खंड १ ला: १०.धर्मजागृती

खंड १ ला:

१०. धर्मजागृती
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. २९-३३
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************

सहाव्या-सातव्या वर्षापासून तो सोळा वर्षाचा होईपर्यंत मी अभ्यास केला; परंतु शाळेत कोठेही धर्माचे शिक्षण मिळाले नाही. शिक्षकांपासून सहजी मिळायचे तेही मिळाले नाही. असे म्हणता येईल. तरी पण वातावरणातून काही ना काही मिळतच गेले. येथे धर्माचा व्यापक अर्थ घेतला पाहिजे. धर्म म्हणजे आत्मभान -- आत्मज्ञान.

माझा जन्म वैष्णव संप्रदायात झालेला. अर्थात हवेलीत वेळोवेळी जाणे होई. परंतु हवेलीबद्दल माझ्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली नाही. हवेलीचे वैभव मला आवडले नाही. हवेलीमध्ये चालणाऱ्या अनीतीच्या गोष्टी ऐकत असे व त्यामुळे तिच्याबद्दल मन उदास होऊन गेले. तेथून मला काहीच लाभ झाला नाही.

परंतु जे हवेली पासून काही मिळू शकले, ते माझ्या दाईपासून मिळाले. ती कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचे मला आजही स्मरण होते. मी पुर्वी सांगितलेच आहे, की मला भूतप्रेतादींचे भय वाटे. रामनाम हे त्यावर औषध आहे, हे रंभेने मला समजावून सांगितले. माझी तरी राम नामापेक्षा रंभेवरच विशेष श्रद्धा होती. म्हणून मी बालवयामध्ये भूतप्रेतादिकांच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी रामनामाचा जप सुरू केला. तो फार दिवस चालला नाही; परंतु बालपणामध्ये पेरलेले बी जळून गेले नाही. आज रामनाम ही माझ्या बाबतीत अमोघ शक्ती आहे. त्याचे कारण रंभाबाईने पेरलेले बीज असे मला वाटते.

याच सुमारास माझ्या एका चुलत्यांचा मुलगा -- की जो रामायणाचा भक्त होता, त्याने आम्हा दोघा भावांना रामरक्षेची संथा देण्याची व्यवस्था केली. आम्ही ती पाठ करून नित्य प्रात:काळी स्नानानंतर म्हणण्याचा नियम केला. पोरबंदरमध्ये राहत होतो, तोपर्यंत हे ठीक चालले. पुढे राजकोटच्या वातावरणात ते पुसटून गेले. या क्रियेबद्दलही विशेष श्रद्धा नव्हती. त्या वडील बंधूंबद्दल आदर होता, आणि काही अंशी रामरक्षा शुद्ध उच्चारानिशी पाठ म्हणता येते त्यासाठी अभिमानही वाटे, म्हणून तिचा पाठ होई.

पण माझ्या मनावर सर्वात जास्त कसला परिणाम झाला असेल, तर तो रामायणाचा. वडिलांच्या आजाराचा काही काळ पोरबंदरला गेला. येथे ते रामजीच्या देवालयात रोज रात्री रामायण ऐकत असत. रामायण सांगणारे रामचंद्रजींचे एक परमभक्त बिलेश्वरचे लाधा महाराज म्हणून होते. त्यांच्याविषयी असे सांगत की त्यांना कोड उठले होते. त्यावर औषध करण्याऐवजी बिलेश्वर महादेवाच्या निर्माल्याची बिल्वपत्रे कोड उमटलेल्या भागावर त्यांनी बांधली आणि रामनामाचा जप सुरू केला, त्यामुळे त्यांचे कोड समूळ नाहीसे झाले. ही गोष्ट खरी असो वा नसो आम्हा ऐकणाऱ्यांना ती खरी वाटली. एवढेही खरे की लाधा महाराजांनी कथा करण्यास आरंभ केला तेव्हा त्यांचे शरीर पूर्ण निरोगी होते. लाधा महाराजांचा कंठ मधुर होता. ते दोहे, चौपाई गात व त्यांचा अर्थ सांगत. ते स्वतः त्याच्या रसामध्ये लीन होऊन जात, आणि श्रोतृजनांना लीन करून सोडीत. माझे वय त्यावेळी तेरा वर्षांचे असेल, पण मला त्यांच्या वाचनामध्ये खूप गोडी वाटे, असे स्मरण आहे. रामायणाबद्दल मला वाटणारा आत्यंतिक प्रेमाचा पाया हे रामायणश्रवण होय. तुळशीदासाचे रामायण हा मी आज भक्तीमार्गावरील सर्वोत्तम ग्रंथ मानतो.

