आज्जी-आजोबांची डायरी- भाग ३७
डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.
डायरी नव्याने वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी माहिती म्हणून सांगते. मी जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेले साडेपाच महिने जॉब करते आहे आणि जॉईन केल्यानंतर 3 आठवड्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. आज डायरीचा भाग 37 लिहायला सुरुवात केली आहे.
आता सगळे फ्लोअर्स क्वारंटाईन मुक्त स्वरूपातले असले, तरीही आज मी ज्यांची अतिशय नाट्यमय अशी गोष्ट सांगणार आहे, ते आजोबा मला क्वारंटाईन फ्लोअरवरच ओळखीचे झाले. हे आजोबा डॉ. असे प्रिफिक्स असलेले पहिलेच असल्याने ते मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे ते संस्थेत दाखल झाल्या झाल्या त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी मी त्यांच्या रूममध्ये गेले. उंचपुरे, धिप्पाड, पांढरी दाढीवाले, लांब नाक असलेले हे आजोबा एकदम अमिताभ बच्चनसारखेच दिसत होते. ते खुर्चीवर शांत बसलेले होते. त्यांचे संस्थेत स्वागत करून त्यांना मी माझे नाव आणि करत असलेले काम सांगून झाल्यावर आजोबांना मी त्यांच्याविषयी माहिती विचारायला सुरुवात केली. माझ्या मनात असलेला प्रश्न त्यांना सगळ्यात आधी विचारला, "तुम्ही मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट"? आजोबा म्हणाले, "तुम्हीच गेस करा". मग मी "डॉक्टरेट" असे उत्तर दिल्यावर अमिताभप्रमाणेच मात्र जर्मनमध्ये, "रिष्टीश" म्हणजेच "सही जवाब" म्हणाले. मग कोणत्या क्षेत्रात? असे विचारले असता, परत त्यांनी मलाच ओळखायला लावल्यावर सायन्सच्या सर्व शाखा, त्यानंतर आर्ट्सच्या आणि मग कॉमर्सच्याही विचारून झाल्यावर, Anthropology, Archeology, Architecture, Hotel management पैकी कोणत्याही क्षेत्रात त्यांनी पीचडी केलेली नसल्याने मी हार मानून त्यांनाच खरं उत्तर द्यायला लावले. शेवटी त्यांनी "रेष्ट अनवॉल्ट" म्हणजेच "कायदा" ह्या क्षेत्रात पीएचडी केले असल्याचे सांगितले.
मला फार आश्चर्य वाटले, हे उत्तर ऐकून.. ह्या क्षेत्रातही पीएचडी करता येऊ शकते, याविषयी मी कधीही विचारच केलेला नव्हता. कायद्यातला नेमका कोणता विषय, विचारले असता त्यांना काही नीट सांगता येत नव्हतं.
या सर्व प्रश्नांच्या ओघात आजोबांना त्यांच्या फॅमिलीविषयी विचारायचं राहूनच गेलं. आजोबांना अजून काही प्रश्न विचारणार, तेवढ्यात नर्स ताई तिकडे आली. आजोबांची बॅग लावशील का? असं तिने मला विचारलं. खरंतर, हे माझं काम नाही, पण मागे एकदा लिहिल्याप्रमाणे तो क्वारंटाईन फ्लोअर असल्याने आणि तिकडे मनुष्यबळ कमी असल्याने नर्सची दगदग कमी करण्यासाठी मीच तिला मदतीचा हात पुढे केलेला होता आणि गरज पडेल तशी ती मला तिची सोपी सोपी कामं सोपवून स्वतःचा भार हलका करत होती अधूनमधून.
मी आजोबांची बॅग लावायला सुरुवात केली. कपडे कपाटात, तर शॅम्पू, लिक्विड सोप, ब्रश, पेस्ट वगैरे बाथरूममध्ये आणि लेदरचे इनडोअर शूज त्यांच्या टेबल-चेअरजवळ तर स्पोर्ट्स शूज वॉर्ड रॉबच्या तळाशी असे सगळे लावून रिकामी सुटकेस एका कोपऱ्यात ठेवून दिली.
