खंड १ ला: १२. जातीबाहेर
खंड १ ला:
१२. जातीबाहेर
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ३७-३९
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
मातेची आज्ञा व आशीर्वाद घेऊन व थोड्या महिन्यांच्या अपत्याला पत्नीसह सोडून मी मोठ्या हौसेने मुंबईत पोचलो. पोचलो खरा, पण तेथे मित्रमंडळींनी बंधूंना सांगितले की, "जून-जुलै महिन्यांमध्ये हिंदी महासागरात तुफान असते आणि याची तर ही पहिलीच समुद्रावरची सफर. तरी याला दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पाठविले पाहिजे" त्यातच कोणीसे तुफानात सापडून कोठलीशी एक बोट बुडाल्याचे सांगितले. त्यामुळे वडील बंधू घाबरले. त्यांनी अशा तऱ्हेने जीव धोक्यात घालून मला लगेच पाठविण्याचे नाकारले, आणि मला मुंबईत मित्राकडे ठेवून स्वतः परत आपल्या नोकरीवर हजर होण्यासाठी राजकोटला गेले. एका मेव्हण्यापाशी पैसे ठेवून गेले, व कित्येक मित्रांपाशी मला मदत करण्याची शिफारस करून गेले.
मुंबईत माझा वेळ जाईना. मला विलायतेची स्वप्ने पडत.
मध्यंतरी ज्ञातीमध्ये खळबळाट झाला. ज्ञातीची सभा बोलविण्यात आली. कोणीही मोढ वाणिया अद्यापपर्यंत विलायतेला गेला नव्हता. आणि मी चाललो, त्या अर्थी मला फैलावर घेतले पाहिजे! मला ज्ञातीच्या वाडीमध्ये हजर राहण्याबद्दल फर्मान आले. मी गेलो. मला एकाएकी धैर्य कुठून आले देव जाणे! हजर होण्यात मला यत्किंचितही संकोच किंवा भय वाटले नाही. ज्ञातीच्या प्रमुख शेठजींशी दूरचे नातेही होते. वडिलांचा व त्यांचा चांगला स्नेह संबंध होता. त्यांनी मला सांगितले: "ज्ञातीचे मत आहे की तू विलायतेला जायचा विचार केला आहेस, तो बरोबर नाही. आपल्या धर्मामध्ये समुद्र ओलांडून जाण्याची मनाई आहे. शिवाय विलायतेत धर्म सांभाळता येणार नाही असे आम्ही ऐकतो. तेथे साहेब लोकांबरोबर खावे प्यावे लागणार,"
मी जबाब दिला, "मला तर वाटते, की विलायतेला जाण्यात बिलकुल अधर्म नाही. मला तिकडे जाऊन विद्याभ्यास करावयाचा आहे. शिवाय, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला भीती वाटते, त्या गोष्टीपासून दूर राहण्याची मी माझ्या मातुश्रीपाशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी त्यांपासून दूर राहू शकेन."
" पण आम्ही तुला सांगतो, की तिकडे धर्मपालन शक्यच नाही. तुझ्या वडिलांचा व माझा कशा तऱ्हेचा संबंध होता, ते तुला माहीतच आहे. माझे सांगणे तू मान्य केले पाहिजे," शेठ बोलले.
"आपल्याशी असलेला संबंध मला माहित आहे. आपण मला वडिलांसमान आहात. परंतु या बाबतीत माझा निरुपाय आहे. विलायतेला जाण्याचा माझा निश्चय मी फिरवू शकत नाही. माझ्या वडिलांचे मित्र व सल्लागार, जे विद्वान ब्राह्मण आहेत, त्यांचे मत आहे की माझ्या विलायतेला जाण्यामध्ये काही वावगे नाही. माझ्या मातुश्रींची व बंधूंची परवानगीही मला मिळाली आहे," मी जवाब दिला.
"परंतु ज्ञातीचा हुकूम मानणार नाहीस?"