काही महिन्यांनी आम्ही राजकोटला आलो. तेथे अशा प्रकारचे वाचन नव्हते. एकादशीच्या दिवशी भागवत मात्र वाचले जात असे खरे. त्याला मी कधी कधी बसत असे. परंतु भटजी रस उत्पन्न करू शकत ना. आज मी समजू शकतो की भागवत हा एक असा ग्रंथ आहे की ज्याच्या वाचनाने भक्तीरस उत्पन्न करता येईल. मी तर तो गुजराथीतून आवडीने वाचला आहे. परंतु माझ्या एकवीस दिवसांच्या उपवासामध्ये भारतभूषण पंडित मदनमोहन मालवीयजींच्या पवित्र मुखातून मूळ संस्कृताचे काही भाग ऐकले तेव्हा असे वाटले, की बालपणी ही त्यांच्यासारख्या भगवद् भक्तांच्या तोंडून ऐकायला मिळते, तर त्यावर माझे प्रेम बालवयामध्येही जडले असते. त्या वयात मनावर झालेल्या शुभाशुभ संस्कारांची मुळे खोलवर जातात, याबद्दल मला खूप अनुभव आलेला आहे. आणि म्हणून कित्येक उत्कृष्ट ग्रंथ त्या वयामध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली नाही, याबद्दल वाईट वाटते.

राजकोट मध्ये मला अनायासेच सर्व संप्रदायाविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदुधर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो. कारण की आई बाप हवेलीला जात, शिवालयात जात, आणि राममंदिरात जात. आणि आम्ही भावांना घेऊन जात, किंवा पाठवीत असत.

शिवाय, वडिलांपाशी जैनधर्माचार्यामधून कोणी ना कोणी नेहमी येत. वडील त्यांना भिक्षाही घालीत. ते वडिलांबरोबर धर्मासंबंधी व व्यवहारासंबंधी गोष्टी करीत. याशिवाय वडिलांचे मुसलमान आणि पारशी मित्रही होते. ते आपापल्या धर्माबद्दल गोष्टी बोलत, आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा रस पूर्वक ऐकत असत. अशा प्रकारच्या वार्तालापांच्या वेळी मी 'नर्स' असल्यामुळे बरेचदा हजर असे. या सर्व वातावरणाचा माझ्यावर असा परिणाम झाला की सर्व धर्मांबद्दल माझ्या मनामध्ये समानभाव उत्पन्न झाला.

ख्रिस्ती-धर्म मात्र अपवाद होता. त्याच्याबद्दल काहीसा अनादर उत्पन्न झाला. त्यावेळी हायस्कूलच्या कोपऱ्यावर कोणी ख्रिस्ती व्याख्यान देत असत. ते हिंदू देवतांची व हिंदूधर्मियांची नालस्ती करीत. ते मला असह्य होई. मी एखाद्या वेळीच ते व्याख्यान ऐकण्यास उभा राहिलो असेन; परंतु पुन: तेथे उभे राहण्याची इच्छाच झाली नाही. याच सुमाराला एक सुप्रसिद्ध हिंदू ख्रिस्ती झाल्याचे ऐकले. गावात बोलत की त्याचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश करविताना त्याला गोमांस खाऊ घालण्यात आले, आणि दारू प्यायला दिली. त्याचा पोशाखही बदलण्यात आला, आणि तो गृहस्थ ख्रिस्ती झाल्यानंतर कोट, पाटलोण आणि इंग्रजी टोपी वापरू लागला. या गोष्टींचा मला तिटकारा वाटला. ज्या धर्मापायी गोमांस खावे लागते आणि दारू प्यावे लागते आणि स्वतःचा पोषाख बदलावा लागतो, त्याला धर्म म्हणावे तरी कसे, असा युक्तिवाद मी मनाशी केला. शिवाय, जो गृहस्थ ख्रिस्ती झाला, त्याने आपल्या पूर्वजांच्या धर्माची रीतीरिवाजांची आणि देशांची टवाळी सुरू केल्याचे कानी आले. या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल अनादर उत्पन्न झाला.

