खंड १ ला: ७. दुःखद प्रसंग: २
खंड १ ला:
७. दुःखद प्रसंग: २.
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. २०-२३
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
************************************
नेमका दिवस आला. माझ्या स्थितीचे संपूर्ण वर्णन करणे कठीण आहे. एका बाजूने सुधारणेचा उत्साह, राहणीत फेरफार करण्याचे कौतुक, आणि दुसऱ्या बाजूने चोराप्रमाणे लपून काम करण्याची शरम. यांपैकी कोणती वस्तू प्रधान होती, याचे मला आज स्मरण नाही. आम्ही नदीकडे एकांत शोधायला चाललो. दूर जाऊन कोणी पाहणार नाही, असा कोपरा शोधून काढला आणि तेथे मी कधी न पाहिलेली वस्तू-मांस पाहिले. बरोबर भट्टीवाल्याकडची डबलरोटी होती. दोहोंतून एकही वस्तू आवडेना! मांस चामड्यासारखे लागे! खाणे अशक्य होऊन गेले! मला ओकारी यायला लागली. खाणे अर्ध्यावर सोडावे लागले.
ती रात्र मला फार बिकट गेली. झोप येईना. जणू काय शरीरात बकरे जिवंत आहे आणि ओरडते आहे, अशी स्वप्ने पडत. मी उसळून उठे, पस्तावे आणि पुनः विचार करी की मांसाहार केल्याशिवाय गत्यंतर नाही; हिंमत सोडता कामा नये! मित्रही नाउमेद होणारा नव्हता. त्याने आता मांस निरनिराळ्या तऱ्हेने रांधायला आणि मीठ-मसाला घालून त्याचा दर्प झाकून टाकण्याला सुरुवात केली. नदीकाठी घेऊन जाण्याऐवजी एका बबर्जीशी संधान बांधून गुपचुपपणे एका सरकारी डाक बंगल्याकडे घेऊन जाण्याची योजना केली आणि तेथे मला खुर्ची-टेबल इत्यादि सामग्रीच्या मोहात घातले. त्याचा परिणाम झाला. रोटीचा तिरस्कार मंदावला, बकऱ्याची कीव बुजली, आणि मांसाची म्हणता येत नाही, पण मांसमिश्रित पदार्थांची चटक लागली. अशा तऱ्हेने एक वर्ष लोटले असावे, व त्या मुदतीत पाच सहा वेळा मांस खावयास मिळाले असेल. कारण की डाक बंगला वाटेल तेंव्हा मिळेना, मांसाची स्वादिष्ट समजली जाणारी पक्वान्ने नेहमीच तयार करणे जुळत नसे. शिवाय असल्या जेवणांना पैसेही पडणार. माझ्याजवळ फुटकी कवडीही नव्हती, त्यामुळे मी काही देणे शक्य नव्हते. पैसे त्या मित्रालाच शोधून काढावे लागत. त्याने कोठून आणले असतील त्याची मला आज मितीपर्यंत माहिती नाही. त्याचा इरादा तर मला मांसखाऊ करून सोडण्याचा--- मला बाटविण्याचा--- होता. त्यासाठी पैशाचा खर्च स्वतः करी. परंतु त्याच्याजवळ म्हणून अखंड खजिना नव्हता. अर्थात असली जेवणे क्वचितच होऊ शकत.
