आज्जी आजोबांची डायरी: भाग ५०

 डायरीच्या मागच्या भागात स्वतःच्या पायाच्या बोटाला इजा करून घेणाऱ्या ज्या आजोबांविषयी लिहिले, ते आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचे काही अपडेट्स समजले नाहीत. पण आज काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलमधून परतलेल्या आजोबांना भेटले आणि त्यांची गोष्ट आज लिहायलाच हवी, असं मनात आलं म्हणून काम संपल्याबरोबर लगेच लिहितेय.


काही महिन्यांपूर्वी एकत्रच आमच्या सिनिअर केअर होममध्ये जोडीनेच हे आज्जी आजोबा दाखल झाले.  ९३ वर्षं वयाच्या आज्जी बेड रिडन आणि विस्मरणाचा आजार जडलेल्या तर आजोबा आज्जींपेक्षा २ वर्षांनी मोठे पण अजूनही बऱ्यापैकी फिटनेस असलेले.. कसल्याही आधाराशिवाय चालू फिरू शकणारे आणि आपली सगळी कामं स्वावलंबीपणे करू शकणारे असे.

"मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे दाखल झालो आहे. ६७(की असाच काहीतरी आकडा) वर्षांचा आमचा संसार. कायम एकत्रच राहिलोय तर आता या टप्प्यावर तिला सोडून राहू शकत नाही, म्हणून इकडे दाखल झालो." असं कारण त्यांनी मला सांगितलं.

आज्जी विशेष काही बोलू शकत नव्हत्या, पण आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोतच होतं आणि त्यांना समजतही होतं, असं त्यांच्या एकंदरीत हावभावावरून मला जाणवलं.

आजोबांनी आज्जींसोबत अनेक वर्षे बेकरी चालवली, हे कळताच याच संस्थेत, याच मजल्यावर दुसरे एक असेच त्यांच्या बायकोसोबत बेकरी चालवणारे, बायको विस्मरण असलेली पण संस्थेतच राहत असलेली अशा फार मोठ्या योगायोगाची मला आठवण झाली जी मी आजोबांना सांगितली. तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का, असे विचारले असता ते हो म्हणाले आणि मी लगेच त्या दुसऱ्या आजोबांना ह्या नवीन आजोबांच्या रूममध्ये त्यांना भेटायला घेऊन आले.

दोघांनी छान गप्पा मारल्या. आपापली बेकरी कुठे होती, बेकरीत काय काय बेक करत, कोण कोण कॉमन ओळखीचे वगैरे गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या. आता ओळख झाली आहे आणि रूमही कळली आहे, तर परत भेटा एकमेकांना, असं मी सांगितलं. तर दोघंही हो म्हणाले, मला धन्यवादही दिले त्यांनी. नंतर एकमेकांना भेटले की नाही, काही माहिती नाही.

मी मात्र अधूनमधून दोघांनाही सेपरेटली भेटी देत होते, त्यांच्यासोबत विचारपूस, गप्पा सुरु होत्या. बेकरीवाले जुने आजोबा आणि आज्जी वेगवेगळ्या रुम्समध्ये आणि मजल्यांवर राहतात. याचे कारण मी एकदा त्यांना विचारले असता, ते म्हणाले होते की माझ्या बायकोला स्वतः उठता बसता येत नाही, म्हणून ते बेल्ट बांधून लिफ्टर लावून उठवतात-बसवतात, तेंव्हा तिच्याकडे मला बघवत नाही. मला मान्य आहे की ते तिच्या सोयी आणि सुरक्षिततेसाठीच हे सगळं करतात, पण खरं सांगू का? ती त्यावेळेला कसायाकडे कापायला नेत असलेल्या डुकरासारखी दिसते आणि मला फार अस्वस्थ होतं ते दृश्य पाहिलं की..