नर्सने प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या टेबलवर एक फुलं असलेला फ्लॉवरपॉट, संस्थेचे माहितीपत्रक, मासिक, वेलकमचा बोर्ड, एक साध्या पाण्याची तर एक सोडा वॉटरची बाटली आणि एक ग्लास ठेवलेलाच होता. त्यांना मी पाणी विचारून होकार आल्यावर पाणी दिले. इतर बऱ्याच आज्जी आजोबांबाबत एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे ते हॉस्पिटलमधून संस्थेत दाखल झालेले होते. मात्र हे आजोबा डायरेक्ट घरून संस्थेत आले असल्याचं समजलं. मला वाटलं, त्यांच्या घरी त्यांची काळजी घेणारं आता कोणी नसेल आणि स्वतःचं स्वतः करण्याची क्षमताही त्यांच्यात नसावी, म्हणून ते इकडे आले असावेत. कारण जनरली संस्थेत दाखल होणारे लोक शारीरिक किंवा मानसिकदृष्टीने स्वावलंबी राहण्यास सक्षम नसतात. मी आजोबांना उत्सुकता असूनही त्यांच्या येण्याचं नक्की कारण विचारण्याचं टाळलं. अजून प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना पूर्ण क्वारंटाईन फ्लोअर फिरवून आणण्याचं ठरवलं. त्यांना इतर रहिवाश्यांसोबत गप्पा मारायला बनवलेला सिटिंग कॉर्नर, केअर युनिट एम्प्लॉयीज बसतात ते ऑफिस, किचन, छोटी आणि मोठी डायनिंग रूम आणि सगळ्यात शेवटी गच्ची दाखवून तिथे थोडावेळ त्यांच्यासोबत बसून त्यांना परत त्यांच्या रूममध्ये सोडून आले. आजोबा मला तर एकदम मस्त इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व वाटत होते. मग लंचब्रेक झाल्यावर जेवून परत आले, तर हे आजोबा पॅसेजमध्ये उभे होते. मी विचारलं, "काय? कसं वाटतंय संस्थेत?" तर म्हणाले, "फारच छान वाटतंय. काय छान जेवण होतं.."
"काय जेवलात?", विचारलं असता, त्यांना सांगता येईना.. रोज जेवणात दोन मेनू असतात, त्यातला एक निवडायचा असतो, ते दोन्ही वाचून मी त्यातला एक निवडला असल्याने मी त्यांना विचारले, "स्पार्गल (ऍस्पॅरागसचे जर्मन नाव) विथ व्हाइट सॉस का?" तर "हो, बरोबर!" म्हणाले. मग एक आज्जी आल्या, तर त्यांनाही सांगायला लागले, "जेवण काय छान होतं ना? काय खाल्लं बरं मी?" मी पुन्हा सांगितलं, "स्पार्गल..." त्यानंतर आजोबा जे काही त्या आज्जींसोबत बोलत होते, ते असंच तुटक तुटक होतं. आजोबांना डिमेन्शिया (विस्मरणाचा आजार) तर नसेल ना? अशी मला शंका आली.
मग दुपारी १ ते ३ या वेळात सगळे झोपायला गेले आणि मी माझे ऑब्झरवेशन्स डॉक्युमेंट करायला ऑफिसमध्ये गेले. थोडं लिहून झालं, तेवढ्यात ऑफिसरूमच्या काचेच्या खिडकीतून हे नवीन आजोबा त्यांची रिकामी सुटकेस घेऊन फ्लोअरभर फिरतांना दिसले. आजोबांना काय झालं?" विचारलं असता, आजोबा म्हणाले, "मला घरी जायचंय, रस्ता कुठेय?" माझ्या घशात एकदम आवंढा दाटून आला. आजोबांना आता काय सांगावं? असा प्रश्न मला पडला. मी आपली, "आजोबा, चला तुम्ही रूममध्ये. आता झोपा थोडावेळ", असं म्हणून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होते. पण आजोबा काही ऐकायला तयार नव्हते.
