खंड १ ला: ११. विलायतेची तयारी
खंड १ ला:
११. विलायतेची तयारी
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ३३-३७
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
सन १८८७ साली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा झाली. देशाची काय किंवा आमच्या गांधी कुटुंबाची काय, गरिबीच अशा प्रकारची की परीक्षा द्यायला अहमदाबाद व मुंबई अशी दोन ठिकाणे असल्यास त्या स्थितीतील काठेवाडी लोक जवळचे व स्वस्त असे अहमदाबादच पसंत करणार. माझेही तसेच झाले. राजकोट ते अहमदाबाद हाच माझा पहिला एकट्याने केलेला प्रवास.
पास झाल्यानंतर कॉलेजात जाऊन शिक्षण पुढे चालवावे, अशी वडील मंडळींची इच्छा होती. मुंबईतही कॉलेज आणि भावनगरलाही कॉलेज. भावनगरला खर्च कमी म्हणून भावनागरच्या शामळदास कॉलेजात जाण्याचे ठरले. तेथे मला काही समजेना. सर्वच कठीण वाटू लागले. अध्यापकांच्या व्याख्यानामध्ये गोडीही वाटेना, आणि समजही पडेना. त्यांत अध्यापकांचा दोष नव्हता. दोष माझ्या कच्चेपणाचाच होता. त्यावेळी शामळदास कॉलेजचे अध्यापक तर पहिल्या दर्जाचे समजले जात. पहिली सहामाही पुरी करून घरी आलो.
कुटुंबाचे जुने मित्र व सल्लागार एक विद्वान व्यवहारकुशल ब्राह्मण मावजी दवे म्हणून होते. त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतरही कुटुंबाशी असलेला संबंध कायम ठेवला होता. ते या सुट्टीच्या दिवसांत आमच्या घरी आले होते. मातुश्री व वडील बंधू यांच्याबरोबर गोष्टी बोलत असता माझ्या शिक्षणासंबंधी त्यांनी चौकशी केली. मी शामळदास कॉलेजात आहे हे ऐकून ते म्हणाले, "काळ बदलला आहे, कबा गांधींची गादी सांभाळण्याची तुम्हा भावांपैकी कोणाची इच्छा असेल, तर ती शिक्षणाखेरीज मिळणार नाही. हा मुलगा अजून शिकतो आहे, त्या अर्थी गादी सांभाळण्याचे काम त्यालाच उचलायला लावले पाहिजे. त्याची अजून चारपाच वर्षे बी.ए. होईपर्यंत जातील. आणखी इतका वेळ घालवून त्याला पन्नास-साठ रुपयांची नोकरी लागेल. दिवाणपद नाही मिळणार. बरे, त्यापुढे त्याला माझ्या मुलाप्रमाणे वकील करावा, तर आणखीही थोडी वर्षे जाणार, आणि तोपर्यंत तर दिवाणगिरीसाठी वकीलही कितीतरी तयार झालेले असतील! तुम्ही त्याला विलायतेला पाठवले पाहिजे. केवळराम (मावजी दवेंच्या मुलाचे नाव) म्हणतो, की तिकडे शिक्षण सोपे असते. तीन वर्षात शिकून परत येईल. खर्च पण चारपाच हजाराहून जास्त होणार नाही. तो नवा बॅरिस्टर आला आहे, तो पहा ना, केवढ्या थाटात राहतो! कारभाऱ्याची जागा त्याला पाहिजे तर आत्ता मिळेल. माझा तर सल्ला असा आहे की तुम्ही मोहनदासला यंदाच विलयतेला पाठवून द्यावे. आमच्या केवळरामचे इंग्लंडात पुष्कळ मित्र आहेत, त्यांच्याबरोबर तो शिफारसपत्रे देईल, म्हणजे त्याला तिकडे कसलीच अडचण पडणार नाही."
स्वतःचा सल्ला मान्य होणार याबद्दल जणू काय शंकाच नाही अशा तऱ्हेने जोशींजींनी विचारले:
"कसे काय, तुला विलायतेला जाणे आवडेल की इथेच शिकत बसणे?" मला तर आवडत होते, तेच वैद्याने सांगितले. कॉलेजात अडचणींनी मी भिऊन गेलेलोच होतो. मी म्हटले, "मला विलायतेला पाठवाल, तर फारच चांगले. कॉलेजात झपझप पास होता येईलसे वाटत नाहीच. परंतु मला डॉक्टरचा धंदा शिकण्यासाठी नाही पाठवता यायचे?"
