आज्जी-आजोबांची डायरी: भाग १०
थँक्यू डियर ऑल.. आता मी खूपच सावरले आहे. आजचा दिवसच तसा होता. अतिशय वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला..
माझा आणि आपल्या सर्वांचाच मूड लाईट आणि हॅपी व्हावा असा माझा आजचा दिवस फार सुंदर गेला.
आज इतके अनुभव आलेले आहेत की किती लिहू आणि किती नको, असे मला झालेले आहे, पण रात्र थोडी आणि सोंगं फार, अशी माझी अवस्था झालेली आहे. आजचा लेख फार मोठा झाल्याने आणि ट्रॅमच्या प्रवासात संपू शकला नसल्याने घरी आल्यावर थोड्या थोड्या कामानंतर कन्टीन्यू केला आणि तरीही सगळ्या दिवसाचा वृत्तांत इच्छा असूनही पूर्ण करू शकलेले नाहीये.
आज ऑफिसला गेल्या गेल्या कलीगने सांगितले की तुझ्या लाडक्या आज्जींचे 2 फ्रेंड्स ह्या बिल्डिंगमध्ये होते, ज्यांना त्यांच्या जाण्याचा खूप त्रास झालेला आहे. तू त्यांच्याशी बोलू शकतेस जाऊन. त्यांनी त्या दोघांची नावं सांगितली आणि ती नोट करून घेऊन मी त्यांना भेटायला निघाले. त्यातले एक होते त्यांचे शेजारी आजोबा, म्हणजे त्यांच्या समोरच्या रूममध्ये राहणारे आणि दुसऱ्या होत्या, एक आज्जी ज्या त्यांच्या मिस्टरांबरोबर इथे आहेत.
आजोबांच्या खोलीकडे जात असतांना समोर बघितलं, तर आपल्या लाडक्या आज्जींचा गोड हसरा फोटो एका स्टूलवर ठेवलेला होता. खाली छान कव्हर अंथरलेलं होतं. फोटोजवळ प्रसन्न फुलं एका फ्लॉवरपॉट मध्ये ठेवलेली होती आणि समोर एक वही होती, ज्यात आज्जींचा फोटो एका बाजूला चिटकवलेला, त्याखाली एक सुंदर काव्यमय सकारात्मक संदेश आणि दुसऱ्या बाजूला आज्जींची जन्मतारीख आणि जाण्याची तारीख लिहिलेली होती आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून बऱ्याचशा लोकांनी आपापली नावं लिहिलेली होती. त्यात मी ही माझे नाव लिहून आले. त्या वहीतली अलीकडची पानं चाळली, तर त्यात आज्जींच्या वाढदिवसाच्या दिवशीही असाच त्यांचा एक फोटो डावीकडे आणि खाली छान मेसेज, उजवीकडे शुभेच्छुकांची नावं लिहिलेली होती. त्या अलिकडेही अशीच बरीच पानं होती. मला एकदम भरूनच आलं. मी काही मग ते वाचायला गेले नाही. तडक समोरच्या रूममधल्या आजोबांकडे गेले.
आजोबा खुर्चीवर बसलेले, खिडकीकडे चेहरा आणि टेबलवर काहीतरी लिहीत बसलेले होते. त्यांना विचारलं, येऊ का गप्पा मारायला? आमची ओळख तर आधीच झालेली होती. हे आजोबा म्हणजेच मागे मी एका भागात उल्लेख केलेले- त्यांचे घर संस्थेपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असूनही बिल्डिंगला लिफ्ट नसल्याने आणि ते पहिल्या मजल्यावर राहत असल्याने रोज व्हीलचेअर कशी खालून वर नेणार आणि रोजची मेडिकल हेल्प लागत असल्याने त्यांच्याहून ५ वर्षांनी लहान बायको कशी मॅनेज करणार, म्हणून इकडे गेल्या २ वर्षांपासून राहत आहेत. त्यांची बायको रोज दिवसभर त्यांच्या सोबत राहून आणि झोपायला मात्र घरी जात असे. करोनामुळे दोघांची महिनाभरापासून भेट नाही. रोज फोनवर बोलतात. व्हिडीओ कॉल चे सुचवले होते मागच्याच भेटीत, पण दोघांनाही त्यातलं कळत नाही, म्हणून करू शकत नाही म्हणाले होते.
आजोबांशी आज बोलायला सुरुवात केली. आज्जी नं 1 ची आठवण काढली. आजोबा म्हणाले, "समोरच्याच रूममध्ये असल्याने येता जाता भेट व्हायची, गप्पा व्हायच्या. माझ्या शेजारच्या दोन्ही बाजूच्या रूममधले शेजारी गेलेच होते, आता समोरच्याही गेल्या.. सिनियर केअर होममध्ये आल्यावर आता हे अपेक्षितच आहे."
