आमची लंडन ट्रिप
आमची लंडन ट्रिप
शनिवार दि. 16 मार्च ते बुधवार दि. 20 मार्च असे प्रवास धरून एकूण पाच दिवसांची लंडन ट्रिप आम्ही केली. खूप दिवसांपासून मनात असलेली ही ट्रिप फायनली प्रत्यक्षात करता आली.
भारतात राहत असतांना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, हे ऐकतच मोठे झालेलो असतो आपण. मात्र युरोपियन देशांमध्ये आलो की हा समज साफ खोटा ठरावा, असे अनुभव येतात, जे अर्थातच मलाही आले. जर्मनीत राहायला लागले आणि इथे इंग्रजी चालत नाही, हे कळले. इतरही युरोपियन देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचं लक्षात आलं. इंग्रजी येत असूनही समोरच्याला त्यांची भाषा बोलायला प्रवृत्त करून त्यांच्या भाषेचं जतन करण्याचं महत्वाचं काम हे देश करतात. त्यांचं म्हणणं असतं की इंग्लिश लोक शिकतात का तुमची भाषा? ते तुम्हालाच इंग्रजी शिकून बोलायला लावतात ना? मग आम्हीही तेच करतो!
ह्या पार्श्वभूमीवर लंडन ट्रिप करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट मनात आली, ती म्हणजे जिथे आपल्याला व्यवस्थित समजते, बोलता येते, ती भाषा असलेल्या देशात आपण जात आहोत आणि या गोष्टीचे प्रचंड थ्रील मनात होते. शिवाय ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्यांचा देश, राणी एलिझाबेथचा देश, न पडणारा पण गाण्यात सतत falling down असा उल्लेख असलेला लंडन ब्रिज असलेला देश, आपला कोहिनूर हिरा आणि अब्जावधीची मालमत्ता जिथे लुटून नेलेली आहे, तो देश, जिचे उल्लेख नेहमी साहित्यात असतात आणि चित्रपटांमध्ये बघायला मिळते ती Themes नदी असलेला देश, हॅरी पॉटर चा देश, ती गोष्ट लिहिणाऱ्या लेखिकेचा देश, BBC नेटवर्क चालवणाऱ्यांचा देश, असे एक ना अनेक संदर्भ मनात होते, जो बघायला मिळणार म्हणून खूपच आनंदी आणि उत्साही मनाने ह्या ट्रीपला गेले.
British Airways ने जर्मनीतील Dusseldorf Airport वरून London City Airport वर अशी सव्वा तासाची फ्लाईट होती.
सोमवार ते शुक्रवार काम, नीलची शाळा, स्पोर्ट्स इ. ने दमून गेलेलो असतांना सगळी तयारी करून शनिवारी सकाळी लवकर उठून फ्लाईट पकडून लंडनला गेल्यावर श्रमपरिहार म्हणून पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये चेक इन करून, आराम करून मग संध्याकाळी थोडे शहर फिरावे, असा प्लॅन होता. दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा-जयचा शाळेतला बॅचमेट मित्र- सुब्रनील आम्हाला अशी ठिकाणं त्याच्या कारने फिरवणार होता, जिथे बस आणि ट्रेनने सहज पोहोचता येत नाही. मग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपले आपण शहरातली महत्वाची ठिकाणं फिरण्याचा विचार होता.
सुब्रनीलने आम्हाला त्याच्या घरी राहण्याचा आग्रहही केला होता, मात्र होस्टवर जास्तीचा ताण पडू नये शिवाय आम्हालाही मोकळेपणाने आणि आपल्या मर्जीने राहता, झोपता-उठता यावे, या विचाराने हॉटेल हॉलिडे इन चे बुकिंग केले आणि बाबांकडून समजले की त्यांच्या जवळच्या मित्राचा मुलगा समीरदादा लंडनपासून जवळपास असलेल्या गावीच राहतो आणि काका काकूही त्याच्याकडे आत्ता आलेले आहेत. म्हणून मग त्याला संपर्क केला. तर दादाही म्हणाला, आमच्याकडे राहायलाच या. मग त्यालाही हॉटेल बुकिंग झालेले असल्याचे सांगितले. मग लंडनला पोहोचल्यावर लगेचच दादाकडे जायचे ठरवले. दादाचे गाव ट्रेनने सव्वा तास अंतरावर होते. एक ट्रेन बदलून जायचे होते आणि स्टेशनवर दादा घ्यायला येणार होता.
