प्रस्तावना

प्रस्तावना:
- मूळ पुस्तक: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा
- लेखक: मोहनदास करमचंद गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ३-९
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
**************************************

चार किंवा पाच वर्षांपूर्वी निकटच्या सहकाऱ्यांच्या आग्रहावरून मी आत्मकथा लिहिण्याचे मान्य केले होते; आणि आरंभही केला. परंतु फुलस्केपचे एक पान लिहितो न लिहितो इतक्यात मुंबईची आग (संदर्भ: नोव्हेंबर १९२१ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनप्रसंगी मुंबई शहरात झालेले दंगे. ते थांबेपर्यंत गांधीजींनी अनशन केले होते.) भडकली आणि मी हाती घेतलेले काम अर्धवट राहून गेले. त्यानंतर तर मी एकामागून एक असा व्यवसायात पडलो, की शेवटी मला माझे येरवड्याचे स्थान मिळाले. तेथे भाई जयरामदासही(संदर्भ: सिंधचे पुढारी श्री. जयरामदास दौलतराम) होते.
त्यांनी माझ्यापाशी अशी मागणी केली, की बाकीची सर्व कामे बाजूला सारून मी पहिल्याने आत्मकथा लिहून टाकावी. त्यांना जबाब पाठवला, की माझा अभ्यासक्रम ठरून चुकला आहे आणि तो पूर्ण होईपर्यंत मी आत्मकथेला प्रारंभ करू शकत नाही. मला जर माझी शिक्षेची मुदत येरवड्यामध्येच घालवण्याचे सदभाग्य लाभले असते, तर मी खात्रीने तेथेच आत्मकथा लिहू शकलो असतो. परंतु आत्मकथेला सुरुवात करण्यासच मला अजून एक वर्ष पाहिजे होते. त्यापूर्वी मला कोणत्याही तऱ्हेने आत्मकथेचा आरंभही करणे शक्य नव्हते. अर्थात आत्मकथा राहून गेली. आता स्वामी आनंदांनी ( संदर्भ: गांधीजींच्या वर्तमानपत्रांचे मुद्रक, प्रकाशक आणि व्यवस्थापक; गांधीजींचे एक निकटचे अनुयायी.) पुन्हा तीच मागणी केली आहे, व 'दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास' पुरा केला असल्यामुळे मलाही आत्मकथा लिहावेसे वाटू लागले आहे. स्वामींची मागणी अशी होती, की मी संबंध कथा लिहून काढावी आणि नंतर ती पुस्तकरूपाने छापावी. परंतु माझ्यापाशी लागोलाग एवढा वेळ नाही. लिहावयाचेच, तर नवजीवनसाठीच लिहिता येणार. मला 'नवजीवन'साठी काही तरी लिहावयाचे असतेच. मग आत्मकथाच का लिहू नये? स्वामींनी हा बेत मान्य केला. अशा तर्हेने आत्मकथा लिहिण्याचा आता योग आला आहे.

परंतु हा बेत करतो, इतक्यात एका निर्मळ अंतःकरणाच्या मित्राने (दर सोमवारी गांधीजी मौन पाळत.) माझे मौन चालू असतांना सौम्य शब्दांमध्ये मला म्हटले: " तुम्ही आत्मकथा काय योजून लिहिणार आहा? ही तर पाश्चात्य पद्धत आहे. पूर्वेमध्ये लिहिलेली ऐकिवात नाही. आणि लिहिणार तरी काय? अथवा सिद्धांतांन अनुसरून जी जी कामे तुम्ही करत आहा. त्यात मागून फेरफार केलेत तर? पुष्कळ लोक तुमच्या लिखाणाला प्रमाणभूत मानून स्वतःचे वर्तन ठरवीत असतात, त्यांची दिशाभूल झाली तर? म्हणून सावध राहून तूर्त आत्मकथेसारखे काहीही लिहिले नाहीत, तर बरे नाही का?"

