आज्जी आजोबांची डायरी: भाग ४१
डायरी लिहायला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झालं, ह्यावर ६ एप्रिलला पोस्ट लिहिली आणि त्या वेळेपासूनच मन डायरी लेखनाकडे ओढ घेऊ लागलं होतंच आणि कालच अशा काही अजब, सुखद धक्के देणाऱ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ज्या सांगितल्यावर बहीण म्हणाली, "ताई प्लिज, लगेच हे लिहून काढ ना गं!" आईनेही त्याला दुजोरा दिला. मग आता हातातली सगळी कामं बाजूला ठेवून लिहायला सुरुवात केली.
खरं म्हणजे लेकाला केजीत सोडून परतीच्या ट्रॅमच्या प्रवासात लिहायला सुरुवात केली. आज मी घरी आहे. ५ दिवसांचे वर्किंग अवर्स ४ दिवसात संपवून १ दिवस घर आवरणे, कपडे २/३ राऊंडसमध्ये (मशिनमध्ये) धुवून (ड्रायरमध्ये) वाळवून, घड्या घालून जागच्या जागी ठेवून देऊन, स्वयंपाक करून, केजीतून दमून भागून, भुकेजून घरी आलेल्या लेकाची काळजी घेणे, त्याने दप्तर फेकताक्षणी सुरू केलेल्या गोड बडबडीला नीट प्रतिसाद देणे- जिच्यात दिवसभराचा आढावा असतो, काय काय खेळले, शिकले, खाल्ले, शी केली की नाही, या सगळ्या डिटेल्समध्ये मी गढून जाते. थोडक्यात त्याला एंटरटेन करत करत स्वतः एंटरटेन्ड होणे, हे माझे आजचे अत्यंत आवडते रुटीन असते. ह्या दिवशी मला माझे पूर्णवेळ होममेकर असतांनाचे सुंदर जुने दिवस अनुभवता येतात.
तर या रुटीनमधला सकाळच्या कामाचा रुक्ष भाग, जो मी कधी विविध भारतीचे रेडिओ स्टेशन ऐकत ऐकत, तर कधी पुणे एफ एम लावून, कधी हंगामा-एव्हरग्रीन बॉलिवूड ऐकत थोडा सुखावह करत असते, ते माझे रुटीन डिस्टर्ब करून लिहिण्याच्या आलेल्या जबरदस्त उर्मीला न थोपवता लिहायला लागलेले आहे.
नमनाला घडाभर तेल ओतून झालेले आहे. तर आता सुरुवात करते फायनली.
परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे.
मोठ्या गॅपनंतर लिहायला लागलेले आहे, तर एक बदलही करते आहे. मागे मला काही जणांनी ह्या आज्जी आजोबांना काल्पनिक नावं देण्याचे सुचवले होते, जे मी लिखाणाचा फ्लो जातो, म्हणून केले नव्हते. तर मला अचानकपणे सुचले की काल्पनिक नावांना चांगला पर्याय असेल, आज्जी आजोबांच्या नावांची इनिशीयल्स. ह्याने मलाही कोणाविषयी लिहितेय, त्याची लिंक लागेल आणि वाचकांनाही समजायला सोपे होईल. ही इनिशियल्स नाव- आडनाव, अशी न घेता रँडम असणार आहेत, ज्यामुळे मला ती व्यक्ती आठवणे सोपे जाईल. उदा. गार्ब्ज आडनाव असल्यास जी आर आणि हामर आडनाव असेल तर एच आर, किंवा एच एम अशा कोणत्याही ऑर्डरने. (ह्या दोन्ही आडनावांचे कोणीही आज्जी आजोबा संस्थेत अजूनतरी नसल्याने ही आडनावे निवडली.)
तर, सुरुवात स्ट्रेसफूल आणि शेवट सुखद अनुभवाने, जसे घडले, तसे आणि त्याच ऑर्डरने लिहायचा प्रयत्न करते.
माझ्या कामाचे स्वरूप सतत इव्हॉल्व्ह होत असते. रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असतांना संस्थेत राहणाऱ्या बहुतेक रहिवाश्यांसाठी हे शेवटचे घरकुल असल्याने त्यांच्या मनातली उदासी, निराशा, जवळच्यांच्या मृत्यूचे दुःख, स्वतःच्या मृत्यूचे भय, जवळ आणि दूर राहणाऱ्या नातेवाईकांची येणारी आठवण, राहते घर विकून केअर होममध्ये राहावे लागले, या निर्णयाचे अतीव दुःख, आजार, अपंगत्व, यातून आलेले परावलंबीत्व अशा अनंत पैलूंमुळे त्रासलेल्या आज्जी आजोबांना आनंदी करण्यासाठी मला जमेल ते करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि तू हेच का केलं आणि ते का नाही? असं कर, तसं करू नकोस, इतक्याच लोकांना भेट, ह्याच लोकांना भेट, टार्गेट सेट कर आणि ते दिवसाला, आठवड्याला पूर्ण कर, त्याचं मला रिपोर्टिंग कर, असं कोणतंही प्रेशर माझ्या बॉस मला देत नसल्याने मी माझ्या मनाप्रमाणे काम करू शकते.
