खंड १ ला: १७. अन्नाचे प्रयोग

खंड १ ला: १७. अन्नाचे प्रयोग

- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ५३-५६
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
-आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रित वाचण्यासाठी लिंक: https://sakhi-sajani.blogspot.com
************************************

जीवनाविषयी मी जो जो बारकाईने विचार करू लागलो, तो तो मला माझ्या अंतर्बाह्य आचारात फरक करण्याची जरुरी भासू लागली. ज्या वेगाने राहणी व खर्च यामध्ये फेरफार केला, त्याच, किंबहुना त्याहून अधिक वेगाने मी माझ्या आहारामध्ये फेरफार करू लागलो. अन्नाहारावरील इंग्रजी पुस्तकांमध्ये लेखकांनी फार सूक्ष्म विचार केल्याचे मला दिसून आले. अन्नाहाराचा त्यांनी धर्म, विज्ञान, व्यवहार व आरोग्य यांच्या दृष्टीने विचार केला होता. नैतिकदृष्ट्या त्यांचे म्हणणे असे होते, की माणसाला पशुपक्ष्यांदिकांवर जे प्रभुत्व मिळालेले आहे, ते त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या रक्षणासाठी; किंवा ज्याप्रमाणे मनुष्ये एकमेकांचा उपयोग करून घेतात परंतु एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत, त्याप्रमाणे पशुपक्षीही त्या तऱ्हेच्या उपयोगासाठी आहेत, खाण्यासाठी नव्हेत. यापलीकडे ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली होती, की खाणेपिणे हे चैनीसाठी नव्हे, तर देहधारणासाठी आहे. ही गोष्ट लक्षात घेता आहारामध्ये मांसच नव्हे, पण अंडी आणि दूधही वर्ज्य केली पाहिजेत असे कित्येकांचे म्हणणे होते; व ते त्यांनी कृतीतही आणले होते. विज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आणि मनुष्याची शरीररचना लक्षात घेऊन कित्येकांनी असे अनुमान काढले होते, की मनुष्याला अन्न शिजवण्याचीच गरज असू नये. त्याने वनातील वरपीक फळेच खाऊन राहावे, असा ईश्वरी संकेत दिसतो. दूध फक्त आईचे घ्यावे. दात आल्यानंतर त्याने चावून खाण्याजोगा आहारच घ्यावा. आहाराच्या दृष्टीने त्यांनी मिरची-मसाल्याचा त्याग सांगितला होता. व्यावहारिक किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांनी दाखवून दिले होते, की कमीतकमी खर्चाचा आहार म्हणजे अन्नाहाराच होय. या चारी दृष्टींची माझ्यावर छाप पडली; आणि अन्नाहार देणाऱ्या भोजनगृहामध्ये चारी दृष्टींच्या माणसांच्या मी गाठी घेतल्या. विलायतेत अन्नाहाराची एक संस्था होती आणि एक साप्ताहिकही निघत असे. मी साप्ताहिकाचा वर्गणीदार झालो आणि संस्थेचा सभासद झालो. थोडक्याच अवधीत माझी तिच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली. त्या ठिकाणी माझी अग्रगण्य अन्नाहारींची ओळख झाली. मी प्रयोगामध्ये मग्न होऊन गेलो.

घरून मिठाई, मसाला वगैरे मागविले होते, ते रद्द केले आणि मनाने निराळेच वळण घेतले. त्यामुळे मसाले वगैरेंचा शोख मावळू लागला, आणि जी भाजी मसाल्याच्या अभावी रिचमंडमध्ये बेचव लागत होती, तीच नुसती उकडलेली स्वादिष्ट वाटू लागली. असल्या अनेक अनुभवांवरून मला कळून आले, की स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे, तर मन आहे.

आर्थिक दृष्टी तर माझ्यापुढे होतीच. त्यावेळी चहा- कॉफीला अपायकारक मानणारा आणि कोकोचा पुरस्कार करणारा असाही पंथ होता. शरीरव्यापारासाठी जरूर तेवढ्याच वस्तू घेणे योग्य आहे, एवढे मला समजले होते. म्हणून चहा-कॉफीचा बहुतांशी त्याग केला, व त्याऐवजी कोको घेऊ लागलो.

