खंड १ ला: २. बालपण:

खंड १ ला:

2. बालपण:
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ५-७
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
पोरबंदरहून वडील राजस्थानी कोर्टाचे सदस्य होऊन राजकोटला गेले, तेंव्हा माझे वय सातएक वर्षांचे असावे. मला राजकोटच्या गावठी शाळेत घातले. या शाळेतील दिवस मला चांगले आठवतात. पंतोजींची नावे वगैरेही आठवतात. पोरबंदरप्रमाणेच येथिलही अभ्यासासंबंधी सांगण्यासारखे विशेष काही नाही. माझी गणना सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यांत तरी होत असेल की नाही याबद्दल शंकाच. गावठी शाळेतून मुख्य शाळेत व तेथून हायस्कुलात. येथपर्यंत पोचेतो माझ्या वयाला बारा वर्षे होऊन गेली. तोपर्यंत मी कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे किंवा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. मी अतिशय भिडस्त मुलगा होतो. शाळेत माझे काम बरे की मी बरा. घंटा वाजण्याच्या सुमारास पोचायचे आणि शाळा बंद होताक्षणी घरी पळायचे. 'पळायचे' हा शब्द इरादापूर्वक लिहिला आहे. कारण कोणाबरोबर बोलत राहणे मला आवडत नसे. 'कोणी माझी थट्टा केली तर' अशी भीतीही वाटे.

हायस्कुलातील पहिल्याच वर्षी परीक्षेच्या प्रसंगी घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. शाळाखात्याचे इन्स्पेक्टर जाइल्स शाळा तपासण्यास आले होते. त्यांनी पहिल्या इयत्तेच्या मुलांना पाच शब्द लिहायला घातले. त्यांत एक शब्द केटल् (Kettle) होता. त्याची वर्णरचना मी चुकीची लिहिली. मास्तरांनी मला आपल्या बुटाचे टोक मारून इशारा दिला. परंतु माझ्या ते कोठून लक्षात येणार? मास्तर मला समोरच्या विद्यार्थ्यांच्या पाटीकडे पाहून माझे शुद्धलेखन सुधारण्यास सांगत असतील, अशी माझी कल्पनाही होऊ शकली नाही. माझी समजूत की आम्ही एकमेकांचे चोरून पाहू नये, एवढ्याचसाठी मास्तर नजर ठेवीत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे पाची शब्द बरोबर आले आणि मीच काय तो ढ ठरलो.. माझा 'मूर्खपणा' मास्तरांनी मागाहून मला दाखवून दिला. परंतु माझ्या मनावर त्या सांगण्याचा काही परिणाम झाला नाही. मला दुसऱ्या विद्यार्थ्याची कॉपी कधीच करता आली नाही.

असे असूनही मास्तरांविषयीची विनयवृत्ती कधीच ढळली नाही. वडील मंडळींचे दोष न पाहण्याचा गुण माझ्यामध्ये स्वभावतःच होता. त्याच मास्तरांचे इतर दोषही मागाहून माझ्या ध्यानात आले. तरीही त्यांच्याबद्दल मला वाटणारा आदर कायम राहिला. वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे, एवढे मला माहित होते. ते सांगतील ते करावे; त्यांच्या कृत्यांच्या गुणदोषांच्या निवाड्यात आपण पडू नये.

याच सुमारास दुसरे दोन प्रसंग घडले, ते कधीही माझ्या स्मरणातून गेलेले नाहीत. मला सामान्यपणे शाळेच्या पुस्तकांपलीकडे काहीही वाचण्याचा नाद नसे. धडे केले पाहिजेत; बोललेले सहन व्हावयाचे नाही, मास्तरांना फसवावयचे नाही, म्हणून धडे वाचीत असे. परंतु मनातून कंटाळा. त्यामुळे धडे कित्येकदा कच्चे राहत. मग इतर वाचन सुचणार कुठून? परंतु वडिलांनी विकत आणलेले एक पुस्तक माझ्या नजरेत भरले. ते 'श्रवर्ण पितृभक्ती' नाटक. ते वाचण्याची मला इच्छा झाली. ते मी अतिशय आवडीने वाचले. त्याच सुमारास काचेतून चित्र दाखविणारेही दारोदारी हिंडत. त्यांच्यापासून श्रवण आपल्या आईबापांना कावडीत बसवून यात्रा करण्यास घेऊन जात आहे, असे चित्र मी पाहिले. दोन्ही गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. " मला पण श्रवणासारखेच व्हावयाचे" असे मनात येई. श्रवणाच्या मृत्यूसमयीचा त्याच्या माता-पित्यांचा विलाप अजून आठवतो. ती गोड चाल मी बाजारावरही बसविली. बाजा शिकण्याची हौस होती, व वडिलांनी एक बाजाही घेऊन दिला होता.

याच सुमारास कोणी नाटक मंडळी आली होती. तिचे नाटक पाहण्याची परवानगी मिळाली. हरिश्चंद्राचे आख्यान होते. ते नाटक पाहण्याचा मला कंटाळा कसा तो वाटेच ना. ते पुन: पुन: पाहण्याची इच्छा होई. वारंवार पहायला कोण जाऊ देणार? परंतु मनातल्या मनात मी ते नाटक शेकडो वेळा रंगविले असेल! हरिश्चंद्राची स्वप्ने पडत. " सर्वांनीच हरिश्चंद्र सारखे सत्यवादी का होऊ नये" हाच विचार घोळे. हरिश्चंद्रा वर आल्या तसल्या विपत्ति भोगून सत्याचे पालन करावे हेच खरे सत्य. नाटकात वर्णिलेल्या होत्या तशाच विपत्ती हरिश्चंद्रावर येऊन पडल्या असल्या पाहिजेत, असेच मी तरी समजत होतो. हरिश्चंद्राचे दुःख पाहून, त्याचे स्मरण करून मी खूप रडलो आहे. आज माझ्या बुद्धीला समजत आहे की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी. परंतु माझ्या मनात सृष्टीत हरिश्चंद्र आणि श्रवण आजही जिवंत आहेत. आज सुद्धा मी ती नाटके वाचली, तर आजही मला अश्रू येतील असे वाटते.


 

Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३