आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

दोन वर्षांनी धक्का स्टार्ट केलेली डायरीची गाडी आता सुसाट सुटली असल्याने लिहून डोळे आणि अंगठा हे अवयव थकले असले तरी मन मात्र फ्रेश झालेले आहे. तो लिहिण्याचा flow किती काळ टिकेल, मी पण सांगू शकत नाही. त्यामुळे लगेच पुढचा भाग लिहित आहे. (अशी सुरुवात करून आणि थोडे लिहून झाल्यावर काही पुढे लिहिणे झाले नाही, ते डायरेक्ट आजच पूर्ण करू शकले.)

हॅनोवरमधील सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असतांना भेटत असलेल्या लोकांमध्ये सगळ्यात वेगळे, युनिक म्हणता येईल असे आणि अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व मला मागच्या महिन्यात भेटले. ती भेट पटकन शब्दात नाही उतरवली, तर त्यातले बरेचसे तपशील मीच विसरून जाईन, म्हणूनही लगेच लिहित आहे. 

मागच्या महिन्यातली गोष्ट.. 

आदल्या दिवशी दुपारी नवीन रेसिडेंट दाखल झाल्याची इमेल वाचली आणि लगेच त्यांना भेटायला गेले. त्या बाई फोनवर बोलत होत्या आणि त्यांच्या अंगावर काहीही कपडे नव्हते. त्या मात्र या बाबतीत रिलॅक्स होत्या, असे जाणवले. मी नर्सला नंतर याबाबतीत विचारले, तर तिने काहीतरी सांगितले, जे काही मला नीटसे आठवत नाहीये.

मागच्या भागात उल्लेख केलेली मलमूत्र विसर्जनासाठीची स्टोमा बॅग त्यांनाही लावलेली दिसत होती. जनरली ती बॅग छोटीशीच असते. पण यांची बॅग थोडी मोठी तर दिसत होतीच, शिवाय तिला जास्तीचा एक पाईपसुद्धा बसवलेला होता. तो जमिनीवर त्यांच्या कॉटखाली कशात तरी रिकामा होत असावा. 

त्या बाईंचा अगडबंब देह, ती उघडी स्टोमा बॅग, तो हिरवा पिवळट लिक्वीड भरलेला पाईप बघून माझ्या घशातच कसंतरी व्हायला लागलं. त्यांचा फोनही सुरू असल्याने मी ती संधी साधून तिकडून पटकन कल्टी मारली. 

त्यांना दुसऱ्यांदा भेटायला गेले, तेंव्हा त्या झोपलेल्या होत्या. मग मात्र दुसऱ्याच दिवशी परत त्यांच्याकडे गेले. ह्यावेळीही त्या तशाच उघड्या दिसल्या, मात्र फोनवर नव्हत्या. त्यांना ते नवीन असल्याने मी संस्थेत वेलकम केलं, माझ्या कामाचं स्वरूप सांगत ओळख करून दिली आणि विचारलं की तुम्ही कपडे का नाही घालत आहात. 

त्यांनी सांगितलं की त्यांच्या स्टोमा बॅगची नीट ऍडजस्टमेन्ट व्हायची आहे, त्यामुळे त्यांना ती उघडी ठेवायला लागते आहे. सगळं खराब होऊ नये म्हणून ते तसे उघडे राहत आहेत, असं त्यांनी सांगितलं. दोन वाक्य बोलले असू नसू तर त्यांना मळमळायला लागलं आणि उलटी होऊ लागली, म्हणून मग मी नर्सला कळवलं. बिचाऱ्या नर्सचं काम किती अवघड असतं ना? आपल्याला  कोणाला तरी उलटी होतांना बघूनच कसंतरी होतं. नर्सला मात्र ते सगळं स्वच्छही करावं लागणार आहे, याचं दुःख माझ्या मनात होत राहिलं. नर्सेसच्या कामाविषयी आदर दुणावला. नंतर परत त्यांना काही तासांनी भेटायला गेले, तेंव्हा ते झोपलेले होते. अशाप्रकारे हाही दिवस मी काही त्यांच्याशी बोलू शकले नाहीच.