मग म्हणाले होते की तू कोणाला सांगू नकोस, पण माझ्या तरुणपणी एकदा मी माझ्या एका नोकरीत एकदा एक जिवंत डुक्कर कापलं होतं. ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं आणि मला दु:स्वप्नं पडून माझी झोपमोड होते. त्या जागी आता ही माझी बायको मला दिसते, त्याने मी खूप डिस्टर्ब होतो. म्हणून मी वेगळं राहायला लागलो. पण तिला रोज दुपारी जेवणानंतर भेटून ४ तास कंपनी देतो.

हे ८८ वर्ष वयाचे आजोबा एक दिवस मला जवळच्याच एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला घेऊन गेले होते. तर आईस्क्रीम पार्लरवाला आणि रस्त्यावर येणारे जाणारे, आईस्क्रीम खाणारे  असे मिळून किमान साताठ जण त्यांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून गेले!

मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, आजोबा तुम्ही फारच फेमस दिसता! तर त्यांनी मला बोटाने एका दिशेला पॉईंट आउट करून दाखवलं आणि सांगितलं, इथे जवळच तर माझी बेकरी होती. ५० वर्षं मी आणि बायकोने ती चालवली. इथेच जवळपासच्या बिल्डिंगमध्ये राहायला होतो. त्यामुळे ह्या भागातले बरेचजण मला ओळखतात.

गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या आजारपणात झालेल्या मृत्यूविषयीही सांगितलं आणि सून आणि नात येतात भेटायला पण नातीची आमच्यासोबत विशेष ऍटॅचमेंट नाहीये. या गोष्टीचं त्यांना दुःख होतं.

ही गोष्ट माझ्या लक्षात राहून गेलेली होती. त्यांची सून एकदा संस्थेत आलेली असतांना मी आजोबांची ही बोच तिला बोलून दाखवली, तेंव्हा ती म्हणाली, ह्या गोष्टीला हे दोघंच जबाबदार आहेत. मी माझ्या मुलीला तिच्या लहानपणी यांच्याकडे पाठवायचा प्लॅन करायचे, तेंव्हा हे दोघं बिझी असायचे, त्यांचे त्यांचे प्लॅन्स असायचे, ज्यात ते माझ्या मुलीला वेळ देऊ शकत नसत, मग मी तिला माझ्या आई वडिलांकडे पाठवायचे. साहजिकच तिची माझ्या आई वडिलांसोबत जास्त ऍटॅचमेंट आहे आणि यांच्यासोबत कमी.. पेराल तसे उगवते, ह्या म्हणीची आठवण करून देणारा आणि काहीसा अंतर्मुख करणारा हा किस्सा. 

तर असे हे संस्थेत आणि ह्या एरियातही जुने असलेले बेकरीवाले आज्जी आजोबा.  आम्ही नेहमीच भेटतो आणि आणि गप्पाही मारतो.

तर ते दुसरे नवे बेकरीवाले आजोबा इतके गप्पीष्ट नाहीत. तेव्हढ्यास तेवढे पण नम्रतेने बोलणारे. त्यांनी म्हणे नर्सेसच्या नाकात दम आणला. सतत त्यांच्या बायकोला बेडवरून उठवा, तिला मला (व्हीलचेअरवरून) चालायला घेऊन जाऊ दे, असे म्हणत. आज्जींना झोपेची गरज असे, तरीही, अगं ऊठ, चल बाहेर जाऊ, गप्पा मारू, म्हणून उठवून टाकत. ह्या आज्जीही, दिवसा झोपत, रात्री जागत आणि आजोबांचीही झोपमोड करत. असं दोघंजण मिळून एकमेकांचं झोपेचं तंत्र आणि स्वतःच्या तब्येती बिघडवून घ्यायला लागले आणि नर्सेसनाही बरंच कामाला लावायला लागले, म्हणून नर्सेसने त्यांची सेपरेट रुम्समध्ये व्यवस्था केली.