Flight Journey निर्विघ्न पार पडली आणि चुकत माकत, एलिझाबेथ लाईन, ज्युबिली लाईन असे जर्मन सिस्टीमपेक्षा एकदमच वेगळे आणि जरा गुंतागुंतीचे असे ट्रेन नेटवर्क समजून घेत, तसेच टॅपिंग करत, प्रत्येकी एक असे क्रेडिटकार्ड किंवा तिथले लोकल कार्ड ज्याला ऑईस्टर कार्ड म्हणतात, ते वापरून तिकीट काढणे, ते कार्ड एन्ट्री आणि एक्झीट पॉइंट्सवर दाखवून गेट उघडले की पुढच्या पॉइंटला जाणे, मग एकाचे कार्ड वर्क न झाल्याने एक मागे राहणे, एक पुढे जाणे, मग सिक्युरिटी पर्सनच्या मदतीने समस्या सोडवणे अशा अनेक अडथळींच्या शर्यती पार करत, आमच्या सुटकेसेस आणि बॅगपॅक्स सांभाळत प्रवास करत कसेबसे दादाच्या गावी सुखरूप पोहोचलो.
समीर दादाला खूप वर्षांत भेटलेले नसले, तरीही आम्ही फेसबुकमुळे संपर्कात होतो आणि एकदा माझा नवरा-जयला दाताचा प्रॉब्लेम होता आणि वीकेंडमुळे जर्मनीतले डॉक्टर्स भेटू शकत नव्हते, तेंव्हा मला समीर दादाची आठवण झाली होती आणि त्याच्या सल्ल्याने जयचे दाताचे दुखणे विकेंडपूरते सुसह्य होऊ शकले होते.
लहानपणी म्हात्रे काका-काकूंच्या घरी नेहमी जाणे-येणे व्हायचे. त्यांच्या घरी नेहमी फिश करी असायची, कोकणी स्टाईल.. आरती ताई, समीर दादा, क्रांती आणि माझी छोटी बहीण इलासोबत मी, असे आम्ही सगळे अतिशय धम्माल करायचो, प्रचंड हसायचो आणि खिदळायचो.
मला एक गंमत आठवून नेहमीच हसू येतं. मी मराठी मीडियमच्या शाळेत होते आणि फक्त A, B, C, D इकडून तिकडून वाचून माहिती होते, तेंव्हा मी DABBADDADABBADDADDA असे काहीही शब्द लिहून समीर दादाला वाचायला लावायचे आणि त्याने ते डब्बड्डाडब्बड्डड्डा असे काहीही वाचले की खो खो हसत सुटायचे.
म्हात्रे काका-काकूंसोबत साक्षरता अभियान शिबीर आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही सगळे अलिबाग ट्रिपही केली होती. त्यांच्या एका नातेवाईकांच्या घरी तर हापुस आंबे झाडावरून तोडून खाल्ले होते.
छोट्याशा अपार्टमेंट राहत असतांना छोट्याशा बाल्कनीत आपला स्टडी कॉर्नर बनवून नाईट लॅम्पच्या प्रकाशात तासंतास अभ्यास करून डेंटिस्ट झालेल्या कष्टाळू आणि अतिशय नम्र अशा समीर दादाविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. माझे सगळ्यात पहिले डेंटल क्लिनिंगही त्याने त्याच्या नाशिकच्या क्लिनिकमध्ये केले असून, "सकीना, तुझे दात खूप स्वच्छ आणि छान मेंटेन केलेले आहेत", अशी त्याची सुखावणारी कॉम्प्लिमेंट माझ्या कायमची मनात राहून गेलेली आहे.
अशा सगळ्या रम्य आठवणीत रमून गेले मी त्यांना भेटायचे ठरल्यावर आणि आता इतक्या वर्षांनी तर समीर दादाचे लग्नही झालेले असून अमन आणि अनुराग अशी अनुक्रमे 16 आणि 12 वर्षांची दोन मुलंही त्याला आहेत, त्याची डेंटिस्ट बायको शिल्पा हिलाही फक्त फोटोतच आजवर बघितलेले होते. या सर्वांना भेटण्याची उत्सुकता होती.
