खंड १ ला: १५. 'सभ्य' वेशात

खंड १ ला:

१५. 'सभ्य' वेशात
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ४६-५०
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
-आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रित वाचण्यासाठी लिंक: https://sakhi-sajani.blogspot.com
************************************

अन्नाहारावरील माझी श्रद्धा दिवसानुदिवस वाढत चालली. सॉल्टच्या पुस्तकाने आहाराच्या विषयावर जास्त वाचण्याची माझी जिज्ञासा तीव्र केली. मी तर मिळाली तेवढी पुस्तके विकत घेतली आणि वाचून काढली. त्यापैकी हॉवर्ड विल्यम्सच्या 'आहारनीति' नावाच्या पुस्तकामध्ये निरनिराळ्या काळचे ज्ञानी पुरुष, अवतार, पैगंबर, इत्यादींच्या आहारांचे व आहारविषयक विचारांचे वर्णन आहे. पायथागोरस,(२५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक ग्रीक तत्त्ववेत्ता.) येशू इत्यादी लोक केवळ अन्नाहारी होते असे सिद्ध करण्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. डॉ. मिसेस किंगस्फर्डचे 'उत्तम आहारपद्धति' हे पुस्तकही चित्ताकर्षक होते. शिवाय डॉ. ऍलिन्सनच्या आरोग्यविषयक लेखांचीही पुष्कळ मदत झाली. औषधांऐवजी फक्त आहारातील फेरफार यांनीच रोग्याला बरे करण्याच्या पद्धतीचे त्यांनी समर्थन केले आहे. डॉ. ऍलिन्सन स्वतः अन्नाहारी होते, व रोग्यांना फक्त अन्नाहाराचीच शिफारस करीत असत.

या सर्व पुस्तकांच्या वाचनाचा परिणाम असा झाला, की माझ्या जीवनामध्ये आहारविषयक प्रयोगांनी महत्त्वाचे स्थान पटकावले. त्या प्रयोगांमध्ये प्रथम आरोग्याच्या दृष्टीला प्रधान स्थान होते. मागून धार्मिक दृष्टीला श्रेष्ठ स्थान मिळाले.

इकडे त्या माझ्या मित्रांची माझ्याबद्दलची काळजी दूर झाली नव्हती. त्यांना माझ्यावरील प्रेमामुळे वाटे, की मी मांस खाल्ले नाही तर अशक्त बनेन; एवढेच नव्हे, तर 'ठोंब्या'च राहीन. कारण की मला इंग्रज समाजामध्ये मिसळताच येणार नाही. मी अन्नाहारावरील पुस्तके वाचीत असतो, हे त्यांना कळले होते. त्यांना अशी धास्ती पडली, की असल्या वाचनाने मी भ्रमिष्ट बनून जाईन, प्रयोगाखालीच माझा जन्म वाया जाईल, मला साधावयाचे ते मी विसरून जाईन आणि पढतमूर्खासारखी माझी स्थिती होऊन राहील! म्हणून मला सुधारण्याचा त्यांनी एक अखेरचा प्रयत्न केला. मला नाटकाला येण्याबद्दल आमंत्रण दिले. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांच्याबरोबर हॉबर्न- भोजनगृहात जेवायचे होते. हे भोजनगृह म्हणजे माझ्यादृष्टीने राजमहाल होता. व्हिक्टोरिया-हॉटेल सोडल्यानंतर असल्या भोजनगृहात जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. व्हिक्टोरिया-हॉटेलातील अनुभवाचा काही उपयोग नव्हता. कारण, तेथे तर मी शुद्धीवरच नव्हतो म्हटले तरी चालेल. आम्ही दोघाजणांनी एक टेबल धरले. सभोवार शेकडो लोक होते. मित्राने पहिले वाढप मागविले. ते 'सूप' होते. मी बुचकळ्यात पडलो. मित्राला कसे विचारावे? म्हणून मी वाढणाऱ्याला जवळ बोलावले.

