आज्जी आजोबांची डायरी: भाग ४८

दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीत हॅनोवर शहरात ज्या सिनियर केअर होममध्ये मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करतेय, तिथे भेटायला मिळालेल्या अविस्मरणीय व्यक्तीमत्त्वांपैकी एक अशा आजोबांची गोष्ट मी आता सांगणार आहे.


तांबूस पिंगट रंगाचे डोळे, कॉफी कलरच्याच पण लाईट आणि डार्क अशा वेगवेगळ्या शेड्सच्या पॅन्ट्स, वेगवेगळ्या रंगांचे पण कायमच चेक्सचे कॉलर असलेले फुल किंवा हाफ शर्ट घालणारे, छान उंची आणि बांधा असलेले असे एक आजोबा आमच्या संस्थेत दाखल झाले. नाकीडोळे खूपच रेखीव आणि सरळ रेषेत असलेले पांढरेशुभ्र दात ते हसले की चमकतांना दिसत. ते दात खरे होते की ती कवळी होती, याची कल्पना नाही.

ते ज्या रंगाचा शर्ट घालत, त्याचं प्रतिबिंब डोळ्यात पडल्याने त्यांचे डोळे कधी हिरवे तर कधी निळे असे वेगवेगळ्या रंगांचे दिसत.

असे हे गोड आजोबा, बोलायलाही तितकेच गोड. आमच्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. माझा हात हातात घेऊन म्हणले होते, "आह! सकीना! किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा रंग, तुमचा गंध..." मला गंमत वाटली हे ऐकून आणि मी फक्त हसले होते यावर. जर्मनीत आल्यापासून अशाप्रकारे कौतुक करणारी मंडळी मला भेटली आहेत बरेचदा.

एकदा आमच्या संस्थेतल्याच एक आज्जी तर माझा हात हातात घेऊन मला म्हणाल्या होत्या, मी जर मुलगा असते, तर तुझ्याशीच लग्न केलं असतं. 

खूप गंमत वाटते मला इकडच्या लोकांच्या प्रशंसेच्या, फ्लॅर्टिंगच्या पॅटर्नची. मनात येतं, ते मोकळेपणाने बोलून टाकतात, कुठलाही संकोच न करता.

तर हे आजोबा आणि त्यांच्याकडून हे असं माझं कौतुक करणं नेहमीच व्हायचं. त्यांना मी फक्त एक दोनदाच त्याच्या रूममध्ये व्हिजिट केलं होतं. कारण ते कायमच फिरतांना दिसायचे आणि दुपारी कॉफी टाईमला मी त्यांना डे रूम (डायनिंग हॉल) मध्ये अधूनमधून भेटायला जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायचे. आमच्या गप्पा खूप रंगायच्या. 

मी ही त्यांच्या दिसण्याचं कौतुक करायचे. तुम्ही भारतात असता तर हिरो म्हणून नक्की खपून गेला असता, असं म्हणायचे. ते त्यावर हसत सकीना, सकीना म्हणत गोड हसायचे.

हे आजोबा मूळचे पोलंडचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत आश्रय घ्यायला तिकडून निघाले, तर जर्मनीत पोहोचल्यावर अमेरिकन लष्कराकडून पकडले गेले आणि दीड वर्ष त्यांच्या कैदेत होते. युद्ध संपल्यावर त्यांची सहीसलामत सुटका झाली. मग जर्मनीमध्येच ते स्थायिक झाले.

त्यांची मुलगी ह्याच शहरात राहते आणि ती त्यांना भेटायला कायम यायची. त्यांच्याशी गप्पा मारायला एकदा त्यांच्या रूममध्ये गेले असतांना आजोबा म्हणाले होते, माझ्या मुलीने मला येत्या ख्रिसमसला तिच्या घरी चार दिवस राहायला बोलवले आहे पण मी तिला 'येणार नाही', असे सांगितलेय. आता हेच माझं घर. इथे मला खूप कम्फर्टेबल वाटतं. चार काय, एका दिवसासाठीही मला माझं हे घर सोडून जायची आता इच्छा नाहीये, इतकं मला इथे आवडतं.