भोजनगृहामध्ये दोन वर्ग असत. पहिल्या वर्गात जेवढे पदार्थ खाल्ले, तेवढ्याचे पैसे द्यावे लागत. या ठिकाणी वेळेला एक-दोन शिलिंगचाही खर्च येई. यात सुस्थितीतील लोक येत. दुसऱ्या भागात सहा पेन्सात तीन पदार्थ आणि रोटीचा एक तुकडा एवढे मिळे. मी जेव्हा खूप काटकसर सुरू केली, तेव्हा फार करून सहा पेन्सच्या विभागामध्येच जाऊ लागलो.

वरील प्रयोगांबरोबर इतर किरकोळ प्रयोग चालूच होते. कधी पिठूळ पदार्थ वर्ज्य करण्याचा, कधी फक्त रोटी आणि फळे खाऊन राहण्याचा, तर कधी लापसी, दूध आणि अंडी एवढेच घेण्याचा.

हा शेवटला प्रयोग विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. तो पंधरा दिवसही चालला नाही. पिठाशिवायच्या आहाराचे समर्थन करणाऱ्याने अंड्याची खूप स्तुती केली होती, आणि अंडी म्हणजे मांस नव्हे, असे सिद्ध केले होते. ती घेण्यात जिवंत प्राण्यांना दुःख होत नाही, हे तर खरेच. या युक्तिवादाने भूरळून मी आईला वचन दिलेले असूनही अंडी खाल्ली. परंतु माझी भुरळ क्षणिक होती. प्रतिज्ञेचा नवा अर्थ लावण्याचा मला अधिकार नव्हता. प्रतिज्ञा देणाऱ्याचाच अर्थ प्रमाण मानला पाहिजे. मांस न खाण्याची प्रतिज्ञा देणाऱ्या मातेला अंड्याची कल्पनाही नसणार, हे मला माहित होते. त्यामुळे मला प्रतिज्ञेच्या रहस्यांची जाणीव होताच मी अंडी सोडली आणि तो प्रयोगही सोडून दिला.

हे रहस्य सूक्ष्म आहे आणि ध्यानात ठेवण्यासारखे आहे. विलायतेत मासांच्या तीन व्याख्या माझ्या वाचनात आल्या. एकीत मांस म्हणजे पशुपक्ष्याचे मांस. तशी व्याख्या करणारे मांस वर्ज्य मानीत, परंतु मासे खात; अंडी तर खातच. दुसऱ्या व्याख्येप्रमाणे ज्याला सामान्य मनुष्य जिवंत प्राणी समजतो, त्याचे मांस निषिद्ध मानले होते. म्हणजे मासे वर्ज्य परंतु अंडी ग्राह्य. तिसऱ्या व्याख्येनुरूप ज्याना आपण सामान्यपणे जिवंत प्राणी म्हणतो, ते सर्व व त्यापासून तयार होणाऱ्या वस्तू या सर्व वर्ज्य. या व्याख्येप्रमाणे अंड्यांचा व दुधाचाही त्याग आवश्यक होता. यापैकी पहिली व्याख्या मी ग्राह्य धरली असती, तर मासेही खायला हरकत नव्हती. पण मला मातुश्रींची व्याख्याच प्रमाण मानली पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. अर्थात जर तिच्यासमोर केलेली प्रतिज्ञा पाळायची, तर अंडी घ्यायला मोकळीक नव्हती. त्यामुळे अंड्यांचा त्याग केला. हे मला फार अडचणीचे झाले. कारण की, बारीक तपास करू लागलो, तेव्हा मला कळून आले की अन्नाहाराच्या भोजनगृहांमध्येही पुष्कळ पदार्थात अंडी असतात. म्हणजे मला पुरी माहिती होईपर्यंत वाढप्यापाशी प्रत्येक पदार्थाबद्दल पूसतपास करीत बसावे लागे. कारण, पुष्कळ प्रकारच्या पुडिंगमध्ये व केकमध्ये अंडी असायचीच. यामुळे एका तऱ्हेने मी भानगडीतून सुटलो. कारण की, थोडक्याच व अगदी साध्या अशाच वस्तू मला घेता येत असत. उलटपक्षी थोडा जाचही वाटला. कारण जिभेला चटक लागलेल्या अनेक वस्तू सोडाव्या लागल्या. परंतु हा जाच क्षणिक होता. प्रतिज्ञापालनापासून होणारा निर्मळ, सुक्ष्म व शाश्वत स्वाद मला त्या क्षणिक स्वादापेक्षा जास्त प्रिय वाटला.

परंतु खरी परीक्षा ती यापुढेच व्हायाची होती. व ती दुसऱ्या व्रताच्या बाबतीत. देव तरी त्याला कोण मारी?

