Harz Trip
जर्मनीतील हॅनोवर शहरापासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या Harz ह्या ठिकाणाविषयी बरंच ऐकलं होतं, पण ते पाहण्याचा योग मात्र ह्या इस्टरनिमित्त मिळालेल्या लॉंग विकेंडला आला. ह्या युनिक ट्रिपचे अनुभव लिहून काढावे, असं मनात होतंच, पण बाबांनी लिहायला सांगितल्यावर तो विचार मनात पक्का झाला. ट्रीपला जाऊन आता एक आठवडा पूर्ण होईल, मग जसजसा वेळ जातो, तसतशा आठवणीही पुसट होत जातात. मात्र दिवस सुरू झाला की ऑफिस आणि घरकामात वेळ जातो आणि रात्री दमून झोप लागते, या सगळ्यात लिहायला वेळ कसा काढायचा , हेच समजत नव्हतं.
आज मात्र मध्यरात्री जाग आली ती लिहिण्याची उर्मी येऊनच. उठ आणि लिही असं एक मन मला सांगत होतं चक्क! तर दुसरं म्हणत होतं, उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे. आत्ता जागलीस तर दिवस थकव्यात जाईल. ह्या द्वंद्वात अर्धातास पडून राहिले. शेवटी पहिल्या मनाचं ऐकायचं ठरवलं आणि उठलेच!
असो, तर नमनाला घडाभर तेल ओतून झालं आहे, तेंव्हा मूळ मुद्दा सुरू करते.
ह्या इस्टरच्या सुट्टीत आपण नक्की जायचं कुठे, नक्की जायचं कुठेतरी की जरा घर वगैरे नीटनेटकं आवरत भरपूर आराम करायचा, नेटफ्लिक्स सिरीज बिंज वॉज करायच्या, नीलसोबत खेळत वेळ घालवायचा, हे काही आमचं शेवटपर्यंत ठरत नव्हतं. जोडून चार दिवस सुट्टी मिळालेली असतांना घरी बसणं, हेही काही मनाला पटत नव्हतं. शेवटी खूप लांबचा प्रवास नसलेलं पण नीलचंही मनोरंजन होईल, असं ठिकाण निवडायचं ठरवलं.
आत्तापर्यंतच्या ट्रिप्सचा अनुभव असा होता की आपण खूप प्लॅन करून ठिकाण निवडावं, भरपूर प्रवास करावा, पण छोटा नील मात्र जिथे जाऊ तिथे बागेच्याच शोधात असतो. शिवाय कुठेही गेलो, तरी त्याला रस्त्यावर पडलेले दगडगोटे, काड्या आणि तत्सम सगळं गोळा करण्यातच रस असतो.
असा सर्व बाजूंनी विचार करून शेवटी Harz पक्कं केलं. एका दिवसाची ट्रिप करायची की एक रात्र रहायचं, हा पुढचा प्रश्न मनात होता. मला सुट्टीच्या दिवशी लवकर उठून आवराआवर करून लवकर निघणं वगैरे अजिबात आवडत नाही. विक डेज ला तेच आणि विकेंडलाही तेच घाण्याला जुंपण्याचं रुटीन असेल तर सुट्टीचा काय फायदा, नाही का?
शेवटी सकाळी जशी जाग येईल, तसं आरामात उठून जायचं ठरवलं. तसं आरामात साडेआठला वगैरे नॅचरली जाग आल्यावर आवरून अकरापर्यंत निघालो. इतक्या उशिरा जातोय, तर एक रात्र राहून यायचं ठरवलं. मग हॉटेल बुक करणं आलं. जयने मग उपलब्ध यादीतून एक हॉटेल निवडलं. ब्रेकफास्ट त्यात इन्क्लुडेड असावा, अशी किमान अपेक्षा होती, पण तसं एकही हॉटेल उपलब्ध नव्हतं. मग उपलब्ध असलेल्यांपैकी त्यातल्यात्यात बरं वाटलं, ते बुक केलं. आधी हॉटेलमध्ये चेक इन करून मग फिरायला जायचं मनात होतं. तसा विचार सांगितल्यावर हॉटेल एजंटने सांगितलं की चावी ठेवून जाऊ तुमच्यासाठी.