दादा स्टेशनवर घ्यायला आलेला होता. खूप वर्षांनी त्याला भेटून खूप मस्त वाटलं. त्याच्या पूर्णपणे पारदर्शक छपराच्या गाडीत बसल्यावर नीलला खूपच मज्जा वाटत होती. त्या छपरातून निरभ्र निळं आकाश आणि सोनेरी ऊन असलेलं वातावरण, सुंदर घरं बघून मन प्रसन्न झालं. नेहमी असलेलं पावसाळी वातावरण त्या दिवशी नव्हतं, असं दादा म्हणाला. जर्मनीतही साधारण असंच पावसाळी वातावरण असलेल्या गावांमध्ये राहण्याचा अनुभव असल्याने, आम्हालाही मस्तच वाटत होतं. पाचच मिनिटांची ड्राइव्ह आणि आम्ही त्याच्या घरी पोहोचलो पण!
तिथे काका-काकू, समीर दादाची बायको शिल्पा, त्याची अमन आणि अनुराग ही दोन मुलं यांना भेटून खूप मस्त वाटलं.
समीर दादाचं घरही खूप छान आहे. एकदम प्रशस्त! त्याची फॅमिलीही एकदम मस्त आणि फ्रेंडली. त्याच्या बायकोने- शिल्पाने खूप चवदार जेवण बनवलं होतं. नील अमन आणि अनुरागशी गप्पा आणि खेळ, यामध्ये रमला. दादाने दिलेले गिफ्ट्स आणि चॉकलेट्सही त्याला आणि आम्हाला खूप आवडले. तर म्हात्रे काकांनी मला त्यांचे डार्विन थिअरीवर लिहिलेले पुस्तकही भेट दिले.
लहानपणीचे किस्से, मस्त गप्पा, हास्यविनोद यात आमचा दिवस कसा संपला आणि संध्याकाळ झाली, हे समजलंच नाही. दादाच्या हातचा फक्कड चहा घेऊन आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो खरे, मात्र,"सकीना आमची मुलगीच आहे. तुम्ही आलात, खूप छान वाटलं" असं काका म्हणाले आणि "सकीना, येत जा गं अशी नेहमी", असं काकू आणि दादा म्हणाला, ते मनात राहून गेलं आणि प्रेमाचा ओलावा असलेली माणसं भेटली की मन कसं प्रसन्न होतं, याचा प्रत्यय आला.
परतीच्या प्रवासात खूप गोड सहप्रवासी ट्रेनमध्ये भेटले. तो ब्रिटिश मुला-मुलींचा हसरा, आनंदी ग्रुप म्हणजे एकमेकांचे वकील सहकारी होते आणि वाईन टेस्टिंग सेरेमनी अटेंड करुन म्हणजेच वेगवेगळ्या बेस्ट वाईन्स ची टेस्ट करून परतीच्या प्रवासाला निघालेले, आणि त्यामुळेच धुंदीत असलेले असे लोक होते. त्यांचे डोळे मिटत होते, पण ते आनंदी दिसत होते आणि ते अतिशय सेन्सिबल आणि क्लियर बोलत होते. त्यांच्यातली एक जण अर्धी भारतीय तर अर्धी फिलीपिनियन होती. तिचा नवरा ब्रिटिश होता. त्यांना एकत्र बसायला जागा मिळावी म्हणून मी उठत होते, तर त्यांनी मला ते करू दिलं नाही आणि तो उभा राहिला. मात्र त्यांना माझं हे gesture आवडलं आणि त्यांनी सर्वांनी माझ्याशी खूप आत्मियतेने गप्पा मारल्या.
जय आणि नीलला मागच्या सीटवर जागा मिळाल्याने ह्या ग्रुपसोबत मी एकटीच गप्पा मारत होते. ब्रिटिश नवरा असलेल्या मुलीने मी तमिळनाडूची आहे का, असं विचारलं. मी नाही, मात्र नवरा तिकडचा आहे, हे सांगितल्यावर तिने राधिका शरदकुमार नावाच्या तमिळ नटीचं पहिलं लग्न एका ब्रिटिश माणसासोबत झालं होतं आणि ती तिच्या ब्रिटिश नवऱ्याशी रिलेटेड आहे, हे जयला सांगितलं.
त्या ग्रुपमधला एक जण मूळचा जर्मन असून ब्रिटनमध्येच जन्मला आणि वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात जाण्याची, देश पाहण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
हॉटेलमध्ये येईपर्यंत संध्याकाळ झालेली होती. अंधार पडला होता. White Chapel या स्टेशनवरून 7 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स वर आमचे हॉटेल हॉलिडे इन होते.