या युक्तिवादाचा माझ्या मनावर थोडाबहूत परिणाम झाला. परंतु मला आत्मकथा थोडीच लिहावयाची आहे? मला तर आत्मकथेच्या नावाखाली सत्याचे जे अनेक प्रयोग मी केले आहेत, त्यांची हकिकत लिहावयाची आहे. त्या प्रयोगांमध्ये माझे जीवन गुरफटलेले असल्यामुळे ती हकिकत एखाद्या जीवनवृत्तांताप्रमाणे होऊन जाईल ही गोष्ट खरी; परंतु जर तिच्या प्रत्येक पानातून माझे प्रयोगच प्रकट होत राहिले, तर त्या कथेला मी स्वतः निर्दोष समजेन. माझ्या सर्व प्रयोगांची मालिका लोकांसमोर राहिली तर ती लाभदायी होऊन राहील, असे मला वाटते-किंवा असा मला मोह वाटतो म्हणा ना! राजकीय क्षेत्रांतील माझे प्रयोग आता हिंदुस्थानच्या माहितीचे झाले आहेत. एवढेच नव्हे; तर थोड्या बहुत अंशाने ज्याला "सुधारलेले" जग म्हणण्याची वहिवाट आहे, त्याच्याही माहितीचे आहेत. माझ्या मते, त्या प्रयोगांची किंमत अल्पात अल्प आहे, व म्हणूनच त्या प्रयोगांमुळे मला जी 'महात्मा' पदवी मिळाली आहे, तिचीही किंमत अल्प आहे. कित्येक वेळा त्या विशेषणाने मला अतिशय दुःखही दिले आहे. त्या विशेषणाने मी फुशारलो असेन, असा एकही क्षण मला आठवत नाही. पण माझे अध्यात्मिक प्रयोग, की जे माझे मीच जाणू शकणार, आणि ज्यांतूनच माझी राजकीय क्षेत्रातली शक्तीही उद्भवलेली आहे, त्या प्रयोगांचे वर्णन करून सांगणे मला आवडेल खरे. जर हे प्रयोग खरोखरच अध्यात्मिकच असतील, तर त्यांमध्ये फुशारकीला जागा नाही. त्यांपासून केवळ नम्रतेची वृद्धी होईल. जसजसा मी विचार करू लागतो, माझ्या भूतकालीन जीवनावर दृष्टी टाकीत जातो, तसतसे माझे अल्पत्व मला स्पष्टपणे दिसून येते. मला जे करावयाचे आहे, ते तर आत्मदर्शन, ईश्वराचा साक्षात्कार- मोक्ष हेच होय. माझी सर्व हालचाल याच दृष्टीने होत असते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते, आणि राजकिय चळवळीतही मी मनोभावे पडतो, तोही याचसाठी.
परंतु पहिल्यापासूनच माझे असे मत आहे, की जे एकाला शक्य आहे ते सर्वांना शक्य आहे. त्यामुळे माझे प्रयोग खाजगी म्हणून झालेले नाहीत, खाजगी राहिलेलेही नाहीत. ते सर्वांनी पाहिले म्हणून त्यांची अध्यात्मिकता कमी होत असेल असे मला वाटत नाही. अलबत, अशा कित्येक गोष्टी असतात की ज्या आत्म्यालाच समजणार, आत्म्यातच अंतर्धान पावणार. अशा गोष्टींचे वर्णन माझ्या शक्तीपलीकडचे आहे. माझ्या प्रयोगांमध्ये तरी अध्यात्मिक म्हणजे नैतिक, धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म. अर्थात, ज्या गोष्टींचा निर्णय बालक, तरुण व वृद्ध करतात व करू शकतात, अशा गोष्टींचाच समावेश ह्या कथेमध्ये होईल. असली कथा जर मला तटस्थपणे, निरभिमानवृत्तीने लिहिता आली, तर त्यापासून तसलेच प्रयोग करणाऱ्या इतर लोकांना थोडीबहुत सामग्री मिळू शकेल.
माझे प्रयोग कोणत्याही प्रकारे संपूर्ण आहेत, असे माझे मुळीच म्हणणे नाही. एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे आपले प्रयोग अतिशय पद्धतशीर रीतीने विचारपूर्वक व सूक्ष्मपणे करत असूनही, त्यांच्यापासून काढलेली अनुमाने अखेरची आहेत असे लोकांना सांगत नाही, किंवा त्या प्रयोगांचे हेच निर्विवाद परिणाम आहेत किंवा नाहीत, याबद्दल तो साशंक नसला, तरी तटस्थ राहतो, तशाच तऱ्हेने माझेही माझ्या प्रयोगासंबंधी म्हणणे आहे. मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे. एकन् एक भावना तपासली आहे. तिचे पृथक्करण केले आहे. परंतु त्यावरून निघालेली अनुमाने सर्वांच्याच बाबतीत अखेरची आहेत, किंवा खरी आहेत, किंवा ती तेवढीच खरी, असा माझा मुळीच आग्रह नाही. हो, एवढं मात्र मी अवश्य म्हणतो, की माझ्या दृष्टीने ती खरी आहेत आणि तूर्त तरी अखेरचीशी वाटतात. तशी ती वाटत नसतील, तर त्यांच्या आधारावर मी कोणत्याही कामाची उभारणी करता कामा नये. परंतु मी तर पावलोपावली ज्या ज्या गोष्टी समोर येतील, त्यांचे त्याज्य आणि ग्राह्य असे दोन वर्ग पाडतो आणि ग्राह्य मानलेल्या गोष्टींस अनूरूप असे स्वतःचे वर्तन निश्चित करतो. अशा तऱ्हेने ठरविलेल्या आचरणापासून जोपर्यंत माझे, म्हणजे माझ्या बुद्धीचे आणि आत्म्यांचे समाधान होत असेल, तोपर्यंत मला त्याच्या शुभपरिणामाबद्दल अचलित विश्वास राखला पाहिजे.