माझे बंधू मध्येच म्हणाले:
" ते तर बापूंना आवडत नसे. तुझी गोष्ट निघताच ते म्हणत, की आपण वैष्णवांनी हाड-मांस कापण्याचे काम करू नये. बापूंचा विचार तुला वकील करण्याचाच होता."
जोशींनी दुजोरा दिला: "गांधीजींप्रमाणे डॉक्टरकीचा मला तिरस्कार वाटत नाही. आपली शास्त्रं या धंद्याला कमी लेखीत नाहीत. पण डॉक्टर होऊन तू दिवाण बनणार नाहीस. तुला दिवाणगिरी किंवा त्याहून उच्च जागा मिळावी हे तर मला पाहिजे आहे. तरच तुमचे हे एवढे मोठे कुटुंब झाकले जाणार. काळ दिवसेंदिवस पालटत चालला आहे, आणि कठीण होतो आहे. म्हणून बॅरिस्टर होण्यात शहाणपण आहे. "
मातुश्रीकडे वळून म्हणतात, "आज आता मी जातो. माझ्या बोलण्याचा विचार करून पाहा. मी पुनः येईन तेंव्हा तयारी असल्याची बातमी ऐकण्याची आशा ठेवून येईन. काही अडचण आल्यास सांगा."
जोशीजी गेले. मी तर हवेत किल्ले बांधू लागलो. वडील बंधू फिकिरीत पडले; पैशाचे कसे करायचे? शिवाय, माझ्यासारख्या नवयुवकाला इतके दूर पाठवावे तरी कसे?
मातुश्रीला तर काहीच सुचेना. तिला वियोगाची गोष्टच सहन झाली नाही. पण प्रथम तरी तिने असेच सांगितले: आपल्या कुटुंबात आता असे काकाच राहिले आहेत. अर्थात पहिल्या प्रथम त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांनी आज्ञा केली तर मग आपण विचार करायचा."
वडील बंधूंना दुसरा एक विचार सुचला: "पोरबंदर राज्यावर आपला हक्क आहे. लेलीसाहेब तेथील ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. आपल्या कुटुंबाविषयी त्यांचे चांगले मत आहे. काकांवर त्यांची विशेष मर्जी आहे. ते कदाचित संस्थानतर्फे तुला थोडीबहुत मदतही करतील."
मला हे सर्व पटले. मी पोरबंदरला जाण्यास तयार झालो. त्याकाळी रेल्वे नव्हती, गाडीरस्ता होता. पाच दिवसांचा रस्ता होता. मी स्वभावाने भित्रा होतो हे मागे सांगितलेच आहे. परंतु या प्रसंगी माझी भीती पार पळाली. विलायतेला जाण्याच्या इच्छेने माझ्यावर ताबा बसवला. मी धोराजीपर्यंत बैलगाडी केली. धोराजीहून पुढे एक दिवस लौकर पोचण्याच्या इराद्याने उंट केला. उंटाच्या स्वारीचाही हा पहिलाच अनुभव.
पोरबंदरला पोचलो. काकांना साष्टांग प्रणाम केला. सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी विचार करून जबाब दिला:
" विलायतेला जाऊन आपल्याला धर्म राखता येईल की नाही हे मला सांगता येत नाही. सर्व गोष्टी ऐकतो, त्यावरून तरी मला शंका वाटते. असे पाहा ना! बड्याबड्या बॅरिस्टरांच्या मला गाठी घ्याव्या लागतात, तेव्हा त्यांच्या आणि साहेबांच्या राहणीत मला तरी काही भेद दिसत नाही. त्यांना खाण्यापिण्याचा काही विधिनिषेध नसतो. सिगारेट तर तोंडातून निघायचीच नाही. पोशाख पाहावा तर तोही तसाच नंगा. हे सर्व आपल्या कुटुंबाला शोभणारे नाही. पण मी तुझ्या साहसामध्ये विघ्न घालू इच्छित नाही. मी तर थोड्याच दिवसांनी यात्रेला जाणार. मला आता थोडीच वर्षे काढायची आहे. मरणाच्या दारी आलेल्या मी तुला विलायतेला जाण्याची- समुद्र ओलांडण्याची- कशी परवानगी द्यावी? पण मी तुझ्या आड येणार नाही. खरी परवानगी तुझ्या आईची. तिने जर तुला परवानगी दिली तर तू सुखाने जा. मी तुला अडवीत नाही, एवढेच सांग. माझा आशीर्वाद तुला आहेच."