मित्र समजला. चिडून मला विचारले,
"काय झाले?"
मी हळूच संकल्पपूर्वक म्हटले:
"यात मांस आहे काय ते मला विचारावयाचे आहे." "असला जंगलीपणा या गृहात खपणार नाही. तुला असली कटकट लावायची असेल, तर तू बाहेर जाऊन एखाद्या बारक्या भोजनगृहात खाऊन ये आणि बाहेर माझी वाट पाहत बैस.

या सांगण्याने मला आनंद झाला. मी उठून गेलो, आणि दुसरी खानावळ शोधू लागलो. शेजारीच एक अन्नाहार देणारे भोजनगृह होते, परंतु ते बंद होऊन गेले होते. आता काय करावे ते मला सुचेना. मी उपाशी राहिलो. आम्ही नाटकाला गेलो. मित्राने झाल्या प्रकाराबद्दल चकार शब्दही काढला नाही. मला तर बोलण्याची जरूरच नव्हती.

पण हे आम्हा उभयतांमधील शेवटचे प्रेमयुद्ध होय. आमचा संबंध तुटला नाही, किंवा आमच्यात वितुष्टही आले नाही. त्यांच्या या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी असलेले त्यांचे मजवरील प्रेम मला दिसत होते. त्यामुळे विचार व आचार भिन्न असताही माझा त्यांच्याविषयीचा आदर वृद्धिंगतच झाला.

परंतु मला वाटले, की त्यांना माझ्यासंबंधी वाटत असलेली भीती नाहीशी केली पाहिजे. मी निश्चय केला, की आता जंगली राहायचे नाही. सभ्यपणाची लक्षणे संपादन करायची आणि अन्य तऱ्हेने समाजामध्ये मिसळण्यास लायक बनून अन्नाहाराच्या बाबतीतील माझा विक्षिप्तपणा झाकून टाकायचा.

मी सभ्यपणा संपादण्याचा छचोरपणाचा मार्ग पत्करला. तो माझ्या आवाक्याबाहेरचा होता.

विलायती फॅशनचे खरे, तरीपण मुंबईत कापून शिवलेले कपडे उच्च इंग्रज समाजामध्ये शोभणार नाहीत, म्हणून 'आर्मी अँड नेव्ही' स्टोअरमध्ये कपडे करविले. 19 शिलिंग (ही किंमत त्या काळाच्या मानाने फारच मोठी म्हटली पाहिजे.) किमतीची 'चिमणी' टोपी माथ्यावर चढविली. एवढ्याने समाधान न होता ब्रॉड स्ट्रीटमध्ये म्हणजे जेथे विशेष शौकीन लोकांचे कपडे शिवले जात, तेथे जाऊन दहा पौंड पाण्यात टाकून संध्याकाळी घालायचा पोशाख बनविला. भोळ्या व उदार दिलाच्या वडील बंधूंमार्फत खास सोन्याचा शेडा, जो दोन्ही खिशात अडकवून लटकवितात-मागविला; आणि तो मिळालाही. तयार बांधलेला टाय वापरणे हा शिष्टाचार समजत नाहीत, म्हणून टाय बांधण्याची कला हस्तगत करून घेतली. घरी तर आरसा हजामतीच्या दिवशीच पाहायला मिळायचा; परंतु येथे तर मोठ्या आरशासमोर उभे राहून टाय बरोबर बांधण्यात आणि केस चापून भांग पाडण्यात रोज दहा एक मिनिटांचा तरी व्यय व्हायचाच. केस नरम नव्हते, त्यामुळे त्यांना चांगले वळवून राखण्यासाठी रोज ब्रशबरोबर (ब्रश म्हणजे केरसुणीच की नाही?) लढाई होई. आणि टोपी घालता काढताना भांग सांभाळण्यासाठी हात डोक्याकडे गेलाच म्हणून समजावे. शिवाय, मधून मधून चारचौघांत बसलो असताना भांगावरून हात फिरवून केस जेथल्या तेथे राखण्याची निराळी आणि सभ्यपणाची क्रिया चालायचीच,,