मग त्यांनी त्यांच्या रूमच्या कॉर्नरला असलेल्या बोटीच्या आकाराच्या स्टँडकडे बोट दाखवत मला सांगितलं, ते बघ. त्यात सगळी वर्तमानपत्रच होती. मी विचारलं, हवंय का यातलं एखादं? तर म्हणाले, 'ते नाही, त्याच्या मागे बघ'. त्याच्या मागे एक फ्रेम ठेवलेली होती. तिचं तोंड भिंतीकडे होतं. 'ती बघ', असं ते मला म्हणाले. फ्रेम समोर केली असता त्यात एक न्यूड पेंटिंग दिसले. मला हे अनपेक्षित होतं. पुढे ते म्हणाले, ही माझी रूम आहे ना? मग मला हवं ते मी इकडे ठेवू शकतो ना? तर माझी मुलगी मला ही फ्रेम लावू देत नाही. हे नका करू, ते नका करू, असं फार बोअर करते. मला इथे मोकळं वाटतं. कोणाचाही अंकुश नसतो, त्यामुळे. पण इथेही मला तिचेच ऐकावे लागते.

मी काहीही उत्तर न देता ती फ्रेम जिथे आणि जशी होती तिथे आणि तशीच परत ठेवून दिली. त्यांनाही माझ्याकडून काही उत्तर वगैरे अपेक्षित नव्हतंच. ते फक्त मन मोकळं करत होते, असं लक्षात आलं.

एरवी नॉर्मल वाटणारे हे आजोबा एकदा मात्र  कपडे न घालता दरवाजा उघडाच ठेऊन त्यांच्या रूममध्ये सहजपणे वावरतांना दिसले. कोणीतरी नर्सला कळवले असेल. त्यामुळे तेवढ्यात ती येतांना दिसली आणि तिने त्यांना लहान मुलांना सांगतो, तसे कपडे घाला बरं लवकर, असे फिरू नका, असे समजवले. त्यांच्या डोळ्यात काहीही भाव दिसले नाहीत. ना संकोच, ना आणखी काही. ते आपल्याच धुंदीत होते.

असेच ते पुन्हा एकदा भान विसरुन त्यांच्या रूमबाहेरील हॉलवे मध्येही फिरतांना दिसले. पुन्हा नर्सला हस्तक्षेप करावा लागला. हेच कारण असेल का त्यांना त्यांच्या मुलीने संस्थेत दाखल करण्याचे? अशी शंका माझ्या मनात आली त्याक्षणी.

हे दोन प्रसंग सोडता पुन्हा ते कधीही तसे वावरतांना दिसले नाहीत.

नंतर हे पोलिश आजोबा त्यांच्याच फ्लोअरवरच्या त्यांच्याहून काही वर्षांनी मोठ्या- नव्वदीच्या पुढच्या एका पोलिशच आज्जींसोबत सिटिंग कॉर्नरवर गप्पा मारतांना दिसायला लागले.

ह्या आज्जी खरतर विस्मरणाच्या पेशंट. कधी धड बोलतील आणि कधी फटकून, त्याचा काहीच नेम नाही. त्यांची गंमत म्हणजे त्या फक्त नर्स मुलांकडूनच सगळी सेवा करून घेत. मुली त्यांना आवडत नसत. मुलं समोर आली की गोड हसत आणि बोलत. मुलींना हिडीस फिडीस करत. एका एक्सटर्नल थेरपिस्टला, चल जा इथून. मला तुझी गरज नाही असं ओरडून बोलल्या होत्या. माझ्यासमोरच हे घडलं. त्यामुळेच कदाचित तिला एकदम लाजिरवाणं आणि अपमानास्पद वाटलं असावं. ती एकदम रडायलाच लागली. मी तिला सांगितलं की आज्जी सगळ्यांशी असंच वागतात. तिला ऑफिसरूममध्ये घेऊन जाऊन कॉम्प्युटरवर डॉक्युमेंटेशनही दाखवलं, ज्यात  इतरांसोबतच मी ही केलेली नोंद होती, आज्जींच्या ह्या तुसड्या वागणुकीबद्दलची. ते बघून ती जरा शांत झाली.

