खंड १ ला: ९. वडिलांचा मृत्यू व माझी नालायकी
खंड १ ला:
९. वडिलांचा मृत्यू व माझी नालायकी
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. २६-२९
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
माझे सोळावे वर्ष चालू होते. वडील भगंदराच्या विकाराने अंथरुणातच पडून असत, हे पूर्वी सांगितलेच आहे. त्यांच्या शुश्रुषेला मातुश्री, घरचा एक जुना नोकर व मी अशी तिघेजण बहुतेक वेळ राहत असू. माझे काम 'नर्स'चे होते. त्यांचा व्रण धुणे, त्याला औषध लावणे, मलम लावायचे असतील तेव्हा ते लावणे, औषध देणे आणि औषध घरी तयार करावयाचे असल्यास तयार करणे, हे माझे मुख्य काम होते. रोज रात्री त्यांचे पाय चेपावे, व त्यांनी जा म्हटले किंवा त्यांना झोप लागली म्हणजे मी झोपण्यास जावे, असा परिपाठ होता. मला ही सेवा अतिशय प्रिय होती. तीत कधीही चुकारपणा केल्याचे मला स्मरत नाही. हे माझे हायस्कूलचे दिवस होते. त्यामुळे खाण्यापिण्याखेरीजचा माझा सर्व वेळ शाळेत किंवा वडिलांच्या सुश्रूषेत जात असे. वडिलांची परवानगी असेल आणि त्यांच्या प्रकृतीकडून अडचण नसेल तेव्हा संध्याकाळचा फिरायला जात असे.
याच वर्षी पत्नीला दिवस गेले. ही गोष्ट दोन प्रकारे लाजिरवाणी होती, हे मी आज समजू शकतो. एक तर हा काळ विद्याभ्यासाचा असता मी संयम राखला नाही; आणि दुसरी गोष्ट अशी की शाळेचा अभ्यास करावयाचा धर्म मला समजत होता, त्याहूनही मातापितरांच्या भक्तीचा धर्म मला समजत होता--- तो येथपर्यंत की त्याबाबतीत बालपणापासूनच 'श्रवण' हा माझा आदर्श होता-- असे असूनही विषय माझ्या मनावर सत्ता चालवू शकत होता. कारण की रात्री मी वडिलांचे पाय चेपीत बसत असे खरा, परंतु मन शयनगृहाकडे धाव घेत असे; आणि तेही अशा वेळी की जेव्हा धर्मशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि व्यवहार शास्त्र यांच्या दृष्टीने स्त्रीसंग वर्ज्य होता. सेवेमधून सुट्टी मिळाली की मला आनंद होत असे, आणि वडिलांना नमस्कार करून तडक शयनगृहाकडे मी जात असे.
वडिलांचे दुखणे वाढत्या प्रमाणात होते. वैद्यांनी स्वतःचे लेप लावून पाहिले. हकीमांनी मलमपट्टी करून पाहिली. न्हाव्यांचे वगैरे सामान्य घरगुती उपाय करून झाले. इंग्रज डॉक्टरानेही आपली बुद्धी चालवून पाहिली. इंग्रज डॉक्टराने शस्त्रक्रिया एवढाच इलाज आहे असे सुचविले. कुटुंबाचे घरोब्याचे वैद्य होते ते मध्ये पडले आणि वडिलांच्या उतारवयात तसली शस्त्रक्रिया त्यांनी नापसंत केली. अनेक प्रकारच्या बाटल्या विकत घेतलेल्या फुकट गेल्या, व शस्त्रक्रिया झाली नाही. वैद्यराज हुशार, नामांकित होते. मला वाटते की जर त्यांनी शस्त्रक्रिया होऊ दिली असती, तर जखम भरून येण्यास अडचण पडली नसती. शस्त्रक्रिया मुंबईच्या त्यावेळच्या प्रसिद्ध सर्जनच्या हातून व्हावयाची होती. परंतु अंत जवळ येऊन ठेपला होता. मग या उपायांचा अमल कोठून होणार? वडील मुंबईहून शस्त्रक्रिया करविल्याखेराज, व त्यासाठी खरेदी केलेले सर्व सामान बरोबर घेऊन परत आले. त्यांनी जास्त जगण्याची आशा सोडून दिली. अशक्तपणा वाढत चालला, आणि दर एक क्रिया बिछान्यातच करावी लागणार, अशी स्थिती येऊन पोहोचली. परंतु शेवटपर्यंत त्यांनी तसे करण्याचे नाकारले, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट सोसण्याची आग्रह कायम राखला. वैष्णवधर्माची तशी करडी आज्ञाच आहे. बाह्यशुद्धी अत्यावश्यक आहे; परंतु पाश्चात्त्य वैद्यक शास्त्राने आपणास हे दाखवून दिले आहे की मलत्याग व स्नान वगैरे बिछान्यातच निजूनही पूर्ण स्वच्छपणे होऊ शकतात व रोग्याला कष्ट सहन करावे लागत नाहीत. पाहावे तेव्हा त्याचे अंथरूण स्वच्छच असते. अशा तऱ्हेने राखलेली स्वच्छता मी तरी वैष्णव-धर्मसंमतच मानतो. परंतु त्यावेळी वडिलांचा अंथरुणातून बाहेर येण्याचा आग्रह पाहून मी तरी आश्चर्यचकित होत असे, आणि मनातल्या मनात त्यांची स्तुती करीत असे.