शिवाय माझ्या ह्या मेन बॉसना कायम माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला पुरेसा वेळ नसतो, तर त्यांनी माझ्यासाठी आमची एच आर हेड माझी इमिडीएट बॉस म्हणून नेमलेली आहे. ती सकाळी मला चार पैकी कोणत्या मजल्यावर आज केअर गिव्हर्सची कमतरता आहे, हे सांगून मला त्या त्या फ्लोअरवर ड्यूटी लावत असते. कधी कधी सगळीकडेच कमतरता असल्याने मी चारही फ्लोअर्सचा दिवसभरात धावता आढावा घेते, तर कधी सकाळी एक मजला आणि दुपारी दुसरा तर कधी एकच मजला दिवसभर, असे करते. एकच मजला दिवसभर मिळाला की मला सर्वांना भेटणे आणि निवांत बोलणे शक्य होते म्हणून मला आनंद होतो तर ज्या दिवशी सर्व मजले फिरावे लागते, त्यादिवशी सर्वांची ओझरती का होईना, भेट होण्यामुळे मला आनंद होतो. थोडक्यात, आवडते काम असल्याने कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये मी खूशच असते. तर ही कॉम्बिनेशन्स मला नेमून देणारी माझी दुसरी बॉस माझ्या अनंत प्रश्नांना उत्तरं द्यायला कायम उपलब्ध असते. नसली, तरी मला ती उपलब्ध झाल्या झाल्या कॉल करून काय ते विचारते.
हो! मला रोज प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात. आलेल्या प्रसंगाला कसे डील करावे, हे समजत नाही, कोणाकडे जावे, हे कळत नाही. मग ही आमची एच आर ची बॉस मला मार्ग दाखवते.
तिच्याशी मी कलिग्जसोबत झालेले वादही मोकळेपणाने शेअर करू शकते आणि आज्जी आजोबांच्या बाबतीत घडलेले नाजूक विषयांवरचे प्रॉब्लेम्स कोणत्याही आडपडद्याशिवाय डिस्कस करू शकते. तिच्याकडून मला अफाट सुंदर सोल्युशन्स मिळतात, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे धडे मिळतात.
डायरीच्या आधीच्या भागांमध्ये मी तिच्याविषयी काही लिहिलं नव्हतं कारण तेंव्हा माझ्या मनात तिच्याविषयी काही अनुभवांमुळे नकारात्मकता होती. जी मी तिच्याशीच बोलून क्लियर करून घेतल्यामुळे आमच्यातील मळभ आता दूर झालेले आहे. आमच्यात नक्की काय वाजले होते, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच, तर त्यातले एक, दोन फारसे पर्सनल नसल्याने उदाहरणार्थ सांगायला माझी हरकत नाही.
तर झाले असे. कुटुंबात विशेषतः लेकाला वाढवण्यात रमलेल्या मला, " आई कुठे काय करते?" असे सगळे करूनही सतावत असलेल्या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी अनेक वर्षांच्या गॅपनंतर मी नोकरीला लागले. अगदी अनपेक्षितपणे फार पटकन लागलेल्या ह्या नोकरीसाठी माझे जडत्व निर्माण झालेले शरीर आणि मनही तितकेसे तयार नव्हते.
सपोर्टिव्ह असा आणि इनिशिएटिव्ह घेऊन ऑफिसचे काम करून घरकामात हातभार लावणारा नवरा लाभलेला असूनही आणि लेकाला मिळून तयार करून दोघं मिळून एकत्रच केजीत सोडूनही मला कामाच्या ठिकाणी पोहोचायला आठवड्यातून 2 दा तरी कधी 10 मिनिटं तर कधी 15 मिनिटं उशीर व्हायचा. मग ही एच आर बॉस, "काय सकीना, आजही उशीर?!?" अशी रिसेप्शन काउंटरजवळ किंवा कुठेही कमेंट करायची. मी तिला आज हे झालं, तर परवा ते अशी सगळी खरीखुरी कारणं सांगायचे. मग ती 'ओके!' म्हणायची. यात माझीच चूक असली, तरीही मला सगळ्यांसमोर ऐकवणूक झाल्याने लाजिरवाणं वाटायचं. मूड जायचा.