इतरवेळी हॉटेल बुक करतांना असतो, तसा नीट फोटो वगैरे पाहण्याइतका वेळ नसल्याने जे आणि जसं असेल, ते गेल्यावर कळेलच, असा विचार करून जास्तीतजास्त रेटिंग असलेलं हॉटेल निवडलं. रिव्ह्यूज वाचण्याइतकाही वेळ नव्हता. ही सगळी प्रोसेस जय करत असतांना मी कपडे, खाणे-पिणे याची तयारी करत होते, त्यामुळे मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे जेंव्हा त्या ठिकाणी पोहोचलो, तेंव्हा ते हॉटेल नसून हॉलिडे होम असल्याचं समजलं आणि सुखद धक्काच बसला! साधारण तीन चार दिवस राहणार असू, तरच शक्यतो आम्ही हॉलिडे होमचा विचार करतो, जेणेकरून आपल्याला हवे ते बनवून खाता वगैरे येते. पण हॉटेल कॅटेगरीतून बुक केलेलं असतांना हे हॉलिडे होम मिळणं, हे अनपेक्षित असं मस्तच फिलिंग होतं. ब्रेकफास्ट नसणार, हे माहिती असल्याने किमान तयारी केलेली होतीच. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स, उकडलेली अंडी, थर्मास भरून स्ट्रॉंग कॉफी, दूध, वॉटर बॉयलर, इत्यादी साहित्य सोबत होतं.
हे हॉलिडे होम म्हणजे एक रो हाऊसेसपैकी एक होतं. त्यात एकूण चार अपार्टमेंट्स होती. मुख्य दरवाजाबाहेर चार पोस्टाच्या पेट्या होत्या. त्या डिजीटली लॉक केलेल्या होत्या. एजंटने त्यातल्या एकात आमच्यासाठी किल्ल्या टाकलेल्या होत्या. इमेलने डिजिटल लॉकचा नंबर पाठवलेला होता. त्यात एक मेन डोअरची आणि एक अपार्टमेंटची चावी होती. नीलला ते डिजिटल पोस्ट बॉक्स बघून खूपच गंमत वाटली. त्यानेच मुख्य दरवाजा चावीने उघडला. आमचं अपार्टमेंट नं 4 हे कळल्यावर त्यानेच पळत जाऊन ते शोधूनही काढलं आणि दारही उघडलं.
पहिल्या मजल्यावर आमचं अपार्टमेंट होतं. खाली रिसेप्शन वगैरे काउंटर नव्हतंच. एका टेबलवर रेस्टॉरंट्सची पॅम्पलेट्स होती, जेणेकरून जेवण ऑर्डर करता येईल आणि एका ताटात वेगवेगळ्या रंगात रंगवलेले आणि उकडलेले भरपूर इस्टर एग्ज वेलकम म्हणून गेस्ट्ससाठी ठेवलेले होते. ते बघून खूप मस्त वाटलं. त्यातले काही एग्ज घेऊन आमच्या अपार्टमेंटमध्ये गेलो.
आत छान बेड्स लावलेले होते, मस्त उजेड होता. एका बाजूला किचन होतं. त्यात घरी असतं, ते सगळं साहित्य होतं. फ्रीज, मायक्रोवेव्ह, छोटंसं डीशवॉशर, त्यासाठीचे टॅब्ज, भांडी कुंडी, मीठ, साखर, नूडल्सचा एक प्रकार:स्पॅगेटी. जो उकडण्यासाठी तयार स्थितीत ठेवलेला होता. आपण फक्त उकडून त्यात हवी ती पेस्ट मिक्स करायची. ब्राऊन ब्रेडवर लावून खाण्यासाठी आम्ही पेस्तो पेस्ट आणलेली होती, तीच हया पास्तासाठी उपयोगी पडेल, ह्या विचाराने आनंद झाला. वॉटर बॉयलरही होताच तिथे. वायफाय आणि स्मार्ट टीव्हीही होता. आता इथेच राहावं आणि फिरायला वगैरे जाऊच नये, असं वाटलंच! थर्मासमध्ये आणलेली गरमागरम कॉफी घेऊन आणि वेलकम काउंटरवर दिलेले एग्ज खाऊन तो आरामाचा विचार झटकून फ्रेश होऊन फिरायला निघालो.
आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांची डिस्काउंट कुपन्सही हॉलिडेहोमकडून मिळालेली होती. त्यात दर ठिकाणी तिकिटांवर 5 ते 10 % डिस्काउंट होता. जी घेऊन जायची आम्ही विसरलो, हा भाग वेगळा! पण त्यांनी इतका विचार केला ही जाणीव सुखद होती. एकही माणूस न दिसलेल्या हॉलीडेहोम मध्ये खऱ्या अर्थाने होस्ट लेस असले तरी परफेक्ट वेलकम होतं हे सगळं!
रूमच्या बाहेर एक कॉमन कपाट होतं. त्यातून तिथल्या एका अपार्टमेंटमधली एक गेस्ट काहीतरी काढून घेऊन जातांना दिसली, म्हणून इथे काय आहे, हे बघितलं, तर आत भांडी घासायचे स्पंजेस, वॉशिंग लिक्विड, हॅन्डवॉश, कचऱ्याच्या पिशव्या, व्हॅक्युम क्लिनर असं बरंच काही होतं! हवं ते रुममध्ये घेऊन जाऊन वापरायची सोय केलेली होती. बाथरूममध्येही भरपूर टॉवेल्स ठेवलेले होते. टॉयलेट पेपर्स, एक सुंदर कृत्रिम बोन्साय ट्री त्या स्वच्छ सुंदर बाथरूमची शोभा वाढवत होता. क्षणात ते सुंदर हॉलिडे होम खरं आपलं घरच वाटायला लागलं.
असो, तर या घरात जास्त न गुंतता, फ्रेश होऊन पटकन बाहेर पडलो. सगळ्यात पहिल्यांदा गेलो ते केबल कारकडे. Harzच्या माऊंटन्समधून घेऊन जाणारी ही केबलकार सुरुवातीलाच अचानक उंचीवरून तिरपी खाली जाते, हे बघून माझ्या पोटात गोळा आला. रोलर कोस्टरचा भयावह अनुभव आठवला ते बघून. त्यामुळे खूप आग्रह झाला, तरी मी त्यात न बसण्याच्या निर्णयाशी ठाम राहिले आणि त्यात बसलेल्या आपल्या बापलेकाचे (जय आणि नील) फोटो व्हिडिओ काढण्यात धन्यता मानून एका बेंचवर बसून आजूबाजूची सुंदर दृश्यं एन्जॉय केली.
बापलेक 5 मिनिटात परत येतील, म्हणून त्यांचा व्हिडीओ काढण्यासाठी व्हिडीओ मोड ऑन करून बसले, तर फोन आला की ही केबल कार एका पॉईंटला थांबून खालून दुसरी कार करून यायचे होते. तिथे खाली एक गार्डन होते, तिथे नील खेळण्यात रमला, तर मंडळी जरावेळाने येतील. मी सांगितलं, पुढच्या पाच मिनिटांत निघा! बागेत खेळण्यात लेक रमला तर बाकी काही बघणं होणं अशक्य. नशिबाने माझं ऐकून मंडळी वेळेत परत आली. लेकरू आईवर चिडलेलं. मी केबलकारमध्ये बसून सोबत गेले असते तर मला "अजून पाच मिनिटं" असं म्हणून जरा जास्त वेळ गार्डनमध्ये थांबण्याचा आग्रह करता आला असता, असं त्याचं म्हणणं होतं आणि कुठेही गेलो तरी छोट्या साहेबांचे डोळे गार्डनच शोधतात, आणि त्यांचा अंतिम आनंद गार्डनमध्येच आहे, हे पुन्हा एकदा सिद्धं झालं!
त्यानंतर आम्ही गेलो रोडरबानकडे. ट्रॅक्स असलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॉलीतून बापलेकाने हार्जच्या डोंगराच्या अंगाखांद्यावरून 10-15 मिनिटांची राउंड मारली आणि मी त्यांचे व्हिडीओज कॅप्चर करण्यात धन्यता मानली.
