खंड १ ला: ५. हायस्कुलात
खंड १ ला:
५. हायस्कुलात:
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. १३-१७
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
विवाह झाला तेव्हा मी हायस्कुलात शिकत होतो, हे मी पूर्वी लिहिलेच आहे. त्यावेळी आम्ही तिन्ही भाऊ एकाच शाळेत शिकत असू. वडील बंधू वरील इयत्तेत होते आणि ज्या बंधुंच्या लग्नाबरोबर माझे लग्न झाले ते एक वर्ष पुढे होते. विवाहाचा परिणाम असा झाला की आम्हा दोघा भावांचे एक एक वर्ष फुकट गेले. माझ्या बंधूंच्या बाबतीत तर याहूनही वाईट परिणाम घडला. विवाहानंतर ते शाळेत राहू शकले नाहीत. असला अनिष्ट परिणाम किती तरुणांवर घडत असेल देव जाणे! विद्याभ्यास आणि विवाह ही दोन्ही एकत्र हिंदू समाजामध्येच आढळतील.
माझा अभ्यास चालू राहिला. हायस्कुलात माझी गणना ढ विद्यार्थ्यात होत नसे. शिक्षकांची मर्जी तर मी नेहमीच संपादित असे. प्रत्येक वर्षी आईबापांना विद्यार्थ्यांचा अभ्यास व वर्तन यासंबंधी प्रमाणपत्रे पाठविली जात. त्यामध्ये कधीही माझा अभ्यास किंवा वर्तन खराब असल्याबद्दल टीका नव्हती. दुसऱ्या इयत्तेनंतर बक्षिसेही मिळविली, व पाचव्या-सहाव्या इयत्तेत अनुक्रमे चार व दहा रुपयांची शिष्यवृत्तीही मिळविली. ती मिळविण्यात माझ्या हुशारीपेक्षा दैवाचा भाग विशेष होता. ही शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांसाठी नव्हती; तर जे सोरर्ठ प्रांतातले विद्यार्थी असतील त्यात पहिला येणाऱ्याला होती. चाळीस-पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात त्या दिवसात सोरर्ठ प्रांताचे विद्यार्थी कितीसे असणार?
मला स्वतःला असेच स्मरते की मला माझ्या हुशारीबद्दल अभिमान मुळीच नव्हता. बक्षीस किंवा शिष्यवृत्ती मिळाली तर मला आश्चर्य वाटत असे. परंतु माझ्या वर्तनाला मी फार जपत असे. वर्तनात उणीव निघाली तर मला रडे येई. शिक्षकांना मला बोलावे लागेल अशा तऱ्हेचे माझ्या हातून काहीही घडणे किंवा शिक्षकांना तसे वाटणे ही गोष्ट मला असह्य होत असे. एक वेळ मार खावा लागला असे मला स्मरते. माराचे दुःख नव्हते. परंतु मी शिक्षेला पात्र झालो याचे महादुःख वाटले. मी खूप रडलो. हा प्रसंग पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेतील आहे. त्यावेळी दोराबजी एदलजी गिमी हेडमास्तर होते. ते विद्यार्थीप्रिय होते. कारण, ते नियम पाळीत, पद्धतशीर काम करीत, करवीत व शिकवितही चांगले. त्यांनी वरच्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांस कसरत व क्रिकेटही आवश्यक केली होती. मला त्यांचा कंटाळा. भाग पडण्यापूर्वी मी कधी कसरत, क्रिकेट किंवा फुटबॉलमध्ये गेलोच नव्हतो. माझा भिडस्त स्वभाव हेही न जाण्याचे एक कारण होते. आता मला दिसते, की हा कंटाळा चुकीचा होता. कसरतीचा शिक्षणाशी संबंध नाही, अशी चुकीची समजूत माझी त्यावेळी होती. मागून मी समजलो, की व्यायामाला म्हणजे शारीरिक शिक्षणाला मानसिक शिक्षणाच्या बरोबरीचे स्थान विद्यार्जनात असले पाहिजे.
तरीही कसरतीत न गेल्यामुळे माझे नुकसान झालेले नाही, हेही मला नमूद केले पाहिजे. याचे कारण असे की पुस्तकात मोकळी हवा खायला जाण्याची शिफारस वाचली, ती मला आवडली होती, आणि त्यामुळे हायस्कूलच्या वरच्या इयत्तांपासूनच फिरायला जाण्याची मला सवय जडली होती. ती शेवटपर्यंत राहिली. फिरणे हाही व्यायाम आहेच. त्यामुळे माझे शरीर काही अंशी कसलेले बनले.
