आज्जी-आजोबांची डायरी: भाग १

डियर ऑल,
जर्मनीत हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये माझा रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून जॉब सुरू होऊन आता 3 आठवडे झाले. रोजचा दिवस वेगळा आणि अनेक आठवणींनी भरलेला असला, तरी
आजचा माझा दिवस स्पेशल होता.. खरं म्हणजे आज सोमवार.  वीकएंडचं रिलॅक्सेशन आणि ते रूटीन बदलल्याने सर्वांना सोमवारी येणारा थकवा आज मलाही जाणवत होताच.. जावंसंच वाटत नव्हतं आज कामावर. पण तरीही गेलेच.. No matter how you feel, just get up, dress up and show up.. हे फेमस वाक्य आठवून तयारी करुन गेले कामावर. जवळपास सर्व( आयसोलेटेड रूम्स आणि डिमेन्शिया झालेले सोडले तर) आज्जी आजोबांना एकेकदा भेटून आता झालेले आहे. तरीही काही ना काही कारणाने भेट न झालेल्या काही जणांना आज भेटले.  (बाकी सर्व भेटींबद्दल नंतर सविस्तर सांगेन. )
त्यांच्या भेटी तर अतिशय इंटरेस्टिंग होत्याच, पण ज्यांना आज दुसऱ्यांदा भेटले, त्या पैकी एका आज्जींचा मागच्या वेळी बोलण्याचा मूडच नव्हता, त्या आज एकदम खुलल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी न मागता त्यांना काय हवं ते बरोबर ओळखून पाठवत असते, असे अभिमानाने सांगतांना फळं पाठवतांना तिने फळं कापायला लागणारा कटिंग बोर्ड आणि नाईफही पाठवल्याचं दाखवलं. मी भारतीय आहे, हे समजल्यावर त्यांनी दिल्लीच्या दोन मुलांना आर्थिक दृष्ट्या कसे adopt केलेले आहे, त्या त्यांच्या कशा गॉड मदर आहेत, त्याची गोष्ट सांगितली. गेल्या 11 वर्षांपासून त्या त्या मुलांना पैसे पाठवत आहेत दरमहा आणि त्यांना कसे 1 बादली पाण्यासाठी 6-6 किमी चालावे लागते, त्याबद्दल दुःख व्यक्त केलं. माझ्या एकुलत्या एक आणि माझी अतिशय काळजी घेणाऱ्या साडे चार वर्षाच्या माझ्या मुला-नीलविषयी त्यांना सांगितल्यावर आणि आपण दोघेही मुलांबाबतीत किती लकी आहोत, हे सांगितल्यावर त्यांना फार छान वाटलं. त्यांनी आमचं बोलून झाल्यावर मी निघाले, तेंव्हा नीलसाठी ईस्टर बनी चॉकलेट दिलं, जे त्यांच्या मुलीने त्यांच्यासाठी पाठवलेलं होतं.

दुसऱ्या एका आजोबांनीही आज आमची दुसरी भेट होती तर निघतांना मला छोटीछोटी 4-5 चॉकलेटस दिली.

एक आज्जी ज्या पहिल्या दोन भेटीत विशेष मोकळेपणाने बोलल्या नव्हत्या, आज त्यांनी बोलायला त्रास होत असूनही त्यांच्या लायब्रेरियन जॉब विषयी, त्यांच्या आयुष्याविषयी खूप गोष्टी सांगितल्या. त्यांचे मिस्टर त्यांना कसे लायब्ररीत पहिल्यांदा भेटले आणि आज दोघेही सिनियर रेसिडेन्स मध्ये आहेत, हे सांगतांना आणि आयुष्य किती पटकन संपून जातं, हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते. निघतांना त्यांनी मला फ्लाईंग कीस दिला.

आजचा दिवस एकूणच वेगळा आणि वेगवेगळ्या अर्थांनी माझ्यासाठी गिफ्टेड होता. मी तो कधीच विसरू शकणार नाही.
~सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
०६.०४.२०२०

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५