मृत्यूची घोर रात्र येऊन ठेपली. त्यावेळी माझे चुलते राजकोटलाच होते. मला असे काही स्मरते की वडिलांचे दुखणे वाढत चालले आहे, असे कळल्यावरूनच ते आले होते. उभयता बंधुंमध्ये गाढ प्रेम बसत होते. काका सबंध दिवस वडिलांच्या बिछान्याजवळ बसून राहत आणि आम्हा सर्वांना झोपायला सांगून स्वतः वडिलांच्या बिछान्यापाशी झोपत असत. कोणाच्या हे स्वप्नीही नव्हते की ही रात्र अखेरची ठरेल. धाकधूक तर नेहमीच चालू होती. रात्रीचे साडेदहा किंवा अकरा वाजले असावेत. मी पाय चेपीत बसलो होतो. काकांनी मला सांगितले, "तू जा, आता मी बसतो." मी खुश झालो, आणि सरळ शयनगृहामध्ये गेलो. पत्नीला बिचारीला गाढ झोप लागली होती. परंतु मी कसचा झोपू देणार? मी तिला जागे केले. पाच-सात मिनिटे झाली असतील नसतील, इतक्यात ज्याचा मी पूर्वी उल्लेख केला आहे, त्या नोकराने दार ठोठावले. माझ्या पोटात धस्स झाले. मी चपापलो. "उठ, बापू फार आजारी आहेत," नोकर म्हणाला. फार आजारी आहेत हे माहीतच होते. त्यामुळे त्या वेळेच्या "फार आजारी" चा विशेष अर्थ माझ्या लक्षात आला. बिछान्यातून ताडकन उडी मारून मी उठलो.
" काय झाले, सांग तर खरा!"
"बापू आटोपले!" जबाब मिळाला.
आता मला पश्चात्ताप झाला तरी उपयोग काय? मी अती शरमलो. मला अतिशय दुःख झाले, वडिलांच्या खोलीकडे धावून गेलो. माझ्या ध्यानात आले की मी विषयांध नसतो, तर शेवटच्या त्या घडीला माझ्या नशिबी वियोग आला नसता. मला अंतकाळी वडिलांची पादसेवा करीत राहता आले असते. आता केवळ काकांच्या तोंडून मला ऐकायचे राहिले की, "बापू तर आपल्याला सोडून गेले!" आपल्या वडिल बंधूंचे परमभक्त असे काका त्यांच्या शेवटच्या सेवेचा मान मिळवून बसले. वडिलांना आपल्या मृत्यूचे पूर्वज्ञान झाले होते. त्यांनी खुणेने लिहिण्याचे सामान मागितले. कागदावर त्यांनी लिहिले की "तयारी करा" एवढे लिहून हातातील कडे त्यांनी स्वतःच्या हातानी काढून टाकले. सोन्याची कंठी होती तीही काढून फेकून दिली. क्षणमात्रामध्ये आत्मा उडून गेला.
माझ्या शरमेचे दिग्दर्शन मी मागील एका प्रकरणात केले होते, ती शरम हीच-- सेवेच्या वेळी विषयेच्छा,, हा काळा डाग मी आजपर्यंत घासून टाकू शकलो नाही, विसरून जाऊ शकलो नाही; आणि मी नेहमी असेच मानीत आलो आहे, की जरी माझी मातापित्यांबद्दलची भक्ती अपरंपार होती, जरी तिच्यासाठी मी सर्वकाही सोडू शकत होतो, तरीही त्या सेवेच्या प्रसंगीही माझे मन विषयाला सोडू शकत नव्हते, हे त्या सेवेमधील एक अक्षम्य न्यून होते आणि म्हणून स्वतःला मी एकपत्नीव्रत पाळणारा मानीत असूनही विषयांध मानीत आलो आहे. त्यातून सुटून जाण्यास मला फार अवधी लागला, व सुटून जाण्यापूर्वी अनेक धर्मसंकटेही सहन करावी लागली.
माझ्या दुहेरी शरमेचे हे प्रकरण पुढे करण्यापूर्वी हेही सांगून मोकळा होतो, की माझ्या पत्नीला जे मूल झाले ते चार-दोन दिवसच श्वास घेऊन निघून गेले! याहून दुसरे काय होणार? ज्या आईबापांची किंवा बाल पतीपत्नींची मर्जी असेल, त्यांनी या माझ्या दाखल्यावरून सावध व्हावे.

Comments
Post a Comment