खंड १ ला: ४. स्वामित्व
खंड १ ला:
४. स्वामित्व:
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. १०-१२
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
लग्न झाले त्या दिवसांमध्ये निबंधाच्या लहान लहान चोपड्या, पैशापैशाच्या की पैपैच्या आठवत नाही, निघत असत. त्यांमध्ये पतिपत्नीप्रेम, काटकसर, बालविवाह वगैरे विषयांची चर्चा केलेली असे. यापैकी एखादा निबंध माझ्या हाती पडे, व मी तो वाचीत असे. ही तर सवय होतीच, की वाचलेले पसंत पडले नाही तर विसरून जावे, आणि पसंत पडले तर त्याचा अमल करावा. एकपत्नीव्रत पाळणे हा पतीचा धर्म आहे असे वाचले, ते हृदयात घोळत राहिले. सत्याची आवड होतीच. अर्थात पत्नीची प्रतारणा करायची नाहीच. त्यावरून अन्य स्त्रीशी संबंध ठेवायचा नाही, हेही लक्षात आलेच होते. लहान वयात एकपत्नीव्रताचा भंग होण्याचा संभव कमीच.
परंतु या सुविचारांचा एक विपरीत परिणाम घडला. "मी जर एकपत्नीव्रत पाळायचे, तर पत्नीने एकपतिव्रत पाळले पाहिजे," या विचाराने मी संशयी पती बनलो. "पाळावे" वरून "पाळवावे" या विचारावर मी आलो. आणि जर पाळवायचे, तर मला नजर ठेवली पाहिजे. मला काही पत्नीच्या पतिव्रतेबद्दल शंका घेण्याचे कारण नव्हते. परंतु असूया ही कारण थोडीच शोधीत बसणार? माझी पत्नी कोठे जाते, हे मला नेहमी माहिती झालेच पाहिजे; म्हणून तिने माझ्या परवानगीवाचून कोठेही जाता कामा नये. या गोष्टीमुळे आमच्यामध्ये दुःखदायक बेबनाव होऊ लागले. परवानगीशिवाय कोठेही जायचे नाही, ही एक प्रकारची कैदच झाली. परंतु कस्तूरबाई ही अशा प्रकारची कैद सहन करणारी स्त्री नव्हती. मनाला येईल तेंव्हा खुशाल मला विचारल्याशिवाय ती जाई. मी जसजसा दबाव घाली तसतशी ती अधिकच मोकळीक घेई, आणि तसतसा मी अधिकच चिडत असे. अशा तऱ्हेने आम्हा बालकांमध्ये अबोला वरचेवर उद्भवू लागला. कस्तूरबाईने जी मोकळीक घेतली, ती मी निर्दोष समजतो. जिच्या मनाला पापाचा स्पर्शही नाही, अशी बालिका देवदर्शनाला जायचे किंवा कोणाला भेटायला जायचे, असल्या गोष्टींवर नियंत्रण का म्हणून सहन करील? मी जर तिच्यावर दडपण घालणार तर तिने माझ्यावर का घालू नये? ... पण हे आता सुचते. त्याकाळी तर मला माझे स्वामित्व शाबित करायचे होते..
परंतु आमच्या ह्या गृहसंसारात माधुर्य मुळीच नव्हते, असे वाचकाने समजू नये. माझ्या वक्रतेच्या मुळाशी प्रेम होते. माझ्या मनातून माझ्या पत्नीला आदर्श स्त्री बनवायचे होते. तिने निष्पाप व्हावे, निष्पाप रहावे, मी शिकतो ते शिकावे, आणि आमची उभयतांची एकतानता व्हावी, अशीच माझी भावना होती.
कस्तूरबाईच्या मनात ही भावना असल्याचे मला माहित नाही. स्वभावाने सरळ, स्वतंत्र, मेहनती आणि माझ्याशी तरी मितभाषण करणारी होती. आपण शिकलेले चांगले, अशी तिची इच्छा मी माझ्या बालपणात कधीही अनुभवलेली नाही. त्यावरून मला वाटते की माझी भावना एकपक्षीय होती. माझे विषय सुख एका स्त्रीवरच साठविलेले होते. आणि त्या सुखाच्या प्रतिध्वनीची मी अपेक्षा करीत होतो. एकतर्फी का होईना, पण जेथे प्रेमाचे अस्तित्व आहे तेथे सर्वस्वीच दुःख असणे अशक्य आहे.
