खंड १ ला: ३. बालविवाह

खंड १ ला:

३. बालविवाह:
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ७-१०
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************

हे प्रकरण मला लिहावे लागू नये अशी माझी इच्छा आहे. परंतु या कथेमध्ये मला अशा तर्‍हेचे कितीतरी कडू घोट प्यावे लागणार आहेत. स्वतःला 'सत्याचा पुजारी' म्हणून घेणाऱ्या मला दुसरा मार्गच नाही.

तेरा वर्षाचा असताना माझा विवाह झाला, ही गोष्ट लिहिताना मला दुःख होते. आज माझ्यासमोर बारा तेरा वर्षाची मुले आहेत. त्यांच्याकडे पाहतो आणि माझ्या विवाहाचे स्मरण करतो, तेव्हा मला स्वतःबद्दल कींव वाटू लागते; आणि माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बजावल्याबद्दल या मुलांना धन्यवाद देण्याची इच्छा होते. तेरा वर्षाच्या वयात झालेल्या माझ्या विवाहाच्या समर्थनपर असा एकही नैतिक युक्तिवाद मला सुचू शकत नाही.

मी 'सगाई' ( गांधीजी काठेवाडचे. गुजराथेत विवाह म्हणजे वाङ्निश्चय किंवा वर उल्लेखिलेली 'सगाई') विषयी लिहितो अशी वाचकाने समजूत करून घेऊ नये. काठेवाडांत विवाह म्हणजे लग्न, 'सगाई' नव्हे. 'सगाई' म्हणजे मुलामुलीचे लग्न लावण्या संबंधी वर -वधूच्या आईबापांमध्ये झालेला करार. सगाई मोडू शकते. सगाई झाली आणि वर मयत झाला, तर कन्या विधवा होत नाही. सगाईमध्ये वर व कन्या यांचा काही संबंध येत नाही. दोघांना त्याची गंधवार्ताही नसते. माझी एकामागून एक तीनदा सगाई झाली. ती केव्हा व कशी झाली, याची मला गंधवार्ताही नाही. दोन कन्या एकामागून एक मृत्यू पावल्या, असे मला कोणी सांगितले. त्यावरून मला माहित की माझ्या तीन सगाया झाल्या होत्या. तिसरी सगाई सातएक वर्षाच्या वयाला झालेली असावी असे काहीसे स्मरते. परंतु सगाई झाली त्यावेळी मला काही सांगितले असल्याचे माहीत नाही. विवाहामध्ये वर व कन्या दोहोंची जरूर पडते. विवाहामध्ये विधी करायचा असतो. मी लिहीत आहे ते या विवाहासंबंधी. विवाहाचे मला पूर्ण स्मरण आहे.

आम्ही तीन भाऊ होतो, हे वाचकांना माहीतच आहे. त्यापैकी वडील भावाचे लग्न होऊन चुकले होते. माझे बंधू माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठे होते. त्यांचा, माझा चुलत भाऊ कदाचित माझ्याहून वर्षभराने मोठा असेल त्याचा व माझा, असे तीन विवाह एकत्र करण्याचा वडील मंडळींनी बेत केला. यात आमच्या कल्याणाचा प्रश्न नव्हता. इच्छेबद्दल तर त्याहूनही नव्हता. यात फक्त वडिलांच्या सोयीचा आणि खर्चाचा प्रश्न होता.

हिंदूसमाजामध्ये विवाह अशी तशी गोष्ट नाही. वर वधूचे आईबाप लग्नापायी सर्वस्व घालवून बसतात, पैसे उधळतात आणि काळाचा अपव्यय करतात. आगाऊ कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होते. कपडे तयार होतात, दागिने घडवायचे असतात, गावभोजनाचे अंदाज चालतात, भोजनासाठी निरनिराळी पक्वान्ने करण्याच्या शर्यती सुरु होतात. गळा असो किंवा नसो, बायका घसेबसेतो गाणी गातात, आजारी पण पडतात! शेजाऱ्यांच्या शांततेचा भंग करतात. प्रसंग येईल तेव्हा त्यांना स्वतःलाही असेच सर्व करायचे असते, म्हणून बिचारे शेजारीही गोंगाट, खरकटे आणि इतर घाण मुकाट्याने सहन करतात!

"एवढा गोंधळ तीन वेळा करण्यापेक्षा एकाच वेळी उरकून घेतला तर किती चांगले? लग्न थोडक्या खर्चात आणि थाटाने होईल" कारण की तीन लग्ने एकत्र करायची, तर द्रव्य मुबलकपणे खर्च करण्यास हरकत नाही. वडील व चुलते वृद्ध होते. आम्ही त्यांचे सर्वात धाकटे मुलगे. तेव्हा आमच्या लग्नाचा सोहळा डोळ्यादेखत व्हावा अशीही इच्छा असायचीच. या व अशा तऱ्हेच्या विचारांनी हे तिन्ही विवाह एकत्र करण्याचा निश्चय झाला आणि मी वर सांगितल्याप्रमाणे त्यांची तयारी आणि सामग्री कित्येक महिन्यांपासून चालू होती.