तिसऱ्या दिवशी नेटाने केलेल्या प्रयत्नात मात्र मी त्यांच्याशी बोलण्यात यशस्वी झाले आणि एक अतिशयच इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व माझ्यासमोर उलगडले. तब्बल एक ते दीड तास मी त्यांच्या रूममध्ये बसून होते, नव्हे खुर्चीला खिळूनच होते, असे म्हणायला हरकत नाही, एवढी त्यांची गोष्ट सुरस होती. 

आज त्यांच्या अंगावर पांघरूण होते. 

त्यांचे आडनाव मी जर्मन पद्धतीने उच्चारले, तर त्यांनी मला ते इंग्लिश पद्धतीने उच्चारायला लावले. (काही जर्मन शब्द आणि आडनावांचा उच्चार करतांना स चा उच्चार श सारखा केला जातो.) मग साहजिकच मी विचारले की तुम्ही ब्रिटिश आहात का? होकारार्थी उत्तर मिळाल्यावर मला काय आनंद झाला! कुठल्याही भाषिक अडथळ्याशिवाय बोलता येण्याचा हा आनंद काही वेगळाच होता. 

ह्या ६८ वर्षांच्या बाईंना मी संभाषणाची सुरुवात म्हणून कुटुंबाची माहिती विचारली. तर त्यांनी त्यांना पहिल्या लग्नापासून एक आणि दुसऱ्या लग्नापासून एक मुलगी असल्याचे सांगितले. तुमचे मिस्टर कुठे आहेत, असे विचारले असता, मिस्टर नाही, तर मला मिसेस आहे..नाही... होती, असे त्यांनी सांगितले आणि त्यांची पहिली बायको ब्रिटिश असून दुसरी जर्मन असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर काहीतरी चुकीचे ऐकले, असे वाटले ना? किंवा मग मनात आले असेल ना की त्या लेस्बिअन असतील? तर अर्थातच ते माझ्याही मनात आलेच आणि मी त्यांना विचारले की मग मुली तुम्हाला झाल्या की तुमच्या बायकोला? त्याचे मला मिळालेले उत्तर अतिशय अनपेक्षित होते. 

त्यांनी सांगितले की त्यांना मूल बाळ होणे शक्य नाही, कारण ते मुळात एक पुरुष होते आणि ऑपरेशन करून ते स्त्री झालेले आहेत! हे ऑपरेशन त्यांनी २० वर्षांपूर्वी केले आहे!!

त्यांनी हे सांगताच मी त्यांच्या चेहऱ्याचे नीट निरीक्षण केले आणि मला लक्षात आले, अरे! खरंच की! ह्यांचा चेहरा पुरुषी वाटतो आहे. भुवया छान बारीक कोरलेल्या होत्या. शिवाय त्यावर भुवयांच्या आकारात काळे टॅटूही काढून घेतलेले होते. मग माझी नजर त्यांच्या खांद्यावर गेली. तेही पुरुषांसारखे ब्रॉड होते. ब्रेस्ट मात्र अगदी स्त्रियांसारखे होते. 

मागच्या दोन्ही भेटींमध्ये ते पूर्णपणे उघडे असले तरीही मी त्यांच्या खाजगी अवयवांकडे नीट बघितलेले नव्हते. त्यांनी ऑपरेशनचे सांगितल्यावर मी त्यांना म्हणाले, वॉव! तुम्ही माझ्या आयुष्यातले असे पहिले व्यक्ती मला भेटले आहात, ज्यांनी या प्रकारचे ऑपरेशन करून घेतलेले आहे. तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला नीट बघू शकते का? मला प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

त्यावर ते म्हणाले माझी काहीही हरकत नाही. तू बघू शकतेस. तू जर मुलगा असतीस, तर मात्र मला ते दाखवायला आवडले नसते. असे म्हणून त्यांनी मला त्यांचे शरीर नीट दाखवले. मी डॉक्टरांनी केलेल्या ह्या सर्जरीने इतकी इंप्रेस झाले की काय सांगू!!! इतके हुबेहुब एका पुरुषाचे स्त्रीमध्ये रूपांतर करता येऊ शकते, यावर माझ्या डोळ्यांचा विश्वासच बसेना!!! हे डॉक्टर आहेत की शिल्पकार, की साक्षात निसर्गदेवतेचे दूत असा प्रश्न पडावा इतके परफेक्ट त्यांनी सगळे काम केलेले दिसत होते. 

