खंड १ ला: ८. चोरी आणि प्रायश्चित्त
खंड १ ला:
८. चोरी आणि प्रायश्चित्त
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. २३-२६
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
मांसाहाराच्याच सुमारास, तसेच त्यापूर्वी घडलेल्या कित्येक दोषांचे वर्णन अजून करावयाचे राहिले आहे. हे दोष विवाहापूर्वीचे किंवा त्यानंतर लवकरच घडलेले आहेत.
माझ्या एका नातलगाबरोबर मला विडी पिण्याची चटक लागली. आमच्यापाशी पैसे नसत. विडी पिण्यापासून काही फायदा आहे किंवा तिच्या वासात काही मजा आहे, असे आम्हा दोघांपैकी एकालाही वाटत नव्हते; परंतु फक्त धूर काढण्यातच काही मजा असावी अशी समजूत होती. माझ्या चुलत्यांना विडी ओढण्याची सवय होती. त्यांना व इतरांना धूर काढतांना पाहून आम्हालाही विडी फुकण्याची इच्छा झाली. गाठीला पैसा तर नाही. तेंव्हा काकांनी फेकून दिलेली विड्यांची थोटके चोरण्यास आम्ही सुरुवात केली.
परंतु विड्यांचे तुकडे नेहमीच कोठून मिळणार? शिवाय, त्यातून विशेष धूरही निघेना. म्हणून नोकराच्या गाठीला चारदोन दिडक्या असत, त्यांतील मधून मधून एखादी लांबविण्याला सुरुवात केली, आणि तिच्या विड्या विकत आणू लागलो. परंतु त्या ठेवायच्या कुठे, हा प्रश्न पडला. वडिलांच्या देखत विडी प्यायची नाही हे माहीत होते. कसेबसे करून चारदोन दिडक्या चोरून काही आठवडे चालविले. मध्यंतरी अशी बातमी मिळाली की एक झाड असते, (त्याचे नाव आता लक्षात नाही... त्याच्या डहाळ्या विडीप्रमाणेच पेटतात, आणि त्यांही विडीप्रमाणेच ओढता येतात. आम्ही त्या आणून ओढू लागलो,,
परंतु समाधान होईना; आमची पराधीनता आम्हाला बोचू लागली. वडिलांच्या परवानगीशिवाय काहीच करता येऊ नये, याचे फार वाईट वाटले. आम्ही कंटाळलो आणि आत्महत्या करण्याचा निश्चय केला!
पण आत्महत्या कशी करायची; विष कोण देणार? धोतऱ्याच्या फळातील बिया खाल्ल्या तर मनुष्य मरतो असे ऐकले. रानात जाऊन आम्ही त्या मिळवून आणल्या. संध्याकाळची वेळ शोधली. केदारजीच्या देवळात नंदादीपात तूप घातले, देवदर्शन घेतले आणि एकांताची जागा शोधून काढली. परंतु विष खाण्याची छाती होई ना! तत्काळ मृत्यू आला नाही तर? मरून तरी काय मिळणार? पराधीनता भोगून टाकलेली काय वाईट? तरीही चारदोन बिया खाल्ल्याच! आणखी खाण्याचे मात्र धैर्य होईना. दोघांनाही मृत्यूची भीती वाटली, आणि रामजीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन शांत होण्याचा व आत्महत्येची गोष्ट विसरून जाण्याचा आम्ही ठराव केला.
आत्महत्येचा बेत करणे सोपे, पण प्रत्यक्ष आत्महत्या करणे सोपे नाही, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यावरून जेव्हा कोणी आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागतो, तेव्हा त्यांचा माझ्यावर फारच थोडा परिणाम होतो- मुळीच होत नाही म्हटले तरी चालेल.
या आत्महत्येच्या विचारापासून एक परिणाम घडून आला. तो हा की आम्ही दोघेही उष्ट्या विड्या चोरून पिण्याची व नोकराच्या दिडक्या चोरून त्यांच्या विड्या पिण्याची सवय पार विसरून गेलो. मोठेपणी बिडी पिण्याची इच्छाच मला कधी झाली नाही; आणि ही सवय जंगली, गलिच्छ व हानिकारक आहे, असेच मी नेहमी मानीत आलो आहे. विडीचा इतका जबरदस्त शोख दुनियेला का असावा, त्याचे कारण समजण्याची शक्ती मी कधीच मिळवू शकलो नाही. आगगाडीच्या डब्यात जेथे खूप विड्या फुकल्या जात असतात, तेथे बसणे मला असह्य होते व त्यांच्या धुराने गुदमरून जातो.
