Posts

Showing posts from July, 2022

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४८

दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीत हॅनोवर शहरात ज्या सिनियर केअर होममध्ये मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करतेय, तिथे भेटायला मिळालेल्या अविस्मरणीय व्यक्तीमत्त्वांपैकी एक अशा आजोबांची गोष्ट मी आता सांगणार आहे. तांबूस पिंगट रंगाचे डोळे, कॉफी कलरच्याच पण लाईट आणि डार्क अशा वेगवेगळ्या शेड्सच्या पॅन्ट्स, वेगवेगळ्या रंगांचे पण कायमच चेक्सचे कॉलर असलेले फुल किंवा हाफ शर्ट घालणारे, छान उंची आणि बांधा असलेले असे एक आजोबा आमच्या संस्थेत दाखल झाले. नाकीडोळे खूपच रेखीव आणि सरळ रेषेत असलेले पांढरेशुभ्र दात ते हसले की चमकतांना दिसत. ते दात खरे होते की ती कवळी होती, याची कल्पना नाही. ते ज्या रंगाचा शर्ट घालत, त्याचं प्रतिबिंब डोळ्यात पडल्याने त्यांचे डोळे कधी हिरवे तर कधी निळे असे वेगवेगळ्या रंगांचे दिसत. असे हे गोड आजोबा, बोलायलाही तितकेच गोड. आमच्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. माझा हात हातात घेऊन म्हणले होते, "आह! सकीना! किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा रंग, तुमचा गंध..." मला गंमत वाटली हे ऐकून आणि मी फक्त हसले होते यावर. जर्मनीत आल्यापासून अशाप्रकारे कौतुक करणारी मंडळी म

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४७

"आजीच्या जवळी घड्याळ कसले, आहे चमत्कारिक, देई ठेवुनी ते कुठे अजूनही, नाही कुणा ठाऊक.."  माझे बाबा त्यांच्या नातवंडांना झोपवतांना गात असलेलं गाणं ऐकलं की मला माझी आज्जी-आईची आईच आठवायची कायम. ह्या गाण्यातल्या आज्जीकडे कुठलेही घड्याळ नसूनही तिला दिवसाचा कुठला प्रहर आणि वेळ सांगता यायची, तशीच माझ्या कस्तुरा आज्जीलाही यायची.  ती निरक्षर होती. पण आता किती वाजले असतील, हे ढोबळपणे सांगू शकायची कायम. नाशिक पुणे रस्त्यावर येणाऱ्या स्टेशन्सची नावं आणि त्यांची ऑर्डरही तिला अचूकपणे सांगता यायची. इतकेच नाही तर ती हिशोबातही चोख होती. आज हे गाणं आठवायचं कारण म्हणजे जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते, तिथे मला भेटलेल्या एक उत्साही आज्जी.  त्यांची गोष्ट मी आज सांगतेय. केक आणि कुकीज बेकिंगमधल्या त्या एक्स्पर्ट.वेगवेगळ्या व्हरायटीचे केक बनवतांना त्या माप फक्त 'फील' करतात. टायमरही लावत नाहीत. ओव्हनमधल्या केककडे बघूनच त्यांना कळतं की तो बेक झाला असेल की नाही. केक माझा लहानपणापासून आवडता. पण तो बेकरीत मिळणारा नाही तर माझ्या आईच्या हातचा. माझी आ

