आज्जी-आजोबांची डायरी: भाग २९

भाग २८ किळस न येऊ देता वाचून मायेने मला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आणि खूप खूप आभार! ते प्रतिसाद वाचून माझ्या मनावरचे दडपण नष्ट होऊन मी एकदम रिलॅक्स झाले. आता यापुढे मी मोकळेपणाने जे आणि जसं घडलं, ते आणि तसं कुठल्याही आडपडद्याशिवाय लिहू शकेन.

त्या 'आल्लं-माल्लं' असं बरळणाऱ्या आज्जींनी दुसऱ्या दिवशी अजूनच मजेशीर प्रकार केल्याचे दुसऱ्या नर्स ताईकडून कळले. ह्या आज्जी म्हणजे आपलं लहानसं गोड बाळच वाटल्या मला त्यांच्या बाळलीला ऐकून. अर्थात नर्स ताई ते सगळं ज्या स्वरात आणि भावात सांगत होती, त्यामुळेच.. ती म्हणे त्यांच्या रूममध्ये गेली, तेंव्हा आज्जी बाथरूममध्ये होत्या. कमोडमध्ये तळाशी असलेलं पाणी दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन त्याने तोंड धुणे एन्जॉय करत बसलेल्या होत्या. त्यांना तिने सांगितलं, "आज्जी, अहो! हे पाणी तोंड धुण्यासाठी नाहीये. हे बेसिन बघा, इकडे तोंड धुवायचं असतं." मग नर्सने बघितलं, की कचऱ्याच्या डब्यात आज्जींनी शू करून ठेवलेली होती. तिने मग त्यांना हा कचऱ्याचा डबा त्यात कचरा फेकायचा असतो आणि शू कमोडवर बसून करायची असते, हे समजावून सांगितलं.

ह्या आज्जींना रूममध्ये बसायला आवडायचं नाही. त्या रूमच्या बाहेर पडून कोणाच्याही रूममध्ये जायच्या. शेजारच्या रुममधल्या दुसऱ्या नवीन आज्जींच्या रूममध्ये एकदा मध्यरात्री भुतासारखं शिरून त्यांना चांगलंच घाबरवलं होतं त्यांनी! तेंव्हापासून त्यांचा धसका घेऊन ह्या आज्जींनी आपली रूम लॉक करून घ्यायला सुरुवात केली. त्यांना आमची मास्टर की वापरून आम्ही भेटायला गेलो की परत जातांना दार लॉक करायला विसरू नका, हे त्या आठवणीने प्रत्येकवेळी सांगत असत. हे करूनही त्यांचा त्रास काही संपला नाहीच.. कारण त्या आज्जी लॉक केलेल्या दाराचे हँडल दुपारी आणि रात्री अपरात्री हलवत बसून उघडायचा जो प्रयत्न करत, त्यात ह्या दुसऱ्या नव्या आज्जींची झोपमोड व्हायचीच..

करोनाकाळात हा फ्लोअर आयसोलेट केला गेला असल्याने जिने वापरणे बंद ठेऊन त्यांच्या दरवाज्यांना सायरन बसवला आहे, जेणेकरून कोणीही दार उघडलं, की तो जोरात वाजेल. आज्जींनी तो कसा वाजतो, ह्याचे एकदा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठीच जणू ते दार उघडून जिने उतरणे सुरू केले.

हे सगळे काही डॉक्युमेंट केले गेले आहे. मग आज्जींना ट्रँक्युलाईझर्स देऊन थोडे शांत करण्यासाठी उपचार देण्यात आले. मात्र कधीच आज्जींना बांधले नाही की त्यांची रूम लॉक केली नाही. त्यांच्यावर कोणीही ओरडले आणि वैतागले नाही. फक्त टेरेसचे दार आपण यापुढे बंद ठेवायला हवे, ह्या आज्जींनी वरून उडी मारायला नको, असे नर्स म्हणाली.

बाकी सर्वांना मी टेरेसमध्ये न्यायचे, ह्या आज्जींना मात्र त्यांच्याच सुरक्षिततेसाठी न नेण्याचे नर्सने सांगितल्याने मी ते कधी केले नाही. त्यांना कळो न कळो, काहीतरी गप्पा मारून येण्याचे काम नियमितपणे तेवढी करत राहिले.

एक दिवस ह्या आज्जी अशाच रूममधून बाहेर येत होत्या, तर नर्स ताई त्यांना म्हणाली, 'नका हो बाहेर येऊ, तुमचं येडं डोकं आहे..' तर आज्जीही लगेच आल्यापाऊली परत वळल्या आणि आज्ञाधारकपणे रूममध्ये जाऊन बसल्या. मी नर्सला म्हणाले, 'नको ना गं असं बोलूस.' तर ती म्हणाली, 'अगं, त्यांना फक्त हीच भाषा कळते. तुला तर माहितीच आहे, त्या कशा नाकी नऊ आणतात ते!' मलाही पटलं, बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष काम करणाऱ्याच्या संयमची मात्र परीक्षा असते, अधूनमधून त्यांचाही तोल सुटतो, तरी नर्स ताई जे काही बोलली, त्यात मला मायाच जाणवली. आज्जी सुद्धा तशा कूलच होत्या. 'बॅक ऑफ द माईंड' कदाचित त्यांना आपल्या उद्योगांची अधूनमधून पुसटशी कल्पना येत असावी, असं मला वाटलं..

