Happy Mother's Day: एक आठवण
Happy Mother's Day my dearest Mom.. तू आहेस म्हणून मी आहे💕 मला आजही ती दुपार आठवते आहे.. मी शाळेतून घरी आलेले होते. उज्ज्वला मावशी आणि मीच घरी होतो. रणरणत्या उन्हातली ती दुपार होती. मी नेहमीप्रमाणे घराबाहेरच्या पायरीवर बसून सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसलेले होते. खूप खूप कंटाळलेले होते. मला तुझी खूप आठवण येत होती आणि तू ऑफिसला गेलेली होतीस. मावशीने रेडिओ लावलेला होता. त्यावर गाणी सुरू होती. पुढचं गाणं सुरू झालं.
"कितना हसीन हैं ये इक सपना
फुलोंकी शहर में हैं घर अपना
क्या समा हैं तू कहा हैं
मैं आई आई आई आई.. आजा.."
गाण्यातले आई आई आई आई शब्द ऐकून तूच मला डोळ्यासमोर दिसलीस. मी एकदम व्याकुळ झाले तुझ्या आठवणीने आणि मला एकदम रडूच कोसळलं... ते गाणं कधीही आठवलं की मला तोच प्रसंग आठवतो.
संध्याकाळी तू घरी परत आलीस की तुझ्या कुशीत मला स्वर्ग लाभायचा. लव्ह यू आई... आमच्यासाठी तू आणि बाबा दिवसभर खूप खूप झटलात, इच्छा नसतांनाही मनावर दगड ठेवून कामावर गेलात. म्हणून आम्ही आज सुखाचे दिवस बघत आहोत. त्यावेळी उज्ज्वला मावशीने आम्हाला सोबत केली, आम्हाला वेळेत जेऊ खाऊ घातलं, कधीकधी अगदी थोड्या दिवसांसाठी गार वाऱ्याची झुळूक आल्यासारखी आज्जी यायची, मला शाळेतून घरी घेऊन जायची, माझ्याशी खूप गप्पा मारायची, तिच्या जुन्या काळातल्या खास हेलमध्ये स्वतःच तयार केलेली गाणी गायची. मला ते फार आवडायचं. कधी कधी मनिषा मावशी यायची आणि खूप मनोरंजन करणाऱ्या गप्पा मारायची आणि मस्त मस्त गोष्टी सांगायची.. तिच्या वयाचं समजून ती ज्या पद्धतीने माझ्याशी तिचा दिनक्रम शेअर करायची, ते मला फार आवडायचं.
आणि आई, तू तर काय... तुझा गोड आवाज, तुझी गाणी. विशेषतः आजा सनम मधूर चांदनी में हम.. तुझं गोड हसू, कानातल्या लांब रिंगा, तुझ्या वेण्या ज्या तू आता घालत नाहीस. अजूनही मला जशाच्या तशा आठवतात. तुझ्या हातच्या मऊ घडीच्या पोळ्या, पुरणपोळ्या, कटाची आमटी, भरल्या वांग्याची भाजी.. तोंडाला पाणी सुटतं ते आठवून.
तू घरी नसतांना (आणि असतांनाही) कडकडून भूक लागल्यावर आईच्या मायेने बाबांनी झटपट केलेला फोडणीचा भात, पोळीचा कुस्करा, साबुदाण्याची खिचडी याने पोट आणि मनही तृप्त व्हायचं.
तेंव्हाची छोटीशी इला... तिची काळजी घेतांना मला माझ्यातल्या आईची आठवण करून द्यायची. तिच्याशी खेळतांना गोड, जिवंत बाहुलीशी खेळण्याचा आनंद मिळायचा. आता तीच इला आता आईसारखी आपली सर्वांची काळजी घेते.
तुमच्या सगळ्यांमध्ये दडलेल्या सर्व आयांनी माझं बालपण समृद्ध केलं आहे.
आता आमच्याही आयुष्यात आमची बाळं आहेत. त्यांची काळजी घेतांना आमच्यातली आईसुद्धा तृप्त होते. ते आयुष्यात आले आणि आमचं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालं. एक वर्तुळ पूर्ण झालं.
Happy Mother's Day to all of you. 💕💕💕
सकीना वागदरीकर
10 May 2026

Comments
Post a Comment