जरी अशा तऱ्हेने इतर धर्माबद्दल माझ्या मनात समभाव उत्पन्न झाला, तरीही माझ्या मनात ईश्वराविषयी आस्था होती असे म्हणता येणार नाही. यावेळी वडिलांच्या पुस्तक-संग्रहातून मनुस्मृतीचे भाषांतर माझ्या हाती आले. त्यात जगाच्या उत्पत्तीसंबंधी वर्णन वाचले. त्यावर श्रद्धा बसली नाही. उलट, काहीशी नास्तिकता उत्पन्न झाली. माझ्या दुसऱ्या चुलत्याचे चिरंजीव --जे अजून हयात आहेत, त्यांच्या बुद्धीविषयी मला विश्वास होता. त्यांच्यापाशी मी माझ्या शंका प्रदर्शित केल्या. परंतु ते माझे समाधान करू शकले नाहीत. त्यांनी मला जबाब दिला: "मोठा झालास की हे प्रश्न स्वतःच सोडवायला शिकशील. असले प्रश्न मुलांनी उभे करणे ठीक नाही." मी गप्प बसलो पण मनाचे समाधान झाले नाही. मनुस्मृतीच्या खाद्याखाद्य प्रकरणात व इतर प्रकरणातही मला चालू रीतीरिवाजांचा विरोध दिसला. या शंकेचा जबाबही मला जवळ जवळ वरच्या प्रमाणेच मिळाला. 'कधी काळी बुद्धी विस्तार पावेल, वाचन वाढेल मग समजेल," असे म्हणून मनाला परतवले.

मनुस्मृती वाचून त्यावेळी आयुष्याचे शिक्षण तर मिळाले नाहीच. मांसाहाराचा विषय येऊन गेलाच आहे. त्याला तर मनुस्मृतीचा आधारच मिळाला. सर्प, ढेकूण इत्यादींना मारणे, ही नीतीच आहे असेही वाटले. त्यावेळी धर्म समजून ढेकणांना वगैरे मारल्याचे मला स्मरते.

पण एक गोष्ट मनात रुजून राहिली- या जगताचा आधार नीती आहे, सत्यामध्ये सर्व नीतीचा समावेश होतो. मग तर सत्याचा शोध केलाच पाहिजे. दिवसेंदिवस सत्याचा महिमा माझ्या दृष्टीने वाढत गेला. व त्याची व्याख्या अधिकाधिक विस्तृत होत गेली, व अजूनही विस्तृत होत जात आहे.

शिवाय, एक नीतिविषयक सहा चरणी श्लोक हृदयात ठसून राहिला. अपकाराचा मोबदला अपकार नसून उपकारच होय, ही गोष्ट जीवनसूत्र होऊन बसली. तिने माझ्यावर साम्राज्य गाजविण्यास सुरुवात केली. अपकार करणार्‍याचे कल्याण इच्छिणे व करणे ही माझी आवडती गोष्ट होऊन बसली. मी असंख्य प्रयोग केले. एवढा चमत्कार घडवून आणणारा तो श्लोक असा:
पाणी आपने पाय, भलुं भोजन तो दीजे;
आवी नमावे शीश, दंडवत कोडे कीजे.
आपण घासे दाम, काम मोहोरोनुं करिए;
आप उगारे प्राण, ते तणा दुःखमा मरिए.
गुण केडे तो गुण दश गणो, मन, वाचा, कर्मे करी;
अवगुण केडे जे गुण करे, ते जगमां जीत्यो सही.

"जो पाणी देईल, त्याला चांगले जेवण घालावे. जो आपल्यापाशी येऊन डोके नमवील, त्याला साष्टांग दंडवत घालावा. एका पैशाची झीज सोशील, त्याचे मोहरांनी ऋण फेडावे; प्राण वाचवील त्याच्या दुःखनिवारणाच्या कामी प्राण वेचावे; एका उपकाराबद्दल दहा उपकार करावे; परंतु या जगात सर्वश्रेष्ठ तोच, की जो कायावाचामनेकरून अपकाराच्या बाबतीतही उपकार करतो."

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५