खंड १ ला: १. जन्म

खंड १ ला:

जन्म:
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ३-५
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************

गांधी कुटुंब प्रथम तरी किरण्या मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते. परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते. राज्य प्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. त्यांनी नबाबसाहेबांना डाव्या हाताने सलाम केला. या उघड दिसणाऱ्या अविनयाचे कोणी कारण विचारले तेव्हा जबाब मिळाला, " उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकलो आहे. "

होता गांधींची एकामागून एक दोन कुटुंबे झाली. पहिल्याचे त्यांना चार मुलगे होते आणि दुसऱ्याचे दोन. बालपणीची आठवण करता ते बंधु सावत्र असावेत अशा तर याची कल्पनाही मला होत नाही. त्यापैकी पाचवे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी. उभयता बंधूंनी आळीपाळीने पोरबंदर मध्ये कारभाऱ्याचे काम केले. कबा गांधी हे माझे वडील. पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते. नंतर राजकोटला व काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्युसमयी राजकोट दरबारचे पेन्शनर होते.

कबा गांधींची ही एकामागून एक चार कुटुंबे झाली. पहिल्या दोहोपासून दोन मुली झाल्या. शेवटच्या पुतळीबाई पासून एक मुलगी व तीन मुलगे. त्यातला सर्वात धाकटा मी.

वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काहीअंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळीसाव्या वर्षांनंतर झाला होता. ते लाचे पासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती. सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. एकदा प्रांताच्या एका साहेबाने राजकोटच्या ठाकूर साहेबांचा अपमान केला. त्याबद्दल ते त्यांच्याशी भांडले. साहेब संतापले. कबा गांधींना माफी मागण्यास फर्माविले. त्यांनी माफी मागण्याचे नाकारले व त्या पाई काही तास अटकेतच राहिले; परंतु ते डगमगले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्यांना साहेबाने सोडून देण्याचा हुकूम केला.

वडिलांनी द्रव्यसंचय करण्याचा लोक कधीच धरला नव्हता; त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले. वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते. ज्याला आपण आज गुजराथी पाचव्या त्याचे शिक्षण म्हणू, तेवढे शिक्षण त्यांचे झाले असेल. इतिहास भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको. असे असूनही व्यवहारज्ञान इतक्या उच्च दर्जाचे होते, की सूक्ष्मात सूक्ष्म प्रश्नाचा उलगडा करण्यात किंवा हजार माणसांपासून काम घेण्यास त्यांना अडचण पडत नसे. धार्मिक शिक्षण नाही सारखेच. परंतु देवळात जाण्याने, कथा वगैरे ऐकून जे धर्मज्ञान असंख्य हिंदूंना सहजी मिळत असे, ते त्यांना होते. एक विद्वान ब्राह्मण आमच्या कुटुंबाचे मित्र होते त्यांच्या सल्ल्यावरून शेवटच्या वर्षात त्यांनी गीतापाठ सुरू केला होता, आणि रोज पूजेच्या वेळी थोडेबहुत श्लोक ते मोठ्याने पठण करीत असत.

आई साध्वी स्त्री होती, अशी माझ्या मनावर छाप राहिलेली आहे. ती फार भाविक होती. पूजापाठ केल्याशिवाय कधी जेवत नसे. हवेलीत( गुजराथेतील वैष्णवांच्या देवालयास 'हवेली' म्हणतात.) नित्यनेमाने जायची. मला समजू लागले तेंव्हापासून तिने चातुर्मास्य व्रतवैकल्याखेरीज रिते दवडलेले मला स्मरत नाही. ती कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे पार पाडी. घेतलेली व्रते आजारी पडली तरी सोडायची नाही. मला असा एक प्रसंग स्मरतो, की तिने चांद्रायर्ण व्रत केले. त्यामध्ये आजारी पडली. परंतु व्रत भंगू दिले नाही. चातुर्मास्यात एकभुक्त राहणे यात तिला विशेषसे काही वाटत नसे. एवढ्याने संतोष न मानता एका चातुर्मास्यात तर तिने दिवसाआड जेवणाचा नियम केला होता. लागोपाठ दोन तीन उपास म्हणजे तर तिला काहीच नाहीसे वाटे. एका चातुर्मास्यात तर तिचे असे व्रत होते की सूर्यनारायणाचे दर्शन करून नंतरच जेवावयचे. त्या पावसाळ्यात आम्ही मुले ढगांकडे डोळे लावून पहात राहत असू की केव्हा सूर्य दिसतो आणि आई जेवते. पावसाळ्यात पुष्कळ वेळा दर्शन दुर्मिळ होत असते, हे सर्वांना माहीतच आहे. असेही दिवस स्मरतात, की ज्या दिवशी आम्ही सूर्य पहावा, "आई, आई, सूर्य दिसला" असे ओरडावे, आणि आई घाईघाईने येते तो सूर्याने दडी मारावी! "त्याचे काय मोठे? आज नशिबात जेवायचे नसेल!" असे म्हणून ती ती परत वळे आणि स्वतःच्या कामात दंग होऊन जाई.

आई व्यवहारकुशल होती। दरबारच्या सर्व गोष्टी तिला समजत. राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबद्दल बहुमान असे. मी लहान म्हणून कधी कधी आई मला राजवाड्यात आपल्याबरोबर घेऊन जाई. त्यावेळी "आजीसाहेबां' बरोबर चालणारे कित्येक संवाद मला अजून आठवतात.

या आईबापांच्या घरी मी संवत १९२५ च्या भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सन १८६९ च्या ऑक्टोबरच्या २ तारखेला पोरबंदर अथवा सुदामापुरी येथे जन्म पावलो.

बालपण पोरबंदरातच गेले. कोठल्याशा शाळेत मला घातले होते असे आठवते. कसेबसे काही पाढे शिकलो. त्यावेळी मुलांबरोबर मी पंतोजींना मात्र शिव्या देण्यास शिकलो होतो, एवढी आठवण आहे; दुसरे काहीएक आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो, की माझी बुद्धी मंद असावी, किंवा स्मरणशक्ती, आम्ही पोरे एक कडवे गात असू त्यातल्या कच्च्या पापडासारखी असावी. ते चरण तर मला दिलेच पाहिजेत.

एकडे एक, ...... पापडशेक
पापड कच्चो, ...... मारो(माझा)
पहिल्या रिकाम्या जागी मास्तराचे नाव असायचे. त्याला मी अमर करू इच्छित नाही. दुसऱ्या रिकाम्या जागी दिलेली शिवी भरण्याचे प्रयोजन नाही.

Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३