आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३

हॅनोवर, जर्मनीतील सिनियर केअर नर्सिंग होममध्ये काम करत असतांना काही वेळा अशी व्यक्तिमत्व मला भेटतात, जी बघून मला वाटतं की मी त्यांची सायकॉलॉजिस्ट आहे की ते माझे? काल ज्यांच्याशी ओळख झाली, त्या आज्जींबाबतीत मला असंच वाटलं. ११.११.४४ अशी युनिक जन्मतारीख असलेल्या या जर्मन आज्जीही अतिशयच युनिक आहेत. 

या महिन्यात १० ऑक्टोबरला आमच्या संस्थेत दाखल झालेल्या या आज्जी त्याच दिवशी माझी सुट्टी सुरू झाल्याने माझ्या संपर्कात येऊ शकल्या नाहीत. 

काल सोमवार असल्याने वीकेंडच्या आरामानंतर डोळे चोळत सुरू केलेले काम आणि ते सुरू करतांना सुरुवातीला आरामात संस्थेच्या किचनमधून गरमगरम कॉफी आणून ती घेत घेत इमेल्स वाचणे, डॉक्युमेंटशन वाचणे, त्या दिवशी कोणाला भेटायचे, याचे प्लॅनिंग करणे, या माझ्या रूटीनला फाटा बसला. कारण माझ्या टीम लीडरने मला सांगितले त्या एक आज्जी फार अस्वस्थ असतात आणि त्यांना भेट आणि शांत करण्याचा प्रयत्न कर. मी म्हणाले ओके.  

आज्जींशी अजून ओळख झालेली नसल्याने लगेच आज्जींचे जुने डॉक्युमेंटेशन वाचून त्यांची थोडी माहिती काढून जाऊ,  अजून कोणाला भेटणे आवश्यक असेल, तर ती लिस्ट तयार करून, माझं ईमेल वाचन संपवून जाऊ, असा विचार करून कॉम्प्युटरसमोरच पुढची १० मिनिटे वाचत बसले.  अजूनही ५ मिनिटे बसले असते, तर तेवढ्यात माझा टीम लीडर परत ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला, आज्जींच्या बाबतीत SOS आहे. म्हटलं काय SOS? Emergency service येऊन त्यांना घेऊन गेली का? म्हणजे मला त्यांच्याकडे जायची गरज नाही ना? तर म्हणाले, नाही, लगेच जा त्यांच्याकडे. त्या त्यांच्या व्हीलचेअरवर बसून नुसत्या अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत आहेत, रडत आहेत, इव्हन त्या जिन्याकडे जात आहेत, तिकडे गेल्या तर व्हीलचेअरवरून पडू शकतात, त्या मुळे SOS... त्यांना लग्गेच भेट! 

हे ऐकून मी पटकन उठले आणि त्यांच्याकडे गेले. त्यांच्या रूमकडे जात असतांनाच स्टाफ नर्स भेटली आणि म्हणाली, अगं तू कुठे निघालीस, प्लीज त्या आज्जींकडे जातेस का? मी म्हणाले, हो तिकडेच निघालेय. त्यांची रूम शोधावी लागू नये, म्हणून ती माझ्यासोबत आली आणि मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली. जाऊन बघते, तर आत त्या नाहीत! मग आमची शोधाशोध सुरू झाली. माझा टीम लीडर ऑफिसमध्ये असला तर खिडकीतून बाहेर बघून सांगू शकेल की त्या गार्डनमध्ये आहेत का, म्हणून मी त्याला फोन केला, तर तो म्हणाला, त्या आत्ताच कंपनीच्या कॅन्टीनच्या किचनमध्ये आल्या आहेत आणि तो त्यांच्यासोबतच आहे आणि मला पटकन तिकडे यायला त्याने सांगितलं. स्टाफ नर्स म्हणाली एक मिनिट थांब आणि तिने त्यांच्या स्टेशनवरील ऑफिसमधून सिगरेटचं पाकिट आणि एक लायटर माझ्या हातात दिलं आणि मला सांगितलं की त्या आज्जींना गार्डनमध्ये स्मोकिंगसाठी घेऊन जा आणि फक्त एक सिगरेट पेटवून दे. म्हटलं, ठीके. 

कॅन्टीनच्या किचनमध्ये गेले तर तिकडे त्या मस्तपैकी व्हीलचेअरवर बसुन आमच्या टीम लीडरला सांगत होत्या, मला काही समजत नाहीये, मी ह्या ठिकाणी का आलेले आहे. पण आता मी इथेच बसून राहणार. तो त्यांना सांगत होता, आपण बाहेर जाऊन बोलूया आणि त्या नाही म्हणत होत्या. 

मी तिथे आलेले बघून आणि माझ्या हातात सिगरेट आणि लायटर बघुन त्याला लगेच समजलं की हे त्या आज्जींसाठी आहे. मी स्मोक करत नाही आणि तो करतो, त्यामुळे त्याला तेवढी माहिती साहजिकच असल्याने तो आज्जींना म्हणाला, बघा आमची सायकॉलॉजिस्ट आली आहे आणि येतांना तुमच्यासाठी सिगरेटही घेऊन आलेली आहे. तर आपण जाऊया गार्डनमध्ये स्मोक करायला. 

ही मात्रा लगेच लागू पडली आणि आज्जी पटकन तयार झाल्या गार्डनमध्ये जायला. आता इकडे थंडी थोडी सुरू झाली असल्याने आणि बराच गार वाराही असल्याने टीम लीडर म्हणाला, मी जाऊन आज्जींचे जॅकेट त्यांच्या रूममधून घेऊन येतो. तोवर तू त्यांच्याशी गप्पा मार. मी बोलायला लागले, तर आज्जी म्हणाल्या, एका कागदावर मला एक फोन नंबर लिहून दे. मला तिथे फोन करून मी नेमकी कुठे आहे, हे विचारायचे आहे. मी त्यांना संस्थेचाच नंबर एका टिश्यू पेपरवर लिहून दिला. 

तेवढ्यात तिथे एक बाई आल्या. बाहेरच्या कोणत्यातरी सायकॉलॉजिकल डिपार्टमेंट की संस्थेतून त्या आल्या असल्याचे कळले. आमचे टीम लीडरही तेवढ्यात आज्जींचे जॅकेट घेऊन तिथे पोहोचले. त्यांनी त्या बाहेरून भेटायला आलेल्या बाईंशी दोन शब्द बोलले आणि त्या बाई लगेच निघूनही गेल्या. 

मग टीम लीडर आणि आम्ही गार्डनमध्ये गेलो. टीम लीडर मला म्हणाला, तू पण जॅकेट घालून ये. बाहेर बराच वारा आहे. मी बरं म्हणाले आणि जॅकेट घालून आले, तोवर तो आणि आज्जी स्मोकिंग करायला लागलेले होते. आज्जी बऱ्याच रिलॅक्स झालेल्या दिसत होत्या. छान हसून बोलत होत्या. 

गार्डनमध्ये स्मोकिंगसाठी एक कमान असलेली मेटलची शेड बनवलेली आहे. तीन ते चार लोक आरामात उभे राहू शकतील आणि पाऊस वाऱ्यापासून संरक्षण करत झुरके घेऊ शकतील, इतकी जागा तिच्यात आहे. तिच्यात रेलून हात टेकवून उभं राहण्यासाठी दोन्ही बाजूंना मेटलच्या जाळीचे कठडे बनवलेले आहेत. त्यामागे दोन्ही बाजूंना सिगारेटची थोटके आणि राख टाकण्यासाठीचे छोटुसे कचऱ्याचे डबे आहेत. पाऊस पाण्याचे वातावरण असतांना आणि नसतांनाही बरेच सहकारी तिथे येऊन आपली तल्लफ भागवत, आपला शॉर्ट ब्रेक घेत, गप्पा मारून रिफ्रेश होऊन परत कामाला जातात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे स्मोकर्स एकमेकांशी या एका निमित्ताने जोडले गेलेले दिसतात. असो, 

तर आज्जींमुळे तिथे जाण्याचा माझा योग आला. मला सिगरेटचा धूर सहन होत नसल्याने मी स्मोकर्सपासून चार हात लांबच असते. आमचे टीम लीडर, मी आणि आज्जी असे काल तिथे गेलो आणि बोलायला सुरुवात केली तर लगेच त्याचवेळी आज्जींना भेटायला एक बाई आल्या. त्या दिसायला बऱ्यापैकी आज्जींसारख्याच होत्या पण आज्जींपेक्षा वयाने लहान वाटत होत्या. त्यामुळे त्या त्यांची बरीच लहान बहिण, मुलगी किंवा मैत्रीण असाव्यात, असा अंदाज व्यक्त करत असतांनाच त्यांनी आज्जींना येऊन प्रेमाने मिठी मारली आणि त्यांच्या गालावर चार- पाच किसेस दिले. ते बघून आमच्या टीम लीडरने विचारले, तुम्ही कोण, आज्जींच्या लेक का? यावर त्या म्हणाल्या, नाही, मी तिची जवळची मैत्रीण आहे. 

त्या जवळच्या मैत्रिणीला आज्जींची आजची सगळी कहाणी ऐकवून एका मीटिंगला टीम लीडर गेला. मी पण आज्जींना त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारायला तिथेच राहू देऊन त्यांचा निरोप घेतला. आज्जींच्या मैत्रिणीने माझा फोन नंबर मागितला. नंतर त्यांना माझ्याशी बोलायचे आहे, तेंव्हा त्या मला आज्जींच्या रूममध्ये बोलवून घेतील, असं त्यांनी सांगितलं. मी माझा वर्क फोन नंबर त्यांना दिला आणि माझ्या इतर कामांना निघून गेले. 

नंतर काहीवेळाने मी आज्जी राहतात त्या मजल्यावर गेले असता मला आज्जी आणि त्यांची मैत्रीण आज्जींच्या रुमकडे जातांना दिसल्या. आज्जींच्या मैत्रिणीने मग मला त्यांच्याकडे बोलावून घेतले. आम्ही सोबतच त्यांच्या रूममध्ये गेलो. 

मैत्रिणीने मला सांगितले की आज्जींना बेडवर झोपायची आणि खाली पडायची भीती वाटते. त्यांच्यासाठी म्हणून extra बेड हा कॉटला लागून ठेवलेला आहे, म्हणजे पडल्या तरी बेडवर पडतील. पण आज्जी तरीही घाबरत आहेत. बेडला हवे तेंव्हा वर खाली करता येऊ शकतील असे ग्रीलही आहेत. पण त्या तरीही घाबरत, अस्वस्थ होत असतात. तर तू त्यांच्याशी बोल, त्यांचं कौन्सेलिंग कर. मी म्हणाले, हो नक्कीच आणि रोज एका विशिष्ट वेळेचा रिमाईंडरही लावला, ज्यावेळी मी न विसरता आज्जींना भेटेन. 

मग अनौपचारिक गप्पांना सुरुवात करण्यासाठी मी विचारलं तुम्ही काय करता, त्यांनी त्यांच्या ऑफिस जॉब विषयी सांगितलं. मग मी आज्जींच्या जॉब विषयी विचारलं. तर त्यांनी सांगितलं, ह्या NLP therapist आहेत. (एनएलपी थेरपी, किंवा न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग थेरपी, ही औपचारिक मानसोपचार नाही तर विचार, भाषा आणि वर्तन बदलून आत्म-जागरूकता, आत्मविश्वास आणि संवाद सुधारण्यासाठी तंत्रे आणि तत्त्वांचा संच आहे. एखाद्याचे विचार, भाषा आणि कृती अनुभवांना आकार देण्यासाठी कशा प्रकारे संवाद साधतात यावर लक्ष केंद्रित करून ते कार्य करते. अधिक माहितीसाठी गुगल सर्च करावा.) हे ऐकून मी चकितच झाले. त्यांच्या मैत्रिणीने मला हेही सांगितले की आज्जींनी आजवर २६ पुस्तकं लिहिली आहेत. त्यात पेशंटना Metapher (रूपक) पद्धतीने गोष्टी सांगून आजार बरे करण्यासंदर्भातलेही एक पुस्तक आहे. आज्जी रोज किमान हजार शब्द लिहायच्या एकेकाळी. 

मग त्यांनी आज्जींच्या थेरपीने बरी झालेल्या त्यांच्या नातीचा एक किस्सा सांगितला. या मैत्रिणीच्या नातीला बराच काळ कॉन्स्टिपेशनचा त्रास होता. अक्षरशः किंचाळायची ती वेदनेने. तेंव्हा तिने आज्जींचा सल्ला घेतला. आज्जींनी त्यांचा नातीसाठी एक सशाची रुपककथा लिहिली. ही कथा त्या मैत्रिणीने नातीला वाचून दाखवली आणि त्या क्षणापासून त्यांच्या नातीचा कॉन्स्टीपेशनचा आजार चक्क बरा झाला!!! 

मी थक्क झाले हे ऐकून. मी आज्जींना विचारले, हे खरे आहे का, तर त्यांनी होकारार्थी मान डोलवली. आज्जींच्या मैत्रिणीने सांगितले की उद्या ती त्यांची पुस्तकं आणेल मला वाचण्यासाठी. 

मी आज्जींना म्हणाले, तुम्ही जर इतक्या ग्रेट थेरपिस्ट असाल तर तुम्हीच माझे प्रॉब्लेम्स दूर करू शकाल मी तुमचे करण्याऐवजी. त्या दोघीही हे ऐकून हसायला लागल्या. 

मग मी आज्जींच्या मैत्रिणीला विचारलं की तुम्ही एकमेकींना कसे ओळखता. त्यावर मैत्रिणीने मिश्किलपणे हसत आज्जींना विचारलं, सांगू का मी हिला, आपली मैत्री कशी झाली ते? त्याही हसत म्हणाल्या, जरूर सांग. मग मैत्रिणीने सांगितलं की तिचा नवरा हा आज्जींचा पहिला नवरा आहे. वीस वर्ष एकत्र राहिल्यानंतर वेगळं झालेलं हे जोडपं... मैत्रीण आणि तो नवरा भेटले आणि प्रेमात पडले, लग्न केले, तेंव्हा तो खूपवेळा आज्जींचा बोलण्यात उल्लेख करायचा, त्यांच्याविषयी खूप काही सांगायचा. 

म्हणून मैत्रीण म्हणाली, जिचा तू इतका सातत्याने उल्लेख करत असतोस, ती कोण आहे, एकदा दाखव तरी मला. म्हणून मग त्याने या दोघींची ओळख करून दिली. तर ह्या दोघी एकदम घट्ट मैत्रिणीच बनल्या. आता हीच मैत्रीण आज्जींची ऑफिशिअल केअरटेकरही झाली आहे. 

मी म्हणाले, तुम्ही दोघी काहीही नाते नसतांनाही दिसता किती सारख्या. एकदा डीएनए टेस्टही करून घ्या. त्यावर मैत्रीण मनापासून हसत म्हणाली, हो खरंच करणार आहोत आम्ही आणि म्हणाली की हो ना, आम्हाला सगळेच बहिणी किंवा मायलेकी समजतात. आमचं नातं, ऋणानुबंध जन्मोजन्मीचा आहे आणि पुढच्या जन्मी मला हिला लवकर भेटायचं आहे, आत्तासारखं इतक्या उशीरा नाही. 

मी विचारलं, तुम्हाला मायलेक व्हायला आवडेल का, त्यावर दोघी हो म्हणाल्या आणि आज्जी म्हणाल्या पण मला हिची लेक व्हायला आवडेल. मैत्रीण म्हणाली पण हिची आई होण्यापेक्षा मला हिची मोठी बहीण व्हायला जास्त आवडेल. 

अशा छान गप्पा झाल्यावर मैत्रीण आणि मी दोघीही आज्जींच्या रूममधून त्यांना निरोप देऊन निघालो. उद्या लवकर येईन असे त्यांना मी आश्वासनही दिले. 

आज सकाळी आदल्या दिवशीचे डॉक्युमेंटेशन वाचतांना आज्जींविषयाचे काल दुपारी आम्ही त्यांना भेटून गेल्यानंतरचे रिपोर्टिंग वाचले तर त्यात लिहिलेले होते की आज्जी बऱ्याच अस्वस्थ होत्या. परत जिन्याकडेही गेल्या होत्या. पडता पडता त्यांना कोणीतरी वाचवले होते. कोणाच्या ना कोणाच्या रूममध्ये जाऊन त्यांनी त्यांना डिस्टर्बही केले होते त्यांनी काल रात्री. 

मग मी आज रिमाईंडर अलार्मची वाट न बघता सगळ्यात पहिल्यांदा आज्जींनाच जाऊन भेटले. मला पाहिल्यावर त्यांनी मला ओळखले असल्याचे जाणवले नाही मला. मी काल येऊन गेल्याचे सांगितले, त्यांच्या मैत्रिणीविषयी सांगितले, तर त्यांना काहीही आणि कोणीही आठवेना. 

मी इथे कुठे आले आहे आणि का आले आहे, हे मला प्लीज लिहून दे, असं त्या म्हणाल्या. मग मी त्यांच्या छोट्याशा नोटीस बुकमध्ये त्या शॉर्ट टाइम केअर साठी आमच्या संस्थेत आलेल्या आहेत हे लिहून संस्थेचे नाव, पत्ता, फोन नंबर हे लिहून दिले. तुम्ही संस्थेत सुरक्षित राहण्यासाठी, बरे होण्यासाठी, काळजी करणारे लोक आजूबाजूला असावेत म्हणून आणि एकटे पडू नये, म्हणून आलेल्या आहात, हे  इथे येण्याचे कारण सांगितले, त्यांनी ते सगळे पॉइंट्स लिहून घेतले. 

त्यांना हेही सांगितले की आज तुमची मैत्रीण तुमची पुस्तकं घेऊन येईल. तर म्हणाल्या कोणती मैत्रीण? मग मी तिचं नाव सांगितलं, तर म्हणाल्या, थांब मी तिचं नाव लिहून घेते. मग त्यांनी नाव आणि ती पुस्तकं घेऊन येणार आहे, हेही लिहून घेतले. 

मग त्या मला म्हणाल्या, मला स्मोक करायला घेऊन जाशील का? मी त्यांना सांगितले की तुमचे सिगरेट पॅकेट आणि लायटर मी ऑफिस रूममधून घेते आणि मग आपण जाऊया. आज्जींनीच निघतांना मला त्यांना जॅकेट घालण्याची आठवण करून दिली. 

मला ते लायटर कसे पेटवतात, हे माहिती नसल्याने मी टीम लीडर कडून ते शिकून घेतले, तर त्याने विनोद केला की आता स्मोक करायला नको सुरुवात करुस. मी म्हणाले, मला तो वासही सहन होत नाही, तर मी कसली सिगरेट ओढतेय!! 

मग आज्जींना मी स्मोकिंग कॉर्नरवर घेऊन गेले. त्यांना सिगरेट पेटवून दिली. एक सिगरेट ओढून झाल्यावर त्यांना म्हणाले, तुम्हाला इथल्या रीडिंग रूम मध्ये घेऊन जाऊ का पुस्तकं वाचायला? त्या हो म्हणाल्या. आणि त्यांनी मला विचारलं मला कॉफीही आणून देशाला का? त्यांना मग मी किचन कॅन्टीन मधून गरम गरम कॉफी आणून दिली. बिन साखरेची आणि भरपूर दूध असलेली, त्यांच्या इच्छेप्रमाणे. मग रीडिंग रूममध्ये घेऊन गेले. कोणते पुस्तक वाचायला आवडेल, असे विचारले असता माझे पुस्तक आहे का इथे, असे त्यांनी मला विचारले आणि त्या ते शोधू लागल्या. तुमचे पुस्तक नाहीये इथे, असे मी सांगितल्यावर मग मला ते इथे आणून ठेवले पाहिजे, आण, असं त्या म्हणाल्या. मग अस्वस्थ झाल्या. मग मला घरी घेऊन चल म्हणाल्या. मी त्यांना त्यांच्या रूममध्ये आणून सोडले, तर तिथे त्या त्यांचे पुस्तक शोधायला लागल्या. मी त्यांना सांगितले, मैत्रीण पुस्तक घेऊन येणार आहे आणि नोटीस बुकमधला त्यांचाच मेसेज त्यांना दाखवला. तेथे त्यांनी मग रीडिंग कॉर्नरसाठी पुस्तक आण, असा अजून एक मेसेज ऍड केला. 

मी आज्जींना विचारले की तुम्ही अजूनही मेटाफर लिहिता का? तर त्या म्हणाल्या, लिहिते ना. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही माझ्यासाठी एक मेटाफर लिहाल का? त्या म्हणाल्या लिहीन ना , पण आपण अपॉईंटमेंट घेऊन भेटू. मी म्हणाले, चालेल. मग त्यांनी विचारलं तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत. मी सांगितलं की माझा एक गुडघा दुखतो आहे आणि बरेचदा लो एनर्जी फिल होतं आणि इतक्या कमी वयात मला ही सगळी दुखणी नको आहेत. माझं मूल लहान आहे आणि मला त्याच्यासोबत भरपूर खेळायचं आहे. निरोगी राहायचं आहे अजून अनेक वर्ष. त्यांनी ह्या सगळ्या नोंदी करून घेतल्या. त्यानंतर आज्जींना निरोप देऊन मी बाकीच्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. दुपारी डॉक्युमटेशनला गेलेले असतांना ईमेल वाचण्यात आली की आज्जींना उद्या सकाळी हॉस्पिसमध्ये भरती केले जाणार आहे. (ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी माहिती देते. हॉस्पिस केअरमध्ये अशा पेशंट्सची काळजी घेतली जाते,  जो/जी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचत आहे, जो/जी
 गंभीर आजाराने ग्रस्त आहे अशा व्यक्तीची काळजी, आराम आणि जीवनमान यावर लक्ष केंद्रित केले जाते. एका पॉईंटला त्याच्यावर पुढचे उपचारही न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो परिस्थितीनुसार.)

हे वाचून मी एकदम सुन्न झाले. माझ्या कामाची वेळ खरं तर संपत आलेली होती. पण उद्या मी कामावर यायच्या आत या आज्जी निघून गेल्या तर काय, या विचाराने मी पटकन त्यांना भेटायला गेले. 

त्या बेडवर पडलेल्या होत्या. मी त्यांना काहीही सांगणार नव्हते त्यांच्या जाण्याबद्दल. त्यांचा फक्त निरोप घेणार होते, तर त्या स्वतः च म्हणाल्या, उद्या मी इथून जाणार आहे असं त्यांना सांगितलं गेलं आहे. मी म्हणाले, हो, समजलं ते मला, म्हणूनच मी भेटायला आलेय तुम्हाला. त्या मग म्हणाल्या, मला मी कुठे जाणार आहे, हे मात्र माहिती नाही. मी यावर गप्प बसले. 

मग मी त्यांना म्हणाले, आपलं NLP थेरपी सेशन आता राहूनच जाणार आणि त्यांना विचारलं, तुम्हाला वेळ मिळाला का माझ्यासाठी मेटाफर लिहायला? त्या म्हणाल्या, लिहिलं नाहीये पण माझ्या डोक्यात तयार आहे. मला वाटलं होतं की त्या हे सगळं विसरलेल्या असतील एव्हाना, त्यांचा विस्मरणाचा आजार बघता. पण त्यांना लक्षात होतं. मग मी म्हणाले, तुम्ही मला ते सांगाल का आत्ता, त्या हो म्हणाल्या आणि उठून बसल्या. त्यांना तेवढ्यात खोकल्याची उबळ आली म्हणून मी पाणी दिलं आणि त्यांचा बेड बटन दाबून हाय केला. त्या म्हणाल्या बेड नको हाय करुस. मला खाली पडायची भीती वाटते. मग मी तो परत लो केला. 

त्या मग तशाच पाठीच्या सपोर्ट शिवाय बसून राहिल्या. पाणी पिऊन मला ग्लास परत दिला आणि माझ्यासाठी तयार केलेले मेटाफर सांगायला लागल्या, "एक मांजर असते. ती रोज झाडावर चढत असते, उड्या मारत उतरत असते, पण एक दिवस तिला ते जमेनासे होते. ती विसरलेली असते की तिच्यात किती स्किल्स आहेत. ती किती ॲक्टिव्ह आहे, कशी झाडावरून उड्या मारू शकते, कशी झटकन शिकार करू शकते, कशी तिच्या बाळाला समर्थपणे सांभाळू शकते. तिला आपले सगळे स्किल्स आठवोत."  आणि आज्जी ही सगळं सांगत असतांना पूर्णवेळ आपल्या गुडघ्यावरून हात फिरवत होत्या. त्या इतके बोलून शांत झाल्या. मला वाटलं अजून सांगणार आहेत. पण त्यांची रूपक कथा इथेच संपलेली होती. त्या क्षणी मी गुडघे वेगवेगळ्या पद्धतीने हलवून बघितले, तर माझे दुखणे गायब झालेले!! 

मी आज्जींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, हे कसं काय शक्य आहे? तुम्ही जादूगार आहात का ? की निसर्ग देवता आहात? त्या म्हणाल्या मी हे दोन्हीही नाही. मी म्हणाले मग नक्कीच निसर्गदेवतेचे दूत आहात. त्या हसल्या आणि म्हणाल्या, हे मात्र मी असू शकते. 

मग त्या उद्या इथून जाणार म्हणून माझ्या डोळ्यातूनच पाणी यायला लागलं. त्यांनी मग मला मिठी मारली आणि म्हणाल्या, तू फार गोड आहेस. मी म्हणाले , तुम्हीपण फार गोड आहात आणि म्हणाले, आपली फक्त दोन दिवसांची ओळख आहे आणि मी इतकी अटॅच झालेय तुमच्यासोबत. आपले नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असतील ना? 

जशी दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ...

त्या म्हणाल्या, हो, हे बरोबर आहे. साश्रुनयनाने त्यांना निरोप देऊन तेथून मी बाहेर पडले. त्यांच्या मैत्रिणीचा नंबर लिहून ठेवला आहे. मला वाटल्यास, जमल्यास त्यांना हॉस्पिसमध्ये भेटायला जाईन. 

त्यांनी सांगितलेली मांजरीची गोष्ट आता मी मनात कोरून ठेवलेली आहे. कुठलंही दुखणं वर आलं की मी ती आठवणीने आठवणार आहे आणि स्वतःलाच सांगणार आहे.

सकीना वागदरीकर/ जयचंदर

२८.१०.२०२५

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:

https://sakhi-sajani.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१