मला सांगितले पाहिजे की माझ्या पत्नीच्या बाबतीत मी विषयासक्त होतो. शाळेतही तिचे विचार येत. रात्र केव्हा पडते आणि भेट केव्हा होते, हाच विचार सारखा चाले. वियोग असह्य वाटे. माझ्या रिकाम्या बडबडीने मी तिला झोपू देत नसे. या आसक्तीबरोबर जर माझ्यात कर्तव्यपरायणता नसती, तर मी व्याधीग्रस्त होऊन मृत्यूवश झालो असतो, अथवा या जगात भार बनून राहिलो असतो असे मला वाटते. सकाळ झाली की नित्यकर्मे केलीच पाहिजेत, कोणाला फसविता कामा नये, अशा तर्हेच्या माझ्या विचारांमुळे मी पुष्कळ संकटातून बचावलो आहे.
वर लिहिलेच आहे कि कस्तुरबाई निरक्षर होती. तिला शिकविण्याची मला फार हौस होती. परंतु माझी विषयवासना मला शिकवू देणार कोठून? एक तर मला सक्तीने शिकवावे लागणार. तेही रात्री एकांतातच जुळणार. वडीलांदेखत पत्नीकडे नुसते पाहताही कामा नये. बोलायचे तर नावच नको. काठेवाडात त्यावेळी बुरख्याचा निरुपयोगी व अडाणी रिवाज अमलात होता. आजही बऱ्याच अंशी तो चालू आहे. त्यामुळे शिकविण्याची संधीही मला प्रतिकूल. त्यामुळे शिकविण्याचे जेवढे प्रयत्न मी तारुण्यात केले तेवढे सर्व व्यर्थ गेले हे मला कबूल केले पाहिजे. जेव्हा मी विषयाच्या निद्रेतून जागा झालो तेव्हा तर मी सार्वजनिक जीवनामध्ये गुरफटलेला होतो. त्यामुळे वेळ देता येण्यासारखी माझी स्थिती राहिली नव्हती. शिक्षकांमार्फत शिकविण्याचे माझे प्रयत्नही निष्फळ झाले. त्यामुळे आज कस्तुरबाईची स्थिती ती जेमतेम पत्र लिहू शकेल आणि सामान्य गुजराथी समजू शकेल इतपत आहे. माझे प्रेम विषय दूषित नसते तर आज ती विदुषी स्त्री असती अशी माझी समजूत आहे. तिचा शिकण्याचा कंटाळा मी जिंकू शकलो असतो. शुद्ध प्रेमाला काही अशक्य नाही, हे मला माहित आहे.
अशा तऱ्हेने स्वस्त्रीविषयी आसक्त असूनही त्यामानाने मी बचावलो कसा त्याचे एक कारण वर दाखविलेच आहे. दुसरे एक कारण नमूद करण्यासारखे आहे. शेकडो अनुभवांवरून मी हे सार काढले आहे की ज्याची निष्ठा खरी आहे त्याला प्रभूच तारतो. हिंदू समाजात बालविवाहाचा घातकी रिवाज आहे. त्याबरोबरच त्यातून थोडी मोकळीक मिळावी अशीही पद्धती ठेवलेली आहे. बाल पती-पत्नींना त्यांचे आईबाप फार काळ एकत्र राहू देत नाहीत. बाल पत्नीचा अर्ध्याहून अधिक काळ तिच्या माहेरी जातो. आमच्याही बाबतीत तसेच झाले. म्हणजे १३ ते १९ वर्षांच्या दरम्यान आमचे मधून मधून मिळून तीन वर्षाहून जास्त वेळ एकत्र राहणे झाले नसावे. सात-आठ महिने होतात तो आई बापाकडून माघारी येईच. त्यावेळी ते फार दु:सह वाटत असे. परंतु त्यामुळेच आम्ही दोघेही बचावलो. पुढे १८ वर्षाच्या वयात मी विलायतेला गेलो त्यामुळे अनुकूल आणि दीर्घ मुदतीचा वियोग आला. विलायतेहून आल्यावर एकत्र अशी सहा एक महिनेच राहिली असू. कारण मला राजकोर्ट मुंबईदरम्यान यायचे जायचे असायचे. तितक्यातच पुन: दक्षिण आफ्रिकेचे बोलावणे आले एवढ्या अवधीत मी नीट जागृतही झालो होतो.

Comments
Post a Comment