स्टेशनवर उतरून स्टेशनचे नाव वाचले, तर इंग्रजी सोबतच एका अगम्य पण भारतीय वाटेल अशा लिपीत शेजारी त्याच स्टेशनचे नाव लिहिलेले होते. गुगल सर्च केल्यावर समजले की ती भाषा बंगाली आहे. त्या स्टेशनचा मी फोटोही काढला होता पण कुठे हरवला, माहिती नाही, म्हणून गुगल इमेज डाउनलोड करून टाकली आहे.
तसंच, Southhall नावाच्या स्टेशनवर पंजाबी भाषेतही स्टेशनचे नाव लिहिलेले आहे. तिथे भली मोठी पंजाबी कम्युनिटी राहते, असे नंतर समजले.
स्टेशनबाहेर बघितले, तर भारतात दिसतो, तसा रस्त्याकाठी असलेला बाजार, छोटे-छोटे शॉप्स दिसले आणि त्यात भारतीय दिसणारे लोक आणि विरुद्ध दिशेला आधुनिक इमारती, भव्य लंडन हॉस्पिटल. जर्मनीत राहत असतांना अशी समोरासमोर वेगवेगळी आर्थिक दरी दिसत नाही. कमी आर्थिक स्तर असलेल्या लोकांची इकडे वेगळी वस्तीच असते. दोन्ही स्तर असे आनंदाने एकत्र नांदतांना दिसत नाहीत.
रस्त्यात आम्हाला 3-4 भारतीय छोटेखानी रेस्टॉरंट्सही दिसले. आमच्या हॉटेलपासून इतके जवळ असे रेस्टॉरंट्स असणे, हे आमच्यासाठी pleasant surprise होते. जर्मनीत असे चित्र मुळीच दिसणार नाही. त्यामुळे फुडी असलेली मी तर लगेचच लंडनच्या प्रेमात पडले. जर्मनीत जाणवणारा सातत्याने ऑर्गनायज्ड लिव्हिंगचा मनावर असणारा एक छुपा ताण इकडे एकदम नाहीसाच झाला. आधुनिक भारतीय शहरात आलो आहोत, असंच वाटलं एकदम. लोकही एकदमच फ्रेंडली, कुल आणि वेलकमिंग!
हॉटेल हॉलिडे इन मध्ये आम्हाला नवीन मेम्बरशीप आणि बुकिंग डॉट कॉम वरून पॅकेज बुकिंग केल्याचा रिवॉर्ड म्हणून executive रूम मिळाली होती, जी अतिशय मोठी आणि सुंदर होती. तिथला टीव्ही स्मार्ट टीव्ही नसूनही सगळे इंग्लिश चॅनेल्स बघून खूपच मस्त वाटलं. जर्मनीत जर्मनच चॅनेल्स दिसतात ना! इंग्रजी बघण्यासाठी युट्यूब, नेटफ्लिक्स वगैरे उघडावे लागते. त्यामुळे हा आम्हाला एकदम कम्फर्ट वाटला!
हॉटेलरुममध्ये असलेले कॉफी मशीन, वॉटर बॉयलर, कप, ग्लासेस, चहा, कॉफीचे पाऊचेस, चॉकलेट्स, यामुळे मस्त वाटलं आणि नीलला घरातल्यासारखा बाथटब इथेही असल्याने खूप आनंद झाला. खाऊन झालेले चॉकलेट, वापरलेल्या टी बॅग्स दुसऱ्या दिवशी अगदी बरोबर जितक्या वापरल्या तितक्याच परत रिप्लेस झालेल्या बघून मज्जा वाटत होती. रोज नील ते एक चॉकलेट खायचा आणि रात्री फिरून परत आलो की त्याच जागी नवीन चॉकलेट बघून जादू झाल्यासारखं हरखून जायचा! सुंदर स्वच्छ आवरलेली, टॉवेल बदलून घड्या घालून ठेवलेली रूम, धुतलेले नवीन कॉफी मग्ज बघून 'सुख म्हणजे अजून काय वेगळं' असं वाटायचं.