मी आजोबांना माझ्या आणि आज्जींच्या जुळलेल्या ऋणानुबंधाविषयी सांगितल्यावर आणि मला आज्जी माझ्या आज्जीसारख्या होत्या सांगितल्यावर ते म्हणाले, "आई वडिलांचे मुलांशी नाते वेगळे, ज्यात जबाबदारी असते, पण आज्जी आजोबा आणि नातवांचे नाते वेगळेच असते ना? माझेही आज्जी आजोबा आता या जगात नाहीत पण मला त्यांची फार आठवण येते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण मुलाने लग्न केले नाही आणि मुलीला मूल झाले नाही, त्यामुळे मी आजोबा होऊ शकलो नाही." मला अगदी भारतीय आज्जी/आजोबांशी बोलतेय, असा भास झाला, हे ऐकतांना..
बोलता बोलता त्यांच्या हातांकडे मी बघत होते. त्यांच्या नसा पारदर्शक हातांतून दिसत होत्या. मी सहज त्यांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि मी माझ्या आज्जीच्या सुरकुत्या असलेल्या स्किनशी खेळायचे, त्याची आठवण सांगितली, तर त्यांनीही आपल्या आज्जीच्या आठवणी सांगितल्या. ते विचारत, "तुला अशा सुरकुत्या कशा गं?" त्यावर त्यांची आज्जी म्हणायची, "वय झालं की सर्वांना येतात, तुलाही येतील" मग म्हणाले, "आता मला सुरकुत्या आहेत, पण त्या दाखवायला आज्जीच नाही माझी.."
माणसाचं वय कितीही झालं, तरी तो आपल्या लहानपणीच्या आठवणीतच रमतो नाही का? आणि आज्जी आजोबांसोबतचं आपलं नातं कायमच स्पेशल असतं, हो ना?
आजोबांनी मग त्यांच्या आज्जीच्या कितीतरी आठवणी सांगितल्या.. त्यांची आज्जी जमीन खोदून त्यात रोप लावत असे, आणि हे आजोबा ते उखडून टाकत असत, मग आज्जी सांगे, नको असं करुस, याच्यापासून पुढे झाड निर्माण होईल, मग ते तिचं ऐकत. अशा बऱ्याच आठवणींमध्ये ते रमले..
त्यांना निरोप दिल्यावर ते म्हणाले, तुम्ही येत जा माझ्याकडेही आता, जसे आज्जींकडे जायचात.. त्या क्षणी आजोबांचा चेहरा निरखून बघितला तर ते मला माझ्या आजोबांसारखेच भासले, चेहरा अगदी तसाच! (वडिलांचे वडील) आणि तेही माझ्या आजोबांप्रमाणेच sudoku कोडे सोडवत बसलेले होते! ह्यांना आता आपण आजोबा नं 2 म्हणूया!
मग दुसऱ्या आज्जींकडे गेले, ज्या आज्जी नं 1 ची मैत्रीण होत्या. त्या तिसऱ्या मजल्यावरच्या आज्जी. त्या आपल्या मिस्टरांबरोबर रूममध्ये होत्या. आमची भेट आधी एकदा झाली होतीच. त्यांनी दोघांनी शेजारी शेजारी दोन रूम्स घेतलेल्या असून एकीचे हॉल आणि दुसरीचे बेडरूममध्ये रूपांतर केलेले आहे. ह्या आजोबांना डीमेन्शिया असून ते शांतपणे नुसतेच बसून असतात. बोलत काहीच नाहीत. आज्जी आजोबा गेल्या ७० वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत, हे आज्जींनी सांगितलं. त्यांची एकुलती एक मुलगी काही वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली. आज्जींनी सांगितले, आज्जी नं 1 माझी जुनी मैत्रीण. आम्ही सोबत कॉलेजला जायचो, इतकी जुनी मैत्रीण..आज्जींच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या मैत्रिणीच्या आठवणीने. मग वेगवेगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आणि मी त्यांचा निरोप घेतला. ह्यांना आपण आज्जी नंबर 3 म्हणूया. आज्जी नं. 3 आणि आजोबा नं. 2 सोबत मी आज आज्जी नं 1 मुळे नकळत जोडली गेले..
आज मी अजून काही आज्जी आजोबांना भेटले आणि त्यात मागे उल्लेख केलेल्या लायब्रेरियन आज्जीही होत्या. त्यांच्या प्रेमकहाणीत आज मी कबुतराची भूमिका बजावली, त्याची अतिशय लांबलचक आणि सुरस कथा पुढच्या भागात सांगते.
~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
१५.०४.२०२०
Comments
Post a Comment