आज्जी आजोबांची डायरी: भाग ४६

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या जर्मनीतील सिनियर केअर होममध्ये मी दुपारच्या राउंडला गेलेले होते. दुपारची वेळ  वामकुक्षीची, त्यामुळे शक्यतो दरवाजा वाजवून कोणाची झोपमोड करणे, मी टाळते. जे जागे असतात, हे माहिती असते, त्यांनाच भेटते किंवा ज्यांचे दार उघडेच असते, तिथे हळुच डोकावून, जागे आहेत ही खात्री करून घेऊन मग भेटायला, बोलायला जाते.


अशाच एका दुपारी दुसऱ्या मजल्यावरच्या एका डबलरूमचे दार उघडे दिसले म्हणून मी चेक करायला गेले. एका बेडवरच्या आज्जी गाढ झोपलेल्या आणि दुसऱ्या वाचत बसलेल्या होत्या. झोपलेल्या आज्जींना डिस्टर्ब होऊ नये, म्हणून मी वाचत बसलेल्या आज्जींनाही हॅलो वगैरे न करता तिकडून निघाले. आज्जींची आणि माझी नजरानजरही झालेली नव्हती, त्यामुळे मला वाटलं, त्या वाचनात गढलेल्या आहेत. मात्र मी जशी बाहेर जायला वळले, तशा त्या म्हणाल्या, कोण आहे? मी कोण ते हळू आवाजात सांगितले आणि ह्या दुसऱ्या आज्जी झोपल्या असल्याने आपण नंतर बोलूया, असे म्हणाले.

त्यावर ह्या आज्जी वैतागून म्हणाल्या, त्या तर कायमच झोपलेल्याच असतात, मग तुम्ही माझ्याशी कधी बोलणार? मी ही माणूस आहे, मलाही कोणीतरी बोलायला लागतं. ह्या बाई बोलायचे तर दूरच, साधे हसत सुद्धा नाहीत. त्यांची मुलगी आणि नात इतक्या लांबून म्युनिकहून खास त्यांना मागच्या आठवड्यात भेटायला आली होती, पण ह्यांचा काही बोलण्याचा मूड कधीही नसतोच. मुलीसमोरही अशाच दुर्मुखलेल्याच राहिल्या.

आज्जींचे म्हणणे खरेच होते. त्या आज्जींचे नक्की काय बिनसलेले आहे, ते माहिती नाही. ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचे एक ब्रेस्ट रिमूव्ह केलेले आहे. त्या बोलायला लागल्या की त्यांना शब्द फुटत नाहीत. त त त त करतात. फारच दुर्मिळ असे स्मितहास्य कधीतरी करतात. मी फिरायला घेऊन जाऊ का, हे विचारले तर कायम नाहीच म्हणतात. रेडिओ लावू देत नाहीत. ब्रेकफास्ट करायला जातात आणि येऊन झोपतात, जेवायला जातात आणि परत येऊन झोपतात.  मी गप्पा मारायला लागले की डोळे मिटून घेतात. त्यांनी स्वतःभोवती एक कोष विणलेला आहे आणि त्यात त्या कोणालाही शिरू देत नाहीत.

त्यामुळे ह्या नवीन आलेल्या दुसऱ्या बडबड्या आज्जींना त्यांच्याकडे बघून बोअर झाले नाही, तरच नवल.

मग त्या झोपी गेलेल्या आज्जींच्या झोपेची पर्वा न करता आम्ही बोलायला लागलो आणि एक वेगळेच आणि मस्त व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर उलगडत गेले.

किरकोळ अपघातामुळे तात्पुरते अपंगत्व आलेल्या ह्या आज्जींना एका महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीसाठी आणि देखरेखीखाली ठेवण्यासाठी इकडे दाखल केले गेलेले होते.

ऍनिमल रेस्क्यू वर्कर आणि फ्री लान्स लेखिका म्हणून आयुष्यभर जगलेल्या ह्या आज्जींना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांच्या राहत्या घरात रेस्क्यू करून आणलेल्या ४ मांजरी आहेत.