"याहून जास्तीची आशा तुमच्यापासून मी ठेवणे योग्य होणार नाही. मला आता माझ्या आईचे समाधान केले पाहिजे. परंतु मला लेलीसाहेबांवर शिफारस तर द्याल ना?"
काका म्हणाले, "ते माझ्याकडून कसे व्हावे? परंतु साहेब भले आहेत. तू चिठ्ठी लिही. कुटुंबाची ओळख दे. म्हणजे मग ते तुला भेटण्याचा वेळ खात्रीने देतील, आणि वाटल्यास मदत पण करतील."
काकांनी साहेबांकडे शिफारस का केली नाही याची मला कल्पना नाही. मला अस्पष्ट स्मरण आहे की विलायतेला जाण्यासारख्या धर्मविरुद्ध कार्यामध्ये इतकी सरळ मदत देण्याचा त्यांना संकोच वाटला.
मी लेलीसाहेबांना चिठ्ठी लिहिली. त्यांनी आपल्या राहण्याच्या बंगल्यावर मला भेटायला बोलवले, त्या बंगल्याचा जिना चढत असता साहेब मला भेटले, आणि "तू बी.ए. हो, मग मला भेट. सध्या काही मदत देता येणार नाही," असे म्हणून वर चढून गेले. मी खूप तयारी करून पुष्कळशी वाक्ये घोकून गेलो होतो. खाली वाकून दोन्ही हातांनी सलाम केला. परंतु माझी सारी मेहनत व्यर्थ गेली!
पत्नीच्या दागिन्यांवर माझी दृष्टी गेली. वडील बंधूंवर अपार श्रद्धा होती. त्यांच्या उदारतेला सीमा नव्हती. त्यांचे प्रेम पित्यासारखे होते.
मी पोरबंदरहून निघालो. राजकोटला येऊन सर्व गोष्टी सांगितल्या. जोशींची सल्लामसलत घेतली. त्यांनी कर्ज काढूनही मला पाठविण्याची शिफारस केली. मी माझ्या पत्नीच्या हिश्श्याचे दकाढून टाकण्याची सूचना केली. त्यातून दोन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त येण्यासारखे नव्हते. बंधूंनी कसेही करून पैसे पुरे पाडण्याची प्रतिज्ञा केली.
आईची समजूत कशी पार पाडावी? तिने बारीक तपास सुरू केला होता. कोणी म्हणे तरुण लोक विलायतेला जाऊन बहकतात; कोणी म्हणे, ते मांसाहार करतात; तर कोणी सांगत, दारूशिवाय चालायचेच नाही. आईने हे सर्व मला सांगितले. मी म्हटले, "पण तुला माझा विश्वास नाही? मी तुला फसवणार नाही; शपथ घेऊन सांगतो की या तिन्ही वस्तूंपासून मी दूर राहिन. तसा धोका असला, तर जोशीजी मला कसे जाऊ देतील?"
आई म्हणाली, "मला तुझा विश्वास आहे. पण दूर देशात कसे होणार? माझी अक्कल गुंग होते. मी स्वामींना विचारते. बेचरजी स्वामी मोढवण्यातून जैन साधू झाले होते. जोशीजीप्रमाणे ते पण आमचे सल्लागार होते. त्यांची मदत झाली. त्यांनी सांगितले, मी या मुलापासून या तिन्ही बाबतीत व्रत घेववितो, मग त्याला जाऊ देण्यास हरकत नाही येणार."
त्यांनी प्रतिज्ञा घेवविली व मी मांस, मदिरा आणि स्त्रीसंग यांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा केली. आईने परवानगी दिली.
हायस्कुलात समारंभ झाला. राजकोटचा एक तरुण विलायतेला जातो, याचे लोकांना नवल वाटले. उत्तरादाखल मी थोडे लिहून नेले होते. पण तेही मोठ्या शिकस्तीनेच वाचू शकलो. माझे डोके गरगरत होते, शरीर कापत होते, एवढे मला आठवते.
वडील मंडळींचा आशीर्वाद घेऊन मुंबईत जाण्यास निघालो. मुंबईचा हा पहिलाच प्रवास; वडील बंधू बरोबर आले.
पण शुभकार्यात शंभर विघ्ने! मुंबईचे फाटक चटकन खुलण्यासारखे नव्हते.

Comments
Post a Comment