विड्यांची थोटके चोरणे, तसेच त्यासाठी चाकरांचे पैसे चोरणे, या गुन्ह्यांपेक्षाही दुसरा एक चोरीचा गुन्हा जो माझ्या हातुन घडला, तो मी जास्त भयंकर समजतो. विडीचा गुन्हा घडला तेव्हाचे वय बारा-तेरा वर्षांची असेल; कदाचित त्याहूनही कमी. दुसऱ्या चोरीच्या वेळी वय पंधरा वर्षाचे असावे. ही चोरी माझ्या मांसाहारी बंधूंच्या सोन्याच्या कड्याच्या तुकड्याची होय. त्यांना थोडेसे, म्हणजे 25 एक रुपयांचे कर्ज झाले होते. ते फेडावे कसे त्याचा आम्ही उभयता बंधू विचार करीत होतो. माझ्या बंधूंच्या हातात भरीव कडे होते. त्यातून एक तोळा सोने कापून काढणे कठीण नव्हते.
कडे कापले, कर्ज फिटले. परंतु मला ही गोष्ट असह्य झाली. इत:पर चोरी म्हणून करायची नाही, असा मी निश्चय केला. वडिलांपाशी कबुलीही देऊन टाकली पाहिजे असे वाटू लागले. पण जीभ तर चालेच ना. वडील स्वतः मला मारतील अशी भीती वाटत नव्हती. त्यांनी उभ्या जन्मात आम्हाला भावांना कधीतरी मारले असेल असे आठवत नाही. परंतु त्यांना स्वत:ला दुःख होईल. डोकेही आपटून घेतले तर? हा धोका सहन करूनही गुन्हा कबुल केलाच पाहिजे; त्याखेरीज दोषाचे क्षालन होणार नाही, असे मनाने घेतले.
अखेरीला ठराव केला की चिठ्ठी लिहून गुन्हा कबूल करावा आणि माफी मागावी. चिठ्ठी लिहिली आणि स्वतः त्यांच्या हाती नेऊन दिली. चिठ्ठीमध्ये सर्व गुन्हा कबूल करून शिक्षा मागितली होती, त्यांनी स्वतःवर काही दुःख ओढवून घेऊ नये अशी विनवणी केली होती; व इत:पर अशा तर्हेचा गुन्हा न करण्याची प्रतिज्ञा केली होती.
मी कापऱ्या हाताने ती चिठ्ठी वडिलांच्या हातात दिली. मी त्यांच्या उच्चासनाच्या समोर बसून राहिलो. त्या वेळी त्यांना भगंदराची व्यथा होती. त्यामुळे ते अंथरुणाला खिळलेले होते. खाटेऐवजी लाकडी उच्चासन वापरीत.
त्यांनी चिठ्ठी वाचली. डोळ्यांतून मोत्यांचे बिंदू गळले. चिठ्ठी भिजली. त्यांनी क्षणमात्र डोळे मिटून धरले, ती चिठ्ठी फाडून टाकली आणि वाचण्यासाठी बसले होते ते परत आडवे झाले.
मी पण रडलो. वडिलांचे दुःख समजू शकलो. मी चित्रकार असतो तर आजही ते चित्र पूर्णपणे रेखाटू शकलो असतो, इतक्या स्पष्ट रीतीने ते माझ्या डोळ्यांसमोर उभे आहे.
त्या मौक्तिक बिंदूंच्या प्रेमबाणाने माझे हृदय भेदून गेले. मी शुद्ध झालो. ज्याला अनुभव असेल तोच हे प्रेम समजू शकणार. 'रामबाण वाग्यां रे होय ते जाणे." (रामबाण ज्याला लागला असेल तोच समजणार.)
माझ्या दृष्टीने हा अहिंसेचा पदार्थपाठ होता. त्यावेळी त्यात मला पितृप्रेमापलीकडे काही दिसले नव्हते. परंतु आज मी त्याला शुद्ध अहिंसा या रुपाने ओळखू शकतो. अशा तर्हेच्या अहिंसेने व्यापक स्वरूप धारण केले, म्हणजे तिच्या स्पर्शापासून कोण आलिप्त राहणार? अशा व्यापक अहिंसेच्या शक्तीचे मोजमाप करणे अशक्य आहे.
अशा तर्हेची शांत क्षमा वडिलांच्या स्वभावाविरुद्ध होती. ते संतापतील, लावून बोलतील, कदाचित डोकेही आपटून घेतील असे मला वाटले होते. परंतु त्यांनी इतकी अपार शांती राखली त्याचे कारण गुन्ह्याची कबुली हेच होय, असे मला वाटते. जो मनुष्य अधिकारी मनुष्यापाशी स्वतःचा गुन्हा खुल्या दिलाने कबूल करतो व पुन्हा न करण्याची प्रतिज्ञा करतो, तो सर्वोत्कृष्ट प्रायश्चित्त करतो. मला माहित आहे, की माझ्या कबुलीमुळे वडील माझ्याविषयी निश्चिंत झाले आणि त्यांच्या मजवरील अगाध प्रेमात भरच पडली.

छान
ReplyDelete