बाकी सगळ्या गोष्टीत मदत लागणाऱ्या ह्या आज्जी स्वतःचे स्वेटर्स मात्र स्वतःच धुवून वाळत टाकत. अगदी टापटीप. हँगरला वगैरे लावून. त्यांना त्यांच्या आई वडिलांची फार आठवण यायची. आई असती, तर तिने माझं हे काम केलं असतं, माझी काळजी घेतली असती, आपले आईवडीलच आपल्यावर खरं प्रेम करतात, असं म्हणायच्या.

ह्या आज्जींचे आणि आजोबांचे कायमच एकत्र गप्पा मारतांना दिसणे छान वाटत होते. आज्जींना जास्त चालता यायचे नाही. त्यामुळे त्या कायम बसूनच असत. त्यामुळे आजोबाही त्यांच्यासोबत बसूनच गप्पा मारत.

एकदा ह्या आजोबांचा चेहरा मला उतरलेला दिसला. काय झालंय, असं विचारलं असता, त्यांनी मला सांगितलं, सकीना, एक मोठाच प्रॉब्लेम झालाय. सांगायला सुद्धा लाज वाटतेय मला. पण सांगितल्याशिवाय राहवतही नाही. होप, तू मला समजून घेशील. मी त्यांना तसा ऍश्यूरन्स दिल्यावर त्यांनी सांगितलं, काल रात्री ते त्या आज्जींच्या रूममध्ये गेले होते. ते दोघंही बेडवर होते आणि रात्रीची नर्स राउंडला आली आणि तिने त्यांना नको त्या अवस्थेत बघितले. तेंव्हापासून त्यांचा पार मूड गेलेला आहे. इथे काहीच प्रायव्हसी नाही. दार लॉक केले, तरी नर्सेसकडे चावी असतेच ना!

मी आजोबांना सांगितले, काळजी करू नका आणि वाईटही वाटून घेऊ नका. आपण यावर सोल्यूशन शोधून काढुया.

माझ्या बॉसला मी हा प्रॉब्लेम सांगितला. तिला खूप वाईट वाटलं. तिने सांगितलं, आपण नाईट नर्सेसना कल्पना देऊ या बाबतीत आणि त्यांच्या दारावर 'डू नॉट डिस्टर्ब' चा बोर्ड लावायला सांगू या.

दुसऱ्या दिवशी भेटून आजोबांना ही गोष्ट सांगायला मी उत्सुक होते, तर त्यांचा फ्लोअर करोनाचे पेशन्टस आढळल्याने आयसोलेट केला गेला होता.

दोन आठवड्यांनी कॉरंटाईन पिरियड संपला की आपण आजोबांना भेटून हे सांगू, असे मी ठरवले, तर आजोबाही पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. त्यांच्या मैत्रीण झालेल्या आज्जीही पॉझिटिव्ह झाल्या असल्याने दोघंही आपापल्या रूममध्ये आयसोलेट केले गेले. ३० रहिवासी असलेल्या फ्लोअरवर बघता बघता निम्मे लोक पॉझिटिव्ह झाले.

'त्या फ्लोअरवर जे निगेटिव्ह आहेत, त्यांच्याशी किमान तू बोलायला जा. ते पार वेडे होतील नाहीतर', असा आदेश मला आठवड्याभरानंतर बॉसकडून आला आणि मला भीतीने धस्स झालं.

तसं मी आयसोलेटेड फ्लोअरवर करोनाच्या सुरुवातीला काम केलेलं होतं, पण तेथील रहिवासी बहुतेककरून हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्याने कॉरंटाईन असत, करोनाने नाही. त्यावेळी तसा नियम केलेला होता. हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या व्यक्तीला कंपल्सरी कॉरंटाईन केले जायचे दोन आठवड्यांसाठी.