कंटाळ्याचे दुसरे कारण वडिलांची सेवा करण्याची तीव्र इच्छा हे होते. शाळा बंद झाली की लगेच घरी जाऊन सेवा-चाकरीला लागत असे. जेव्हा कसरत आवश्यक झाली, तेव्हा या सेवेमध्ये विघ्न आले. वडिलांची सेवा करण्यासाठी कसरतीची माफी मिळाली पाहिजे अशी विनंती केली. परंतु गिमी साहेब कसली माफी देतात? एका शनिवारी सकाळची शाळा होती. संध्याकाळी चार वाजता कसरतीला जायचे होते. माझ्यापाशी घड्याळ नव्हते. आकाशात ढग असल्यामुळे वेळेची उमज पडेना. ढगांमुळे मी फसलो. कसरतीला जातो तो सर्व निघूनही गेले होते. दुसऱ्या दिवशी गिमीसाहेबांनी हजेरी तपासली. तीत मी गैरहजर निघालो. मला कारण विचारले. मी जे होते ते सांगितले. त्यांनी ते खरे मानले नाही आणि मला एक की दोन आणे (किती ते बरोबर आठवत नाही.. दंड झाला) मी खोटा ठरलो. मला अतिशय दुःख झाले. "मी खोटा नाही" हे कसे सिद्ध करू? काही उपाय सुचेना. मनातल्या मनात फुणफुणत राहिलो, रडलो. ठरवले की सत्य बोलणाऱ्याने व सत्य आचरणाऱ्याने गाफीलही राहता कामा नये. अशा तऱ्हेची गफलत माझ्या शिक्षणाच्या मुदतीत ही पहिली व शेवटची होय. मला पुसट आठवण आहे, की अखेरीला मी तो दंड माफ करवू शकलो.
कसरतीतून मोकळीक तर मिळविलीच. शाळेच्या वेळेनंतर स्वतःच्या सेवेसाठी आपल्याला माझी जरूर असते, असे वडिलांचे पत्र हेडमास्तरांना असल्यामुळे मोकळीक मिळाली.
व्यायामाऐवजी फिरायचे ठेवले, त्यामुळे शरीराला व्यायाम न देण्याच्या चुकीबद्दल मला कदाचित शिक्षा भोगावी लागली नाही; परंतु दुसऱ्या एका चुकीची शिक्षा मी आजपर्यंत भोगीत आहे. शिक्षणामध्ये हस्ताक्षर चांगले लिहिण्याची जरूर नाही, असा चुकीचा समज माझ्यामध्ये कुठून आला ते माहित नाही; परंतु तो थेट विलायतेला जाईपर्यंत राहिला. मागाहून आणि मुख्यतः दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील वकिलांची व आफ्रिकेत जन्मलेल्या नवयुवकांची मोत्यासारखी हस्ताक्षरे पाहिली, तेव्हा मी शरमलो व पस्तावलो. माझ्या ध्यानात आले, की खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी समजली पाहिजे. मी मागून माझे अक्षर सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पक्क्या मडक्याचे काठ वळणार थोडेच? बालवयामध्ये ज्याची मी हेळसांड केली, ते मी आजपर्यंत करू शकलो नाही. दरेक नवयुवक व नवयुवती यांनी माझ्या उदाहरणावरून सावध व्हावे आणि ध्यानात धरावे की चांगले अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे. चांगले अक्षर शिकण्यासाठी रेखाकला आवश्यक आहे. माझे तर असे मत बनले आहे की मुलांना रेखाकला अगोदर शिकवावी. ज्याप्रमाणे पक्षी, वस्तू वगैरे पाहून बालक त्यांचे स्मरण ठेवून सहजी ओळखू शकते, त्याप्रमाणे अक्षरे प्रथम ओळखण्यास शिकावे. व रेखाकला शिकून चित्रे वगैरे काढण्यास शिकल्यानंतर अक्षरे काढण्यास शिकले, तर त्याचे अक्षर छापलेल्या अक्षराप्रमाणे येईल.
या काळाच्या विद्याभ्यासासंबंधी आणखी दोन आठवणी नमूद करण्यासारख्या आहेत. विवाहामुळे एक वर्ष फुकट गेले ते भरून काढण्याचा दुसऱ्या इयत्तेत मास्तरांनी माझ्याकडून बेत करविला. मेहनती विद्यार्थ्याला तसे करण्याची परवानगी त्यावेळी तरी मिळत असे. म्हणून मी तिसऱ्या इयत्तेत सहा महिने बसलो व उन्हाळ्याच्या सुटीपूर्वीच्या परीक्षेला नंतर मला चौथीत घातले. येथपासून काही शिक्षण इंग्रजीतून होऊ लागते. मला काही समजेच ना. भूमितीसुद्धा चौथ्या इयत्तेत सुरू होते. मी तीत मागे पडलो होतोच. शिवाय ती मुळीच समजेना. भूमितीचे शिक्षक समजावून देण्यात हुशार होते. परंतु माझे काही बस्तानच बसेना. मी अनेक वेळा निराश होत असे. कित्येक वेळा असेही वाटे, की दोन इयत्ता सोडून देऊन परत तिसऱ्या इयत्तेचा मार्ग धरावा. परंतु तसे केल्यास माझी अब्रू जाईल व मी झटून अभ्यास करीन या विश्वासावर ज्या शिक्षकांनी मला वर चढविण्याबद्दल शिफारस केली, त्या शिक्षकांचीही अब्रू जाणार, या भयाने खाली उतरण्याचा विचार मी रद्द केला. प्रयत्न करता करता जेव्हा युक्लिडच्या तेराव्या प्रमेयाशी आलो, तेव्हा एकाएकी मला वाटू लागले की भूमिती तर सोप्यात सोपा विषय आहे. ज्यात बुद्धीचा फक्त साधा व सरळ उपयोग करायचा आहे, त्यात अडचण ती कसली? त्यानंतर नेहमी मला भूमिती हा सोपा व रसिक विषय होऊन राहिला.