ते दोघंही वेगवेगळ्या मजल्यांवर राहू लागले. ही गोष्ट आज्जींना काही सहन होईना. विस्मरण झालेते असले तरी आजोबा आणि त्यांचा सहवास त्यांना पक्का लक्षात होता, त्यामुळे सतत जर्मन भाषेत फाटर फाटर (म्हणजे फादर फादर) म्हणून हाका मारू लागल्या. आजोबाही तिन्ही वेळचे जेवण खाण आणि रात्रीची झोप सोडता बाकी पूर्णवेळ आज्जींसोबत राहू लागले. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांना व्हीलचेअरवर बसवून आपल्या रूममध्ये आणत आणि त्यांचा हात धरून बसून राहत तास न् तास. गार्डनमध्येही फेरफटका मारायला घेऊन जात रोज नियमितपणे.

एक दिवस अचानक त्यांची पाठ प्रचंड दुखायला लागली. ती वाढू लागल्याने आज्जींना स्वतः उठून भेटायला जाणे आणि त्यांना रूममध्ये घेऊन येणे त्यांच्यासाठी अशक्य झाले. पण त्यांचे हे काम मग त्या त्या शिफ्टच्या नर्सेस करू लागल्या. आज्जींना जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळांना त्यांच्या मजल्यावर नेणे आणि इतरवेळी आजोबांकडे आणणे, हे इमानेइतबारे करू लागल्या. पण इतकी वर्षे स्वावलंबी असलेले आजोबा अचानकपणे आलेलं हे परावलंबित्व सहन न होऊन डिप्रेशनमध्ये गेले. इतकी की ते एका नर्सला म्हणाले की मी आत्महत्या करायचा विचार करतो आहे. आधी खिडकीतून बायकोला ढकलून देऊन मग मी ही उडी मारेन म्हणतो. म्हणून त्या नर्सने मला तडक ही बातमी कळवून आजोबांना कौंसेलिंग करायची विनंती केली.

मी आजोबांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी छान गप्पाही मारल्या. मला त्यांच्या आत्महत्येच्या प्लॅनविषयी मात्र ते काही बोलले नाहीत. त्यामुळे मी ही त्यांना काही कौंसेलिंग वगैरे केलं नाही. तुम्ही आणि आज्जी किती मस्त कपल आहात. तुमचं फार कौतुक वाटतं वगैरे त्यांना जगण्याविषयी रस वाटेल, असं सकारात्मक, प्रेरणादायी बोलले.  आज्जी त्यांच्यासोबत होत्याच. पण अतिशय शांत.  मग लंचब्रेक झाला. आजोबांनी मला आज्जींना जेवायला त्यांच्या मजल्यावर घेऊन जाण्याची आणि त्यानंतर बागेत फिरवून आणून परत त्यांच्या रुम्समध्ये आणण्याची विनंती केली. जी मी अर्थातच मान्य केली.

आज्जींचे जेवण होईपर्यंत त्यांच्यासोबत थांबले, त्यांना गार्डनमध्ये एक राउंड फिरवून आणले आणि आजोबांकडे आणून सोडले. आजोबांकडे पटकन परत जायचं म्हणून आज्जी फार पटापट जेवल्या. गार्डनमध्ये राउंड मारतांनाही पटापट आवर आणि मला त्यांच्याकडे घेऊन जा, असं मला म्हणाल्या. आम्ही सगळं आवरून आजोबांकडे गेलो, तोवर ते जेवतच होते. म्हणून मी त्यांना जर्मनमध्ये "गुटन अपेटिट" म्हणजेच "आपल्या जेवणाचा आनंद घ्या"  असे म्हणाले. तर इतका वेळ शांतपणे माझ्याकडून सेवा करून घेतलेल्या आज्जी एकदम ओरडून मला म्हणाल्या, "एकटं सोड त्यांना आणि जा इथून". आज्जींना काय वाटलं असेल, याची कल्पना करून, ह्या वयातही त्यांचा पझेसिव्हनेस समजून घेऊन मी त्या गोष्टीचे वाईट न वाटून घेता खेळकरपणे ती गोष्ट घेतली.

