गांधीजींचे आत्मचरित्र

मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार🙏

माझे, राहते शहर हॅनोवर येथील IASH ह्या भारतीय मंडळींच्या समूहात गांधीजींच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना त्यांचे आत्मचरित्र भेट म्हणून मिळाले. मी त्या कार्यक्रमाला जायचे ठरवूनही ऐनवेळी जाऊ शकले नाही, म्हणून माझे ते पुस्तक हुकले. त्यामुळे खूपच वाईट वाटले. मी अनेक वर्षांपूर्वी हे आत्मचरित्र वाचलेले होते. पण तेंव्हा बरीच लहान असल्याने बराचसा भाग विसरला गेला होता. शिवाय वयानुसार अनुभवविश्व अधिक समृद्ध झाल्यावर तेच पुस्तक अधिक चांगल्या पद्धतीने समजेल, असे वाटून मी ते पुस्तक मिळवून वाचायला सुरुवात केली. झपाटल्यासारखे एका दिवसात अर्धे वाचूनही झाले! अतिशय सुंदर अनुभव होता तो! वाचतांना मनात अनेक विचार येत होते, जसे, अरे! गांधीजींची विचार करण्याची पद्धत बऱ्यापैकी माझ्यासारखी आहे की! किंवा अरेरे! पारंपरिक/ सनातनी वातावरणात वाढल्यामुळे गांधीजींना किती संयमाने जगावं लागलं. कधी विचार आला, कसला निर्मळ माणूस, किती निष्कपट, तर कधी ह्यांचे आपले काहीतरीच! मजेशीरच आहेत की हे!
आमच्या घरात कायम लेख वगैरेंचे सामूहिक वाचन व्हायचे. आई, बाबा, मी आणि बहीण एकत्र बसून वाचत बसायचो, चर्चा करायचो, ती मी अतिशय मिस करतेय. तर हे वाचत असतांना मनात आलं, आपण असं आता मोठ्या समूहात करू शकतो ना! थँक्स टू सोशल मीडिया!
शिवाय मी 'Knowing Gandhism Global Friends' या फेसबुकवरील समूहाचा एक भाग असल्याने गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवता येतील, यावर खूप छान चर्चा तिकडे होत असतात. तिथेच हा विचार माझ्या मनात अधिक स्पष्टपणे आला. तिथल्या admin आणि इतर मित्रांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि माझा तो विचार आता कृतीत उतरवायला सुरुवात करत आहे.
तिकडे एका मित्राने सुचवले की इतके लिहित बसण्याची गरज नाही. आता picture to text convert करता येते. Pdf to text converter सोयीची कल्पना होती, वापरलीही होती, मात्र कालौघात विसरली गेली होती. त्या मित्राचे धन्यवाद, ती आठवण करून दिल्याबद्दल. पण तरीही मला ती सोय न वापरता लिहायलाच आवडेल. माझे बाबा लहानपणी अभ्यासाच्या वेळी सांगत, जे शिकते आहेस, ते लिहून काढ. त्याने आकलन वाढेल. त्या गोष्टीची सवय आणि गोडीच लागली मग मला. आता या लिखाणाच्या निमित्ताने गांधीजींच्या सहवासात चार क्षण रोज जास्त जगता येईल मला आणि त्यांचे विचार अजूनच खोलात समजतील.
फार नाही, रोज एकच पान किंवा एकच अनुभवाचा भाग लिहिण्याचा मानस आहे. लिहून झाले की प्रतिसादात त्या त्या वेळी माझ्या मनात आलेले माझे विचार लिहीन. वाचकांच्या प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. त्यानिमित्ताने चर्चा झाली, तर खूप आवडेल.
आपल्या मित्रमंडळींसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.
- सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर 

Comments

Popular posts from this blog

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३