खंड १ ला: १३. एकदाची विलायत तर गाठली,,

खंड १ ला:

१३. एकदाची विलायत तर गाठली,,
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ४०-४३
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************

बोट मला मुळीच लागली नाही. परंतु दिवस चालले, तसतसा मी गोंधळून जाऊ लागलो. स्टुअर्डजवळ बोलण्याचाही संकोच वाटे. इंग्रजीत बोलण्याची मला सवयच नव्हती. मुजुमदाराखेरीजचे सर्व उतारू इंग्रज होते. त्यांच्याबरोबर बोलता येईना. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत, तर माझी समजूत पडेना; आणि समजले तरी जबाब कसा द्यावा कळेना. प्रत्येक वाक्य बोलण्यापूर्वी मनात जुळवावे लागे. काट्या-चमच्याने जेवता येईना. आणि कोणती वस्तू मांसाखेरीज आहे हे विचारण्याचे धैर्य होईना. त्यामुळे मी जेवणाच्या टेबलाकडे कधी गेलोच नाही. खोलीतच जेवीत असे. बरोबर मेवामिठाई वगैरे घेतली होती, त्यावरच बहुतांशी चालवून नेले. मुजुमदारांना कसलीच अडचण नव्हती. ते सर्वांबरोबर मिसळून गेले. डेकवरही मोकळेपणाने जात. मी मात्र सबंध दिवस खोलीत कोंडलेला राही. क्वचित डेकवर थोडी माणसे असतील अशा वेळी तिथे थोडा वेळ बसून परत येई. मुजुमदार मला सर्वांबरोबर मिसळायला, मोकळेपणाने गप्पागोष्टी बोलायला समजावून सांगत. वकिलाची जीभ बोलकी पाहिजे असेही सांगत. स्वतःचे वकीलीचे अनुभव सांगत. इंग्रजी ही काही आपली भाषा नव्हे, तीत चुका व्हायच्याच, तरी पण दडपून बोलत गेले पाहिजे, वगैरे उपदेश करीत. परंतु मला माझा भिडस्तपणा सोडता येईना.

एका भल्या इंग्रजाला माझी दया आली, आणि त्याने माझ्याबरोबर बोलण्या-चालण्यास सुरुवात केली. तो स्वतः वयाने मोठा होता. मी खातो काय, मी कोण, जाणार कोठे, कोणाशी बोलत चालत का नाही वगैरे प्रश्न तो विचारी. मला जेवणाच्या जागी चलण्याबद्दल सुचवी. मांस न खाण्याच्या माझ्या अग्रहासंबंधी ऐकून त्याला हसू आले. माझी दया येऊन तो म्हणाला, "येथपर्यंत (पोर्ट सय्यद येण्यापूर्वी) ठीक आहे. बिस्केच्या उपसागरात पोचलास की तू आपले विचार बदलशील. इंग्लंडात तर इतकी थंडी पडते, की मांसाशिवाय चालायचेच नाही."

मी म्हटले, "मी ऐकले आहे, की तिकडे लोक मांसाहाराशिवाय राहू शकतात."

ते म्हणाले, "ही खोटी गोष्ट आहे असे समज. माझ्या ओळखीचा असा एकही गृहस्थ मला माहित नाही की जो मांसाहार करीत नाही. हे पाहा,
मी दारू पितो, ती प्यायला मी तुला नाही सांगत. पण मांसाहार तर केलाच पाहिजे असे मला वाटते."

मी म्हटले, "तुमच्या सल्ल्याबद्दल मी आभार मानतो. परंतु मांस खाण्याबद्दल मी माझ्या आईशी बांधलेला आहे. त्यामुळे मला मांस घेता येत नाही. जर त्याखेरीज चालतच नसेल तर मी परत हिंदुस्थानात जाईन, पण मांस नाही खाणार."

बिस्केचा उपसागर आला. तेथेही मांसाची जरूरी भासली नाही, किंवा दारूचीही भासली नाही. मांस खाण्याबद्दलची प्रमाणपत्रे जमविण्याची मला सूचना मिळाली होती. म्हणून या इंग्रज मित्रापाशी मी प्रमाणपत्र मागितले. त्याने ते आनंदाने दिले. मी ते काही काळपर्यंत धनाप्रमाणे जपून ठेवले. मागाहून मला कळले, की प्रमाणपत्रे तर मांस खाऊन सवरूनही मिळविता येतात! त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा मोह नाहीसा झाला. जर माझ्या शब्दावर विश्वास नसेल, तर असल्या बाबतीत प्रमाणपत्रे दाखवून तरी मला कसला फायदा मिळवायचा असणार?

कसाबसा प्रवास पुरा करून आम्ही साऊदँम्टन बंदरात येऊन पोचलो. त्या दिवशी शनिवार होता. एवढे मला स्मरण आहे. बोटीवर मी काळे कपडे वापरीत असे. मित्रांनी माझ्यासाठी पांढऱ्या फ्लॅनेलची एक कोट-पाटलोण शिवविली होती. ती मी विलायतेत उतरताना वापरण्याचे ठरविले होते. सफेद कपडे जास्त शोभिवंत दिसतील अशी समजूत! मी हे फ्लॅनेलचे कपडे घालून उतरलो. सप्टेंबर अखेरचे दिवस होते. असले कपडे वापरणारा मी एकटाच दिसत होतो. माझ्या पेट्या आणि त्यांच्या किल्ल्या तर ग्रिन्डले कंपनीचे गुमास्ते अगोदरच घेऊन गेले होते. बाकीचे सर्व करतील तसे आपण करायचे असा विचार करून मी माझ्या किल्ल्याही देऊन टाकल्या!

