आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

बरोबर दोन वर्ष होतील काही दिवसांनी डायरीचा ५० वा भाग लिहून.. साडेपाच वर्षं झाली बघता बघता जर्मनीतील हॅनोवर शहरात सिनिअर केअर होम मध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करायला सुरुवात करून. इथे काही दिवसांसाठी ऍडमिट झालेले ते कायमचे रहायला आलेले असे कितीतरी लोक रोज पहायला मिळतात. माझ्याकडून त्यांना एक मनापासून ऐकणारा कान मिळतो, तर त्यांचे बोलणे ऐकत असतांना वेगवेगळ्या जीवनानुभवांनी मी समृद्ध होत जाते. अशाच एका आज्जींची गोष्ट आज मी सांगणार आहे.

शुक्रवारी आमच्या संस्थेत एक ऐंशी प्लस वयाच्या आज्जी दाखल झाल्या. त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडून जर्मनीतील गरीब लोक एकेकाळी कसे राहत असतील, ह्या कधी मनातही न आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 

अतिशय नीटनेटक्या, फ्रेश दिसणाऱ्या, केसांची छान स्टाईल केलेल्या, एका पायाला लागलेले असल्याने बँडेड लावलेल्या, व्हीलचेअर वर बसुन इकडे तिकडे जाणाऱ्या आणि सतत एकतर चेक लिही किंवा शब्दकोडे सोडव, असं करत स्वतःला गुंतवून घेतलेल्या सोफिस्टिकेटेड, मृदुभाषी आणि गोड अशा या जर्मन आज्जींनी किती गरिबीत आयुष्य काढून इथवरचा पल्ला गाठलेला आहे, याचा अंदाज करता आलाच नसता मला त्यांच्याशी बोलल्याशिवाय. 

त्यांच्या वडिलांचे घड्याळ बनवण्याचे दुकान होते, पण वडील सगळे पैसे दारूतच उडवत असत, त्यामुळे घरात फार हलाखीची परिस्थिती होती त्यांच्या. त्यातून वयाच्या १३ व्या वर्षी आज्जींची आई कॅन्सरने वारली. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. आज्जींनी त्यांच्या आईच्या छातीत असलेली गाठ बघितली होती, पण त्यांची आई डॉक्टरांकडे मात्र उपचारासाठी गेली नव्हती. त्या काळी लोकांना डॉक्टरांकडे जायची, इलाज करून घ्यायची लाज वाटायची म्हणे. त्यामुळे त्यांच्या आईच्या गाठी वाढत जाऊन एक दिवस त्या वारल्या. 

आज्जी १३ वर्षाच्या, वडील दारुडे, आज्जींना काहीही घरकाम येत नव्हते, स्वयंपाक, कपडे धुणे, काहीही माहिती नव्हतं. त्यांची आई जिवंत होती, तोवर तिनेच सगळ केलेलं होतं. मुलीला काहीही शिकवलेलं नव्हतं. शिवाय आई त्यांच्याबाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्याने तिने कधी लेकीला इतर मुलांसोबत खेळायला सुद्धा पाठवलं नव्हतं. रस्त्यावर खेळतांना गाडी येऊन अपघात होऊ शकेल, अशी भीती त्यांच्या आईला असायची. त्यामुळे कोणीच फ्रेंड सर्कल ही नव्हतं आज्जींचं. 

मी आजींना विचारलं, मग कसं मॅनेज केलंत सर्व? वडील दारू पिऊन मारायचे का? त्यावर आज्जी म्हणाल्या, नशीब, तेवढं मात्र ते कधीच करत नसत. शांत होते ते. वडिलांनीच मला सगळं काम शिकवलं, असं त्या म्हणाल्या. 

१३ वर्षांची आईविना मुलगी म्हटल्यावर माझ्या मनात साहजिकच प्रश्न आला, तो म्हणजे वयात आल्यावर कोणी त्यांना सगळं शिकवलं असेल बरं... मी तो विचारल्यावर आज्जी म्हणाल्या, की त्या वयाच्या साडे दहाव्या वर्षीच वयात आल्या, त्यामुळे त्यावेळी आई जिवंत होती. पण त्यांच्या आईची प्रतिक्रिया त्यावेळी अतिशय अनपेक्षित होती. त्यांची आई अतिशय खेद व्यक्त करत म्हणाली होती, अरे अरे! किती वाईट गोष्ट घडली ही आता तुझ्याही आयुष्यात. बायकांचा जन्मच खराब!! आता दर महिन्याला ते घाणेरडं रोगट रक्त चार पाच दिवस शरीरातून बाहेर पडणार. बाकी त्यांनी या विषयावर त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे आज्जींना वाटायचं हे फार घाण काहीतरी आहे. त्यांच्याकडे नशिबाने त्या काळात सुद्धा सॅनिटरी पॅड उपलब्ध असल्याने ते बदलणे, इतकेच त्या करायच्या. स्वतःच्या रक्ताला हातसुद्धा लावायच्या नाहीत. धुणे वगैरे तर दूरच! 

