आज्जी-आजोबांची डायरी: भाग ६


सिनियर केअर होममध्ये इतक्या सगळ्या सुखसोयी आहेत, हे बघितल्यावर मनात प्रश्न येणं सहाजिकच आहे की अशा ठिकाणी राहणं सर्वांना परवडत असेल का? तर वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी गरीब, श्रीमंत असे सर्व लोक आहेत. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार पैशाची व्यवस्था करता आलेली आहे. ह्या विषयी माहिती देणारा सर्व आज्जी-आजोबांचा डेटा सर्व्हरवर सेव्ह केलेला आहे. मला पहिल्या दिवसापासूनच हा प्रश्न मनात असल्याने तो भाग मी सगळ्यात आधी वाचला.

शिवाय मी भेटलेल्या पहिल्या आज्जींना ओळख आणि गप्पा झाल्यावर आणि त्या माझ्यासोबत बोलण्यात कम्फर्टेबल आहेत हे समजल्यावर मी प्रश्न विचारला की तुमचा इथे राहण्याचा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? त्यावर त्यांनी सांगितलं की माझी मुलं आणि नातवंडं यांनी माझा खर्च विभागून घेतलेला आहे.

मग मी ऍडमिनिस्ट्रेशनच्या लोकांनाही हा प्रश्न विचारला, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या खर्चाचा काही भाग त्यांच्या हेल्थ इन्शुरन्समधून कव्हर होतो. काही जणांनी स्वतः व्यवस्थित सेव्हिंग केलेले आहे, ते सेल्फ-फायनान्स करतात. काहींची मुलं-नातवंडं त्यांचा खर्च करतात, काहीजण आपलं स्वतःचं राहतं घर विकून त्या पैशात इकडे आयुष्यातले शेवटचे दिवस जगण्यासाठी येतात. ज्यांच्याजवळ अशी सोय नाही त्यांना सरकारकडून फंडिंग मिळते.

अशाप्रकारे सगळी व्यवस्था जरी महाग असली तरी ज्यांना आवश्यकता आहे ते सगळे इथे राहणे निरनिराळ्या प्रकारे अफोर्ड करू शकतात. एकंदरीतच डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तयार असण्याच्या स्वभावामुळे त्यांना फार फायदे होतात आयुष्यात, हे तीव्रतेने जाणवते. त्यातच पैशाची मॅनेजमेंटही आलीच.

आता पैशाचा विषय निघालाच आहे तर थोडी वेगळी गंमत सांगते.
काही दिवसांपूर्वी एका आज्जींच्या लेकीने संस्थेला काही पैसे बक्षीस म्हणून दिले तर त्यात आमच्या बॉसने अजून तितकीच रक्कम टाकून सर्व कर्मचाऱ्यांसाठी लस्सीसारखे वेगवेगळ्या फ्रुट फ्लेवरचे एक छान योगर्ट ड्रिंक आणले.

आत्ता करोनामुळे कंटाळलेल्या आज्जी आजोबांसाठी त्यांच्यापैकी एकाच्या मुलाने अनेक बॅग्ज भरून स्नॅक्स आयटम्स पाठवले. मग ह्याची सगळ्यात जास्त गरज ज्यांना आहे, त्यांना ते देण्याचे ठरले.

मी जॉईन झाले, त्या पहिल्या दिवशी माझ्याकडून अनेक फॉर्म्सवर सही घेतली गेली होती, त्यातल्या एका फॉर्मवरचा मजकूर होता की अडीच युरोपेक्षा जास्त किंमतीचं बक्षीस रहिवाश्यांकडून मी घेणार नाही आणि त्यांनाही देणार नाही.

हे असं का? हे ऍडमिनिस्ट्रेशनच्या हेडला विचारलं, तर तिने सांगितलं, काहीवेळेस काही लोक या आज्जी-आजोबांशी जास्त कनेक्ट होऊ शकतात किंवा तसे भासवू शकतात, परिणामी हे रहिवासी त्यांची प्रॉपर्टी कर्मचाऱ्यांच्या नावावर करू शकतात. ह्या प्रकारची पैशाची देवाणघेवाण वेगवेगळ्या प्रकारे धोकादायक ठरू शकते. एकमेकांचा गैरफायदा घेणे, भ्रष्टाचार अशी गुंतागुंत त्यातून निर्माण होऊ शकते, म्हणून असा नियम बनवला आहे.

मला अतिशय कौतुक वाटलं ह्या जर्मन लोकांच्या दूरदृष्टीचं.. भ्रष्टाचार होण्याची शक्यता ओळखून त्यांनी आधीच अशाप्रकारची तजवीज करून ठेवलेली आहे, हे किती ग्रेट, हुशार आणि निर्मळ मनोवृत्तीचं लक्षण आहे!

अजून एक पण वेगळ्या पैलूचं उदाहरण देते. आठवड्यातून तीनदा- म्हणजेच विक डेज ना दर दिवसाआड बॉस मिटिंग बोलवतात, ज्यात सर्व डिपार्टमेंटचे प्रतिनिधी हजर असणे आवश्यक असते. त्यात काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यावर काय उपाययोजना, ह्यांची चर्चा होते. मग मिटिंगनंतर तिचे मिनिट्स ऍडमिनिस्ट्रेशनचे लोक सर्वांना इमेलने पाठवतात.