हा एक अनुभव.
दुसरा म्हणजे एक दिवस आमची टीम मीटिंग होती. त्यात कळवल्या गेलेल्या एका ट्रेनिंग सेशनची अपॉइंटमेंट नोट करायला मी माझ्या फोनचे कॅलेंडर उघडले होते, हे बहुतेक न समजल्याने, "सकीना, इथे तू मोबाईल घेऊन का बसली आहेस? असे ती मला सर्व टीम मेम्बर्ससमोर रफली बोलली. इथेही चूक माझीच होती. पण मला वाईट वाटायचं, ते वाटलंच.
असे अजून एक दोन प्रसंग घडल्यावर मी न राहवून तिच्याशी बोलायला तिच्या ऑफिसरूममध्ये गेले. तिला म्हणाले, "सॉरी, मला शिस्त नाही, वेळेचे भान नाही आणि वर्क एथिक्सही नाहीत, हे मी मान्यच करते. तू मला शिस्त लावते आहेस, हे ही बरोबरच आहे आणि ते तू करच. पण एकच विनंती करते. तुला मला जे काही सांगायचे असेल, ते शक्य तेंव्हा नंतर प्रायव्हेटली सांगत जा. ते शक्य नसल्यास, हळुवारपणे बोलत जा. माझ्यावर प्लिज बॉसिंग करू नकोस. ह्या सगळ्या बेशिस्त वर्तनामागे माझी कामात पडलेली मोठी गॅप आणि थोडा स्वभावाचा भागही कारणीभूत आहे, जो मी हळूहळू बदलते आहे. पण त्यात माझी खूपच दमछाक होते आहे. मला थोडा वेळ दे. शिवाय अजून एक लक्षात ठेव की माझं काम लोकांशी बोलणं, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणं, हे आहे. जे हृदयाच्या आतून करावं लागतं. ते व्यवस्थित करण्यासाठी माझा स्वतःचा मूड चांगला असणं आवश्यक आहे. तू जेंव्हा माझा असा जाहीर अपमान करतेस, तेंव्हा मी फार अपसेट होते आणि माझा अख्खा दिवस खराब जातो. चूक माझी असूनही मनात अढी मात्र तुझ्याविषयी निर्माण होते आहे.
मी स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतेच आहे, तू सुद्धा प्लिज मला जाहिरपणे न बोलता सेपरेटली मला हवे ते बोल, माझ्यावर संस्कार कर आणि माझं कौतुक मात्र सर्वांसमोर कर, हे तुला जमेल का? हे केलेस, तर फार बरे होईल. ती हसली आणि मला म्हणाली, "ओके! डन!"
मागच्या वर्षी मे मध्ये माझ्या वाढदिवसाच्या आठवडाभर आधी तिने मला विचारलं, आम्ही सगळे टीम मेम्बर्स मिळून तुला गिफ्ट देणार आहोत, तर तुला काही वेगळं हवं आहे का, त्यावर अगदी स्पॉंटेनियसली मी तिला म्हणाले, "मला बाकी काही नको, फक्त तुझं प्रेम हवं आहे." ते ऐकून ती खदाखदा हसली. मी ही अगदी लेस्बियन टाईपचे स्टेटमेंट झालेय की हे तर! हे जाणवून जोरजोरात हसले.
तेंव्हापासून ती माझ्याहून थोडी छोटी असली, तरी माझ्या मोठ्या बहिणीसारखी माझी गाईड कम बॉस झालेली आहे.
त्यानंतर काही महिन्यांनंतरची गोष्ट आहे. माझ्या नोकरीचा काँट्रॅक्ट एका वर्षाचा होता आणि मग माझ्या मेन बॉस तो पुन्हा एका वर्षाने एक्सटेंड करणार की नाही, त्यांच्या मनात माझ्याविषयी, माझ्या कामाविषयी काय इम्प्रेशन आहे, हे काही माहिती नव्हतं, पण त्या पुन्हा एकदा वर्षभरासाठीच एक्सटेंड करणार, असा अंदाज होता, इतर काहीजणांचे एक्सटेंड होणारे कॉन्ट्रॅक्टस बघता. त्याच दरम्यान माझा व्हीजा एक्सपायर होणार होता. तेंव्हा मी डिसेंबरमध्ये बॉसना माझा जॉब काँट्रॅक्ट अनलिमिटेड करता येईल का? जेणेकरून पर्मनंट रेसिडेन्स मिळेल आणि थोड्या थोड्या काळाने परत परत व्हीजा एक्सटेंड करण्याची प्रक्रिया टळेल, हे विचारले होते. त्यावर बॉसने विचार करून दोन दिवसांनंतर सांगते, तू अपॉईंटमेंट घेऊन भेटायला ये त्यादिवशी, असे सांगितले.