हे प्रकरण पुरे करण्यापूर्वी प्रतिज्ञेच्या अर्थासंबंधी थोडे लिहणे जरूर आहे. माझी प्रतिज्ञा म्हणजे मातेसमोर केलेला एक करार होता. दुनियेतील पुष्कळ झगडे कराराच्या अर्थावरून उद्भवत असतात. पाहिजे तेवढ्या स्पष्ट शब्दात करारनामा लिहितात; तरीही अर्थ करणारे पंडित काऊचा बाऊ करून सोडतील,, यात सभ्यासभ्यतेचा भेदच राहत नाही. स्वार्थ सर्वांस आंधळे करून सोडतो. राजापासून रंकांपर्यंत सर्वजण करारांचे आपल्याला सोयीस्कर पडतील तसे अर्थ करून दुनियेला, स्वतःला आणि ईश्वराला फसवीत असतात. अशा तऱ्हेने ज्या शब्दांचा किंवा वाक्यांचा उभय पक्षकार अर्थ करतात, त्याला न्यायशास्त्रामध्ये द्वि-अर्थी मध्यमपद असे म्हणतात. उत्तम पक्ष म्हणजे प्रतिपक्षी आपल्या शब्दांचा जो अर्थ करील तोच खरा मानून चालावे; आपल्याला वाटणारा अर्थ तो चुकीचा किंवा अपुरा समजावा. असाच एक दुसरा सुवर्णन्याय आहे की, जेथे दोन अर्थ संभवत असतील, तेथे निर्बल पक्ष जो अर्थ करील तो खरा मानला जावा. या दोन सुवर्ण मार्गांचा त्याग झाल्यामुळेच बहुधा झगडे होत असतात व अधर्म चालत असतो. आणि या अन्यायाच्या मुळाशी असत्य असते. ज्याला सत्याच्या मार्गानेच चालायचे आहे त्याला सुवर्णमार्ग सहजी सापडतो. त्याला शास्त्रग्रंथ चाळावे लागत नाहीत. मातेने मांस शब्दाचा जो अर्थ मानला, आणि जो मी त्यावेळी समजलो तोच माझ्याबाबतीत खरा होता; अधिक अनुभवावरून किंवा विद्वत्तेच्या घमेंडीत जो मी नवीन शिकलो असे मानले, तो खरा नव्हता. अजूनपर्यंत माझे प्रयोग आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने झालेले होते. विलायतेत त्यांना धार्मिक स्वरूप आले नव्हते. धार्मिक दृष्टीने माझे कडक प्रयोग दक्षिण आफ्रिकेत झाले; त्यांची छाननी पुढे करावी लागेल. परंतु त्यांचे बीजारोपण विलायतेत झाले, असे म्हणण्यास हरकत नाही.

नवीन धर्म स्वीकारणाऱ्या लोकांचा त्या धर्माच्या प्रसाराबद्दलचा उत्साह त्या धर्मातच जन्माला येणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असलेला दिसून येतो. अन्नाहार विलायतेमध्ये तरी नवीन पंथच होता, आणि माझ्या बाबतीत तीच स्थिती होती असे म्हणता येईल. कारण की मी विलायतेला गेलो, तो बुद्धीने तरी मांसाहाराचा पुरस्कर्ता झाल्यानंतर; अन्नाहाराच्या धोरणाचा ज्ञानपूर्वक स्वीकार मी विलायतेतच केला. म्हणजे माझ्याबाबतीत नवीन धर्मात प्रवेश केल्याप्रमाणे झाले होते. नावधर्मीयांचा उत्साह माझ्यामध्ये आला होता. त्यामुळे मी ज्या पेठेत राहत असे त्या पेठेत अन्नाहारी मंडळाची स्थापना करण्याचा मी निश्चय केला. ही पेठ म्हणजे बेजवॉटरची होय. त्या पेठेत सर एडविन आर्नल्ड राहत असत. त्यांना उपाध्यक्ष होण्याबाबत विनंती केली. ते झाले. डॉ. ओल्डफील्ड अध्यक्ष झाले. मी मंत्री(चिटणीस) झालो. काही दिवसपर्यंत ही संस्था जेमतेम चालली. परंतु काही महिन्यानंतर तिचा शेवट झाला. कारण की मी माझ्या वहिवाटीप्रमाणे ठराविक मुदतीनंतर ती पेठ सोडली. परंतु या लहानशा व अल्पावधीतील अनुभवाने मला संस्था काढण्याचा व चालविण्याचा किंचित अनुभव मिळाला.



Comments

Popular posts from this blog

आमची लंडन ट्रिप

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४५