दूर का राही चित्रपट परीक्षण: १

बेकरारे दिल... तू गाये जा...

खुशीयोंसे भरे अफसाने 

जिन्हे सूनके दुनिया झूम उठी

और झूम उठे दिल दिवाने 

बेकरारे दिल... अरे, तू गाये जा...

अनेक वर्षांनी अचानक हे गाणं कोणीतरी सोशल मीडियावर गातांना बघायला मिळालं. ते सूर मनात घोळत राहिले, म्हणून मग मूळ गाणं शोधून ते बघितलं.

अत्यंत जुन्या, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातलं एक गीत अशोक कुमार पियानो वाजवत गात होते. त्यांच्या डोळ्यात दुःखाचा सागर... ते ऐकत असणाऱ्या किशोर कुमारांचे डोळेही असेच दुःखाने भरलेले... ते गाणं ऐकून अस्वस्थ झालेली तनुजा, आपल्या बेडरुममधल्या बेडवरून उठून पळतच जिने उतरत अशोक कुमारजवळ पोहोचते. 

त्यांचे पहिले कडवे संपल्यावर पुढचे कडवे ती गाते. ते गात असतांना तिला तिचा जोडीदार आणि त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात.. जे आपल्यालाही प्रेक्षक म्हणून बघायला मिळतात.

त्यावेळी ती गात असते, 

"जिन्हे सून के दुनिया झूम उठी

और झूम उठे दिल..."

आणि तिला ते वाक्य पूर्ण करता येत नाही कारण तिला खूप रडू येतं आणि आवंढा येऊन त्यात तिचे शब्द गिळले जातात..  

इतकं दर्दभरं गीत बघून माझं मन एकदम आक्रंदलं... इतक्या विलक्षण दुःखामागे काय गोष्ट दडलेली असेल, या विचाराने मी हे कोणत्या चित्रपटातलं गीत असेल, याचा शोध घेतला आणि समोर आला एक नितांतसुंदर चित्रपट: "दूर का राही". लेखक, पटकथाकार, संगीतकार, गायक, मुख्य कलाकार सगळं काही किशोर कुमार असलेला हा १९७१ सालचा सिनेमा मला बघायला मिळाला आणि किशोर कुमार यांच्याविषयीचा आदर शतपटींनी दुणावला. 

किशोर कुमार म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर आजवर आला तो एक विनोदी गायक, हसरा आणि हसवणारा, निर्मळ असा आनंद पसरवणारा कलाकार. पण त्याचं हे रूप मात्र माझ्यासाठी नवीन होतं. 

हा चित्रपट युट्यूबवर शोधत असतांना माझ्यासमोर तनुजाची एक मुलाखतही आली. त्यात आत्ताच्या वयात असलेल्या तिने किशोर कुमारचा एक किस्सा सांगितला आहे. 

"दूर का राही" चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान एकदा ती जेंव्हा चित्रीकरण स्थळी पोहोचली, तेंव्हा किशोर कुमार तिला म्हणाले, की आज शूटिंग कॅन्सल. कारण विचारल्यावर म्हणाले माझं प्रोड्युसर सोबत भांडण झालं आहे म्हणून. आता ते स्वतःच प्रोड्युसर होते, हेही तनुजाला माहिती होतं. त्यामुळे तिने बाकी काही न बोलता त्यांना सांगितलं की मग मी माझ्या दुसऱ्या शूटींग स्पॉटवर जाते, जेणेकरून ते शूटिंग लवकर संपवून घरी जाऊ शकेन. 

यावर किशोर कुमारांनी तिला नाही म्हणून तिथेच थांबायला लावले आणि जगभरातली दुःखी गाणी तिला गाऊन दाखवली. ती ऐकून खराब झालेल्या तिच्या मूडला ठीक करण्यासाठी सेटवर सोबत असलेल्या किशोर कुमार आणि अशोक कुमार या दोन्ही मूळच्या भावंडांनी सखाराम, तुकाराम अशी मजेशीर नावं त्यांच्या विनोदी स्टाइलने रॅप स्टाईलने फास्ट स्पीडने टंग ट्विस्टरसारखी गात तिला खूप खूप हसवले. 