दुसऱ्या दिवशी आजोबांना पाठीचा एक्स रे करण्यासाठी न्यायचे होते आणि अजून काही तपासण्या करण्यासाठी २ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे सांगितले होते, त्यामुळे नर्स म्हणाली की आता मेडिकल ट्रान्सपोर्टची गाडी आलेली आहे आजोबांना घेऊन जाण्यासाठी, तर आज्जींना परत त्यांच्या मजल्यावर घेऊन जाशील का? एकदम धर्म संकटात सापडलेल्या व्यक्तीसारखी माझी अवस्था झालेली होती. पण काम करणं भाग तर होतंच. मला बघताच, कपाळावर आठ्या आणून आजोबा अत्यंत तुसडेपणाने मला "लिव्ह अस अलोन" असं जर्मन भाषेत म्हणाले. "माफ करा, पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी आलेली आहे आणि ते लोक तुमची वाट बघत आहेत", असे सांगून एकमेकांचा हातात हात धरून बसलेल्या रोमँटिक जोडप्याला एकमेकांना निरोप देण्याचं काम सांगून, त्यांचा घट्ट हात शक्य तितक्या अलगदपणे सोडवून आज्जींना त्यांच्या मजल्यावर घेऊन जाण्याचं खलनायकी कार्य केल्याने आज्जींच्या नजरेत मी अजूनच वाईट झाले. तुम्ही असे का करत आहात,  माझ्याशी बोलूच नका आणि माझ्या डोळ्यासमोर उभ्याही राहू नका, अशी ताकीद त्यांनी मला दिली. त्यामुळे पुढचे काही दिवस "फाटर,फाटर" करत रडत बसलेल्या आज्जींना शांत करण्याचं, त्यांचं मन रमवण्याचं मुळातलं माझं काम नर्सेसना करावं लागलं.

आज्जींची व्हीलचेअर ओढून ओढून आजोबांच्या आधीच नाजूक असलेल्या पाठीच्या बरगाड्यांची काही हाडं खूपच दुखावली असल्याने त्यांना जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, असं समजलं.

विस्मरणाचा आजार असलेल्या आज्जी काही दिवसांनी  आजोबांना विसरल्या आणि त्यांची आठवणही काढेनाश्या झाल्या. शांत राहू लागल्या. माझ्याशीही नीट बोलू लागल्या.

आज आजोबा हॉस्पिटलमधून परत आले आणि मला गार्डनमध्ये दिसले. त्यांना भेटायला एक नर्स आज्जींना घेऊन आलेली दिसली. पण दुसऱ्याच क्षणी "आज्जी मला इकडून परत घेऊन जा" म्हणू लागल्या, म्हणून नर्स त्यांना नेऊ लागली. मी जाऊन आज्जींना अर्थातच जर्मनमध्ये म्हणाले, "युवर फाटर इज बॅक." मग त्यांना त्यांच्याकडे परत घेऊन गेले. आजोबांनी आज्जींचा पकडला, त्यांनी तो झिडकारला, तर त्यांनी माघार न घेता पुन्हा त्यांच्या हातावरून हळुवारपणे हात फिरवला. आता आज्जींना स्पर्श ओळखीचा वाटायला लागलेला असणार, म्हणून त्यांनी विरोध केला नाही. मग आजोबा म्हणाले, हिला माझ्या रुममध्ये आणून सोडाल का? हे काम त्या आज्जींना घेऊन आलेल्या नर्सने केले. माझे ऑफिस अवर्स तेंव्हा संपलेले होते, त्यामुळे मी तिला तशी विनंती केली.

रोमँटिक जोडप्याची अशाप्रकारे पुनर्भेट झाली. त्यांची ताटातूट आणि आज पुनर्भेटही माझ्या साक्षीने झाल्याने आज त्यांच्याविषयी लिहिल्यावाचून मला राहवलेच नाही! ट्रॅममध्ये लिहायला सुरुवात करून घरी येऊन लगेच लिहून पूर्ण केला आजचा ५० वा आणि मोठा भाग. शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे धन्यवाद!

सकीना वागदरीकर/ जयचंदर
२८.०९.२०२३

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५