हॉटेलरूममध्ये बॅगा ठेवून पोटात ओरडू लागणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी जेवायला बाहेर गेलो. जवळच लाहोर नावाचे रेस्टॉरंट दिसले. अगदी छोटेसे होते आणि आत भरपूर गर्दी, जी जर्मनीत दुर्मिळच असते. एन्ट्री केल्यावर लगेचच टेबल खुर्च्या, आणि विरुद्ध दिशेला शेवटी किचन, त्याच्या बाहेरच ऑर्डर घेण्यासाठी छोटेसे रिसेप्शन अशी रचना असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला रिसेप्शन काऊंटरसमोरच बसायला जागा मिळाली. त्यामुळे स्टाफशी गप्पा मारतच आम्ही जेवणाची वाट बघितली आणि जेवलोही! सिझलिंग हॉट कढाई चिकन, पालक पनीर, नान आणि भात असं मस्त जेवण आणि लस्सी तीन ग्लास मागवण्यापेक्षा एक जग भरून घेतली तर स्वस्त पडेल, असा स्टाफचा आग्रह स्वीकारून ती तशी मागवली. खूप झाली, तर पार्सल करून हॉटेल रूममध्ये घेऊन जाऊ आणि रुममधल्या फ्रीजमध्ये ठेवू, असे ठरवले. पण जग छोटाच होता आणि चार ग्लास लस्सी तिघांमध्ये संपूनही गेली. जेवण अप्रतिम चवीचं होतं. मॅनेजरने खीरही खाण्याचा आग्रह केला. पोटात जागा नसूनही तो प्रेमाचा आग्रह मोडवला नाही म्हणून एक वाटी खीरही तिघांनी शेअर करत खाल्ली.
मॅनेजरने ऑनलाईन फीडबॅक लिहायला लावला, म्हणून मी तो लगेचच लिहिला आणि त्यालाही दाखवला. त्यात मी फ्रेंडली स्टाफ असे लिहिलेले होते, तर माझा फोन हातात घेऊन तिथे (especially Mr. Gill) असे कंसात त्याचे स्वतःचे नावही टाकले. आम्हाला खूपच हसू आलं तेंव्हा. त्यांना फाईव्ह स्टारही दिले मी.
हॉटेल रूममध्ये परत आलो, तेंव्हा अतिशय दमलेलो असल्याने आणि दिवस खूपच सुंदर अनुभवांनी भरलेला असल्याने दुसऱ्या क्षणी जो डोळा लागला, तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उघडला.
फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी गेलो.
इंग्लिश ब्रेकफास्ट काय असतो, याची उत्सुकता होती. इतर युरोपियन देशांमध्ये असलेल्या ब्रेकफास्टपेक्षा हा काय वेगळा असतो, असा प्रश्न मनात होता, त्याचं लगेचच उत्तर मिळालं. इथे सॉसेजेस, पोटॅटोचं त्रिकोणी कटलेट आणि टोमॅटो प्युरी बेस असलेली प्लेन व्हाईट बीन्सची करी असा वेगळा मेनू होता. बाकी स्क्रॅम्बल्ड एग्स, ऑम्लेटस, वेगवेगळ्या प्रकारचे, फ्लेवर्सचे ब्रेडस, जाम्स, फ्रुटस, प्लेन, फ्लेवर्ड्स योगर्टस असे अनेक प्रकार होते. जे इतर ठिकाणीही असतात.
ब्रेकफास्टनंतर जयच्या स्कुलमेटसोबत त्याच्या कारने लॉंग ड्राईव्हला गेलो. तो हॉटेलरुमवर घ्यायला येणार होता पण त्याचं घर दीड तासाच्या ड्राइव्ह वे वर आहे, हे समजल्यावर आम्हीच त्याला म्हणालो की एका सेंटर पॉइंटला भेटू आणि त्याच्या इन्स्ट्रक्शन्स नुसार ट्रेनने एका पॉइंटला जाऊन भेटलो.
तो खरं म्हणजे आदल्या दिवशीच भारतावारी करून आलेला होता आणि तरीही त्याला आम्हाला पहाटे कोणतातरी सूर्योदय पॉइंट दाखवून मग पुढची ठिकाणं दाखवायची होती. पण आम्हीच इतक्या लवकर नको, असं सांगितलं. मित्राच्या उत्साहाचं आणि एनर्जी लेव्हलचं मात्र आम्हाला प्रचंड कौतुक वाटलं.
नील दोन वर्षांचा असतांना आमच्या जर्मनीच्या घरी तो येऊन गेला होता. त्याला आठ वर्षाच्या नीलला भेटून खूप छान वाटलं आणि नीलचं आणि त्याचंही इन्स्टंट बॉंडिंग झालं.
योगायोगाने समीर दादाच्या कारसारखीच शुभ्रनील दादाची कार पारदर्शक छप्पराची होती. त्यामुळे नील त्यादिवशीही तितकाच खूश होता.