त्यानंतर आम्ही गेलो Titan RT ह्या जगातल्या सगळ्यात लांब आणि युनिक हँगिंग ब्रीज वर. Rappbode नावाच्या धारणावर असलेल्या ह्या तरंगत्या पुलाची लांबी 450 मीटर हूनही जास्त असून तो जर्मनीच्या सर्वात मोठ्या पाणी साठा असलेल्या धरणाच्या 100 मीटर उंचीवर बांधलेला आहे. त्या पुलावरून चालण्याचा अनुभव अमेझिंगच होता! पुलावर जाण्याआधी आम्ही तिथल्या उंच वॉच टॉवर वरून पुलाचे, धरणाचे मनोरम दृश्य पण त्याचवेळी पायाखाली मेटलची जाळी असल्याने धडकी भरणारी उंची असा मिश्र अनुभव घेतलेला होता. पुलावरून इतके भरपूर लोक चालत होते की तो तुटेल अशी भीती वाटत होती, पण विशिष्ट संख्येइतकेच लोक आत सोडत होते, हे माहिती असल्याने मनात एक रिलीफही होता. तरी वारा आला की पूल झोपाळ्यासारखा हलायला लागायचा आणि भीती वाटायचीच! तिथे उंच भिंतीवरून रॅपलिंग, बंजी जम्पिंग, आणि रोपवे वरून लांब स्लाईड होत जाणारं झीप लायनरवरचं धाडसी पब्लिक बघून मनोमन त्यांना साष्टांग दंडवत घातलं.
पुलाच्या दुसऱ्या टोकावरून परत मागे फिरून येणं आणि बांधलेल्या काँक्रीटच्या ब्रिजवरून हळूहळू निसर्गाचा आनंद घेत परत येणं, ह्या दोन पर्यायांपैकी आम्ही दुसरा निवडला. रस्त्यात एक बाईक कॉफी नावाचा शब्दशः बाईकवर सेटअप केलेला स्टॉल लागला. छान ऊन असल्याने कॉफी ऐवजी तिथून मँगो स्मूदी घेऊन ती पीत पीत परत आलो.
मग आम्ही गेलो Hexentanzplatz ह्या ठिकाणी. Hexe म्हणजे चेटकीण tanz म्हणजे डान्स आणि platz म्हणजे place. ह्या मजेशीर नाव असलेल्या ठिकाणी अनुभवही तितकेच मजेशीर आले. चेटकिणीचे घर, गार्डन आणि सगळे आवार चेटकीण खरोखरच असती, तर तिने कसे बांधले असते, तसे बांधलेले होते. चेटकिणीच्या दोन मजली बंगल्यात सगळं काही उलटं टांगलेलं होतं. जमिनीवरून वर बघावं, तर टेबल, खुर्च्या, अन्नपदार्थ, मांजर, वटवाघूळ वगैरे सगळंच! Besetz म्हणजेच Engaged असं लिहिलेली रूम उघडली, तर वर एक अस्वच्छ टॉयलेट आणि तिथून डोकावणारी मांजर, असं दृश्य दिसलं! आपले आकार उंच दाखवणारा आरसाही या घरात होता. शिवाय भयावह आवाज, मास्कस वगैरे सगळं. तरीही भीती न वाटता गंमतच वाटेल, असा सगळा सेटप होता.
चेटकिणीच्या बंगल्याबाहेर हलणाऱ्या आणि बोलणाऱ्या मजेशीर गोष्टी होत्या. त्यातले हलणारं झाड नीलला फारच आवडलं. तिथे हाडांचे सापळे, तरंगणारा झोंबी, अजूनही प्राणी होते. वेगवेगळी भुतं आणि यातलं बरंच काही लाकडावर कोरीव काम करून केलेलं आहे.
शिवाय बाबा यागा ह्या भुतांच्या गोष्टींमधील प्रसिद्ध पात्र आणि तिचं घरही तिथे आहे.
एकंदरीतच Hexentanzplatz हे एक मजेशीर आणि मनोरंजक ठिकाण बघून खूपच मजा वाटली आणि बनवणाऱ्यांच्या कल्पकतेचं खूप कौतुकही वाटलं.
एव्हाना संध्याकाळ झाली आणि आम्ही तेथील एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जर्मनीस्पेशल Schnitzel, सोबत, सलाड, फ़्रेंच फ्राईज, नगट्स वगैरे खाऊन डिनर पूर्ण केलं. तरीही हॉलीडे होमवर येऊन स्पॅगेटी बनवून पेस्तो सॉस सोबत ती सुद्धा हादडली.