परंतु एवढी टापटीपही पुरेशी नव्हती. नुसत्या सभ्य पोषाखाने थोडेच सभ्य होता येणार? सभ्यपणाचे इतर काही बाह्य प्रकारही मी समजून घेतले होते, आणि त्याचाही अभ्यास करायचा होता. त्या गृहस्थाला नाचता आले पाहिजे. त्याला फ्रेंचही नीट आले पाहिजे. कारण की फ्रेंच ही इंग्लंडचा शेजारी फ्रान्स त्याची भाषा होती. आणि संबंध युरोपची राष्ट्रभाषाही होती; आणि माझी युरोपभर हिंडण्याची इच्छा होती. शिवाय, सभ्य गृहस्थाला छटादार भाषणही करता आले पाहिजे. मी नृत्य शिकून घेण्याचा निश्चय केला. एका वर्गात दाखल झालो. एका सत्राचे तीनएक पौंड भरले. तीन आठवड्यांत सुमारे सहा धडे घेतले असतील. बरोबर तालबद्ध पाऊल पडेना. पियानो वाजे, परंतु त्याच्या सुरांचा अर्थ काय याचा पत्ता लागेना! ' एक, दोन, तीन' असा क्रम चाले; परंतु त्याच्यामधील अंतरे पियानोच दर्शवी, ती काही लक्षात येत ना. तर मग आता? आता तर बावाजीच्या मांजरीसारखी स्थिती झाली. उंदरांचे निवारण करण्यासाठी मांजर, मांजरासाठी गाय अशा तऱ्हेने बावाजीचा परिवार वाढला. व्हायोलिन वाजवायला शिकलो म्हणजे तालासुराची माहिती होईल. व्हायोलिन विकत घेण्यात तीन पौंड कृष्णार्पण केले, आणि आणखी काही ते शिकण्यासाठी! भाषण करण्यास शिकण्यासाठी तिसऱ्या शिक्षकाचे घर धुंडाळले, त्याच्याही हातावर एक गिनी ठेवली. बेलचे 'स्टॅंडर्ड इलोक्युशनिस्ट' घेतले. पिटचे भाषण सुरू करविले!

या बेलसाहेबांनी(बेल हे पुस्तककर्त्याचे नाव; परंतु त्या शब्दाचा अर्थ घंटा असाही आहे.) माझ्या कानात घंटा वाजविली. मी सावध झालो.

मला इंग्लंडात जन्म थोडाच काढायचा आहे? छटादार भाषण करायला शिकून मी काय करणार? नाच नाचून मी सभ्य कसा बनणार? व्हायोलिन शिकायचे तर स्वदेशीही शिकता येईल. मी विद्यार्थी आहे. मला विद्याधन जोडले पाहिजे. मला माझ्या धंद्याला जरुरी ती तयारी केली पाहिजे. माझ्या सद्वर्तनावरून मला सभ्य म्हटले तर ठीकच झाले. नाही तर तो नाद सोडून दिला पाहिजे.

या विचारांच्या तंद्रीत असतानाच मी वरील आशयाच्या उद्गारांनी भरलेले पत्र वक्तृत्व-शिक्षकाला पाठविले. त्यांच्यापाशी मी दोन की तीनच धडे घेतले होते. नृत्य शिकविणाऱ्या बाईलाही तसलेच पत्र लिहिले. व्हायोलिन-शिक्षकिणीकडे व्हायोलिन घेऊन गेलो. येईल त्या किमतीला ते विकून टाकण्याची तिला परवानगी दिली. तिच्याशी काहीसा मित्रत्वाचा संबंध जुळला होता, म्हणून तिच्याशी माझ्या मोहाची गोष्ट बोललो. कृत्य इत्यादिंच्या उठाठेवीतून मोकळे होण्याचा माझा विचार तिला पसंत पडला.

'सभ्य बनण्या'चा हा माझा नाद तीनएक महिने चालला असेल. पोशाखाची टापटीप कित्येक वर्षेपर्यंत टिकली. पण मी विद्यार्थी बनलो.

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५