शाळेतल्या मुली ह्या आज्जींपासून त्यामुळे लांबच बसायच्या, त्यांच्या अंगाचा घाण, उग्र वास येतो, म्हणून! आज्जींना कित्येक दिवस काही कळायचं नाही, का त्यांच्याशी मुली अशा वागतात म्हणून...

असो, तर आई सोबतचे आयुष्यही इतके काही छान नसतांना आईविना आयुष्य मात्र अजूनच बिकट होऊन गेले होते.

त्यातल्या त्यात एकच चांगली गोष्ट त्यांच्या आयुष्यात होती, जी म्हणजे शाळा. शाळेमुळे त्यांच्या जीवनाला एक स्ट्रक्चर लाभलं, एक शिस्त मिळाली, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांना शाळेत जायला मनापासून आवडायचं. 

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक सुखद घटना घडली. एक जर्मनीत राहणारा फ्रेंच मुलगा त्यांना भेटला. आज्जींपेक्षा 2 वर्षांनी मोठा. तोही शिकत होता, आज्जीही शिकत होत्या. मूळचा तोही गरीब घरातलाच असल्याने शालेय शिक्षण सुरू असतांनाच आर्थिक मदत व्हावी म्हणून आज्जींच्या वडिलांचा घड्याळ बनवण्याचा व्यवसाय त्याने शिकून घेतला. 

मग हळूहळू त्याने ते दुकानच सांभाळायला सुरुवात केली. मग आज्जीही ते काम त्यांच्यासोबत करू लागल्या आणि दोघं मिळून हा वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले. त्यानंतर त्या दोघांनी लग्नही केलं. मग ते दोघं एका भाड्याच्या घरात रहायला गेले. 

त्यांच्याकडे पैसे इतके कमी होते की त्यात एक छोटीशी खोलीच मिळू शकली. त्या खोलीत ना बाथरूम, ना टॉयलेट, ना पाणी भरण्यासाठी नळ! पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी घरमालकिणीच्या घरी जाऊन बादली भरून आणावी लागत असे. कॉमन toilet वापरावे लागे आणि अंघोळीसाठी गावात एका ठिकाणी बाथटब होता, तिथे पन्नास सेंट देऊन अर्धातास जाऊन बसता येत असे.   त्याकाळचे चलन युरो नसून डी मार्क होते, हे ही आज्जींनी आवर्जून सांगितले. त्या बाथटबमध्ये अंग भिजवून ते धुणे, हीच काय ती अंघोळ असे. जी त्यांना फक्त आठवड्यातून एकदाच करणे परवडायचे. 

अशा परिस्थितीतही त्या अतिशय खुश होत्या, कारण चांगला जोडीदार मिळालेला होता.  यथावकाश त्यांना दोन मुलेही झाली. 

त्यानंतर जरा बरे दिवस दिसायला लागल्यावर त्यांनी जरा चांगले भाड्याचे घर घेतले. जिथे आत पाण्याचा नळ बघून त्या हरखून गेल्या होत्या! गारच पाणी त्यातून येत का असेना, स्वतःचा नळ, ही एकंदम सुखावणारी गोष्ट होती त्यांच्यासाठी. घरातच बाथरूम आणि टॉयलेटही होते. 

५५ वर्षांच्या सुखी संसारानंतर मागच्या नोव्हेंबरमध्ये आज्जींचे मिस्टर कॅन्सरने वारले. आधी त्यांना आतड्याचा आजार झाला, त्यामुळे ते आतडे काढून टाकावे लागले. युरिन साठी कॅथेटर असते तसे स्टूल साठी स्टोमा बॅग असते. डायरेक्ट आतड्याला ती जोडलेली असते. ती आजोबांना बसवावी लागलेली होती. 