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४६

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या जर्मनीतील सिनियर केअर होममध्ये मी दुपारच्या राउंडला गेलेले होते. दुपारची वेळ  वामकुक्षीची, त्यामुळे शक्यतो दरवाजा वाजवून कोणाची झोपमोड करणे, मी टाळते. जे जागे असतात, हे माहिती असते, त्यांनाच भेटते किंवा ज्यांचे दार उघडेच असते, तिथे हळुच डोकावून, जागे आहेत ही खात्री करून घेऊन मग भेटायला, बोलायला जाते. अशाच एका दुपारी दुसऱ्या मजल्यावरच्या एका डबलरूमचे दार उघडे दिसले म्हणून मी चेक करायला गेले. एका बेडवरच्या आज्जी गाढ झोपलेल्या आणि दुसऱ्या वाचत बसलेल्या होत्या. झोपलेल्या आज्जींना डिस्टर्ब होऊ नये, म्हणून मी वाचत बसलेल्या आज्जींनाही हॅलो वगैरे न करता तिकडून निघाले. आज्जींची आणि माझी नजरानजरही झालेली नव्हती, त्यामुळे मला वाटलं, त्या वाचनात गढलेल्या आहेत. मात्र मी जशी बाहेर जायला वळले, तशा त्या म्हणाल्या, कोण आहे? मी कोण ते हळू आवाजात सांगितले आणि ह्या दुसऱ्या आज्जी झोपल्या असल्याने आपण नंतर बोलूया, असे म्हणाले. त्यावर ह्या आज्जी वैतागून म्हणाल्या, त्या तर कायमच झोपलेल्याच असतात, मग तुम्ही माझ्याशी कधी बोलणार? मी ही माणूस आहे, मलाही कोणीतरी बोलायला लाग

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५

  जर्मनीतील हॅनोवर शहरात मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते त्या सिनियर केअरहोममध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक उंचपुरे धिप्पाड कोट-सूट घातलेले निळ्या डोळ्यांचे एक ८४ वर्षांचे आजोबा दाखल झाले. एकेकाळी स्पोर्ट्स ट्रेनर आणि व्यवस्थापक असलेले पण आता माईल्ड विस्मरणाचा आजार डेव्हलप झालेले हे आजोबा फॅमिलीविषयी किंवा त्यांच्या जॉब विषयी विशेष काही सांगू शकत नसले, तरी आपले सर्व काही काम स्वतः करू शकतात. त्यांची रूम तर एखाद्या ऑफिस रुमसारखी टापटीप लावलेली आहे. त्यातून ते दिवसभर कोट-सूट घालून वावरत असल्याने त्यांना भेटायला गेल्यावर अपॉइंटमेंट घेऊन कोणत्यातरी ऑफिसमध्ये गेल्यासारखा फील येतो. आजोबा अतिशय प्रसन्न, हसरे आणि मितभाषी. आजोबांजवळ मरून कलरच्या दोन वॉकिंग स्टिक्स! ते आल्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात एक नवीन आज्जी दाखल झाल्या. ह्या आज्जी त्या आजोबांहून 2 वर्षांनी मोठया. दिसायला अतिशय सुंदर! उंचीने आजोबांइतक्याच. त्यांच्याच शेजारच्या खोलीत दाखल झालेल्या. आज्जी स्वभावाने अतिशय प्रसन्न आणि गोड, त्याला जोडून त्यांचा ड्रेसिंग सेन्सही तितकाच गोड किंवा छान फिगर असल्याने त्यांन

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४४

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये आज एक नवीन जर्मन आज्जी दाखल झाल्या. वय वर्ष 98. डोळयांनी पूर्णपणे अंध. आज त्यांचा इथे पहिलाच दिवस असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती देऊन आज थोडक्यात संभाषण आटोपून उद्या सविस्तर बोलावे, असे ठरवून मी त्यांना भेटायला गेले. कृश शरीरयष्टी असलेल्या या आज्जींचे संस्थेत स्वागत करून त्यांना मी इथे काय करते, हे सांगताच, त्या एकदम खूष झाल्या आणि दिलखुलास हसत मला म्हणाल्या, मी 98 वर्षांची आणि माझा नवरा 80 वर्षाचा. उद्या तो मला भेटायला येईल, तेंव्हा तो माझा मुलगा आहे असा तुमचा गैरसमज होऊ नये, म्हणून आधीच सांगून ठेवते. त्या बरोबर माझ्या दिशेने पाहून बोलत असल्याने मी त्या अंध असल्याचे साफ विसरून गेले होते. माझ्या जर्मन बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांना मी परदेशी व्यक्ती असल्याचे समजले असणार. त्यामुळे त्यांनी मला मी कुठली, हे विचारले. मी भारतीय, हे सांगितल्यावर त्यांनी मला त्यांना इंग्रजी बोलता येते आणि फ्रेंचही येते हे सांगितले आणि त्यानंतरचे पुढचे सगळे संभाषण त्यांनी इंग्रजी मिश्रित जर्मनीमध्ये केले. इ