जेव्हा जेव्हा मी असली जेवणे जेवीत असे, तेव्हा तेव्हा घरी जेवण शक्यच होईना. आई जेव्हा जेवायला बोलवी, तेव्हा "आज भूक नाही, पचन झालेले नाही" अशा सबबी काढाव्या लागत. असे सांगतांना दर वेळी मला मोठा धक्का बसत असे. असले असत्य; आणि तेही आईजवळ! शिवाय मातापित्यांना जर समजले की मुलगे मांसाहारी झाले आहेत, तर त्यांच्यावर वीजच कोसळल्याप्रमाणे होईल. हे विचार माझ्या हृदयाला घरे पाडीत. म्हणून मी निश्चय केला 'मांस खाणे आवश्यक आहे. त्याचा प्रचार करून आपण हिंदुस्थानाला सुधारू. परंतु मातापित्यांना फसवणे आणि खोटे बोलणे हे मांस खाण्यापेक्षाही खराब आहे. यासाठी आईबाप जिवंत असेपर्यंत मांस खाता कामा नये. त्यांच्या मृत्यूनंतर स्वतंत्र झालो म्हणजे उघडपणे खावे, व ती वेळ येईपर्यंत मांसाहाराचा त्याग करावा.' हा निश्चय मी मित्राला कळविला, आणि तेव्हापासून मांसाहार सुटला तो सुटलाच. आपले दोन मुलगे मांसाहार करून चुकले आहेत, हे आईबापांना कधीच समजले नाही.
मातापित्यांना न फसविण्याच्या शुभ विचाराने मी मांसाहार सोडला; परंतु ती मैत्री मात्र सोडली नाही. सुधारावयाला निघालेला मीच बाटलो आणि बाटल्याचे माझ्या ध्यानातही आले नाही!
त्याच मैत्रीमुळे मी व्यभिचारातही पडलो असतो. एक वेळ हा भाई मला वेश्यांच्या वस्तीत घेऊन गेला. तेथे मला योग्य सूचना देऊन एका बाईच्या घरात सोडले. मला काही तिला पैसे वगैरे द्यावयाचे नव्हते. हिशेब चुकवलेला होता. मी फक्त गुजगोष्टी करावयाच्या होत्या.
मी घरात अडकलो खरा; परंतु ईश्वराचीच ज्याला तारण्याची इच्छा, तो पडू पाहत असला तरी पवित्र राहू शकतो. त्या खोलीत मी तर आंधळाच बनून गेलो. मला बोलण्याचे भान राहिले नाही. शरमेने स्तब्ध होऊन त्या बाईपाशी खाटेवर बसलो. परंतु तोंडातून शब्दच निघेना. बाई संतापली, आणि चार दोन शेलक्या विशेषणांचा आहेर करून तिने मला दरवाजा दाखविला.
त्यावेळी तर माझ्या मर्दगिरीला लांच्छन आले असेच मला वाटले, आणि धरणीमाता मला आपल्या पोटात घेईल तर बरे, असे मला वाटू लागले. परंतु अशा तऱ्हेने बचावल्याबद्दल मी सदैव ईश्वराचे आभार मानले आहेत. अशाच तर्हेचे आणखी चार प्रसंग माझ्या आयुष्यात आलेले आहेत. त्यापैकी बहुतेक प्रसंगी स्वतःच्या प्रयत्नाशिवाय बाह्य संयोगामुळेच मी बचावलो, असे म्हणता येईल. विशुद्ध दृष्टीने तर या सर्व प्रसंगी माझे पतन झालेच, असे म्हणता येईल. मी विषयाची इच्छा केली, तेव्हाच मी ते विषय करून चुकलो. तरी पण लौकिक दृष्टीने, इच्छा केली असूनही प्रत्यक्ष कर्मापासून जो बचावतो, त्याला आपण बचावलाच म्हणतो. आणि मी या प्रसंगी याच अर्थाने एवढ्याच अंशाने बचावलो, असे म्हणता येईल. शिवाय कित्येक कार्येच अशी असतात, की जी प्रत्यक्ष करण्यापासून बजावल्याने व्यक्तीचा व त्याच्या सहवासात येणाऱ्यांचा फार फायदा होतो; आणि जेव्हा विचार शुद्ध होतात, तेव्हा त्या कर्मापासून झालेला बचावही तो ईश्वरी कृपा समजतो. ज्याप्रमाणे पतन न पावण्याचा प्रयत्न करीत असताही मनुष्याचा अधःपात होतो असा कैक वेळा अनुभव येतो, त्याचप्रमाणे कुमार्गाने जाण्याची इच्छा असूनही अनेक बाह्य संयोगामुळे मनुष्य बजावून जातो, ही पण अनुभवसिद्ध गोष्ट आहे. यात पुरुषार्थाला जागा किती आहे, दैवाला किती आहे, अथवा कोणत्या नियमांच्या नियंत्रणानुरूप मनुष्याचा अध:पात किंवा बचाव होतो हे गहन प्रश्न आहेत. त्यांचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही आणि कायमचा उलगडा कधी तरी होईल की नाही ते सांगणेही कठीण आहे.