तेवढ्यात मागे उल्लेख केलेला इरिट्रीयन नर्स मुलगा आला. म्हणाला, "थांब, मी हँडल करतो परिस्थिती." मग त्याने आजोबांची सुटकेस स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणाला, "चला, घरी जाऊया." आणि फ्लोअरवर सगळीकडे आजोबांसोबत सावकाश दोन राऊंड मारून त्यांना त्यांच्याही नकळत रूममध्ये परत घेऊन गेला आणि "आता झोपायची वेळ झाली, तुम्ही आता झोपा", म्हणून त्यांना बेडवर झोपायला लावून त्यांच्या रुमचे दार लोटून बाहेर आला.
मी आवाक होऊन हे दृश्य बघतच राहिले! काय सुंदर हँडल केली त्या मुलाने ही परिस्थिती खरोखरच! मी त्याचं मनापासून कौतुक केलं. आपल्याला बरेचदा असे अनुभव येत असतात ना? आपण ज्यात शिक्षण आणि करियर करतो, त्याचा विशेष गंधही नसलेले त्यातलं आपल्याला काहीतरी शिकवून जातात. मला तरी हा अनुभव फार वेळा येतो. मग जाणवतं, हे त्यांच्यातले उपजतच गुण आहेत. आपल्याला जे शिकूनही जमत नाही ते त्या व्यक्तीला न शिकताही- त्यातील औपचारिक शिक्षण न घेताही सहज जमून जातं...
त्या मुलाला म्हणाले, यापुढे असला चॅलेंजिंग प्रसंग आला तर तू ज्या फ्लोअरवर ड्यूटीवर असशील, तिकडून तुला कॉल करून बोलवून घेईन.. तो ही हसून म्हणाला, "हो! जरूर!"
असो, तर ह्या आजोबांनी दुसऱ्या दिवशी अजून वेगळीच गंमत केली. ते म्हणाले, "माझी सुटकेस सापडत नाहीये." मी म्हणाले, "तुम्ही तुमच्या रूममध्ये चेक केलंत का?" तर म्हणाले, "नाही, तिकडे नाहीये. इकडेच बाहेर कुठेतरी आहे." मी त्यांना आदल्या दिवशी दाखवलेल्या सगळ्या रुम्स चेक करून झाल्यावरही सुटकेस मिळत नाही, हे समजल्यावर कॉर्नरच्या एका दाराकडे बोट दाखवत म्हणाले, "तिकडे असेल." मी त्यांना सांगितलं, "ही टॉयलेटच्या पोर्टेबल पार्ट्स क्लिनिंगचे मशिन्स असलेली छोटीशी रूम आहे, वाचा तुम्ही.. "श्पूलराऊम..तिकडे सुटकेस बसूही नाही शकत." तर ते म्हणाले, "आहा! ज्या अर्थी तुम्ही रूम उघडत नाही आहात, त्या अर्थी माझी सुटकेस तिथेच असणार!" त्यांचं लॉजिक बरोबर होतं, नाही का? मनातलं हसू मनातच दाबत आणि डॉक्टर साहेबांच्या लॉजिकपुढे झुकत मी त्यांना ती रुमही उघडून दाखवली. आत काही नाही म्हटल्यावर आजोबांना विचारलं, "आता सगळीकडे चेक करून झालेलं आहे, तर एकदा तुमच्याही रूममध्ये चेक करायचं का?" त्यावर, "हो" असं म्हणून ते माझ्यासोबत त्यांच्या रूममध्ये गेले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची सुटकेस त्यांना तिथे दिसली.
