आज्जी-आजोबांची डायरी: भाग २५
सिनियर केअर होममधल्या माझ्या क्वारंटाईन फ्लोअरवरच्या ड्युटीमध्ये गेल्या आठवड्यापासून बरंच काही घडलं आहे.. बराच हॅपनिंग आहे हा फ्लोअर एकंदरीत.. मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं की चार पाच आज्जी आजोबांना रोज भेटणे, हे इंटरेस्टिंग काम असेल. उलट मला वाटत होतं की वेळ खायला उठेल की काय, त्यांना मला रोज रोज बघून बोअर होईल की काय.. पण सुदैवाने झालंय उलटंच.
त्या सतत नर्व्हस राहणाऱ्या आज्जींना थोडक्यात भेटून आणि दिलासा देऊन घरी आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, तर त्या अजूनही नर्व्हस स्थितीतच होत्या. एकतर त्यांच्यासाठी संस्थाही नवीन आणि वरून हे असलं आयसोलेशन, त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडलेली. त्यांच्या रूममध्ये माझ्या सांगण्यावरून तातडीने रेडिओ पाठवलेला होता टेक्निशियनने, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतही त्या नव्हत्या. वाचायला दिलेलं वर्तमानपत्रही तसंच पडलेलं होतं टेबलवर.
आता आज्जींचा नर्व्हसनेस वेगळ्या कारणावरून सुरू झालेला होता. त्यांच्या लेकीने त्यांना एक बेसिक मॉडेलचा फोन दिलेला होता, त्यात सगळे कॉन्टॅक्टस सेव्ह केलेले होते, पण त्यांना कळत नव्हतं की कॉल करायचा कसा? त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांना लक्षात राहत नव्हतं. 'कॉल रिसिव्ह करायला हिरवं की लाल बटन दाबू?' हा गहन प्रश्न त्यांना पडलेला होता. टीव्ही लावतांना लाल बटन, मग कॉल रिसिव्ह करतांनाही लालच बटन दाबायला हवं, असं त्यांचं लॉजिक होतं. मग मी त्यांना सगळ्या कृती लिहून ठेवायला लावल्या एका पानावर. त्यांनी तातडीने ते केलं. तरीही त्यांना काही ते लक्षात राहीना.
मग त्यांना सांगितलं, तुम्ही नका ताण घेऊ, तुमच्या मुलीला कॉल करायचा असला की बटन दाबून नर्सला बोलवा. तर त्या म्हणाल्या, नर्सला बोलावते, पण तो येतच नाही. मग मी नर्सला विचारलं, असं का म्हणून, तर तो म्हणाला, आज्जी सारख्याच बोलवतात, मला इतरही कामं असतात, मी कितीवेळा तेच तेच काम करत बसू? मला आलेल्या एम्प्लॉयीजच्या अनुभवांच्या पुढे हा अनुभव एकदम विरुद्ध पातळीचा होता. हा नर्स नवीन असून बऱ्यापैकी तुसडा असल्याचे लक्षात आले. मग त्याला मी शांतपणे हसून आणि प्रेमाने समजावले, की ह्या आज्जी एकदम स्ट्रेसमध्ये आहेत, नवीन आहेत संस्थेत आणि त्यांना कशी करोनाची भीती वाटतेय, लेकीच्या काळजीने झोप लागत नाहीये, वगैरे सांगितल्यावर तो जरा नरमलेला दिसला.
मग मी आज्जींकडे परत गेले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही दिवसातल्या काही वेळा ठरवून घ्या आणि मुलीला कॉल करा. सारखे सारखे करू नका. मग लोक तुम्हाला वैतागतील अशाने आणि मग महत्वाच्या कामासाठी बोलवाल किंवा काहीतरी इमर्जन्सी असेल, तेंव्हा लोक तुमच्याकडे येणार नाहीत. शिवाय तुम्हाला चांगली ट्रीटमेंट हवी असेल, तर तुम्हीही समोरच्याच्या कलाने घ्या. तुम्ही इथे त्यांच्यावर अवलंबून आहात. सगळेच काही एकदम चांगले आणि सेवाभावी लोक तुम्हाला भेटतीलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो, तर जनरली सर्वांनाच पण स्पेशली असे तुसडे लोक ड्युटीवर भेटले, तर शक्यतो त्यांना इरिटेट करू नका आणि त्यांना ख्याली खुशाली विचारा. त्यांनाही समजून घ्यायचा प्रयत्न करा. सकाळच्या ड्युटीवरच्या मंडळींना लवकर उठावे लागते आणि कामाचे चार पाच तास झाले की थकवा आलेला असतो त्यांना, शिवाय ह्या फ्लोअरवर ते एकटेच किल्ला लढवत असतात, त्यामुळे त्यांच्या संयमाचा तुम्हीही अंत पाहू नका. गोड बोलून मदत मागा. मग आज्जी गोड हसल्या. म्हणाल्या, तू किती चांगली आहेस, किती छान समजवतेस. मी आज्जींना म्हणाले, तुमची काळजी वाटते, त्यामुळे प्रेमाच्या अधिकाराने समजवते आहे. त्यावर विचार करा.