नाही म्हणायला एकेका फ्लोअरवर २/३ करोना पेशन्ट्स असतही अधूनमधून, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर नसत. शिवाय करोनाने त्यावेळी आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवायला सुरुवात केलेली होती. बरेच जण जीव गमावून बसल्याच्या बातम्या ऐकायला मिळायच्या. त्यामुळे तिथे काम करण्याच्या विचाराने मी पार घाबरून गेले होते. रडलेसुद्धा! हे काम नाकारावे, असेही मनात आले.

मात्र मी विचार केला, त्या फ्लोअरवरच्या नर्सेसना, सफाई कामगारांना, डॉक्टरांना दुसरा काही पर्याय आहे का त्यांना भेटण्याशिवाय? मग मी तरी का घाबरून मागे फिरावे? तसेही मला फक्त बोलण्याचे काम आहे, तेही निगेटिव्ह लोकांसोबत आणि संपूर्ण झाकणारे सुरक्षित असे करोना किट घालूनच मी भेटणार आहे. शिवाय करोनाची लागण तर सुपरमार्केट, ट्रॅम, अशी कुठेही होऊ शकते. मनाला असे समजवून आणि मनावर दगड ठेवून मी त्या फ्लोअरवर गेले. करोना न झालेल्या निगेटिव्ह लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलणे, त्यांना धीर देणे, हे करत होते.

त्या फ्लोअरवरच्या ऑफिसरूममध्ये डॉक्युमेंटेशनसाठी कॉम्प्युटरसमोर बसलेले असतांना त्यासमोरच्या ग्लासच्या भिंतीतून पाहिले असता, समोरच आजोबांची रूम होती.

त्यांना जेवण द्यायला नर्सने दार उघडलं, आणि मला ते दिसले. त्यांना आयसोलेट करून एखादा आठवडा झाला असेल कदाचित. आजोबा खूपच खंगलेले दिसत होते. नेहमी टापटीप दाढी केलेल्या त्यांच्या दाढीची खुरटं वाढलेली दिसत होती. त्यांनी पॅन्ट घातली होती पण शर्ट घातलेला नव्हता. त्यांच्या रुममधल्या खुर्चीवर ते शक्ती नसल्यासारखे कुबड काढून बसलेले होते. त्यांची पार रया गेलेली दिसत होती. मी त्यांच्याकडे बघत असतांनाच त्यांची आणि माझी नजरानजर झाली. मी ग्लासच्या भिंतीपलिकडे असल्याने मला त्यांचा आवाज येऊ शकत नसाल तरी त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून ते रडत रडत 'सकीना' असे म्हणाले असल्याचे मला जाणवले. मी त्यांना हात केला आणि नर्सने त्यांच्या रुमचं दार बंद केलं.

ह्या आजोबांना यातून लवकर बाहेर पडायला मिळू  दे, अशी प्रार्थना मी मनात केली, मात्र त्याच्या पुढच्या ४ एक दिवसातच त्या फ्लोअरवरील पॉझिटिव्ह असलेला/ली एकेक जण करोनाने जात असल्याच्या बातम्या यायला लागल्या. एकूण १२ जण गेले, त्यात हे आजोबाही होते!

त्या आज्जी मात्र त्यातून सहीसलामत बऱ्या होऊन बाहेर आल्या. आज्जींना विस्मरणाचा आजार असल्याने त्यांना आजोबा गेल्याचे लक्षातही आले नाही. मात्र कधीकधी तिकडे खिडकीबाहेरच्या रस्त्यावर माझा एक मित्र राहतो आणि तो मला नेहमी हाका मारतो,असं म्हणायच्या. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी नैसर्गिक मृत्यू येऊन हे जग त्याही सोडून गेल्या.

त्या मजल्यावर गेले की या आज्जी-आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

सकीना वागदरीकर-जयचंदर
१८.०७.२०२२


Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५