असे हे आजोबा दिवसेंदिवस जास्त जास्त गोष्टी विसरतांना दिसू लागले. कधी अर्धवट कपडे घालून बाहेर फिरू लागले, तर कधी स्वतः ऐवजी दुसऱ्याच कोणाच्यातरी रूममध्ये जाऊ लागले. त्यांना घाबरून बाकी रहिवासी आपल्या रुमचे दार आतून लॉक करून घ्यायला लागले. क्वारंटाईन फ्लोअर असल्याने एक लिफ्ट सोडून बाकी जिन्याने उतरण्याची सोय तिथल्या दरवाज्यांना अलार्म लावून बंद करण्यात आलेली होती. तर आजोबा तिकडून अनेकदा बाहेर पडून अलार्म ऍक्टिवेट करायला लागले. इतके झाले तरी आग लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर लोकांना जिन्याने खाली उतरता येण्याची शक्यता कायम राहिली पाहिजे या नियमानुसार दरवाजे कधीच लॉक केले जात नाहीत. रहिवाश्यांनी स्वतःहून आतून लॉक केले तर ठीक, नाहीतर त्यांच्या रुम्सही केवळ ते विस्मरणाचा आजार असलेले लोक म्हणूनही कधीच लॉक केले जात नाहीत, हे तर मागे एका भागात सांगितलं होतंच..(आणि त्यांच्या लॉक्ड दरवाज्यांना हॉटेलप्रमाणे मास्टर की ने एम्प्लॉयीज उघडू शकतात.)
तर आता गेले काही आठवडे क्वारंटाईन फ्लोअर नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतरीत झालेला असून जे रहिवासी इथे मुळात राहत होते आणि फ्लोअर क्वारंटाईन केला गेल्यामुळे इतर फ्लोअर्सवर शिफ्ट केले गेलेले होते, ते आता आपल्या मूळ रुम्समध्ये परत आले. काही रहिवासी खालच्या फ्लोअरवर रमले, ते तिथेच राहिले, इकडे नवीन रहिवासी त्यांच्याजागी भरती झाले. शिवाय, दोन आज्जी, ज्या खालच्या फ्लोअर शिफ्ट झालेल्या होत्या आणि खाली रूम शेअर करत होत्या, त्या दोघींचे एका पाठोपाठ एक असे आठवड्याभराच्या गॅपने निधन झाले, त्यांच्या जागीही दुसरे- संस्थेत पूर्णपणे नवीन असे रहिवासी दाखल झाले. त्यातल्या एक आज्जी मागच्याच आठवड्यात वारल्या.. जवळपास १ ते २ आठवड्यांच्या गॅपने कोणा ना कोणाच्या निधनाची बातमी ऐकायला मिळतेच आहे. त्याविषयी एकदा सविस्तर लिहिनच, मात्र हे आपले आजच्या भागातले आजोबा आता सगळ्यात खालच्या आणि डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणासाठी डेडिकेट केलेल्या फ्लोअरवर असतात. माझ्या ड्यूटीमध्ये हा फ्लोअर समाविष्ट नसला, तरीही ह्या आजोबांना आणि आणखीही काही जणांना भेटायला मी अधूनमधून तिकडे जात असते.
एक दिवस इमेल मध्ये नवीन रहिवासी आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. आज्जींचे आडनाव आजोबांशी मिळतेजुळते असल्याने त्या त्यांच्या मिसेस तर नाहीत, ही शंका आल्याने तिचे निरसन करून घेतले, तर माझी शंका बरोबर असल्याचे समजले. ज्या आजोबांशी इतके ऋणानुबंध जोडले गेले आहेत, त्यांच्या मिसेस असलेल्या आज्जींना मग कधी भेटू, असे झाल्याने धावतच त्यांना भेटायला गेले. तर ह्या आज्जी जर्मन लिटरेचरच्या प्राध्यापिका निघाल्या! ह्या गप्पीष्ट आणि हुशार- आणि तल्लख स्मरणशक्ती असलेल्या आज्जींशी माझी तर एकदम घट्ट मैत्रीच झाली. त्यांचा मोठ्ठा किस्सा पुढच्या भागात सांगते.
~सकीना वागदरीकर जयचंदर
०६.०९.२०२०
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com
Comments
Post a Comment