खंड १ ला: १६. फेरफार
खंड १ ला:
१६. फेरफार
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ५०-५३
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
-आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रित वाचण्यासाठी लिंक: https://sakhi-sajani.blogspot.com
************************************
नृत्य इत्यादींच्या माझ्या प्रयोगावरून तो काळ स्वच्छंदाचा होता, असे कोणी समजू नये. त्यात समजुतीचाही काही भाग होता हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. या मोहाच्या काळीही मी अमुक अंशाने, सावधान होतो. पैन् पैचा हिशेब ठेवीत असे. खर्चाचेही मोजमाप होते. दर महिन्याला पंधरा पौंडाहून जास्त खर्च करायचा नाही असा निश्चय केला होता. बस (मोटार)मधून जाण्याचा किंवा टपालाचाही खर्च टिपून ठेवीत असे आणि झोपण्यापूर्वी नेहमी मेळ घेत असे. ही सवय शेवटपर्यंत कायम राहिली. आणि मला माहित आहे, की त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात माझ्या हस्ते लाखो रुपयांच्या उलाढाली झाल्या, त्यात मी योग्य काटकसर करू शकलो, आणि जेवढ्या चळवळी माझ्या देखरेखीखाली चालल्या त्यात मी कधीही कर्ज केलेले नाही. उलट, प्रत्येकीत काही ना काही जमेच्या बाजूत राहिलेलेच आहे. प्रत्येक तरुण मनुष्याने स्वतःला मिळणाऱ्या थोड्याशा रुपायांचाच हिशेब काळजीपूर्वक ठेवला, तर त्याचा फायदा जसा पुढे मला व समाजाला मिळाला, तसा तो त्यालाही मिळेल.
माझ्या राहणीवर माझी कडक नजर होती. त्यामुळे किती खर्च करणे योग्य हे माझ्या लक्षात आले. आता मी खर्च अर्धा करून टाकण्याचा विचार केला. हिशेब तपासताना मला दिसले, की माझ्या गाडीभाड्याचा खर्च पुष्कळच-वाजवीपेक्षा बराच जास्त-होत होता. शिवाय कुटुंबात राहिल्यामुळे काही ठराविक रक्कम आठवड्याला खर्च केल्याखेरीज गत्यंतरच नव्हते. कुटुंबातल्या माणसांना एखाद्या दिवशी बाहेर जेवायला नेण्याचा शिष्टाचार पाळणे जरूर होते; शिवाय एखाद्या वेळेस त्यांच्याबरोबर कोठेतरी मेजवानीला जावे लागल्यास तेथे गाडीभाड्याचा खर्च व्हावयाचाच. बरोबर मुलगीबिलगी असली तर तिचा खर्च तिच्यावर टाकणे योग्य नव्हे. शिवाय, बाहेर गेले की घरी जेवायला जाता येत नसे. तेथे पैसे दिलेले असायचेच आणि पुनः बाहेर खाण्याचे पैसे दुसरे दिलेच पाहिजेत. अशा रीतीने होणारा फाजील खर्च वाचविता येईल असे दिसून आले. भिडेखातरच खर्च होत होता तोही वाचेल, ही गोष्ट लक्षात आली.
आतापर्यंत इतर कुटुंबात राहत होतो. त्याऐवजी स्वतःची खोली घेऊन राहावे, असा विचार केला. कामाच्या सोयीप्रमाणे तसेच अनुभव मिळावा म्हणून निरनिराळ्या मोहल्यांत बिऱ्हाड बदलावे, असाही विचार केला. घरे अशा ठिकाणी पसंत केली, की तेथून कामाच्या जागी अर्ध्या तासात चालत जाता यावे, आणि गाडीभाडे वाचावे. ह्यापूर्वी नेहमी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी गाडीभाडे खर्चावे लागे, आणि पुन: फिरायला जाण्यासाठी निराळा वेळ काढावा लागत असे. आता कामावर जातानाच फिरणे होऊन जाईल अशी व्यवस्था झाली. आणि ह्या व्यवस्थेमुळे मी रोज आठ-दहा मैल सहज फिरत असे. मुख्यतः ह्या एकाच सवयीमुळे इंग्लंडात मी क्वचितच आजारी पडलो असेन. शरीर चांगले कसले. कुटुंबात राहण्याचे सोडून दोन खोल्या भाड्याने घेतल्या; एक निजण्यासाठी आणि दुसरी उठण्या-बसण्यासाठी. येथून माझ्या विलायतेमधील जीवनक्रमातील दुसरा भाग सुरु झाला असे म्हणण्यास काही हरकत नाही. अजून तिसरा फेरफार ह्यानंतर व्हावयाचा होता.
