खंड १ ला: ६. दुःखद प्रसंग:१

खंड १ ला:

६. दुःखद प्रसंग:१
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. १७-२०
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************

मी मागे सांगितलेच आहे की हायस्कुलात माझे खास मित्र असे थोडेच होते. अशा मैत्रीचे नाव देता येईल असे दोन मित्र मला निरनिराळ्या वेळी होते असे म्हणता येईल. एक संबंध मी आपण होऊन त्या मित्राचा त्याग केला नसतानाही फार काळ चालला नाही. मी दुसऱ्या मित्राची संगत धरली म्हणून पहिल्याने मला सोडले.

दुसरी मैत्री हे माझ्या आयुष्यातील एक दुःखद प्रकरण आहे. ही मैत्री पुष्कळ वर्षेपर्यंत चालली. ती मैत्री करण्यामध्ये माझी दृष्टी त्या मित्राला सुधारण्याची होती. त्या इसमाची प्रथम माझ्या मधल्या बंधूंशी मैत्री होती. तो माझ्या बंधुंच्या वर्गात होता. त्याच्यात कित्येक दोष होते, ते मला दिसत होते. परंतु ज्याला आपला म्हटले, त्याला कधी अंतर द्यायचे नाही हा गुण मी त्याच्या ठिकाणी कल्पिला होता. माझी मातोश्री, माझे वडील बंधू व माझी धर्मपत्नी तिघांनाही ही संगत रुचत नव्हती. माझ्यासारखा गर्विष्ठ नवरा बायकोची सूचना थोडीच मनावर घेणार? आईच्या शब्दाबाहेर नाही जाणार, वडील बंधूंचे ऐकेनच; परंतु त्यांना मी याप्रमाणे सांगून शांत केले: "तुम्ही जे त्याचे दोष सांगितले, ते मला माहित आहेत. त्याचे गुण मात्र तुम्हाला माहीत नाहीत. मला तो आडमार्गात नेणार नाही. कारण माझा त्याच्या बरोबरचा संबंध फक्त त्याला सुधारण्यासाठी आहे. तो सुधारला तर फार उत्तम मनुष्य निघेल, अशी माझी खात्री आहे. तुम्ही माझ्याबद्दल निर्धास्त राहावे अशी माझी मागणी आहे." या बोलण्याने त्यांचे समाधान झाले असे मला वाटत नाही; परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला माझ्या मार्गाने जाऊ दिले.

माझा अंदाज बरोबर नव्हता असे मला मागून दिसून आले. सुधारणा करण्यासाठी माणसाने आपल्या शक्तीपलीकडे खोल पाण्यात उतरणे बरे नाही. ज्याला सुधारायचे आहे त्याच्याबरोबर मैत्री शक्य नाही. मैत्रीमध्ये अद्वैत-भावना असते. अशी मैत्री जगात क्वचितच आढळते. मैत्री समान गुणवाल्यांमध्ये शोभते व टिकते. मित्र एकमेकांवर परिणाम केल्याशिवाय राहायचेच नाहीत. त्यामुळे मैत्रीमध्ये सुधारणेला फारच थोडा वाव असतो. माझे असे मत आहे की खाजगी दोस्ती अनिष्ट आहे. कारण मनुष्य दोषच लवकर उचलतो. गुण ग्रहण करण्यास प्रयास पडत असतात. ज्याला आत्म्याची --ईश्वराची-- मैत्री संपादावयाची आहे, त्याने एकटे राहावे हे चांगले, किंवा अखिल जगताची मैत्री करावी. वरील विचार योग्य असोत किंवा अयोग्य असोत, माझा तरी निकट मैत्री जमवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

मी ह्या मित्राच्या संबंधात आलो यावेळी राजकोटमध्ये "सुधारणा-पंथ" पसरत होता. पुष्कळ हिंदू शिक्षक गुप्तपणे मांसाहार व मद्यपान करीत असतात, अशी बातमी या मित्राकडून मिळाली. राजकोटच्या इतर सुप्रसिद्ध गृहस्थांचीही नावे घेतली. हायस्कूलांतील काही विद्यार्थ्यांचीही नावे माझ्या कानी आली. मला आश्चर्य वाटले व दुःखही झाले. मी कारण विचारले तेव्हा असा युक्तिवाद सांगण्यात आला: आपण मांसाहार करीत नाही त्यामुळे आपला समाज नेभळट बनला आहे. इंग्रज आपल्यावर राज्य करतात, त्याचे कारण मांसाशन होय. मी किती शक्तिवान आहे आणि किती धावू शकतो ते तर तुम्हाला माहीतच आहे; त्याचे कारणही माझे मांसाशन होय. मांसाहाराला गळवे होत नाहीत. झाली तर चटकन भरून निघतात. आमचे शिक्षक मांस खातात. इतके नामांकित लोक खातात, ते काही खुळे म्हणून खातात? तुम्हीही खाल्ले पाहिजे. खाऊन पहा म्हणजे समजेल तुमच्यात किती बळ येते ते!"