आम्हा भावांना तयारी चाललेली पाहूनच समजले, की लग्ने व्हायची आहेत. त्यावेळी माझ्या मनात चांगले चांगले कपडे वापरायला मिळतील, वाजंत्री वाजतील, वरात निघेल, सुग्रास भोजने मिळतील, एका नव्या मुलीबरोबर खेळ करायला मिळतील वगैरे हौसेपलीकडे दुसरे काही असल्याचे स्मरत नाही. विषयवासना मागाहून उद्भवली. ती कशी उद्भवली त्याचे वर्णन मी करू शकेन. परंतु वाचकांनी तशी जिज्ञासा ठेवू नये. मी माझ्या लज्जेवर झाकण घालू इच्छितो. काही गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या पुढे येतील. परंतु हे लिहिण्यात मी जो मध्यबिंदू नजरेसमोर ठेविला आहे, त्याचा आणि ह्या बाबतीतील बारीक सारीक गोष्टीचा फार थोडा संबंध आहे.

आम्हा दोन भावांना राजकोटहून पोरबंदरला नेले. तेथे हळद लावण्याचे वगैरे विधी झाले. ते सर्व मनोरंजक असले तरी सोडून देणेच योग्य.

वडील दिवाण झाले तरी नोकरच. शिवाय राजाच्या मर्जीतले, त्यामुळे विशेषच पराधीन. ठाकूरसाहेब शेवटच्या घटकेपर्यंत जाऊ देत ना. शेवटी जाऊ दिले तेव्हा मुद्दाम टप्प्यांची व्यवस्था केली, आणि दोनच दिवस अगोदर पाठवले. पण विधीघटित निराळेच होते. राजकोटहून पोरबंदर 60 कोस आहे. गार्डी रस्त्याने पाच दिवसांची वाट होती. वडील तीन दिवसांत आले. शेवटच्या मजलीत टांगा उलटला. वडिलांना जबर दुखापत झाली. हातावर पट्टी, पाठीवर पट्टी. विवाहातून त्यांचा आणि आमचा अर्धा आनंद मावळला. पण विवाह तर झालेच. लिहिलेले मुहूर्त काही टळणार आहेत? मी तर विवाहाच्या बालउत्साहात वडिलांचे दुःख विसरून गेलो.

पितृभक्त खराच, पण विषयभक्तही तितकाच ना? येथे विषयाचा अर्थ एकाच इंद्रियाचा विषय नव्हे, तर भोगमात्र. मातापितरांच्या भक्तीसाठी सर्व सुखांचा त्याग केला पाहिजे, हे ज्ञान पुढे यावयाचे होते. असे असूनही जणू काय मला या भोगेच्छेचे प्रायश्चित्त भोगणेच जरूर होते. म्हणून माझ्या आयुष्यात असा एक वेडावाकडा प्रसंग घडला, की जो मला अद्यापपर्यंत सलत आहे. जेव्हा जेव्हा निष्कुलानंदांचे:
" त्याग न टके रे वैराग्य विना, करीए कोटि उपाय जी"
हे गीत मी गातो किंवा ऐकतो, त्या त्या वेळी हा दारुण आणि कटू प्रसंग मला आठवतो आणि शरम आणतो.

वडिलांनी उसने अवसान आणून चेहरा प्रफुल्ल ठेवला आणि शारीरिक वेदना होत असताही लग्नात परिपूर्ण भाग घेतला. वडील कोणत्या प्रसंगी कोठे बसले होते, वगैरे सर्व जसेच्या तसे मला अजून आठवते. बालविवाहाचा विचार करताना वडिलांच्या कृत्याची ची टीका मी आज केली आहे, ती काही माझ्या मनाने त्यावेळी थोडीच केली होती? त्यावेळी सर्वकाही यथायोग्य आणि मनाजोगते वाटत होते. लग्नाची आवड होती. आणि वडील करतात ते सर्व बरोबरच आहे असे वाटत होते. त्यामुळे त्यावेळची स्मरणे ताजी आहेत.

बोहल्यावर बसलो, सप्तपदी केली, शिरा खाल्ला, घास दिले आणि पती पत्नी तेव्हापासूनच एकत्र राहू लागलो. ती पहिली रात्र! दोन निर्दोष बालकांनी अजाणता संसारात प्रवेश केला! मी पहिल्या रात्री कसे वागावे त्याची वहिनीने शिकवण दिली होती, धर्मपत्नीला कोणी शिकवण दिली होती, ते विचारून घेतल्याचे मला स्मरत नाही. अजूनही विचारता येईल, परंतु विचारण्याची लवलेश इच्छा होत नाही. वाचकांना एवढेच सांगू शकतो, की आम्ही दोघेही एकमेकांना भीत होतो अशी अंधुक आठवण आहे. एकमेकांची लाज तर वाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे, हे मला काय कळे? मिळालेला शिकवणीचा तरी काय उपयोग? पण या गोष्टी काय शिकवाव्या लागतात? जेथे संस्कारच बलवान असतात, तेथे शिकवण ही व्यर्थ बडबड होऊन बसते. हळूहळू एकमेकांना ओळखू लागलो. बोलू चालू लागलो. आम्ही दोघं सारख्या वयाची आहोत. पण मी मात्र स्वामित्व गाजवायला सुरुवात केली...

Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५