कंपनीच्या नियमानुसार असे निर्णय फक्त दोन व्यक्तींमध्ये न घेता सोबत अजून एक साक्षीदार लागतो म्हणून अपॉइंटमेंटच्या दिवशी बॉसच्या केबिनमध्ये माझी मेन बॉस आणि ही एच आर बॉस होती.
मला त्यांचा निर्णय सांगण्याआधी मुख्य बॉसने बोलायला सुरुवात केली, "सकीना, गेल्या काही महिन्यांपासून तू आमच्यासोबत काम करते आहेस. तुझे काम मला प्रत्यक्ष पाहायला मिळत नसले, तरीही तुझ्या डॉक्युमेंटेशनमधून मला ते वाचायला मिळते आहे, लोकांकडून ऐकून समजते आहे. तू सुंदर पद्धतीने आणि मनापासून काम करते आहेस, हे जाणवते आहे..." मेन बॉसच्या बोलण्याला दुजोरा देत एच आर बॉस म्हणाली, .."आणि मला तुझी सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तू सर्व आज्जी-आजोबांना समान वागणूक देतेस. त्यांच्यात भेदभाव करत नाहीस."
मी त्यांना उत्तर देतांना म्हणाले, "माझ्यासाठी हे सगळे माझ्याच आज्जी आजोबांसारखे आहेत. माझी लाडकी आज्जी, जिची मी सगळ्यात पहिली नात होते, तिच्यासोबत माझे खूप सुंदर नाते होते. ती मला सोडून गेली, तेंव्हा मी तिच्यासोबत नव्हते, ह्याचे फार मोठे गिल्ट माझ्या मनात आहे. आज माझे सर्व आजी आजोबा अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांना इच्छा असूनही मी भेटू शकत नाही. ह्या आज्जी आजोबांमध्ये मला ते सगळे दिसतात. त्यांची सेवा करतांना माझ्या मनातला अपराधी भाव थोडा कमी होतो. त्यामुळेच इथे येतांना मला माझ्या एका घरातून उठून माझ्या दुसऱ्या घरी आल्यासारखे वाटते. हे घर आणि ही माणसं दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार!"
माझ्या मेन बॉस त्यावर म्हणाल्या, "जरी ही संस्था मी चालवत असले, तरीही आणि अगदी मनापासून काम करत करत असले, तरीही मला हे माझे दुसरे घर आणि हे सगळेजण माझे आज्जी आजोबा असे काही वाटत नाही. असे न वाटणे हा कदाचित माझ्या जर्मन कल्चरचा आणि तुला तसे वाटणे, हे तुझ्या भारतीय कल्चरचा भाग असावे. कदाचित त्यामुळेच तुझे काम इतके चांगले आणि ह्या जॉबसाठी हव्या असणाऱ्या योग्य ऍटीट्यूडने होत असावे.
.. आणि म्हणूनच आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे, की आम्ही तुझा काँट्रॅक्ट अनलिमिटेड करत आहोत!"
ही आनंदाची बातमी ऐकतांना झालेले हे सगळे कौतुक ऐकून मला एकदम खूप काम करून थकल्यावर अचानक भरपूर मल्टिव्हिटॅमिन ज्यूस प्यायला मिळाल्यावर कसे ताजेतवाने, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटेल, तसे वाटले.
'पेराल तसे उगवते', ह्या म्हणीचा प्रत्यय आला. आपण लावलेल्या पॉझिटिव्हीच्या बी चा असा सुंदर पण माझ्यासाठी इनव्हिजिबल असा वृक्ष तयार होत होता आणि त्याचे गोड फळ मला चाखायला मिळाले, याचा आनंद अवर्णनीय होता..
मी सुरुवात काय केली आणि कंटेंट काय लिहिला, याची मजा वाटते आहे. जाऊन सुरुवात बदलावी का, असा विचार आला. पण विचारांच्या ओघात जे लिहिले ते बदलले तर नैसर्गिक ओघही तुटेल, म्हणून नाही बदलत.
मुळात जे लिहायचे होते ते पुढच्या भागात लिहिण्याचा प्रयत्न करते. आता मात्र थांबते. भेटूया, लवकरच.
एल जी (म्हणजे लिबे ग्रुझे- जर्मनमधील प्रेमपूर्ण शुभेच्छा)
तुमची सकीना
९.०४.२०२१
Comments
Post a Comment