छान बेड असला तरी नवीन ठिकाणी मला पहिल्यादिवशी झोप लागत नाही, कितीही दमलेले असले तरीही! त्यामुळे कधी एकदाची सकाळ होते, याची वाट बघत मी तीनच्या सुमारास झोपले आणि तरीही सकाळी सातला फ्रेश मनाने आणि शरीराने उठले.
दुसऱ्या दिवशी काय काय कव्हर करता येईल, याचा विचार करता वाफेच्या इंजिनावर चालणारी ट्रेन घेऊन 2 तास Harz पर्वतरांगांची सफर करायचे माझ्या मनात होते. पण त्या सफरीची मजा बर्फ असतांना जास्त येईल, असं मला मंडळींकडून कंव्हीन्स करण्यात आलं आणि दुसरं काही ऑन द वे बघू नाहीतर लवकर ट्रॅफिक लागण्याच्या आत घरी जाऊ, असंही सांगण्यात आलं.
रस्त्यात एक केव्हज लागली. ती क्रिस्टल केव्हज असल्याने उत्सुकतेने आत गेलो, तर एक सुंदर आणि दुर्मिळ ठिकाण योगायोगाने बघायला मिळाल्याचा आनंद अनुभवायला मिळाला. Hermann's cave असं इंग्रजी भाषांतर असलेल्या ह्या भव्य गुहेचा शोध 1866 साली कन्स्ट्रक्शन वर्कच्या दरम्यान लागला आणि तिला टूरिस्ट डेस्टिनेशनचं स्वरूप देण्याच्या दृष्टीने बांधकाम करून बघण्यासाठी खुली करण्याचं काम 1970 साली पूर्ण झालं.
पृथ्वीच्या पोटात जाऊन तिथे काय काय असू शकतं, कसे कॅल्शियम डिपॉझिट्स सॉलिड झाल्यावर बर्फासारखे पांढरे आणि सुंदर दिसतात, कसे क्रिस्टल्स फॉर्म होतात, या दृश्यांचा त्या लांबलचक केव्हजमधला आनंद केवळ अवर्णनीय होता. तिथे सापडलेल्या अस्वलाचा भलामोठा सापळा जतन केलेला आहे. त्या केव्हज मध्ये तयार झालेली 2 क्रिस्टल्स मेमरी म्हणून सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
आत्तापर्यंत हिरवागार असलेल्या Harzमध्ये रस्त्यात अचानक Brocken हे गाव लागलं आणि हे नाव शब्दशः खरं करणारी कोरडी झालेली झाडं दिसायला लागली. हे ठिकाण भटकंतीसाठी प्रसिद्ध आहे. इथूनच ती स्टीम इंजिन ट्रेनही जाते. सर्व डोंगरांवर अशी तुटलेली आणि तोडलेली झाडं बघून मन दुःखी झालं. हे असं का? याचा शोध घेतला असता, असं समजलं की त्या भागात अचानक जमीन कोरडी झाली आणि काहीतरी इन्फेक्शन झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. म्हणून आता ती झाडं तोडून कोरडी लाकडं स्वस्त दरात विकून हे जंगल परत रिस्टोअर करण्याचं काम सुरू आहे.
आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो खरे, पण रस्ता काहितरी कारणाने ब्लॉक केला गेला आणि कितीही मार्ग बदलले, तरी साधारण 22 किमी पुन्हा पुन्हा राऊंड मारत तिथेच भिंगरी लागल्यासारखे पोहोचत होतो. आमच्या नेव्हीगेशन सिस्टीमला चेटकिणीने झपाटले की काय, असं वाटावं, इतका वेळ गोल गोल फिरून ड्राइव्ह करून झाल्यावर नेव्हीगेशन म्हणते, त्याच्या बरोबर उलट्या दिशेने जात एकदाचे आम्ही चक्रव्युहातून सहीसलामत बाहेर पडलो.
बऱ्याच गोष्टी अजून बघायच्या बाकी आहेत, त्या पुढच्या वेळी बघू हे ठरवूनच Harz ला निरोप दिला.
सुंदर, मजेशीर, भव्यदिव्य आणि अतिशय युनिक असा अनुभव, हेच फिलिंग मनात आहे या ट्रिपबद्दल. तिचे जमेल तितके फोटोज व्हिडिओज काढून तिला डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
सकीना वागदरीकर-जयचंदर
14 एप्रिल 2023
Comments
Post a Comment