मी त्यांना म्हणाले, की मी भाग्यवान आहे की मी एक मुलगी आहे. मुलगा असले असते, तर मला डॉक्टरांनी घडवलेली एवढी सुंदर कलाकृती बघण्यापासून मुकावे लागले असते. मी जर एक पुरुष मानसशास्त्रज्ञ असते, तरी तुम्ही मला नसते का पाहू दिले? त्यावर ते हसून म्हणाले की मी डॉक्टरांना आणि नर्सेसनाही बघू देतो. सायकॉलॉजिस्ट तर डॉक्टरांसारखेच असतात, तेंव्हा माझी काही हरकत नसली असती त्यांच्याही बाबतीत. मग मला जरा बरं वाटलं. 

त्यानंतर मग मी त्यांना त्यांच्या ऑपरेशनविषयी विचारलं. की हे नक्की कसं केलं. त्यांनी सांगितलं की कट केलेल्या त्यांच्या पुरुषी अवयवाचा आणि स्किनचाच उपयोग करून हे ऑपरेशन करण्यात आलेले आहे. मग मी विचारले, तुम्हाला यातून जे अपेक्षित सुख आहे ते उपभोगायला मिळते का? तर त्यांनी सांगितले, हो तर! आणि म्हणाले की डॉक्टर त्यांच्याच शरीरातील नर्व्हजचा उपयोग करून त्यांना जी-स्पॉटही देण्यात यशस्वी झाले आहेत, जो त्यांना ऑर्ग्याझमही देऊ शकतो!! हे ऐकून तर मी चकितच्याही पलीकडे झाले.  त्यानंतर त्यांनी सांगितले की डॉक्टरांनी जे आत होल बनवलेले आहे, ते व्यवस्थित तसेच राहण्यासाठी तसेच मोठे होण्यासाठी त्यांना व्हायब्रेटरचा रोज काही दिवस उपयोग करायला सांगितले होते. 

हे ऑपरेशन आठ तास चालले असून त्यानंतर त्यांना ऑपरेशन झाले त्या जागी प्रचंड इचिंग होत होते. डॉक्टरांनी सांगितले की हा एक साइड इफेक्ट असून उपचार म्हणून त्यावर दोन आठवडे सातत्याने थोड्या थोड्या वेळाने बर्फ घासायला लावले. तेंव्हा कुठे ते इचिंग थांबले.

मग मी त्यांना विचारले, तुमचे ब्रेस्ट सिलिकॉन इम्प्लॅन्ट केलेले आहेत का, तर त्यांनी सांगितले की हार्मोन थेरपीने वाढवलेले ब्रेस्ट आहेत हे. त्यांच्या शरीरावरील सर्व केसही हार्मोन थेरपीनेच गेलेले आहेत. त्याच थेरपीमुळे त्यांची स्किनही मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसत होती. 

ते हे सगळं सांगत असतांना आम्ही दोघेच असल्याने मी अतिशय उत्सुकतेने आणि मोकळेपणाने ऐकले, मात्र आता लिहितांना मला खूप जास्त संकोच होतो आहे. लिहू की नको, या दोलायमान अवस्थेत मी गेले कित्येक दिवस होते. त्यामुळेच दोन वर्षांनी डायरी लिहायला सुरुवात केल्यावर हा अनुभव लिहिण्याऐवजी आधी दुसऱ्या आज्जींची ओळख करून दिली. पण नंतर मनाला समजावले, आपल्याला मिळणारं सगळं ज्ञान कोणीतरी हिंमत करून, संकोच दूर सारून दिलेलं असतं, म्हणूनच आपल्याला ते मिळतं, मग हे अतिशय दुर्मिळ असं मिळालेलं ज्ञान वाटणं आपली ही नैतिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीसुद्धा आहे, जी आपण जपलीच पाहिजे, त्यांनी जपली तशी...