जर मला केवळ सिद्धांताचे म्हणजे तत्वांचेच वर्णन करावयाचे असेल, तर मी ही आत्मकथा लिहिणारच नाही. परंतु मला तर त्या सिद्धांतांवर रचलेल्या कार्याचा इतिहास द्यावयाचा आहे; व म्हणूनच या प्रयत्नाला पहिले नाव मी 'सत्याचे प्रयोग' असे दिले आहे. यामध्ये हिंसा, ब्रह्मचर्य इत्यादि नियमांचेही प्रयोग येऊन जातील. हे नियम सत्याहून भिन्न समजले जातात. परंतु माझ्यामते सत्यच सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामध्ये अगणित वस्तुंचा समावेश होऊन जातो. हे सत्य म्हणजे स्थूल- वाचिक- सत्य नव्हे; तर जसे वाचेचे, तसेच विचारांचेही. हे सत्य म्हणजे आपण कल्पिलेले सत्य तेवढेच नव्हे; तर स्वतंत्र, शाश्वत सत्य; तेवढेच नव्हे तर स्वतंत्र, शाश्वत सत्य; म्हणजे परमेश्वरच.

परमेश्वराच्या व्याख्या अगणित आहेत. कारण त्याच्या विभूतीही अगणित आहेत. या विभूती मला आश्चर्यचकित करून टाकतात. क्षणभर मुग्ध ही करतात. परंतु मी सत्य स्वरूपी परमेश्वराचाच पुजारी आहे. तो एकच सत्य आहे, आणि बाकी सारे मिथ्या आहे. ते सत्य मला सापडलेले नाही. मी त्याच्या शोधात आहे. त्याच्या शोधार्थ मला सर्वात प्रिय असलेल्या वस्तूंचाही त्याग करण्यास मी तयार आहे. या शोधरूपी यज्ञामध्ये माझ्या शरीराचीही होम करण्याची माझी तयारी आहे, आणि शक्ती ही आहे असा मला विश्वास वाटतो. परंतु जोपर्यंत मला त्या सत्याचा साक्षात्कार नाही, तोपर्यंत माझ्या अंतरातले मला जे सत्यसे वाटते, त्या काल्पनिक सत्यालाच माझा आधार समजून त्याच्याच खुणेचा दिवा करून, त्याच्या आश्रयाने मी माझे जीवन व्यतीत करीत आहे.