'माझा निरुपाय आहे. मला वाटते, की या बाबतीत ज्ञातीने मध्ये न पडणे बरे."
या उत्तराने शेठजींना क्रोध चढला. मला चार-दोन सुनावल्या. मी गप्प राहिलो. शेठजींनी हुकूम सोडला: "या मुलाला आजपासून ज्ञातीबहिष्कृत समजण्यात येईल. जो कोणी त्याला मदत करीन किंवा पोचवायला जाईल, त्याला ज्ञाती जाब विचारील व त्याला सव्वा रुपया दंड होईल."
माझ्यावर या ठरावाचा काहीएक परिणाम झाला नाही. मी शेठजींची रजा घेतली. माझ्या बंधूंवर या ठरावाचा काय परिणाम होतो, ही एक विचारात घेण्यासारखी गोष्ट होती. ते भिऊन गेले तर? सुदैवाने ते भक्कम राहिले, आणि मला उत्तरी लिहिले, की ज्ञातीचा ठराव झाला तरी आपण स्वतः मला विलायतेला जाण्याच्या बाबतीत अटकाव करणार नाही.
ही गोष्ट घडल्यानंतर मी अधिकच अधीर झालो. बंधूंवर दडपण आले तर? दुसरेच काही विघ्न उपस्थित झाले तर? या काळजीत मी दिवस कंठित होतो. इतक्यात बातमी मिळाली की चार सप्टेंबर रोजी निघणाऱ्या बोटीने जुनागडचे एक वकील बॅरीस्टर होण्यासाठी जाणार आहेत. ज्या मित्रापाशी बंधूंनी माझ्याबद्दल शिफारस केली होती त्यांना मी भेटलो. त्यांनीही ही सोबत चुकवू नये असा सल्ला दिला. वेळ फार थोडा होता. बंधूंना तार केली आणि जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. मी मेव्हण्यापाशी पैसे मागितले. त्यांनी ज्ञातीच्या हुकुमाची अडचण सांगितली. ज्ञातीबाहेर पडून त्यांचे चालण्यासारखे नव्हते. मी आमच्या कुटुंबाच्या एका मित्राकडे जाऊन त्याजपाशी "भाड्याला वगैरे लागणारे पैसे मला द्या व बंधूपासून मागून घ्या" अशी विनंती केली. या मित्रांनी तसे करण्याचे कबूल केले; एवढेच नव्हे, तर मला प्रोत्साहनही दिले. मी त्यांचे आभार मानले, पैसे घेतले आणि तिकीट काढले.
विलायतेच्या प्रवासाचे सर्व सामान तयार करायचे होते. एक दुसरे अनुभवी मित्र होते, त्यांनी सामान तयार करविले. मला सगळेच विचित्र वाटले. काही आवडले, काही बिलकुल रुचेना. नेकटाय, की जो मी मागाहून हौसेने वापरू लागलो तो तर मुळीच आवडेना. आखूड जाकिट म्हणजे तर पोशाख करूनही नागवे राहण्यासारखे वाटले. परंतु विलायतेला जाण्याच्या उत्सुकतेपुढे या नापसंतीची कथा काय? बरोबर फराळाची सामग्रीही यथास्थित घेतली होती.
माझी जागा पण मित्रमंडळींनी त्र्यंबकराय मुजुमदारांच्याच (हे त्या जुनागडच्या वकिलांचे नाव) खोलीमध्ये राखून घेतली. त्यांच्यापाशी माझी शिफारसही केली. ते तर प्रौढ वयाचे अनुभवी गृहस्थ होते. मी अठरा वर्षांचा, दुनियेचा अनुभव नसलेला अल्पवयी तरुण होतो. मुजुमदारांनी माझ्याबद्दल काळजी करू नका असे मित्रांना सांगितले.
अशा तऱ्हेने सन १८८८ च्या सप्टेंबरच्या चौथ्या तारखेला मी मुंबई बंदर सोडले.

Comments
Post a Comment