सुब्रनील आणि आमचा (फक्त) नील अशी नावांची गम्मतही आमचा गप्पांचा एक विषय झाली. त्याच्यासोबत लॉंग ड्राइव्ह करत आम्ही लंडन शहराबाहेरील कंट्रीसाईड आणि रस्ते पालथे घातले. त्याने आम्हाला राणी एलिझाबेथचे कासलही (अर्थातच बाहेरून) दाखवले, जे त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे. (बकिंगहॅम हे ऑफिशियल रेसिडेन्स आहे. ते नव्हे! हे वेगळे!)
मग Stonehenge ह्या हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या प्रचंड भव्य आणि वजनदार दगडांच्या विशिष्ट रचना असलेल्या ठिकाणी तो आम्हाला घेऊन गेला आणि पूर्वीच्या काळी ही अशी रचना लोकांनी नक्की कशी साधली असेल, याच्या अचंब्यात पडून आम्ही तो परिसर फिरत फिरत अनुभवला. त्या दगडांना हात लावण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांच्यासोबत आमचा फक्त फोटो काढून घेतला. नंतर ते दगड कसे बनले असतील, याविषयी माहिती असणारे एक्झिबिशन बघितले. फार सुंदर अनुभव होता तो. तिथेच एक वजनदार दगडही ठेवलेला होता, जो ओढून पाहून आपली ताकद किती आहे, याचे मापन करणारे यंत्रही तिथे ठेवलेले होते. आम्हीही मग जोर लावून तो ओढून आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. Stonehenge बनवले गेले, त्या काळातले लोक कसे राहत असतील, तशा झोपड्याही कल्पनेने त्या भागात बनवून ठेवल्या असून त्यात आत जाऊन बघण्याची परवानगी दिलेली होती, त्यामुळे आम्ही तो अनुभव घेऊ शकलो.
नंतर सुब्रनील आम्हाला अशाच दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेला, ज्याचे नाव होते Stone Circle, जिथे दगडांना जवळून पाहून हातही लावता येऊ शकत होता. निसर्गाच्या ह्या अमेझिंग निर्मितीचे कौतुक करत करतच संध्याकाळ झाली.
सुब्रनील आम्हाला अजून एका रंगीबेरंगी घरे असणाऱ्या ठिकाणी नेणार होता पण वेळेअभावी आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. त्याच्या घराजवळच असलेल्या प्रसिद्ध South Indian रेस्टॉरंट चेन मधल्या Sangeetha रेस्टॉरंट मधून डोसे, छोले भटूरे, पुरी, बटाटा भाजी अशी ऑर्डर देऊन ती जातांना पीक अप करून त्याच्या घरी त्याच्या फॅमिलीसोबत जेवून हॉटेलरूमवर परतलो. दुसरा दिवसही अतिशय सुंदर अनुभवांनी भरलेला असल्याने त्या आठवणी मनात झोपेतही रेंगाळत राहिल्या.
पुढचे दोन दिवस Hop On and Off साईट सीईंग बस टूर बुक केलेली होती. त्यातील पहिल्या दिवशी आमच्या बसला येण्यासाठी लागणाऱ्या वेळेत Tower Hill परिसरातील भव्य कासल बाहेरूनच बघून तिथेच अतिभव्य आणि अप्रतिम रचना असलेल्या Tower Bridge वर चाललो. आधी आम्हाला तो म्हणजे प्रसिद्ध London Bridgeच आहे, असे वाटले होते, पण हे वेगळे असे नंतर कळले. लंडन ब्रिज त्या मानाने साधाच आहे. त्यावर आम्ही काही चालायला गेलो नाही. लांबूनच बघितला आणि दुसऱ्या दिवशी Themes River Cruise केली, तेंव्हा त्याच्या खालून गेलो. इतकाच काय आम्ही तो अनुभवला.
टुरिस्ट गाईड असलेल्या साईट सीईंग बसमध्ये मात्र आम्हाला खूपच मज्जा आली. लंडनसारखे रिच हेरिटेज असलेले शहर, जे महायुद्धात उध्वस्त झालेले नसल्याने ते बघणे, हे डोळ्याचे पारणे फेडणारा अनुभव देणारे ठरले. जुन्या आणि आधुनिक इमारतींचा सुरेख संगम असणारे हे शहर बघत आणि हवे तिथे उतरून ठिकाणं बघत परत पुढची बस करत जाणं असा छान अनुभव घेतला.