दिवसा ती रिकामी करायला नर्सेस येत. पण रात्री आज्जींनाच हे काम करावे लागे. त्यांना स्वतःला सेप्सिस झालेले असतांना आणि त्यांच्या पायाला त्यामुळे जखम झालेली असल्याने त्या स्वतः अपंग झालेल्या असतांनाही त्यांनी चार वर्ष आजोबांची स्वतः सेवा केली. 

कॅन्सर झाल्यावर मात्र आजोबांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले. पण आजोबा म्हणाले, मला अजून काहीच उपचार नकोत. झाले, तेवढे पुरे! मला घरी जायचं आहे. आज्जींनी त्यांना सांगितलं की त्या काहीच सेवा करण्याइतक्या सक्षम राहिलेल्या नाहीत. तर आजोबा म्हणाले, तू काहीच करू नकोस पण मला माझ्या शेवटच्या दिवसात घरी राहू दे आणि ते घरी निघून आले. घरी आल्यावर दोनच दिवसात त्यांनी आज्जींच्या मांडीवर आपले प्राण सोडले. मुलंही होती त्यावेळी त्यांच्याजवळ. तेही त्यांच्या आई वडिलांना जमेल तशी मदत करतच होते. 

आता आज्जी अजूनही त्याच फ्लॅटमध्ये दोघांपैकी एका मुलासोबत राहतात. ते घड्याळाचं दुकान आता त्यांच्या मुलाने फोटो स्टुडिओत कन्व्हर्ट केलं आहे. तिथे तो फोटोग्राफी, फोटो एडिटिंग वगैरे कामं आनंदाने आणि आवडीने करतो. 

दुसरा मुलगाही काहीतरी काम जवळच्याच गावात करतो. 

दोघांनी लग्न केलेलं नाही. मात्र एकाला गर्लफ्रेंड आहे. नातवंडं नाहीत आज्जींना.

आता चार आठवडे सीनिअर केअर होम मध्ये राहून पायाला उपचार आणि आराम देऊन त्या आपल्या घरी परत जाणार आहेत, आपल्या मुलासोबत राहायला.  

पहिल्याच भेटीत इतकं भरभरून बोलून आपला जीवनपट मोकळेपणाने मांडणाऱ्या आज्जींसोबत एकदम पटकन मैत्री झाली आहे. इतके सगळे सोसूनही अतिशय सकारात्मक विचार करणाऱ्या ह्या हसऱ्या आज्जींचे कौतुक वाटते.

काल आमच्या कंपनीत वाईन फेस्टीव्हल होता. त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लोकांची नावे ऑलरेडी देऊन झाली होती. म्हणून आज्जींनी मला विनंती केली की त्यांचंही नाव त्यात टाक म्हणून. शिवाय इरिट्रिया या छोट्याशा देशातली त्यांची एक जुनी मैत्रीण त्यांना भेटायला येणार असल्याने तीही त्यात सहभागी होऊ शकेल का, हेही विचारायला लावले मला आणि होकार मिळाल्यावर दोघींची एंट्री फी सुद्धा देऊन टाकली लगेच. चेंज ठेऊन घे म्हणाल्या मला. त्याची कॉफी पी, असे सांगितले. मी पैसे घेतले नाहीत. तर त्यांना जरा वाईट वाटले. म्हणून मी म्हणाले की आपण दोघी एकदा निवांत इथेच कॅन्टीन मध्ये आइस्क्रीम खायला जाऊ. तेंव्हा तुम्ही द्या पैसे. मग त्या खुश झाल्या. 

आज वाईन फेस्ट कसा झाला हे विचारायला मी त्यांना परत भेटले, तर म्हणाल्या, खूप मजा आली. त्यांची मैत्रीण तर आलीच, शिवाय सोबत तिच्या नवऱ्यालाही घेऊन आली, त्यामुळे त्या तिघांची एक छोटीशी पार्टीच झाली काल. 

कंपनीत असलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याची आज्जींनी इच्छा व्यक्त केली असून आज त्या पुस्तकाचे सामूहिक वाचन उपक्रमात आनंदाने सहभागी झाल्या. 

त्यांना छान गप्पिष्ट शेजारीणही मिळाली आहे त्यांच्या डबलरूममध्ये. त्यामुळे त्यांचा स्टे मस्त जाणार आणि खडखडीत बऱ्या होऊन त्या घरी जाणार, याची खात्री वाटते. 

सकीना वागदरीकर/ जयचंदर

१८.०९.२०२५


आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:

https://sakhi-sajani.blogspot.com



Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३