मग आज्जींना म्हणाले, जोवर माझी ड्युटी आहे, तोवर तुम्ही मला अमर्याद वेळा बोलवू शकता. मी लावून देत जाईन तुमच्या लेकीला फोन. त्यांच्या मुलीचा आणि नातवाचा फोटो फ्रेममध्ये समोर होताच. आज्जींनी सांगितलं, लेक सिंगल मदर असल्याने तिची काळजी वाटते. जॉब गेला तर तिला कोण सांभाळणार? परत आज्जींनी करोना वगैरे काळज्या बोलून दाखवायला सुरुवात केली. आज्जींना म्हणाले, आता चिंता थांबवा. आपण लेकीशी बोलूया तुमच्या.
लेकीला फोन लावला, तर तिने दुसऱ्या रिंगला उचलला. म्हणाली, थँक गॉड, आई तू फोन केलास. मी माझी ओळख करून दिली. तिला आज्जींची परिस्थिती सांगितली, तर ती म्हणाली, हो, मला कल्पना आहे. आई असंच करते. तिला सकाळपासून ४ वेळा फोन केला, ती उचलतच नाहीये, तिला समजतच नाही कॉल कसा रिसिव्ह करायचा ते! कितीवेळा मी समजवलं, तरी तिला लक्षात येतच नाही.
आज्जींना म्हणाले, घ्या, लेकीशी बोला, तर त्यांनी फोन हातात न घेता ती फोटो फ्रेम उचलून कानाला लावली. ते पाहून मी त्यांच्या लेकीला म्हणाले, तुमच्याकडे whatsapp आहे का? ती हो म्हणाली. मग विचारले, तुम्हांला आईला व्हिडीओ कॉल करायचा असेल, तर माझा फोन आहे उपलब्ध. तिला फार आनंद झाला हे ऐकून. मग ताबडतोब आम्ही एकमेकींचे नंबर्स सेव्ह करून घेऊन आज्जींना व्हिडीओ कॉल लावला, तर आता आज्जी माझा फोन कानाला लावायला लागल्या. मोठ्या मुश्किलीने त्यांना समोर बघायला लावले, तर म्हणाल्या, चष्म्याशिवाय दिसत नाही मला, चष्मा शोधून दे. ड्रॉवरमधून त्यांचा चष्मा काढून दिला आणि मग तो डोळ्यावर लावून आज्जींना एकदाचे लेकीला बघणे शक्य झाले. इतका आनंदाचा क्षण, पण आज्जींनी बाकी काही न बोलता तिच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचायला सुरुवात केली. मला इथे नाही रहायचं, मला घरी घेऊन जा. मला तुमची खूप काळजी वाटते, झोप लागत नाही, बेड सारखा हलतो(असे काही होत नव्हते. त्या बेडवर बसतांना आणि आडव्या पडतांना जी हालचाल करत, त्याने बेड साहजिकच हलत होता. मी चेक केले नीट.)
लेकीने आज्जींना खूप समजवायचा प्रयत्न केला. क्वारंटाईन पिरियड लवकरच संपेल आणि मी तुझ्या कुशीत असेन, असं सांगून सुद्धा आज्जी काही शांत होईना. मग लेकीलाच एकदम रडू फुटलं आणि ती खूप रडायला लागली. मी म्हणाले, काय हे आज्जी? बघा, तुम्ही लेकीलाही रडवलंत! तुम्हाला खरंच इकडे काही त्रास आहे का? जेवण, क्लिनिंग, नर्सिंग सगळं नीट होतंय ना? लेकीला जॉब असतो तुमच्या. ती तुमची सेवा कशी करेल घरी? दिवसभर तुमच्याकडे कोण बघेल? इकडे बेल वाजवली की लोक सेवेला हजर होतात तुमच्या. घरी असे कोण करेल?
मग आज्जींना पटलं मी बोललेलं. त्या लेकीला म्हणाल्या, तू रडू नकोस. मी मजेत आहे. मला काही त्रास नाही. तू ही त्रास करून घेऊ नकोस. मला लवकर भेटायला ये. लव्ह यू, मिस यू आणि दोघींनी एकमेकींना फ्लाइंग किस दिला. मला लेक म्हणाली, आईशी बोलायला मी चोवीस तास उपलब्ध आहे. मला कधीही कॉल करु शकतेस. मला तिने खूप वेळा धन्यवाद दिले. आज्जींनीही मला धन्यवाद दिले. त्या दिवशी लंचब्रेकमध्ये बॉसला हा किस्सा सांगितल्यावर, त्या म्हणाल्या, बरं झालं, तू त्या मजल्यावर आहेस. माझी काळजी मिटली.