Tower Hill नावाच्या एरियात उतरून चालत असतांना समोर थेम्स नदी आणि दुसऱ्या बाजूला एक सुंदरशी लांबलचक भिंत दिसली, ज्यावर अनेक लाल हार्ट्स पेंट केलेले होते आणि त्यात नावं लिहिलेली होती. मला वाटलं लव्हबर्ड्सची नावं असतील, पण तिथेच एक बोर्ड इंग्रजीत लिहिलेला होता: करोना victims ची नावं तुम्ही एकेका हार्टवर लिहू शकता आणि त्यांचे स्मरण करू शकता. त्या क्षणी माझ्या मनात अनिता पगारे ताई आली जी करोनामुळे आपल्याला अकाली सोडून गेली. मला लगेचच एक रिकामं हार्ट ही दिसलं. माझ्याकडे मार्कर पेन नव्हता पण लिहिण्याची उर्मी मात्र खूपच स्ट्रॉंग होती, म्हणून लगेचच तिचं नाव लिहिलं आणि व्हिडीओही काढला. खूप छान वाटलं मला. एकदम हलकं हलकं वाटलं. अनिता ताई जर बघत असेल तर तिच्या चेहऱ्यावर आता स्मितहास्य असेल का? मनोहर आहिरे दादाला, कल्याणीला कसं वाटेल हे पाहून? ते सांगतीलंच मला..
(खरं म्हणजे अजय लांडे हा सुद्धा मनात आला, मात्र तो नक्की करोनाने गेला की नाही, याची खात्री नव्हती आणि इंटरनेट कनक्टिव्हिटी नसल्याने, ते चेक करणं अवघड होतं. म्हणून त्याचं नाव लिहिलं नाही.)
त्यानंतर आम्ही आमच्या साईट सीईंग बसमध्ये परत जाऊन बसलो.
पहिल्या दिवशीच्या बसमध्ये एक बेन नावाचा टुरिस्ट गाईड होता, जो नीलला खूपच आवडला होता. त्याने अर्ध्या मार्गावर लंचब्रेक घेतला, त्यामुळे दुसरी एक गाईड त्याला रिप्लेसमेंट म्हणून आली. ती सुद्धा खूप छान बोलत होती. मात्र नीलला वाईट वाटलं होतं. त्याला बेनच हवा होता . दुसऱ्या दिवशी परत बसमध्ये बसलो, तर वेगळाच गाईड होता. नील बेनला मिस करत होता, पण तो दिसला नाही.
पहिल्या दिवशी आम्ही डबल डेकर बसच्या रुफ टॉप वरून टूर केली होती पण दुसऱ्या दिवशी खूप थंड वारा असल्याने खालच्या मजल्यावर बसून परिसर बघायला लागलो. थोड्याच वेळात टुरिस्ट गाईड रिप्लेसमेंट झाली आणि त्याच्या पहिल्या वाक्यातच नीलने ओळखले की हा तर बेन! पळतच वरच्या डेकवर जाऊन नीलने खात्री करून घेतली! तो बेनच निघाला. नीलच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बेनही तितकाच आनंदी झाला आणि त्याने नीलला स्पेशल वेलकम केले. त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याकडून जर्मन शब्दांचे धडेही घेतले. भरपूर विनोदी किस्से सांगितले. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातले आणि लंडनबद्दलचेही. यांचे जुळलेले सूर बघून आम्ही एकमेकांचे फोन नंबर्सही शेअर केले आणि बेनला जर्मनीत भेटीचे निमंत्रणही दिले. गंमत म्हणजे आमच्याच बसमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही राहतो त्या हॅनोवर शहरातीलच एक आई आणि मुलगी बसमध्ये बसली. बेन सर्वांना कोण कुठून आले, हे विचारत असल्याने वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या लोकांशी ओळख होत होती.