"आपणासी जे जे ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन..." ही समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली उक्ती लक्षात घेऊन आणि आचरणात आणायचे ठरवून ही सगळी माहिती कोणताही आडपडदा न ठेवता लिहिते आहे. 

बरेचदा आपल्याला अजिबात माहिती नसते किंवा फार थोडी माहिती असते, त्या जोरावर आपण समोरच्याला जज करत असतो, वेगवेगळे लेबल्स लावत असतो. पण जेंव्हा आपण आपल्याला हव्या असलेल्या शरीरात नाही आहोत आणि वेगळ्याच शरीरात अडकलेलो आहोत, असे एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, त्यामुळे तो/ती अस्वस्थ होत असेल आणि हवे ते शरीर मिळण्याइतके विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे गेलेले असेल, त्यासाठी खर्च करण्याची आणि हवे ते सोसण्याचीही तयारी असेल, तर का नाही त्या व्यक्तीला असे करायला परवानगी दिली जावी, नाही का? 

तरीही स्वतःच्या घरातच आणि जोडीदाराबाबतीतच असे काही होत असल्यास मनाची तयारी नसणे, तेवढा स्वीकार नसणे, हेही मी समजूच शकते. 

त्याचमुळे जेंव्हा त्यांच्या ब्रिटिश पत्नीने काही वर्षांच्या संसारानंतर आणि एक मुलगीही झाल्यानंतर जेंव्हा त्यांना आपल्या जोडीदाराचा हा विचार पचनी पडला नाही आणि त्यांच्यापासून वेगळे होण्याचा तिने निर्णय घेतला, ते मी समजून घेऊच शकले. 

त्यांच्या पहिल्या पत्नीला त्यांचा एवढा राग आला की त्यांनी घटस्फोटानंतर त्यांना आपल्या मुलीपासूनही वेगळे केले आणि ते राहत असलेले गाव सोडून दुसरीकडे मुलीला घेऊन त्या निघून गेल्या. आपले नावही बदलले. त्यामुळे त्यांचा त्यांच्यासोबत कोणताही संपर्क शक्य झाला नाही. महतप्रयासाने खूप शोध घेतल्यानंतर त्यांना समजले की त्या दुसऱ्या देशातल्या एका माणसाशी लग्न करून त्या देशात सेटल झाल्या आहेत. मुलगीही तिकडेच असते आणि त्यांना नातवंडंही आहेत, ज्यांना ते आजवर पाहू, भेटू शकलेले नाहीत. 

ब्रिटिश आर्मीत पंधरा वर्षे नोकरी करून तिथून सेवानिवृत्त झालेल्या ह्या गृहस्थांनी मग सिक्युरिटी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब्ज केले. अशाच एका जॉबच्या निमित्ताने ते जर्मनीत आले. इथे त्यांना एक जर्मन मुलगी भेटली. ती त्यांची चांगली मैत्रीण झाली. तिला त्यांनी आपली सगळी कहाणी ऐकवली. ती म्हणाली, तुमच्या बायकोने हे चुकीचे केले. तुमच्या शरीरावर आणि मनावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्हाला तिने करू द्यायला हवे होते. ह्या मुलीने त्यांच्याशी हे सगळे माहिती असूनही लग्न केले, त्यांच्यापासून तिला एक मुलगीही झाली. त्यानंतर काही काळाने तिच्या पूर्ण सपोर्टने त्यांनी हे ऑपरेशन केले. आपल्या त्यावेळी छोट्या पण कळत्या वयातल्या मुलीलाही त्याबद्दल कल्पना दिली. आता त्यांना एक नातही आहे.

त्यांची बायको मात्र चार वर्षांपूर्वी वारली. आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये असतांनाच तिने प्राण सोडला, पण हे तिच्याजवळ होते. जाण्यापूर्वी त्यांनी तिची पूर्ण सेवा केली. 