परंतु आपण पुढे चालूया.
त्या मित्राची मित्रता अनिष्ट आहे ही गोष्ट अजूनही माझ्या ध्यानात आली नाही. तसे होण्यापूर्वी आणखीही काही कडवे अनुभव मला मिळावयाचे होते. त्याठिकाणी मला कल्पनाही नाही अशा दोषांचे जेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाले, तेव्हाच माझ्या डोक्यात उजेड पडला. परंतु मी होता होईल तो माझे अनुभव काल अनुक्रमाने लिहीत आहे; म्हणून इतर अनुभव पुढे येतील.
या वेळची एक गोष्ट आहे तेवढे सांगितली पाहिजे. आम्हाला नवरा-बायकोमध्ये वितुष्ट येई आणि कज्जेकफावती होत, त्याच्या मुळाशी ही मैत्री पण होतीच. मी मागे सांगितलेच आहे, की मी जसा प्रेमळ तसाच संशय पती होतो. या मैत्रीमुळे माझ्या संशयी वृत्तीत भर पडली. कारण की मित्राच्या सत्यवादीत्वाबद्दल मला बिलकुल शंका नव्हती. या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझ्या धर्मपत्नीला कितीतरी दुःख दिलेले आहे. या हिंसेबद्दल मी स्वतःला कधीच क्षमा केलेली नाही. असली दु:खे हिंदू स्त्रीच सहन करीत असेल; आणि म्हणूनच मी नेहमीच स्त्रीला सहनशीलतेची केवळ मूर्तीचा असे मानीत आलो आहे. नोकरावर खोटा आळ घेतला तर नोकर नोकरी सोडेल, मुलावर असा प्रसंग आला तर मुलगा बापाचे घर सोडून जाईल, मित्रा मित्रांमध्ये संशय आला तर मैत्री तुटेल, पत्नीला पतीचा संशय आला तर ती मनातल्या मनात फणफडणत गप्प बसेल; परंतू जर पतीने पत्नीवर आळ घेतला तर पत्नीचा बिचारीचा भोगच उभा राहिला ! ती जाणार कोठे? उच्च मानलेल्या वर्णाची हिंदू स्त्री कोर्टात जाऊन बांधलेली गाठ कापवूनही टाकू शकत नाही. असा एकतर्फी न्याय तिच्याबाबतीत चालू आहे. असलाच न्याय मीही दिला, त्याचे दुःख कधीही विसरणे शक्य नाही. या संशयी वृत्तीचा सर्वथैव नाश मला अहिंसेचे सूक्ष्म ज्ञान झाले तेव्हाच झाला; म्हणजे जेव्हा मी ब्रह्मचर्याचा महिमा समजलो आणि हेही समजलो की पत्नी पतीचे दासी नाही, तर त्याची सहचारिणी आहे, सहधर्मीणी आहे, दोघेही एकमेकांच्या दुःखाची समान वाटेकरी आहेत आणि जितकी बरेवाईट करण्याची स्वतंत्रता पतीला आहे तितकीच स्त्रीला आहे. या संशयग्रस्ततेच्या काळाचे स्मरण झाले म्हणजे मला माझा मूर्खपणा व विषयांध निर्दयता यांविषयी संताप येतो, आणि मैत्रीच्या बाबतीतील मूढपणाची कीव वाटते.

Comments
Post a Comment