माझ्यापाशी शिफारशीची चार पत्रे होती: डॉ. प्राणीजीवन मेहता, दलपतराम शुक्ल, राजपुत्र रणजीतसिंहजी आणि दादाभाई नौरोजी यांच्यावर. मी साउदँम्टनहून डॉ. मेहतांना तार केली. बोटीमध्ये आम्हाला कोणी व्हिक्टोरिया हॉटेलमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुजुमदार आणि मी तेथे गेलो. सफेत कपड्यांच्या शरमेमुळे माझी चुळबूळ अगोदरच चालली होती. त्यात आणखी हॉटेलात जाताच समजले, की दुसर्‍या दिवशी रविवार असल्यामुळे सोमवारपर्यंत ग्रिन्डलेकडून सामान येणार नाही. त्यामुळे माझा गोंधळच उडाला.

सात आठ वाजता डॉ. मेहता आले. त्यांनी प्रेमाने माझी थट्टा केली. मला माहिती नसल्यामुळे मी त्यांची रेशमाने मढविलेली केसाळ टोपी पहायला हातात घेतली, आणि तिच्यावर उलटा हात फिरवला. त्यामुळे टोपीची लव उभी झाली. डॉक्टर मेहतांनी ते पाहताच मला लगेच थांबवले. पण गुन्हा तर होऊन चुकला होता. पुन: कधी होणार नाही, एवढाच त्यांच्या थांबविण्याचा परिणाम झाला.

येथून माझा युरोपीय रीतिरिवाजांचा पहिला धडा सुरू झाला, असे म्हणता येईल. डॉ. मेहता हसत हसत अनेक गोष्टींबद्दल समजून देत होते: कोणाच्याही वस्तूला हात लावू नये; हिंदुस्थानात कोणाचीही ओळख होताच जे प्रश्न सहजी विचारता येतात, तसले प्रश्न येथे विचारावयाचे नाहीत; बोलताना आवाज उंच चढवायचा नाही; हिंदुस्थानात साहेबांशी बोलताना 'सर' म्हणण्याचा प्रघात आहे, तो अनावश्यक आहे; 'सर' हे फक्त नोकर आपल्या धन्याला किंवा वरिष्ट अमलदाराला उद्देशून बोलतो. शिवाय, त्यांनी हॉटेलात राहण्याच्या खर्चाचीही गोष्ट काढली; आणि कोणाच्या खाजगी कुटुंबात राहण्याची जरूर पडेल, असे सुचवले. याबद्दलचा जास्त विचार सोमवारपर्यंत तहकूब राहिला. कित्येक शिफारसपत्रे देऊन डॉ. मेहतांनी निरोप घेतला.

आम्हा दोघांना तर हॉटेलात येऊन फशी पडल्यासारखे झाले. हॉटेल पण महागडे. माल्टाला एक सिंधी उतारू चढले होते. त्यांची व मुजुमदारांची चांगली मैत्री जमली होती. हे सिंधी उतारू लंडनचे चांगले माहितगार होते. त्यांनी आमच्यासाठी दोन खोल्या ठरवून देण्याचे काम अंगावर घेतले. आम्ही मान्य केले आणि सोमवारी सामान हाती येताच बिल चुकवून त्या सिंधी गृहस्थांनी ठरविलेल्या खोल्यांत प्रवेश केला. मला आठवते, की माझ्या वाट्याच्या हॉटेलचे बील जवळजवळ तीन पौंड होते. मी तर थक्कच होऊन गेलो. तीन पौंड भरूनही पोटाचे हालच,, हॉटेलातील पदार्थांपैकी कोणताच आवडेना. एक वस्तू घ्यावी, ती आवडली नाही म्हणून दुसरी घ्यावी, पण पैसे मात्र दोहोंचेही दिले पाहिजेत. माझा आधार अजून मुंबईहून आणलेल्या फराळावरच होता, असे म्हणण्यास हरकत नाही.

मला तर त्या खोल्यांत सुद्धा मुळीच करमेना. एकसारखी आपल्या देशाची आठवण होई. मातेचे प्रेम मूर्तिमंत पुढे उभे राही. रात्र पडली, म्हणजे रडे कोसळे. घरच्या अनेक प्रकारच्या स्मरणांच्या चढाईपुढे निद्रा येणार तरी कोठून? हे दुःख कोणाजवळ बोलून दाखवण्याचीही सोय नव्हती. बोलून उपयोग तरी काय? कोणत्या उपायाने मनाचे समाधान होईल, ते माझे मलाही समजेना.

लोक विचित्र, राहणी विचित्र, घरे पण विचित्र! राहण्याची रीतभात सदरहूप्रमाणेच. काय बोलल्याने किंवा काय केल्याने या रीतीभातींच्या नियमांचा भंग होत असेल, त्याचाही पत्ता नाही. त्यातच भरीला खाण्यापिण्याचे बंधन; आणि खाता येण्यासारखे जिन्नस, ते शुष्क आणि नीरस लागत. त्यामुळे माझी स्थिती आडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली. विलायती तर आवडत नाही, आणि परत स्वदेशी जाण्याची सोय नाही. विलायतेत आलो, त्याअर्थी तीन वर्षे पुरी करण्याचा निर्धार होता. 

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५