हा काही एकच दिवस झालेला युक्तिवाद नव्हे. अशा तऱ्हेचे युक्तीवाद, अनेक उदाहरणांनी सजविलेली असे अनेकवार झाले. माझे मधले बंधू तर अगोदरच बाटले होते. त्यांनी त्या युक्तिवादाला स्वतःची अनुमती दिली. माझ्या बंधुंच्या व त्या मित्राच्या मानाने मी फारच नेभळट होतो. त्यांची शरीरे जास्त पीळदार होती. त्यांचे शरीरबळ माझ्यापेक्षा पुष्कळ जास्त होते. ते हिंमतवान होते. या मित्राचे पराक्रम पाहून मी मुग्ध होऊन जात असे. तो वाटेल तितके धावू शकत असे. त्याचा वेगही उत्तम होता. लांब आणि उंच उडीही खुपपर्यंत मारीत असे. मार सहन करण्याची शक्तीही त्याचप्रमाणे. या शक्तीचे प्रदर्शन तो माझ्यापुढे वेळोवेळी करीत असे. आपल्यात नसलेली शक्ती इतरांमध्ये पाहून माणसाला आश्‍चर्य वाटणारच. माझेही तसेच झाले. आश्चर्यातून मोह उद्धवला. माझ्यात धावण्यासवरण्याची शक्ती नाहीसारखीच होती. मी पण या मित्राप्रमाणे बलवान झालो तर किती चांगले!"

शिवाय मी फार भित्रा होतो. चोर, भूत, साप इत्यादीच्या भीतीने पछाडलेला होतो. या भीतीची पीडाही मला खूप होत असे. रात्री एकट्याने कोठेही जाण्याची हिम्मत चालेना. अंधारातून पाऊलही टाकायचा नाही. दिव्याशिवाय झोपणेही जवळजवळ अशक्य. तिकडून भूत आले तर? आणि तिकडून चोर? तिसरीकडून सर्प? म्हणून हा दिवा पाहिजेच. जवळ झोपलेल्या व आता काही अंशी तारुण्यात आलेल्या पत्नीजवळदेखील या माझ्या भीतीचा उल्लेख मी कसा करावा? माझ्यापेक्षा ती जास्त हिंमतवान होती, हे माझ्या लक्षात आले होते व त्याची मला लाजही वाटे. तिला सापाबिपाचे भय कसे ते माहीतच नव्हते. अंधारातून एकटीच जाई. ही माझी दुर्बलता त्या मित्राला माहीत होती. तो तर मला सांगे की आपण जिवंत साप हाताने पकडतो. चोरांची भीती त्याला ठाऊकच नव्हती. भुतांवर तर विश्वासच नव्हता. हा सर्व मांसाहाराचा प्रताप, असे त्याने माझ्या मनावर ठसविले.

त्या दिवसात कवी नर्मदाशंकरांचे पुढील काव्य शाळेत गायले जात असे:

इंग्लिश राज्य करिती, देशी दबून जाती,
देशी दबून जाती, उभयतांची देख शक्ती,
तो पाच हात पूर्ण, पुरणार पाचशेंना.

या सर्वांचा माझ्या मनावर व्हावयाचा तो परिणाम झाला. मी नरमलो. 'मांसाहार ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी बलवान व हिंमतवान बनेन. सर्व देश मांसाहार करील तर इंग्रजांचा पाडाव करता येईल', असे मला वाटू लागले.
मांसाहाराचा आरंभ करण्याचा दिवस मुक्रर झाला.

या निश्चयाचा- या उपक्रमाचा- अर्थ सर्वच वाचकांच्या पूर्णपणे लक्षात येणार नाही. गांधी कुटुंब वैष्णव संप्रदायातले माझ्या मातापित्यांची तर विशेष धर्मनिष्ठ म्हणून ख्याती. रोज हवेलीत जायची. कित्येक देवळे तर आमच्या कुटुंबाचीच म्हटली तरी चालतील. शिवाय गुजराथेत जैन संप्रदायाचे विशेष प्राबल्य. त्याची छाप हर एक स्थळी, हरएक कार्यामध्ये दिसून येते. अर्थात मांसाहाराबद्दल जो विरोध, जो तिरस्कार गुजराथेत आणि श्रावकांमध्ये व वैष्णवांमध्ये दिसून येतो, तसा हिंदुस्थानात किंवा साऱ्या जगात इतरत्र कोठेही दिसून येणार नाही. हे माझे संस्कार.

मातापित्यांचा मी परमभक्त. माझ्या मांसाहाराची गोष्ट त्यांच्या कानी गेली तर त्यांचे असत्या आयुष्यी तत्काल प्राणोत्क्रमण होईल, असे मला वाटत होते. समजून किंवा बिनसमजता पण मी सत्याचा सेवक होतोच. मांसाहार करताना मातापित्यांना फसवावे लागेल हे ज्ञान त्यावेळी मला नव्हते, असे मी सांगू शकत नाही.

अशा स्थितीमध्ये माझा मांसाहार करण्याचा निश्चय ही माझ्याबाबतीत फार गंभीर व भयंकर गोष्ट होती.

परंतु मला तर सुधारणा घडवून आणावयाची होती. मांसाहाराचा षोक नव्हता. त्यात स्वाद आहे असे समजून मला मांसाहार सुरू करायचा नव्हता. मला तर बलवान, हिंमतवान व्हावयाचे होते. इतरांना तसे होण्याचे निमंत्रण द्यायचे होते, आणि मग इंग्रजांचा पाडाव करून हिंदुस्थानला स्वतंत्र करायचे होते. 'स्वराज्य' शब्द त्यावेळी ऐकला नव्हता. या सुधारणेच्या उत्कटतेत माझे भान हरपले.

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५