तुमच्या मुलीने, नातीने तुम्हाला कसे स्वीकारले, असे विचारले असता, त्यांनी अतिशय सहजपणे मला स्वीकारले, असे ते म्हणाले. प्रायव्हेटमध्ये त्यांची लेक त्यांना डॅडी म्हणते पण जगासमोर मात्र त्यांनी घेतलेल्या नवीन फेमिनाइन नावाने त्यांना हाक मारते. 

तुमची काळजी आता तुमची लेक घेत असेल ना, असे विचारले असता, नाही, मीच उलट तिची काळजी घेतो, तिला कारने ग्रोसरी वगैरे शॉपिंगला घेऊन जातो. त्यांची मुलगी तब्येतीने खुप जाड असल्याने तिला स्वतःला फारसे काही काम करता येत नाही, ही माहिती त्यांनी मला दिली...

त्यांच्याशी बोलता बोलता आरामात एक दीड तास नक्कीच झाला असेल, हे लक्षात आले.  तुम्हाला भेटून खूप छान वाटले असे सांगून तुम्ही तुमच्या या युनिक जर्नीची काही प्रेसला बातमी किंवा मुलाखत दिली आहे का, हे विचारले असता, टिव्ही वर त्यांची मुलाखत येऊन गेली आहे आणि त्यांच्याकडे तिचे रेकॉर्डिंग आहे, असे त्यांनी सांगितले. 

मी त्यांच्याशी बोलता बोलता युट्यूबवर त्यांचे नाव टाकून चेक करून बघितले, तर तिकडे ती मुलाखत सापडली नाही. एकदा मला ती बघायला आवडेल, असे मी त्यांना म्हणाले असता, जरूर दाखवेन, असे त्यांनी सांगितले. 

ह्या ऑपरेशननंतर वीस वर्षं यशस्वीपणे आणि आनंदाने कुटुंबासोबत व्यतित केल्यानंतर आता वेगळ्या आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले आणि आता आमच्या संस्थेत थोडे दिवस आराम आणि परत थोड्याच दिवसांनी ते पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये जाणार होते. 

त्या दिवशी पूर्ण दिवस मी फक्त त्यांचाच विचार करत राहिले. दुसऱ्या दिवशी परत त्यांना लंच टाइमला भेटले. वेलकम डार्लिंग (डाsलिंग) असं र चा उच्चार सायलेंट ठेऊन ब्रिटिश ऍक्सेंटमध्ये ते माझ्याशी प्रेमाने बोलले. इतकं गोड वाटलं ते ऐकतांना... मन सुखावलं एकदम... त्यांना लंच साठी दिले गेलेले नूडल्स त्यांनी परत पाठवले आणि त्यांनी सोबत आणलेले इन्स्टंट नूडल्स उकळतं पाणी घालून आणि त्यासोबत आलेले मसाले घालून द्यायला नर्सला सांगून ते मिळाल्यावर त्यांनी गरम गरम ते अतिशय फास्ट खाल्ले. माझ्या तोंडात दात नाहीत, हिरड्यांच्या आजारामुळे सगळे दात काढावे लागले असून आता त्यावर कवळीही फिट बसत नाही आणि म्हणून मी फक्त मऊ तेच खातो, ज्यामुळे गिळायला आणि पचायला सोपे जाते, असे त्यांनी सांगितले. 

त्या दिवशी ते प्रेमाने बोललेले असले तरी थोडे थकलेले आणि अस्वस्थ वाटत होते. मी मग जास्तवेळ न बोलता त्यांना आराम करायला मिळावा म्हणून लवकर निरोप देऊन निघून गेले. 

त्याच दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. आता ते उपचारानंतर संस्थेत परत येणार नाहीत, असे समजले. त्या दिवशीची ती आमची शेवटचीच भेट ठरली, असे म्हणायला हरकत नाही. बघूया, योग असेल, तर परत भेट होईल ह्या विलक्षण व्यक्तिमत्वाची.. त्यांचं ब्रिटिश ऍक्सेंटमधलं डाsलिंग कानात अजूनही अधूनमधून वाजतं आणि माझ्या हृदयात धडधडतं.. 

सकीना वागदरीकर/ जयचंदर

२४.०९.२०२५

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:


https://sakhi-sajani.blogspot.com











Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३