अशा या निर्मळ, विनोदी, हरहुन्नरी कलाकाराचा हा चित्रपट बघण्याची इच्छा मग दुणावली. यूट्यूब वर उपलब्ध असल्याने बघणे सोपे झाले. इतरही ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध असू शकेल. कल्पना नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीला लांबून आलेला एक मुसाफिर दाखवला आहे. ज्याची भूमिका किशोर कुमारने केलेली आहे, ज्याला अनेक दिवसांनी बघुन आनंदित झालेले आणि त्याचे स्वागत करणारे गाववाले दिसतात. त्याच्या येण्याने आनंदून गेलेली एक मुलगीही दिसते. ती त्याला म्हणत असते आपण लग्न करूया.  

मात्र त्याचवेळी त्याला लांब एका माणसाला काठीने मारणारे लोक दिसतात, म्हणून तो तिकडे पळत जातो आणि त्या लोकांना थांबवतो आणि विचारतो की तुम्ही त्याला का मारत आहात. यावर ते सांगतात की ह्याला एक असाध्य आजार झालेला आहे आणि तो गावात पसरू नये, म्हणून आम्ही त्याला इकडून पळवून लावत आहोत. 

किशोर कुमार ज्याचे चित्रपटातील भूमिकेचे नाव प्रशांत असते, तो त्यांना असे न करण्याची विनंती करतो आणि म्हणतो की मी त्याला उद्या माझ्यासोबत इकडून दूर घेऊन जातो. लोक ते ऐकतात आणि निघून जातात. मात्र पुढच्या सीनला किशोर कुमारवर प्रेम करणारी मुलगी त्याच्याकडे रडत रडत येतांना दिसते. सोबत आपलं सामान पॅक करून ती घर सोडून निघून आलेली असते आणि किशोर कुमारला सांगते की माझ्या आईवडिलांनी मला तुझ्यासोबत लग्न करायला नकार दिला आहे कारण तू आजारी माणसाला हात लावलास आणि त्याला मदत करणार आहेस. त्यांना हे अजिबात मान्य नाही. मला मात्र तुझ्या ह्या वागण्याचं कौतुक आणि तुझा माणूस म्हणून अभिमानच वाटतो, त्यामुळे मी घर सोडून आलेले आहे आणि तुझ्यासोबत तू जिथे जाशील तिथे येऊन राहीन.

तो म्हणतो, मी एक मुसाफिर आहे. कुटुंब नाही वसवू शकत. एका जागी सेटल नाही होऊ शकत. माझा मार्ग खडतर आहे आणि मला तुला माझ्यासोबत फरफटत नेण्याची अजिबात इच्छा नाही. ती सांगते, काही हरकत नाही. तुझ्यासोबत मी सर्व काट्या कुट्यांवर चालायला आनंदाने तयार आहे.

पण किशोरकुमार, ज्याचे सिनेमातल्या भूमिकेचे नाव प्रशांत आहे, तो याला नकार देतो आणि तिला आपल्या आई वडिलांच्या घरी परत जायला सांगतो आणि तिला त्याला विसरायला सांगून एखाद्या चांगल्या मुलासोबत लग्न करून संसार करायचा सल्ला देऊन तिथून निघून जातो.

तो असं का वागला असेल, तो 'दूर का राही' का असेल, किंबहुना स्वतःला असं का मानत असेल, असा प्रश्न त्यावेळी पडल्याशिवाय राहत नाही आणि चित्रपट पुढे बघत राहण्याची आणि त्यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता हीच चित्रपट पूर्ण बघण्याची प्रेरणा बनून राहते.

मग किशोर कुमार म्हणजेच प्रशांतचे कॅरॅक्टर म्हातारे झालेले, पांढरे केस आणि दाढी असलेले पांढऱ्या शुभ्र बर्फात चालत असलेले दाखवलेले आहे. त्याच्या अंगातले त्राण गळून पडलेले आहेत, पायात पुढे चालण्याची शक्ती संपलेली आहे. घोंघावणारा वारा, थंडी आणि बर्फ या सगळ्यामुळे तो गलितगात्र झालेला आहे आणि एका क्षणी तो त्याच बर्फावर पडलेला दाखवला आहे. त्याचे उघडे डोळे त्याचा जीवनपट उलगडून आपल्याला दाखवत आहेत. 