आज्जींना 'येडं डोकं' बोलल्याच्या दुसऱ्याच दिवशी हीच नर्स ताई मॉर्निंग शिफ्टला होती. मी तिकडे गेल्या गेल्या मला म्हणाली, "अगं आपल्या 'आल्लं-माल्लं' आज्जींना मी आज फ्रेश हवेत गच्चीत फिरवून आणलं बरंका! त्याही बिचाऱ्या खोलीत पडून पडून कंटाळत असतील ना?' नर्सच्या प्रेमळपणाचं, आज्जींच्या सर्व बाळलीला पोटात घालून आईच्या मायेने त्यांचं केल्याचं, करत असल्याचं पाहून मन भरून आलं.. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यावर ह्या आज्जींना डिमेन्शिया फ्लोअरवर शिफ्ट करण्यात आलं. परवाच्या इमेलमध्ये वाचलं, ह्या आज्जी तिकडे आपल्या वॉकरवरून धडपडत दुसऱ्या व्हीलचेअरवरच्या आज्जींच्या अंगावर पडल्या आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहेत आता. बघूया, त्यांना वर क्वारंटाईन करतात की खाली त्यांच्याच रूममध्ये..

कालच्या भागात उल्लेख केलेल्या आज्जी- ज्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून माझ्या पोटात खड्डा पडला होता, त्या ट्रीटमेंट घेऊन दोन तीन दिवसांनी परत आल्या, त्याबरोबर त्यांचा क्वारंटाईन पिरियडही चौदा दिवसांनी वाढवण्यात आला. अर्थात ह्या आज्जी आता तब्येत आणि मानसिकदृष्टीने अशा स्टेजला पोहोचलेल्या आहेत की त्यांना काही फरक पडत नसणार त्याने. त्यांच्यासाठी सर्व रूम्स सारख्याच.. ह्या आज्जी बेडवरच कायम पडून असत. त्यांना फक्त जेवणा-खाण्यापुरते टेबल खुर्चीत बसता येत असे. तर जेवण झाले की मला लगेच बेडवर टाका, पाठ दुखते, म्हणून हाक मारून बोलवून घेऊन पडून घ्यायच्या. पडल्या की जरावेळाने मला आता उठायचे आहे, पाठ दुखते आहे पडून पडून, म्हणायच्या. बेड बटण दाबून वर उचलला की तोल जाऊन पडत. त्यांची कम्फर्टेबल पोझिशन सेट करून देणे, हे एक सातत्याचं आणि दुसरं एक संयमाची परीक्षा घेणारं काम होतं नर्सेससाठी. ह्या आज्जींना मला गच्चीत नेणे शक्यच नव्हतं. नर्सनेही त्यासाठी नकार दिलेला होता. मी कुठल्याही प्रशिक्षित स्टाफच्या मदतीशिवाय कोणत्याही आज्जी आजोबांना जमत असले तरी उचलणे, भरवणे वगैरे नियम मोडणारे ठरत असल्याने मी ते कधी केले नाही.

एक दिवस ह्या नर्सने त्या आज्जींना गच्चीत त्यांच्या व्हीलचेअर वरून फिरवून आणले. तेंव्हा आज्जी चक्क रडल्या म्हणे! किती छान फ्रेश हवा, सूर्यप्रकाश! आणि मग रोज तिथे बसायला लागल्या.

ही जर्मन नर्स ताई तिची ज्या ज्या दिवशी ड्युटी असते, त्या त्या दिवशी सकाळी साडेपाच/ पावणेसहाला पोहोचते आणि दीड दोनच्या सुमारास घरी जाऊन तिच्या आठ वर्षाच्या लेकासोबत जेवण करते. तुला ही नोकरी कशी लागली, तिच्याबद्दल कशी आवड निर्माण झाली, विचारले असता, काळजी घेणे हा माझा स्वभावच आहे. मला माझं काम मनापासून आवडतं, म्हणून मी ते निवडलं, आणि त्याचा कधीच पश्चाताप मला झाला नाही, असं तिने अगदी सहजतेने मला सांगितलं..

मी ह्या फ्लोअरवर ड्युटीला सुरुवात केली, त्या पहिल्या दिवशी हीच तिकडे होती. मला पाहून, "कोणीतरी आलं इकडे मला सोबत. किती छान!" असं म्हणून माझं प्रेमाने स्वागत करणारी आणि अजूनही निघतांना "तू उद्याही येणार आहेस ना? परवाही असणार आहेस ना इकडे? किती छान!" असे म्हणत असते आणि मला ही संस्था म्हणजे माझे दुसरे घर असल्याचा फील करून देते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
१६.०६.२०२०

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५