संस्कृताने मला भूमितीपेक्षाही अधिक त्रास दिला. भूमितीमध्ये घोकायचे काहीच नसते, तर संस्कृतात पाहतो तो सर्व काही घोकायचेच! हा विषयही चौथ्या इयत्तेपासून सुरू झाला. सहाव्या इयत्तेत मी हरलो. संस्कृत-शिक्षक फार कडक होते. विद्यार्थ्यांना खूप शिकविण्याचा त्यांना लोभ असे. संस्कृत वर्ग आणि फारसी वर्ग यामध्ये एक प्रकारची स्पर्धा असे. फारसी शिकविणारे मौलवी गरीब होते. विद्यार्थी आप-आपसात बोलत असतात की फारसी फार सोपे आहे, आणि फारसी शिक्षक फार सज्जन मनुष्य आहेत. विद्यार्थी करतील तेवढ्यावर ते चालवून घेतात. मी पण सोपे आहे, असे ऐकून लोभात पडलो आणि एक दिवस फारसीच्या वर्गात जाऊन बसलो! संस्कृत-शिक्षकाला दुःख झाले. त्यांनी मला बोलावले. " तू कोणाचा मुलगा आहे तरी ध्यानी आण. तुझ्या धर्माची भाषा तू शिकणार नाहीस? तुला ज्या अडचणी येतील त्या मला दाखव. माझी तर सर्व मुलांना उत्तम संस्कृत शिकविण्याची इच्छा आहे. पुढे त्याच्यामध्ये मधुर रसाचे घुटके चाखायला मिळणार आहेत. तू असा कंटाळून जाऊ नकोस. तू पुन: माझ्या वर्गात येऊन बैस." मी शरमलो. शिक्षकांच्या प्रेमाची अवगणना माझ्याने करवली नाही. आज माझा आत्मा कृष्णशंकर मास्तरांचे उपकार मानीत आहे. कारण की जितके संस्कृत मी त्यावेळी शिकलो, तेवढेही जर शिकलो नसतो तर आज संस्कृत शास्त्रांमध्ये मला जी गोडी वाटते, ती वाटली नसती. मला तर याच पश्चाताप होतो आहे, की मी संस्कृत जास्त शिकलो नाही. कारण की कोण्याही हिंदू बालकाने संस्कृतचा सरस अभ्यास केल्याशिवाय राहता कामा नये.
अलीकडे तर मला असे वाटते की भारतवर्षाच्या उच्च शिक्षणक्रमामध्ये मातृभाषेखेरीज राष्ट्रभाषा हिंदी, संस्कृत, फारसी, अरबी व इंग्रजी एवढ्यांना स्थान मिळाले पाहिजे. इतक्या भाषांच्या संख्येकडे पाहून कोणाला भिऊन जाण्याचे कारण नाही. भाषा पद्धतशीर रीतीने शिकविण्यात येईल आणि सर्व विषय इंग्रजीतूनच शिकवण्याचा व त्यांवर विचारही इंग्रजीतूनच करण्याचा बोजा आपल्यावर नसेल, तर वरील भाषा शिकण्यात जड असे काहीच नाही; एवढेच नव्हे तर त्यामध्ये फार गोडी वाटेल. शिवाय जो एक भाषा शास्त्रीय पद्धतीने शिकला, त्याला मागून दुसरी भाषा शिकणेही सोपे जाते. खरे म्हटले असता हिंदी, गुजराथी, संस्कृत ही एकच भाषा म्हणता येईल. त्याप्रमाणे फारसी व अरबी. फारसी संस्कृताशी मिळती असली तरी आणि अरबी हिब्रूशी मिळती असली तरी दोन्हींमध्ये निकट संबंध आहे. उर्दूचा मी स्वतंत्र भाषा म्हणून निर्देश केलेला नाही. कारण की तिच्या व्याकरणाचा समावेश हिंदीमध्ये होतोच. तिचे शब्द फारसी आणि अरबीच आहेत. उच्च दर्जाचे उर्दू जाणणाऱ्याला अरबी व फारसी शिकावे लागेल; ज्याप्रमाणे उच्च दर्जाचे गुजराथी, हिंदी, बंगाली, मराठी जाणणाऱ्याला संस्कृत जाणणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment