Harz Trip
जर्मनीतील हॅनोवर शहरापासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या Harz ह्या ठिकाणाविषयी बरंच ऐकलं होतं, पण ते पाहण्याचा योग मात्र ह्या इस्टरनिमित्त मिळालेल्या लॉंग विकेंडला आला. ह्या युनिक ट्रिपचे अनुभव लिहून काढावे, असं मनात होतंच, पण बाबांनी लिहायला सांगितल्यावर तो विचार मनात पक्का झाला. ट्रीपला जाऊन आता एक आठवडा पूर्ण होईल, मग जसजसा वेळ जातो, तसतशा आठवणीही पुसट होत जातात. मात्र दिवस सुरू झाला की ऑफिस आणि घरकामात वेळ जातो आणि रात्री दमून झोप लागते, या सगळ्यात लिहायला वेळ कसा काढायचा , हेच समजत नव्हतं. आज मात्र मध्यरात्री जाग आली ती लिहिण्याची उर्मी येऊनच. उठ आणि लिही असं एक मन मला सांगत होतं चक्क! तर दुसरं म्हणत होतं, उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे. आत्ता जागलीस तर दिवस थकव्यात जाईल. ह्या द्वंद्वात अर्धातास पडून राहिले. शेवटी पहिल्या मनाचं ऐकायचं ठरवलं आणि उठलेच! असो, तर नमनाला घडाभर तेल ओतून झालं आहे, तेंव्हा मूळ मुद्दा सुरू करते. ह्या इस्टरच्या सुट्टीत आपण नक्की जायचं कुठे, नक्की जायचं कुठेतरी की जरा घर वगैरे नीटनेटकं आवरत भरपूर आराम करायचा, नेटफ्लिक्स सिरीज बिंज वॉज करायच्या,