तर मागच्या आठवड्यात एक कर्मचारी मुलगी स्टूलवर उभी राहून कपाटातली एक वस्तू काढतांना पडली. त्या फ्लोअरवर मीच होते. कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज ऐकून मी बघायला गेले, तर ही मुलगी विचित्र अवस्थेत पडलेली दिसली. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकेक वायरलेस लँडलाईन फोन दिलेला असला, तरी ती ट्रॉमामध्ये असल्याने कॉल वगैरे करण्याच्या अवस्थेत नव्हती. पटकन कॉल करून मी संबंधित व्यक्तींना बोलावून घेतले, त्यांनी योग्य ते उपाय करून तिला घरी पाठवले.

दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये हा विषय ऐरणीवर होता. प्रत्येक फ्लोअरवर शिडी असूनही तिचा वापर न करता स्टूल का वापरला गेला? लगेच नियम बनवला गेला की यापुढे कधीही स्टुलचा वापर करून वर चढण्याचे काम केले जाणार नाही. शिडीच वापरली जाईल. अशाप्रकारे एखादीही चूक घडताच तिची पुनरावृत्ती टाळून सातत्याने इव्हॉल्व्ह होत राहण्याच्या स्वभावामुळे सतत सोयीच्या आणि प्रगतीच्या दिशेने हे लोक वाटचाल करत असावेत, असे वाटते.

करोनामुळे नातेवाईकांना भेटू न शकणाऱ्या रहिवाश्यांना मी व्हिडीओ कॉलचे सुचवलेले होते, हे कालच्या भागात सांगितले आहे. तर दर मिटिंगला बॉस प्रत्येकाला काही सांगायचे आहे का, हे विचारतात, तेंव्हा ही गोष्ट त्यांना सांगितल्यावर ताबडतोब त्या "किती चांगली कल्पना आहे! सुचवल्याबद्दल खूप खूप आभारी", असे म्हणून "तडक सर्व आज्जी आजोबांना हा प्रश्न विचार आणि कोणाला ही सोय हवी असल्यास आपण त्यांच्या नातेवाईकांना कळवू आणि व्यवस्था करू. कोणाकडे स्मार्टफोन नसल्यास मी माझा उपलब्ध करून देईन", असे म्हणाल्या.

काही रहिवाश्यांनी आपल्यासोबत आपला टीव्ही आणलेला आहे, पण न आणलेलेही बरेचजण आहेत. तशा प्रत्येक खोलीत चांगली मोठी स्क्रीन असलेला टीव्ही लावून देणे, त्यांचे मनोरंजन होत राहील, हे बघणे, हे विशेष काळजी घेऊन केले जाते. हे सगळे पाहता पैशापेक्षाही मनाने मोठा, दिलदार आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेला, अशाप्रकारच्या श्रीमंत लोकांचा हा देश आहे आणि म्हणूनच तो इतका विकसित आहे, हे पदोपदी जाणवते. अपवाद आहेत, नाही असे नाही, पण तुलनेने कमीच.. सुखी आयुष्याची गुरुकिल्ली यांना सापडलेली आहे, असे यांच्याकडे बघून मला कायम वाटते.

आज्जी आजोबासुद्धा आपले मन छान रमवत असतांना दिसतात. एकतर शंभर टक्के जनता साक्षर असल्याने वृत्तपत्र वाचन करतांना बहुतेकजण दिसतात. एका आजोबांच्या खोलीत मॉनिटर सदृश काहीतरी दिसले. हे काय आहे, असे विचारताच त्यांनी ते ऑन केले आणि खाली वर्तमानपत्र ठेवले. तर ते वर्तमानपत्र स्क्रीनवर दिसायला लागले. बाजूला स्क्रोल करण्याचे एक बटन होते, ज्याने झूम लेव्हल कमी जास्त करता येऊ शकत होती.

म्हणजे डोळ्यांना त्रास न होऊ देता मोठया स्क्रीनवर वर्तमानपत्राची हार्डकॉपी वाचता येण्याची व्यवस्था केलेली होती थोडक्यात.. नव्वदीच्या पुढची पिढी, जी इंटरनेट टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही किंवा त्या बाबतीत उदासीन असते, त्यांच्यासाठी शोधून काढलेला हा एक छान मार्ग!
तुम्हाला हे कुठे मिळाले, विचारले असता हेल्थ इन्शुरन्स कंपनीने फुकट दिले, असे सांगितले.

इकडे हेल्थ इन्शुरन्स घेणे अनिवार्य असते सर्वांना आणि तो चांगला हेवी असतो, दर महिन्याच्या पगारातून यासाठी मोठा भाग वजा होतो. शिवाय सरकारलाही भरभक्कम टॅक्स वजा होतो पगारातून. तर आपल्या पगारातून गेलेल्या कष्टाच्या कमाईचे वाईट वाटत नाही, कारण ते योग्य ठिकाणी जाणार, असा विश्वास असतो.

याच पैशांतून अपंगांसाठी व्हीलचेअर वगैरेंचीही सोय केली जाते. त्यामुळे आर्थिकदृष्टीने गरीब असूनही श्रीमंताचे जगणे बहुतेक लोकांना शक्य होते. मला शंभर टक्के डिटेल्स माहिती नाहीत. रस्त्यावर क्वचित काही भिकारी आणि रस्त्याच्या कडेला झोपणारे काही लोक दिसतात. ते कसे काय? शिवाय सर्वांनाच अत्याधुनिक सेवा मिळते की नाही? वगैरे प्रश्नांची उत्तरं नाहीत आणि कल्पनाही नाही. माझ्या डोळ्यांना दिसलेली आणि मला जाणवलेली निरीक्षणे मी नोंदवली आहेत. ती अचूक असतीलच, असे नाही.

बाकी पैलूंविषयी उद्याच्या भागात बोलूयात.
~ सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
११.०४.२०२०

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५