अशा रीतीने अर्धा खर्च वाचला. पण वेळेचे काय? मला माहीत होते की बॅरिस्टरीच्या परीक्षेसाठी फारशा अभ्यासाची जरूर नव्हती. त्यामुळे धीर वाटत होता. इंग्रजीचे माझे अर्धे कच्चे ज्ञान मला नेहमी टोचत होते. लेलीसाहेबांचे'तू बी.ए. हो, नंतर ये' हे शब्द मला सलत होते. बॅरिस्टरीच्या अभ्यासाशिवाय दुसरा अभ्यासही केला पाहिजे. यासाठी मी ऑक्सफर्ड-केंब्रिजची माहिती मिळवली. कित्येक मित्रांना भेटलो. त्यावरून दिसले, की तेथे गेले असता खर्च फार वाढणार, आणि तेथील अभ्यासक्रमही लांबलचक. मला तीन वर्षांवर राहणे शक्य नव्हते. एका मित्राने सांगितले, "जर तुला एखादी कठीण परीक्षाच द्यायची असली, तर तू लंडनची मॅट्रिक्युलेशन पास हो. त्यासाठी मेहनत भरपूर करावी लागेल, आणि सामान्य ज्ञान वाढेल. खर्च तर मुळीच वाढणार नाही." ही सूचना मला आवडली. परीक्षेचे विषय पाहतो तो मनाने उलट खाल्ली. लॅटिन आणि दुसरी एक भाषा आवश्यक. लॅटीनचा अभ्यास कसा व्हावा? पण मित्राने सुचवले की, "वकिलाला लॅटीन भाषेचा फार उपयोग होतो. लॅटीन जाणणाऱ्याला कायद्यांची पुस्तके समजणे सोपे जाते. शिवाय, रोमन लॉच्या परीक्षेत तर एक प्रश्न फक्त लॅटीन भाषेतच असतो आणि लॅटीन शिकल्यास इंग्रजी भाषेवरचा ताबाही वाढेल." ह्या सर्व मुद्द्यांचा माझ्यावर परिणाम झाला. कठीण असो वा नसो, पण लॅटीन तर शिकायचेच; घेतलेले फ्रेंचही पुरे करायचे. अर्थात दुसरी भाषा फ्रेंच हेही ठरलेच. एक खासगी मॅट्रिक्युलेशन वर्ग चालत असे, त्यात नाव घातले. परीक्षा दर सहा महिन्यांनी होत असे. मला जेमतेम पाच महिन्यांचा अवधी होता. हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे होते. परिणाम असा झाला, की शिष्ट बनणार होतो, तो उद्योगी विद्यार्थी बनलो. वेळापत्रक तयार केले. मिनिटामिनिटाचा उपयोग करू लागलो. पण मी इतर विषयांचा अभ्यास करुन वर लॅटीन किंवा फ्रेंच पुरे करू शकेन इतकी माझी बुद्धी किंवा स्मरणशक्ति तीव्र नव्हती. परीक्षेस बसलो; पण लॅटीनमध्ये नापास झालो. वाईट वाटले, पण धीर सोडला नाही. लॅटीनमध्ये गोडी वाटू लागली होती. फ्रेंच जास्त चांगले करण्याचा व विज्ञानशास्त्रात नवीन विषय घेण्याचा विचार केला. रसायनशास्त्रात- ज्यात आता मला वाटते की खूप गोडी वाटायला पाहिजे- प्रयोगांच्या अभावी मन रमेना. हिंदुस्थानात या विषयाचा अभ्यास करावा लागलाच होता, म्हणून लंडन मॅट्रिकसाठी देखील हाच विषय पसंत केला. ह्यावेळी प्रकाश आणि उष्णता हा विषय मी घेतला. हा विषय सोपा मानला जात असे, आणि मलाही तो सोपा वाटला.
पुनः परीक्षा देण्याच्या तयारीबरोबरच मी राहणीत जास्त साधेपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मला वाटले की अजून माझ्या कुटुंबाच्या गरिबीला साजेसे माझे जीवन साधे नाही. बंधूंच्या औदार्याचा व अडचणीचा विचार मनात येऊन मला संकोच वाटू लागला. जे लोक पंधरा पौंड किंवा आठ पौंड दर महिन्याला खर्च करीत होते, त्यांना शिष्यवृत्त्या मिळत होत्या. माझ्यापेक्षा अधिक साधेपणाने राहणारे विद्यार्थीही मला दिसत होते. अशा कितीतरी विद्यार्थ्यांचा माझ्याशी संबंध आलेला होता
एक विद्यार्थी लंडनच्या कंगाल भागात आठवड्याचे दोन शिलींग देऊन एका खोलीत राहत होता, व लोकार्टच्या स्वस्त कोकोच्या दुकानात दोन पेनीची कोको आणि रोटी खाऊन निर्वाह करीत होता. त्याच्याशी स्पर्धा करण्याची तर माझी शक्ती नव्हती. पण मी दोहोंच्या ऐवजी एका खोलीत खुशाल राहू शकेन, आणि अर्धा स्वयंपाक मी हाताने देखील करून घेऊ शकेन असे मला वाटले. असे केल्याने मी दर महिन्याला चार-पाच पौंडात राहू शकेन. साध्या राहणीविषयीची पुस्तके देखील माझ्या वाचण्यात आली होती. दोन खोल्या सोडून देऊन आठवड्याला आठ शिलींगच्या भाड्याची एक खोली घेतली, एक शेगडी विकत घेतली आणि सकाळचा स्वयंपाक हाताने करायला सुरुवात केली. स्वयंपाकात जास्तीत जास्त 20 मिनिटे जात असत. ओटमीलची लापसी आणि कोकोसाठी पाणी एवढे उकळण्यास कितीसा वेळ जाणार? दुपारी बाहेर जेवून घ्यावे व संध्याकाळी पुनः कोको करून रोटीबरोबर घ्यावा. अशा रीतीने दररोज एक ते सव्वा शिलींगमध्ये खाणे कसे भागवावे, हे मी शिकलो. हा माझा जास्तीत जास्त अभ्यासाचा काळ होता. जीवनक्रम साधा झाल्यामुळे वेळ जास्त वाचला. दुसऱ्या वेळी परीक्षेस बसलो आणि पास झालो.
वाचकांनी असे समजू नये की साधेपणामुळे माझा जीवनक्रम नीरस झाला. उलट माझी मन:स्थिती बाह्य स्थितीशी समरस झाली. कौटुंबिक स्थितीशी माझ्या स्वतःच्या राहणीचा मेळ बसला. जीवनक्रम अधिक सत्यमय झाला, व त्यामुळे आत्मानंदाला सीमा राहिली नाही.

Comments
Post a Comment