हा मार्ग जरी वतार्‍याच्या धारेवर चालण्यासारखा आहे, तरी तो मला सोप्यात सोपा वाटला आहे. या मार्गाने जाताना झालेल्या भयंकर चुकाही मला क्षुल्लकशा वाटल्या आहेत कारण त्या चुका करीत असतानाही मी बचावून गेलो आहे आणि माझ्या समजुतीने प्रगतीही केली आहे. दुरून विशुद्ध सत्याचे- ईश्वराचे- अंधूक दर्शनही करू लागलो आहे. सत्यच काय ते आहे; त्याशिवाय या जगात दुसरे काहीही नाही, असा माझा विश्वास दिवसेंदिवस बळावत जात आहे. हा विश्वास कशाने वाढत गेला, ते माझे जग म्हणजे- 'नवजीवन' इत्यादींचे वाचक समजून घेऊन त्या प्रयोगांमध्ये सामील होतील व माझ्याप्रमाणे ईश्‍वराचे दर्शन करतील, तर ते इष्ट आहे शिवाय, माझ्याबाबतीत जे शक्य आहे, ते एखाद्या बालकाच्या बाबतीतही शक्य आहे, हा माझा विश्वास उत्तरोत्तर वाढत आला आहे, आणि तसे वाटल्यास माझ्याशी माझ्यापाशी सबळ कारणेही आहेत. सत्याच्या शोधाची साधने जितकी कठीण तितकीच सोपीही आहेत. ती एखाद्या अभिमान इसमाला अशक्य अशी वाटतील आणि एखाद्या निष्पाप बालकाला अगदी संभवनीय वाटतील. सत्याचा शोधकाला रज:कणापेक्षाही तुच्छ बनावे लागते. सर्व जग रज:कण चिरडीत असते; परंतु सत्याचा पुजारी तर रज:कण सुद्धा त्याला चिरडू शकेल इतका अल्प बनणार नाही, तोपर्यंत त्याला निरपेक्ष सत्याचे किंचित मात्र दर्शनही दुर्लभ आहे. ही गोष्ट वसिष्ट- विश्वामित्रांच्या आख्यानात स्पष्ट करून दाखवलेली आहे. ख्रिस्ती व इस्लामी धर्मही हीच गोष्ट शाबीत करतात.
मी जी प्रकरणे लिहिणार आहे, त्यात जर वाचकाला अभिमानाचा भास झाला, तर त्याने खुशाल समजावे, की माझ्या शोधात काही तरी न्यून आहे, आणि माझा साक्षात्कार मृगजलवत्त् आहे. माझ्यासारख्या अनेकांचा क्षय झाला तरी फिकीर नाही, परंतु सत्याचा जय होवो. अल्पात्म्याचे माप काढण्यासाठी सत्याचा गज कधीही आखूड न होवो!
माझे लेख कोणी प्रमाणभूत मानू नयेत- अशी माझी इच्छा आहे, अशी माझी विनंती आहे. त्यात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामति करावे, एवढीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रांमध्येही माझ्या आत्मकथेच्या लेखांचा पुष्कळ उपयोग होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. कारण की सांगण्याला यक एकही गोष्ट मी छापविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णावयाचे आहेत. मी कसा देखणा आहे, ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वतःला मोजण्याची माझी इच्छा आहे, आणि जे माप आपण सर्वांनी स्वतःला लावले पाहिजे त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की:
मो सम कौन कुटिल खल कामी?
जिन तनु दियो ताहि बिसरयो
ऐसो निमकहरामी ||

कारण की ज्याला मी संपूर्ण श्रद्धापूर्वक माझ्या श्वासोच्छवासाचा स्वामी समजतो, ज्याला मी माझ्या निमका चा दातास मानतो त्याच्यापासून अजूनही मी दूर आहे ही गोष्ट मला क्षणोक्षणी सलते. त्याला कारणीभूत असलेले माझे विकार मी पाहू शकतो. परंतु त्यांना अजूनही बाहेर मात्र काढून लावू शकत नाही.
परंतु तुर्त एवढे पुरे. प्रस्तावनेतून प्रयोगांच्या वर्णनात शिरणे बरे नाही. ते कथेच्या या प्रकरणांमध्येच सापडेल.

#मोहनदास #करमचंद # गांधी
आश्रम, साबरमती
मार्गशीर्ष शु. ११, संवत् १९८२

Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३