तरुण वयातला तो आपल्या घोड्यावर बसून गावोगावी फिरत अडल्या नडलेल्या लोकांना मदत करतांना दाखवला आहे. ज्यांना भेटतो, त्या सर्व ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांना आनंद देतो आहे. त्याने एकेकाळी योग्यवेळी केलेल्या मदतीमुळे ज्यांचे आयुष्य मार्गी लागले त्यांनी त्याला त्याच्यामुळे केलेल्या गुंतवणुकीचे मिळालेल्या नफ्यासकट परत केलेले पैसे, जी रक्कम अत्यंत भरभक्कम असते, तिचा स्वीकार करून तो इतर लोकांचे आयुष्य सावरायला पुढे पुढे जात राहतो. ओळखीच्या आणि अनोळखी लोकांसोबत राहून त्यांना आयुष्यात सेटल करण्यात आपले योगदान देत राहतो. यात अनाथ मुलांचे पुनर्वसन, मित्राला मदत, ज्यांच्याविरुद्ध तक्रार करायला सामान्य माणूस घाबरतो, अशांना धडा शिकवणे, असे प्रसंग छान दाखवले आहेत. दुःखाची किनार असलेले हे प्रसंग मनाला भिडतात. हे सगळे दाखवत असतांना वेळोवेळी बर्फावर पडलेला एकाकी असा तो दाखवत राहतात आणि इतकं चांगलं काम करत असूनही आपल्या आयुष्याच्या शेवटी तो एकटा का, असा प्रश्न भेडसावत राहतो आणि त्याचं उत्तर मिळण्यासाठी चित्रपट पुढे पाहत रहावासा वाटतो. 

त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची संधी येते, जी "बेकरारे दिल" या गाण्यातल्या सुंदर, तरुण आणि त्याच्यासारख्याच एकाकी तनुजाच्या स्वरूपात येते, मात्र ती देखील तो आपल्या मनावर दगड ठेवून नाकारतो आणि तिथून निघून जातो. यावेळी मात्र तो प्रेक्षकांना असं वागण्याचं कारण सांगतो. 

ते कारण सांगून होतं आणि बर्फावर निश्चल पडलेला तो दिसतो आणि चित्रपट संपतो. संपतांना एक उदात्त भावना मनात प्रज्वलित करून जातो. ते कारण मात्र मी इकडे सांगणार नाही. त्यानिमित्ताने हा चित्रपट बघितला जावा, असे वाटते. 

असा हा महान चित्रपट बघतांना जुना काळ, तेव्हाचं समाजजीवन बघायला मिळालं. ते जीवन जणु काही एकप्रकारे जगायला मिळालं. ते साधे लोक, त्यांना त्रास देणारे लोक आणि त्यांना आपल्या परीने वाचवणारा, आपल्यासारखाच सामान्य नायक, जो काहीही जास्तीची हिरोगिरी किंवा larger than life कारागिरी न करता परिस्थितीतून मार्ग काढायला मदत करणारा माणूस असलेला दाखवला आहे, तो मनाला भावतो. तो जे करतो ते आपणही करू शकतो, ही प्रेरणा मनात जागवणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट आहे. युट्यूबवर उपलब्ध असल्याने बघणे शक्य झाले.

तो संपल्यावर दाखवलेली त्याची श्रेयनामावलीही अतिशय सुरेख आणि आदर्श अशी आहे. त्यात कलाकारांची नावे लिहितांना त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्सही दाखवल्या आहेत, जेणेकरून कोणाची भूमिका कोणी केली आहे, हे पाहताक्षणी समजेल आणि नावही लक्षात राहील. 

अशी अप्रतिम कलाकृती समाजाला दिल्याबद्दल मी किशोरकुमारची ऋणी आहे.

- सकीना वागदरीकर 



Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३