आज्जींनी इथे तिथे अडकून पडलेले प्राणीच फक्त वाचवले नसून दुःखी जाणवलेले कोणाच्याही घरातले कुत्रे, झू मधली माकडे इ. असे कोणत्याही प्राण्याची चोरून सुटका करून आणून त्यांना ऍनिमल शेल्टर नाहीतर जंगलात सोडलेले आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना ह्या सगळ्यात कायम मदत केली आहे.


तुम्हाला पोलिसांनी कधी पकडले नाही का? असे विचारले असता, आले होते ना पोलीस एकदा घरी.  असे म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एकदा त्यांना एक दुःखी कुत्रा दिसला आणि त्यांनी त्याला मालकाकडून विकत घ्यायचे ठरवले. मात्र मालकाने अव्वाच्यासव्वा किंमत सांगितल्यावर आज्जी त्यांच्या मैत्रीणीला घेऊन जाऊन मध्यरात्री त्यांच्या बंगल्याचे गेट तोडून कुत्र्याला सोडवून घेऊन आल्या होत्या.

दुपारीच मालकाला कुत्र्याची किंमत विचारलेली असल्याने त्याने आज्जींचे व्यवस्थित वर्णन करून पोलिसांना त्यांच्या घरी पाठवले असणार. पोलीस घरी आले, त्यांनी झडतीही घेतली पण घरात कुत्रा सापडला नाही. कसा सापडणार? त्याला ऑलरेडी शेल्टर होममध्ये पाठवलेले होते.  आज्जींना पोलिसांनी विचारले, खरे सांगा, कुत्र्याला कुठे लपवले, त्यावर त्या हसत हसत म्हणाल्या, माझ्या खिशात. या आणि घेऊन जा. पोलीस वैतागून निघून गेले.

मग आज्जींनी सांगितले की त्यांनी जसे अनेक प्राण्यांना वाचवले आहे, तसेच त्यांच्या मांजरीने त्यांना वाचवले. ही मांजर कुठेतरी अडकली होती आणि आज्जींना तिला वाचवून घरी आणले होते.

एकदा ती मांजर सतत त्यांचा ड्रेस ओढून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. आज्जींना शंका आली की तिला त्यांच्या शरीराचा वेगळा गंध तर येत नसावा? म्हणून त्या स्त्री रोग तज्ज्ञाकडे गेल्या.

त्यांनी टेस्टस केल्या आणि आज्जींना पहिल्या स्टेजमधला कॅन्सर असल्याचं निदान झालं. डॉक्टर म्हणाले एक ब्रेस्ट काढावं लागेल. आज्जी क्षणभरही विचार न करता अथवा दुःखी न होता म्हणाल्या होत्या की लगेच काढून टाका. अख्ख्या आयुष्यासमोर हे अवयव काही फार महत्वाचे नाहीत. लवकरच त्यांचं ऑपरेशन करून एक ब्रेस्ट काढून टाकण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचला.

एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन आज्जी, दोघीही ब्रेस्ट कॅन्सरच्याच पेशन्ट,  पण दोघी किती वेगवेगळ्या! एक डिप्रेशनच्या शिकार तर दुसऱ्या उत्साहाने ओथंबलेल्या..

मला माणसाच्या पिल्लांपेक्षा प्राणी आवडतात, त्यांच्यात मी रमते, त्यांना आनंदी, सुखी आयुष्य दिले की मला समाधान मिळते म्हणणाऱ्या.

त्यांना भेटायला गेलं की पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्याची खात्रीच.  आज्जींचा एक महिन्याचा स्टे संपून त्या गेल्याही घरी. आमचा निरोप घ्यायचा मात्र राहूनच गेला. पण त्या मला कायम आठवत राहतात, त्यांच्या रम्य प्राणी-कथा आणि आनंदी चेहऱ्यासह..

सकीना वागदरीकर-जयचंदर
११.०७.२०२२



Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५