शेवटच्या दोन दिवसात आम्ही फिश अँड चिप्स हा साधारण चवीचा लंडन स्पेशल मेनू खाल्ला. बलुची या PAN India रेस्टॉरंट मध्ये जेवलो. तिथे शेफने त्याच्या आईच्या हातची केरळस्टाइल चिकन करी मेनूत ठेवली होती, ती खाल्ली. अप्रतिम चवीची करी, बटर नान, केशर भात, कुलचा, लस्सी असे भरपूर महागाचे पण चविष्ट आणि उच्च दर्जाचे जेवलो. तिथला एक स्टाफमेम्बर गप्पा मारायला आमच्या जवळ बराचवेळ बसला. माझे मानसशास्त्र विषयाचे शिक्षण आणि नोकरी समजल्यावर त्याने मला विचारले, माझ्याकडे बघून तुमचं काय मत झालं आहे? मला त्याच्याशी बोलून जे वाटलं ते मी त्याला सांगितलं की तुम्ही मला डाउन टू अर्थ वाटता आणि प्रामाणिकही वाटता. त्याला हे इतकं आवडलं की मला तो म्हणाला, तुम्ही सांगितलेलं मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.
एका रात्री बांग्लादेशी रेस्टॉरंटमध्ये रमादान-इफ्तार स्पेशल मेनू होता, तो ही अतिशयच चवदार होता. सामोसे, भजी, बिर्यानी, गुलाबजाम असे बरेच काही खाऊन आम्ही तृप्त झालो.
तर दुसऱ्या रात्री आमच्या हॉटेल रूट वर असलेल्या एका अरबी मेनू असलेल्या रेस्टॉरंटमध्ये केबाप खायला गेलो, तिथे एक उंचापुरा अल्जेरियन मुलगा भेटला. त्याचे इंग्रजी मोडके तोडकेच होते. तो तीनच वर्षांपूर्वी लंडनला आलेला होता आणि हे रेस्टॉरंट चालवणाऱ्या त्याच्या कुटुंबाला मदत करत होता. त्याचे जर्मनीत राहण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण झाले नाही. त्याने नीलला सांगितले, भरपूर प्रोटीनयुक्त आहार खात जा, ते तब्येतीला चांगले असते. नीलनेही त्याचा सल्ल्यानुसार खायला सुरुवात केली.
ट्रेन आणि बसचा प्रवास करत असतांना युनिक अशी ड्रायव्हर आणि पॅसेंजरमध्ये पार्टिशन असलेली आणि मायक्रोफोन बटन दाबूनच संवाद साधता येऊ शकेल, अशी टॅक्सी बघून वाटत होतं की टॅक्सीचा प्रवासही करायला मिळाला असता, तर बरं झालं असतं, ही आमची इच्छाही निसर्गदेवतेने पूर्ण केली.
आमची परतीची ब्रिटिश एअरवेजची फ्लाईट क्रू-मेम्बर्स च्या कमतरतेमुळे कॅन्सल झाली आणि लंडन सिटी एअरपोर्ट वरून फ्लाईट कंपनीने आम्हाला दुसरी फ्लाईट अरेंज करून दिली, जी Heathtow एअरपोर्ट वरून होती. आम्ही लंडन एअरपोर्टवर होतो. ह्या प्रवासासाठी आम्हाला ब्रिटीश एअरवेजतर्फे टॅक्सी arrange करून दिली गेली. टॅक्सी ड्रायव्हरसोबत मायक्रोफोनवरून गप्पा मारत आम्ही कधी एअरपोर्टवर पोहोचलो, हे आम्हाला कळलंसुद्धा नाही! समोरासमोर सीट्स असलेल्या ह्या टॅक्सीत सीटसमोरच सुटकेसेस ठेवण्याची जागा होती. खूपच मोठी आणि भरपूर जागा असलेली मस्त आणि वेगळीच टॅक्सी आम्हाला आवडलीच एकदम. छान पाय पसरून बसलो आम्ही. परत एकदा सुंदर लंडन शहराची टूर झाली या निमित्ताने. नीलला तर त्याचा लाडका टुरिस्ट गाईड बेनही साईट सीईंग बसमध्ये दिसला पुन्हा एकदा! किती स्ट्रॉंग बॉण्ड असणार आहे दोघांचा!
वेळेत एअरपोर्टवर पोहोचलो आणि वेळेत फ्लाईटने घरीही आलो, सुंदर आणि युनिक अशा लंडन ट्रिपच्या आठवणी हृदयात साठवून..
नील रोज विचारतो, लंडनला परत कधी जायचे? हाच प्रश्न आम्हीही स्वतःला विचारतो आहोत. उद्या एक आठवडा होईल परत येऊन, पण अजूनही मनाने लंडनमध्येच आहोत आम्ही. लव्ह यू अँड मिस यू डियर लंडन!!!
सखी-सकीना वागदरीकर
26 मार्च 2024
Comments
Post a Comment