मग वरचेवर आज्जी आणि लेकीचे फोन माझ्या मदतीने व्हायला लागले. आज्जींचा स्वभाव तक्रारीचा असल्याने त्या कॉलवर तक्रारींचा पाढाच वाचत राहिल्या कायम, पण आता लेक मात्र त्याला सरावलेली होती. ती आता भावनिक होत नव्हती. मी आज्जींना परोपरी समजवायचा प्रयत्न करतच राहिले की अशा वागण्याने तुम्हालाच त्रास होतो आहे, याने तब्येतीवर परिणाम होईल, पण आज्जी काही बदलत नव्हत्या.
त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपायला तीनच दिवस उरलेले होते, त्या दिवशी लेकीने खूप आनंदाने कळवले, मी येतेय आई तुला भेटायला. अपॉईंटमेंट फिक्स केली मी. इतके इतके वाजता भेटूया. मी ही सांगितले की तुमच्या भेटीच्या वेळी आज्जींना खाली गार्डनमध्ये आणण्याचे काम मी करेन ह्यावेळी. हे असे रियुनियन्स बघणे म्हणजे ट्रीट असते माझ्या मनासाठी, ती मी सोडणार नाही. लेकही आनंदाने 'हो' म्हणाली.
आमचे बोलणे सुरूच असतांना नर्स आली, आज्जींचे शुगर सॅम्पल घ्यायला. तिने आज्जींचा कान पंच करून रक्ताचे सॅम्पल घेतले. रक्तात साखर अतिरिक्त प्रमाणात निघाली. इतकी, की त्या योग्य आणि तातडीची ट्रीटमेंट मिळाली नाही, तर कोमात जाऊ शकतात, असे समजले. त्या क्षणी चेकिंगसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने आज्जींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे ठरले. त्यांना पोटातून इन्स्युलीन दिले, तर आज्जी म्हणाल्या, किती कमी डोस दिलात! मला इतका इतका डोस लागतो. म्हणजे लेव्हल पटकन डाऊन होते. असे एकदम पटकन लेव्हल डाऊन करणेही धोक्याचे असते आणि आम्ही प्लॅननुसार जात आहोत, असे सांगूनही आज्जींनी तेच पालुपद सुरूच ठेवले.
मला प्लिज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू नका, मग मला परत क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल, असे सारख्या म्हणत होत्या त्या. पण त्याला आता काही इलाज नाही, हे त्यांना समजवण्यात आले. नर्सने मला सांगितले, तू प्लिज त्यांचे तीन दिवसांचे कपडे आणि आवश्यक सामान भरशील का त्यांच्या बॅगेत? मी 'हो' म्हणाले. बॅग भरतांनाही आज्जींनी हे दे, ते नको करत मला बरेच दमवले. नक्की मी तीनच दिवस जाणार की जास्त? खरं सांग, असं मला विचारत होत्या. मी सांगितलं, आज्जी, आत्ता तरी तीन दिवसासाठी जाताय. बरं वाटलं तर याल लवकर नाहीतर वेळ लागू शकतो. पण तुम्ही चिंता सोडा. तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना?
बॅग भरून झाली आणि स्ट्रेचर घेऊन ऍम्ब्युलन्स सोबत आलेले कर्मचारी समोर होते. एक डॉक्टर करोनापासून पूर्ण प्रोटेक्ट करणारा प्लॅस्टिक ड्रेस घालून आज्जींना चेक करत होता. मग आज्जींना निघण्यापूर्वी एकदा पुन्हा लेकीशी ब्रीफ व्हिडीओकॉल मी स्वतःहून घडवून आणला.
तीन दिवसांनी आज्जी परत येणार, असे मला वाटत होते, पण तीन दिवसांनी सर्व्हरवर कॉमन ईमेल आली, त्यांना हॉस्पिटलमधून रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये १५ दिवसांसाठी शिफ्ट केले जाणार असल्याने आज्जींचे सगळे सामना भरून ठेवा. त्यांची रूम रिकामी करा. ते सामान खाली रिसेप्शन काऊंटरला पाठवा. आज्जींची मुलगी येऊन घेऊन जाईल.
आता आज्जींची रूम रिकामी झालेली आहे. माहिती नाही, त्या परत इकडे येतील की नाही. बघूया!
~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर.
२२.०५.२०२०
Comments
Post a Comment